Saturday, October 15, 2011

अल्बर्ट एलिस

May 15, 2011

कॉग्निटिव्ह थेरपीला लोकप्रियता मिळवून देणारा, मानसशास्त्र, सामाजिक आणि लैंगिक विषयांवरचे 800 शोधनिबंध, 1200 लेख आणि 80 पुस्तकं लिहिणारा प्रभावशाली मानसशास्त्रज्ञ म्हणजे डॉ. अल्बर्ट एलिस (1913-2007) 1971 मध्ये "अमेरिकन ह्यूमॅनिस्ट असोसिएशन'नं एलिसला "मानवतावादी' म्हणून गौरवलं. 1982 मध्ये 800 मानसशास्त्रज्ञांच्या एका सर्व्हेक्षणावरून एलिस हा अमेरिकेतला दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रभावशाली सायकोथेरपिस्ट मानला गेला. 1985 मध्ये "अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन'तर्फे त्याच्या कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. 1957 ते 1982 या काळात जे 14000 शोधनिबंध प्रकाशित झाले, त्यांपैकी बहुतांशी शोधनिबंधांत एलिसच्या संशोधनाचा उल्लेख आलेला आहे.

एलिसवर ग्रीक तत्त्वज्ञ एपिक्‍टेटसच्या विचारांचा खूप प्रभाव होता. "तुम्ही ज्या तऱ्हेनं विचार करता, त्यावर तुमच्या मनातल्या भावना अवलंबून असतात आणि म्हणून एकदा का तुम्ही तुमची विचारांची पद्धत बदलली तर तुम्ही तुमच्या भावनाही बदलू शकता,' असं एलिस म्हणत असे.

17 सप्टेंबर 1913 रोजी एलिसचा जन्म अमेरिकेतल्या पिट्‌सबर्ग इथं झाला. आई-वडिलांचं दुर्लक्ष आणि नेफ्रायटिससारखा विकार यांनी त्रस्त असलेला एलिस कुठलाही मैदानी खेळ खेळू शकत नसे. एलिस अशक्त तर होताच; पण डोळे दुखणं, डोळ्यांतून पाणी येणं आणि डोकेदुखी या समस्यांमुळे तो बेजार असे. अंतर्मुख आणि एकांतप्रिय एलिसला मोजकेच मित्र-मैत्रिणी होते.

शाळेत असताना एलिसच्या मनावर थोरोच्या विचारांचा प्रभाव पडला होता. प्रचंड वाचनामुळे एलिसला त्याचे मित्र "बुकवर्म' म्हणून चिडवत. पौगंडावस्थेतील शारीरिक आणि मानसिक विचारांचा अभ्यास करण्यासाठी एलिसनं विल्यम बायर हॅवलॉक, डिकिन्सन आणि बीम, रॉबिन्सन आणि विल्यम रीत्रची पुस्तकं वाचली आणि या वाचनातून त्याचे हस्तमैथुनासंबंधीचे "ते अपायकारक किंवा अनैतिक असतं' असे (गैर) समज कोसळून पडले.
आपण एक चांगला लेखक व्हावं असंही एलिसला वाटे. शेक्‍स्पिअर, वर्डस्वर्थ, ब्राऊनिंग, शेले आणि टेनिसन यांच्या लिखाणानं एलिस भारावून जायचा.

एलिसनं कार्ल मार्क्‍सचं "दास कॅपिटल' वाचून त्यावर सोप्या भाषेत एक पुस्तक लिहिलं. कॉलेजमध्ये असताना अनेक राजकीय आणि सामाजिक विषयांवर रस निर्माण होऊन तो "यंग अमेरिका ऍन्ड न्यू अमेरिका' या संघटनेत सामील झाला. याच काळात त्याच मित्र त्याला त्यांच्या लैंगिक अडचणी सांगून त्याचा सल्ला मागत. त्यालाही हा सल्ला द्यायला आवडत असल्यामुळे त्याला "क्‍लिनिकल सायकॉलॉजी'मध्ये रस निर्माण झाला. मानसशास्त्राच्या क्षेत्रात येण्यापूर्वी लैंगिकतेवर एलिसनं अभ्यासपूर्ण केलं. हस्तमैथुन, कामवासना, लैंगिक स्वातंत्र्य, स्त्री-पुरुष संबंध आणि विवाहसंस्था याबद्दल त्याची मतं खूप वादग्रस्त ठरली.

