Saturday, October 15, 2011

बिहेविअरल थेरपी

May 08, 2011

1950 च्या दशकात बिहेविअरल थेरपीज पुढे यायल्या लागल्या. कुठलीही चेतना (स्टिम्युलस-एस) दिल्यावर त्याची काहीतरी प्रतिक्रिया (रिस्पॉन्स-आर) उमटते. या एस-आर जोड्यांचा अभ्यास करून माणसाची वागणूक/ बिहेविअर बदलायची ही यामागची विचारसरणी होती. 1951 मध्ये हावर्ड लिडेल हा कॉर्नेल विद्यापीठातला प्राध्यापक या तत्त्वांचा उपयोग करून माणसांमध्ये जसा न्यूरॉसिस दिसतो, तसाच न्यूरॉसिस मेंढ्या, बकऱ्या आणि डुकरं यांच्यात निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता.


इथाका इथे एका खोलीत लिडेल आणि त्याचे सहकारी एका मेंढीच्या पायाला एक तार जोडून ठेवत. यानंतर लिडेल त्या खोलीत एकदम एक प्रकाशझोत टाके आणि लगेच दहा सेकंदांनी त्या मेंढीला विजेचा एक झटका देई. सुरवातीला ती मेंढी फक्त विजेच्या धक्‍क्‍यानं उडी मारे; पण असं अनेक वेळा केल्यावर त्या मेंढीनं त्या प्रकाशझोताचा विजेच्या धक्‍क्‍याशी संबंध जोडला होता. यानंतर प्रकाशझोत बघितल्यावरच प्रत्यक्ष झटका बसण्यापूर्वीच ती मेंढी सैरभैर होऊन धावण्याचा प्रयत्न करायला लागे. यालाच "कंडिशनिंग' म्हणतात. असं 1000 वेळा केल्यावर तर प्रकाशझोताचीही गरज भासेनाशी झाली. ती मेंढी त्या खोलीत शिरल्यावर प्रकाशझोत बघण्याच्या अगोदरच सैरभैर होऊन धावायला लागली. याचा अर्थ, ती आता फक्त या खोलीचाही अर्थ त्या विजेच्या झटक्‍याशी जोडायला लागली होती. यानंतर पुढची पायरी म्हणजे मेंढीला तिच्या चरायच्या कुरणातून त्या खोलीकडे न्यायला लागल्यावरच डोळे गरगर फिरवणं, पाय झाडणं, सैरभैर धावणं हे सगळं मग सुरू व्हायचं. असं बरेच दिवस झाल्यावर ती मेंढी इतर मेंढ्यांना टाळायला लागली; आणि माणसाच्या न्यूरॉसिससारखीच लक्षणं ती मेंढी दाखवायला लागली.

मग लिडेलनं मेंढीमधला निर्माण झालेला न्यूरॉसिस काढण्यासाठी याच्याउलट प्रयोग करून तिला "डीकंडिशन' करण्यासाठी प्रयोग केला. त्यानं "न्यूरॉसिस' निर्माण झालेल्या मेंढीला पुन्हा त्या खोलीत नेऊन तिथे प्रकाशझोत टाकला; पण विजेचा झटका मात्र दिलाच नाही. असं अनेकदा केल्यानंतर तिची प्रकाशझोताची भीती गेली. अशाच तऱ्हेनं त्यानं तिची खोलीची आणि त्यानंतर कुरणाकडून खोलीकडे येण्याची भीती टप्प्याटप्प्यानं घालवली. त्यामुळे तो प्रकाशझोत बघितल्यावर, नंतर त्या खोलीत शिरताना आणि नंतर त्या कुरणातून खोलीकडे आणतानाही ती मेंढी कुठलाही त्रागा न करता यायला लागली होती. कालांतरानं ती इतर मेंढ्यांमध्ये मिसळायलाही लागली होती. अशा तऱ्हेनं ती मेंढी "डीकंडिशन' होऊन तिचा न्यूरासिस निघून गेला, पण त्यासाठी शेकडो, हजारो वेळा असे प्रयोग करावे लागले होते!

या खरं तर पाव्हलॉव्हच्याच पद्धती होत्या. पण पाव्हलॉव्हनं फक्त "कंडिशनिंग'साठी प्रयोग केले होते. लिडेलनं "डीकंडिशनिंग' करून निर्माण झालेला न्यूरॉसिस कमी करता येतो, हे दाखवून दिलं. दोन दशकं प्रयोग आणि संशोधन करून लिडेलनं आपले निष्कर्ष प्रबंधांच्या स्वरूपात सादर केले. अशा थेरपीज माणसांचेही काही मनोविकार बरे करण्यासाठी उपयोगी पडू शकतील, असं दक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्ग इथं जोसेफ वोल्प नावाच्या डॉक्‍टरला वाटायला लागलं होतं. वोल्पनं मांजरांवर कंडिशनिंग-डीकंडिशनिंगचे प्रयोग यशस्वीरित्या केले. तो या पद्धतीला "रेसिप्रोकल इनहिबिशन' किंवा "डीसेन्सिटायझेशन' असं म्हणे.

एखादी भीतीदायक गोष्ट बघताना जर खूप प्रसन्न आणि आल्हाददायक वातावरण निर्माण केलं तर त्या गोष्टीचं त्या प्रसन्न वातावरणाशी ऍसोसिएशन प्रस्थापित होईल आणि त्यामुळे त्या गोष्टीची भीती कमी होईल, असं वोल्पला वाटे. भयगंडाच्या रुग्णांना ज्या गोष्टींची भीती वाटत असेल, त्या गोष्टींची भयानकतेच्या चढत्या क्रमांकानं तो यादी करे. यानंतर तो रुग्णाला शांत, चिंतामुक्त वाटण्यासाठी शवासन करायला सांगे आणि त्याच वेळी आल्हाददायक वातावरण निर्माण करे. यानंतर त्या यादीतल्या सर्वांत कमी भीतीदायक गोष्टीची कल्पना तो रुग्णाला करायला लावे. त्या रुग्णाला त्या भीतिदायक गोष्टींचा विचार करताना आजूबाजूला आनंददायी वातावरण असल्यामुळे त्या गोष्टीची भीती वाटेनाशी होई. यानंतर वोल्प त्या यादीतली पुढची म्हणजेच पहिल्यापेक्षा जास्त भीतिदायक गोष्ट निवडे. मग या प्रक्रियेची पुनरावृत्ती होई आणि असं करत करत सगळ्या गोष्टींबद्दलची भीती तो त्या रुग्णाच्या मनातून पूर्णपणे नाहीशी करे.

या उपचारांना खूपच कमी म्हणजे फ्रॉईडच्या मनोविश्‍लेषणाच्या उपचारांच्या मानानं फक्त 5% च वेळ लागायचा! काहींना अंथरुणातच लघवीला होत असे आणि काहींना लघवी करण्याचीच भीती वाटे, तर काहींना गाडी चालवण्याची भीती वाटे. अशा अनेक केसेस वोल्पच्या उपचारांनी सुधारल्या. अर्थात जेव्हा ही भीती किंवा चिंता मानसिक असे, तेव्हाच हे उपाय उपयोगी पडत. त्सुनामी, भूकंप किंवा युद्ध यांच्यासारख्या संकटांमुळे वाटणारी ही भीती असेल तर या पद्धतींचा उपयोग होत नसे.

एकदा वोल्पकडे एक 27 वर्षांची तरुणी "फ्रिजिडिटी'ची म्हणजेच लैंगिक थंडपणाची तक्रार घेऊन आली होती. संभोगाच्या वेळी ती नवऱ्याच्या कृतींना भीतीमुळे काहीच प्रतिसाद देत नसे. या तऱ्हेच्या केसकडे फ्रॉईडनं किंवा नवफ्रॉईडवाद्यांनी कसं बघितलं असतं? त्यांनी लगेच तिच्या मनात लैंगिक व्यवहाराविषयी भीती निर्माण होण्यासारख्या गोष्टी (उदा. मॉलेस्टेशन) तिच्या लहानपणी घडल्या आहेत का, तिचे आणि तिच्या वडिलांचे संबंध कसे होते, त्यांच्यात आकर्षण होतं का, अशा तऱ्हेच्या प्रश्‍नांनी तिला भंडावून सोडलं असतं आणि नंतर त्यांच्या सायकोडायनॅमिक सायकोथेरॅपीचे वेळखाऊ उपाय सुरू केले असते.