एलिस 24 वर्षांचा असताना 1937 च्या दरम्यान कॅरल नावाच्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला. एलिसचं दिसणं, त्याची आर्थिक परिस्थिती, त्याचं जू असणं आणि त्याच्या आई-वडिलांचं विभक्त असणं या गोष्टी त्याच्या लग्नाच्या आड आल्या. पण एलिसनं जिद्द सोडली नाही. काही जवळच्या मित्रांच्या साक्षीनं एलिस आणि कॅरल यांनी लग्न केलं. एलिसच्या आयुष्यातली ही घटना म्हणजे हिंदी सिनेमासारखी प्रचंडच नाट्यमय ठरली. पण लग्नाच्या रात्रीच कॅरल त्याला सोडून जाते काय; काहीच दिवसांनी नैराश्‍याच्या गर्तेत असलेली कॅरल एलिसच्या आयुष्यात पुन्हा एकदा परतते काय; मागचे कडवट अनुभव विसरून तो तिच्यावर उपचार करतो काय आणि तिच्यासोबत लैंगिक सुखाचा अत्युच्च कोटीचा आनंद घेतो काय; सगळंच अजब ! एलिसच्या बाबतीत वैयक्तिक आयुष्यातली फरफट, प्रकृतीच्या अनेक व्याधी, कुटुंबाची जबाबदारी, नोकरीतला मिळणारा तुटपुंजा पगार आणि बाहेरच्या जगाकडून वारंवार होणारी अवहेलना म्हणजे कळसच होता ! एलिसनं या परिस्थितीत विवेकवादी विचार करून, समुपदेशन करून आनंदी राहण्याचा चक्क स्वतःलाच सल्ला दिला आणि तो अमलात आणला. त्यानं सुयोग्य अशा विचारांची तीन कार्डस्‌ तयार केली. त्यावरचे विचार वाचून एलिसनं आपल्या शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढवायला सुरवात केली. कन्फुशियसचे विचार वाचूनच तो दिवसाची सुरवात केली. कन्फुशियसचे विचार वाचूनच तो दिवसाची सुरवात करीत असे.

लग्न झालेलं असलं तरी नवरा-बायको यांना लैंगिक सुखाचा/ स्वातंत्र्याचा अधिकार असला पाहिजे, प्रेम हे आयुष्यात एकदाच होतं यावर त्याचा विश्‍वास नव्हता. एक व्यक्ती अनेकांवरही प्रेम करू शकते, असंही एलिसचं मात होतं. अनेक जोडीदारांसोबत स्वेच्छेनं जोडले गेलेले निरोगी संबंध एलिसला मान्य होते.

एलिसनं "लव्ह अँड मॅरेज प्रॉब्लेम्स इन्स्टिट्यूट (लॅम्प)' नावाची एक संस्था स्थापन केली. पण तेव्हा अशी संस्था काढण्यासाठी मानसशास्त्रातली पदवी असणं आवश्‍यक असल्यामुळे एलिसनं "क्‍लिनिकल सायकॉलॉजी' या शाखेत प्रवेश मिळवून एमए केलं आणि पीएच.डी. केली. एलिसकडे अनेक वेगवेगळे प्रश्‍न घेऊन लोक सल्ला विचारायला येत. त्यांच्याशी बोलताना त्यांचा रोगट लैंगिक दृष्टिकोनच त्यांच्या विकारांचं मूळ आहे हे त्याच्या लक्षात आलं. मग एलिस त्यांना चक्क लैंगिक गृहपाठ द्यायचा. लैंगिक सुखाचा अत्युच्च कोटीचा आनंद घेण्यासाठी एलिस त्यांना संभोगाच्या वेगवेगळ्या पद्धती शिकवायचा. काहींनी त्याला "कामशास्त्रातला चालता-बोलता ज्ञानकोश' ही पदवी देऊन टाकली होती. एलिसची "द फोल्कलोर ऑफ सेक्‍स, "द अमेरिकन सेक्‍शुअल ट्रॅजेडी', आणि "सेक्‍स विदाउट गिल्ट', "द केस फॉर सेक्‍शुअल प्रॉमिस्क्‍यूइटी' ही पुस्तकं अनेक वाद होत गाजली. रसेलच्या "मॅरेज अँड मॉरल्स'मधल्या विचारांनी, तसंच जॉन्स, अल्फ्रेड किन्से, अलेक्‍स कम्फर्ट, वात्स्यायन, हॅवेलॉक एलिस आणि मॅग्नस हर्चफेल्ड यांच्या लिखाणानं एलिसच्या मनात खळबळ उडवली. श्‍लील आणि अश्‍लील या व्यक्तीसापेक्ष संकल्पना आहेत, असं तो माने.

1950 मध्ये मानसशास्त्राचा प्रमुख म्हणून त्यानं न्यू जर्सीमध्ये पूर्ण वेळ काम बघायला सुरवात केली. 1952 पासून त्याचं नावं सेक्‍सोलॉजिस्ट म्हणूनच जास्त गाजायला सुरवात झाली होती. 1952 मध्ये त्यानं न्यूयॉर्कमधल्या मॅनहटनमध्ये प्रॅक्‍टिस सुरू केली. एलिसला डॉ. कार्ल रॉजर्स यांची व्यक्तिप्रधान उपचार पद्धत फारशी रुचत नव्हती. तो आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांवर फ्रॉईडची मनोविश्‍लेषण उपचारपद्धती वापरत असे.

1959 मध्ये एलिसनं "द इन्स्टिट्यूट ऑफ रॅशनल इमोटिव्ह थेरपी'ची स्थापना केली. प्रशिक्षण संस्था आणि सायकॉलॉजिकल क्‍लिनिक म्हणून तिचं कार्य सुरू झालं. एलिस अत्यंत अल्प मानधनावर इन्स्टिट्यूटचं काम पाहत असे. त्यानं "द लिव्हिंग स्कूल' नावाची एक खासगी प्राथमिक शाळाही स्थापन केली होती. भावनिक आरोग्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण देणं, हा शाळा स्थापन करण्यामागचा एलिसचा मुख्य उद्देश होता.

1960 च्या दशकात एकूणच "कॉग्निटिव्ह थिअरीज' खूप पुढे यायला लागल्या आणि जनमानसात रुजू व्हायला लागल्या. एलिसकडे पेशंट्‌सची गर्दी वाढतच चालली. रॅशनल थेरपी मांडल्यावर एलिसला अनेक वाद आणि टीका यांना सामोरं जावं लागलं. एलिसची रॅशनल थेरपी ही वरवरची मलमपट्टी आहे,' असं टीकाकार म्हणू लागले. विचार, भावना आणि आपली वागणूक या तिन्ही गोष्टी या थेरपीत महत्त्वाच्या आहेत आणि माणूस जेव्हा आपल्या दृष्टिकोनात म्हणजे विचारांमध्ये मुळापासून बदल करतो, तेव्हा तो त्याच्या भावनाही बदलून त्याच्यात आश्‍चर्यकारक बदल घडतो, असं एलिसचं ठाम मत होतं. "रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी (आरईबीटी)' या थेरपीवर ठिकठिकाणी एलिसनं व्याख्यानं दिली. न्यूयॉर्कपासून सुरू झालेल्या "रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी'च्या पुढे कॅनडा, अर्जेंटिना, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, रुमानिया, इटली, इस्राईल, ऑस्ट्रेलिया आणि स्वित्झर्लंडसह जगभर शाखा उघडल्या गेल्या. 40 वर्षांपेक्षा जास्त काळ एलिसनं "फ्रायडे नाईट वर्कशॉप' घेऊन स्वयंसेवकांना रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपीच्या प्रात्यक्षिकांनी दैनंदिन जीवनातले प्रश्‍न, कामात येणारे अडथळे, कौटुंबिक ताणतणाव, चिंता यावरच्या उपायायांचं प्रशिक्षण दिलं.