पण वोल्पनं तिला कशाकशाची भीती वाटते अशा गोष्टींची यादी तिला विचारून केली. तिच्या दृष्टीनं एखाद्या नग्न पुरुषाचा पुतळा 30 फुटांवरून बघणं हे सगळ्यात कमी भीतिदायक होतं. वोल्पनं तिला रिलॅक्‍स्ड करून, आल्हाददायक वातावरण निर्माण करून अशा नग्न पुरुषाच्या पुतळ्याविषयी डोक्‍यात विचार आणायला सांगितलं. या दृश्‍यांबरोबर आनंददायी भावना जोडल्यामुळे या दृश्‍यांची भीती तिच्या मनातून हळूहळू गेली. यानंतर त्यानं तो पुतळा आणखी जवळ आहे अशी कल्पना तिला करायला सांगितली. त्याचीही तिच्या मनातली भीती गेली. असं करत करत शेवटी ती त्या पुतळ्याच्या शरीराला आपल्या हातानं स्पर्श करतेय हेही तिला कल्पायला सांगून त्याची भीती त्यानं काढून टाकली. यानंतर तिचा नवरा नग्नावस्थेत खोलीच्या एका टोकाला उभा आहे, अशी तिला कल्पना करायला सांगितलं आणि त्याचीही भीती काढून टाकली. मग तिच्या कल्पनेत पुतळ्यासारखंच तो नवराही पुढे सरकत सरकत खूप जवळ आला. तरीही तिला भीती वाटली नाही. मग सगळ्यात शेवटी हे पुतळे आणि कल्पना जाऊन प्रत्यक्ष नवरा दूरवरून हळूहळू सरकत नग्नावस्थेत पुढे आला. शेवटी तिनं त्याच्या शरीराला प्रत्यक्ष स्पर्श केला, त्यातही तिला आनंद वाटायला लागला. आणि असं बरंच काय काय झालं. त्या सगळ्या गोष्टी लिहिण्यापेक्षा कल्पना केलेल्याच बऱ्या; पण शेवटी तिला लैंगिक क्रियांमध्ये आणि संभोगामध्ये आनंद वाटायला लागला. तिची फ्रिजिडिटी, लैंगिक थंडपणा नाहीसा झाला आणि तिची वोल्पबरोबर 20 सेशन्स होईपर्यंत दर आठवड्याला ती तिच्या नवऱ्याबरोबर अनेक वेळा अत्युच्च लैंगिक आनंदाचा अनुभव घ्यायला लागली.