एलिसनं त्यांच्या "रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी'चा वापर जास्तीत जास्त करण्यास सुरवात केली. रुग्णाच्या मानसिक समस्येवर त्यानं "हाऊ टू लिव्ह विथ अ न्यूरॉटिक' नावाचं एक पुस्तकही लिहिलं. अभ्यासकांनी एलिसच्या या पुस्तकांची नोंद घेतली. एलिस स्वतःविषयी चिकार बढाया मारे. आपण टीचर्स कॉलेजमधले सगळ्यात हुषार विद्यार्थी आहोत किंवा प्रसिद्ध क्‍लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहोत किंवा अमेरिकेतला किंवा जगातला सगळ्यात प्रसिद्ध सेक्‍सॉलॉजिस्ट आहोत असं तो सर्वत्र जाहीरपणे सांगे.

विवाहसंस्थेबाबत स्वानुभव आणि अभ्यासावरून त्याची काही मतं ठाम होती. विवाहसंस्था पोखरली असून, केवळ सामाजिक दडपणांमुळे लग्नं केली किंवा टिकवली जातात. प्रत्येक व्यक्तीची वैशिष्ट्य लग्न करण्यास अनुकूल असतीलच असं नाही; पण तरीही लग्न झालंच पाहिजे अशी मानसिक गरज समाज व्यक्तीच्या मनात निर्माण करतो. एका ठराविक वयानंतर लग्न करायची पद्धत आहे म्हणून बहुतांशी लोक लग्न करतात. लग्न करताना किंवा जोडीदाराची निवड रताना मानसिक आणि शारीरिक गरजा यांचा विचार कुणीही करत नाही. लग्न करताना दिसणं (रूप), शिक्षण, समाजातील स्थान, सांपत्तिक स्थिती याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. एलिसच्या मते विवाहबह्य संबंध, वेश्‍यागमन, लैंगिक गुन्हेगारी, विकृत आणि छुपे संबंध समाजात वाढत असतील तर समाजाच्या निकोप मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. "समाजाची दिशाभूल हे एका जबाबदार मानसशास्त्रज्ञाला शोभत नाही, अश्‍लीलतेला उत्तेजन देणारं लिखाण वाचून लोकांत दुष्परिणाम होतील, धर्म बुडेल आणि विवाहसंस्था उद्‌ध्वस्त होतील' अशा प्रकारची आगपाखड विरोधकांनी एलिसवर केली.

एलिसचं स्वतःचं वैयक्तिक जीवन खूपच विचित्र होतं. एलिसच्या आयुष्यात अनेक स्त्रिया आल्या. शेवटच्या दिवसांत एलिसला मधुमेह, मूत्रपिंडाचे विकार, दृष्टी अधू होणं, ऐकू कमी येणं यांसारख्या अनेक व्याधींनी घेरलं होतं. 2000 मध्ये एलिसनं वयाच्या 86 व्या वर्षी डेबी जोफी या ऑस्ट्रेलियन सायकॉलॉजिस्टसोबत लग्न केलं ! एलिसच्या मृत्यूपर्यंत डेबीनं त्याला झकास साथ दिली. शेवटच्या दिवसांत एलिसला सौम्य स्वरूपाचा हार्ट अटॅक येऊनही तो विद्यार्थ्यांना शिकवत राहिला आणि शेवटपर्यंत दररोज 17-17 तास काम करत राहिला. आयुष्यातलं विनोदबुद्धीचं स्थान प्रचंड महत्त्वाचं तो मानत असे. आयुष्य मजेत जगलं पाहिजे म्हणणाऱ्या एलिसचा 24 जुलै 2007 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी मृत्यू झाला.

No comments:

Post a Comment