बिहेविअरल थेरपीवर आधारित "ऍव्हर्सिव्ह कंडिशनिंग' आणि "ऑपरॅंट कंडिशनिंग' अशा अनेक मानसोपचारपद्धती निघाल्या. दारू, ड्रग्ज किंवा तंबाखू यांची व्यसनं किंवा लैंगिक विकृती अशांसारख्या गोष्टींवर "ऍव्हॅर्सिव्ह कंडिशनिंग'ची पद्धत वापरत. जर या व्यसनांपैकी एखादी गोष्ट केली, तर त्या रुग्णाला लगेच वेदना जाणवतील (उदा. शॉक) असं काहीतरी करायचं आणि त्यामुळे व्यसन आणि होणाऱ्या वेदना यांचं पक्कं नातं (ऍसोसिएशन) त्या रुग्णाच्या मनात तयार होईल आणि मग या व्यसनाची नुसती आठवणसुद्धा त्या रुग्णाला नकोशी होईल, असं बिहेविअर थेरपी म्हणत होती. ऍव्हर्सिव्ह कंडिशनिंगमध्ये दारू प्यायल्यावर ज्यामुळे नॉशिया निर्माण होईल, असं एक औषध दिलं जाई. यानंतर हे औषध देण्याऐवजी विजेचे झटके देणं सुरू झालं. "ऍव्हर्सिव्ह कंडिशनिंग'चा वापर "समलिंगत्व' बरा करण्यासाठीही पूर्वी केला गेला. पण 1970 च्या दशकात "समलिंगत्व' हा विकार नसून, हा ज्याच्या त्याच्या लैंगिक निवडीचा प्रश्‍न आहे, असं मत झाल्यापासून हे "उपाय' बंद करण्यात आले.
"ऑपरॅंट कंडिशनिंग' या पद्धतीमध्ये जे आपलं ध्येय आहे, त्याचे छोटे छोटे भाग पाडण्यात येतात. दर टप्प्यासाठी बक्षीस (रिवार्ड) आणि शिक्षा (पनिशमेंट) यांची पद्धत वापरली जाते. रुग्णानं कुठल्याही टप्प्यात आपल्याला पाहिजे तशी कृती केली तर त्याला लहानसं बक्षीसं दिलं जातं आणि मग पुढच्या टप्प्याकडे वाटचाल केली जाते. असं करत करत शेवटी तो रुग्ण आपल्याला पाहिजे ती कृती करायला लागेल हे अपेक्षित असतं. लहान मुलांच्या बाबतीतच सांगायचं झालं, तर शाळेला कंटाळलेल्या मुलाला प्रत्येक टप्प्याला रिवॉर्ड आणि पनिशमेंट वापरून त्याला हळूहळू शाळेत जायला प्रवृत्त करणं, हा उद्देश असतो. मोठ्या माणसांच्या बाबतीत जरी बक्षिसाचे प्रकार वळ असले, तरी अशाच तऱ्हेची पद्धत वापरली जाते. "अप्लाईड बिहेविअर ऍनालिसिस (ABA)' आणि भाषेकरता स्किनरच्या पद्धतीवर आधारलेली "व्हर्बल बिहेविअर ऍनालिसिस (VBA)' या दोन्ही थेरपीज ऑटिस्टिक आणि इतर मनोविकारांसाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात.

डीसेन्सिटायझेशनच्या तंत्राचा वापर स्त्रियांना ऑर्गझॅमपर्यंत पोचवण्यासाठी विल्यम मास्टर्स आणि व्हर्जिनिया जॉन्सन यांनी 1960 च्या दशकाच्या शेवटी केला. हे दोघंही माणसाच्या लैंगिकतेविषयी संशोधन करत होते. त्यानंतर डीसेन्सिटायझेशनच्या वेगवेगळ्या सुधारित आवृत्त्या आणि बिहेविअरल थेरपीची अनेक अंगं पुढे आली. आयसेंक आणि अर्नोल्ड लाझारस यांनी या पद्धतीचा वापर केला. लाझारस यानं "बिहेविअरल थेरपी' हा शब्द प्रथम वापरला. वोल्पनं अमेरिकेत येऊन "बिहेविअरल थेरपी'वर संशोधन आणि प्रशिक्षण यांच्यासाठी एक संस्थाही काढली. वोल्पनं आणि लाझारसनं मिळून "बिहेविअर थेरपी टेक्‍निक्‍स' नावाचं एक पुस्तकही लिहिलं. यानंतर बिहेविअरल थेरपीवर अनेक लेख आणि पुस्तकं प्रकाशित व्हायला लागली. यानंतर कॉग्निटिव्ह थेरपी उदयास येईपर्यंत बिहेविअर थेरपीचं राज्य अबाधित होतं.

बिहेविअरल थेरपीवर आधारित "ऍव्हर्सिव्ह कंडिशनिंग' आणि ऑपरॅंट कंडिशनिंग' अशा अनेक मानसोपचारपद्धती निघाल्या. मनोविकारासाठी पुढेही विविध पद्धती आल्या. जोसेफ वोल्प याने "रेसिप्रोकल इनहिबिशन' किंवा "डीसेन्सिटायझेशन' ही पद्धती विकसित केली. वोल्प आणि लाझारसनं "बिहेविअर थेरपी टेक्‍निक्‍स' नावाचं पुस्तकही लिहिलं. कॉग्निटिव्ह थेरपी उदयास येईपर्यंत बिहेविअर थेरपीचं राज्य अबाधित होतं.

No comments:

Post a Comment