Saturday, October 15, 2011

पिअँजेचं बालमानसशास्त्र

September 04, 2011

पली वाढ ही "कंडिशनिंग' आणि अनुकरण यांच्यामधून होत असते, असं बिहेवियरिस्ट मानत. पण पिअँजेचं या दोन्हींबद्दल दुमत होतं. भोवतालची परिस्थिती आणि लहान मुलं यांच्यातल्या परस्परसंबंधांवर आणि इंटरऍक्‍शनवर त्या मुलाची वाढ अवलंबून असते असं तो माने. उदाहरणार्थ, अर्भक प्रथम फक्त दूधच पचवू शकतं, पण त्या दुधामुळेच त्याच्यामध्ये सॉलिड अन्न पचवण्याची शक्ती येते, तसंच बुद्धीचं असतं. सर्वप्रथम मुलांना अगदी सोप्या गोष्टीचं आकलन होऊ शकतं, पण या आकलनामुळेच त्याची आकलनशक्ती वाढते आणि तो जास्त गुंतागुंतीच्या गोष्टी समजून घेऊ शकतो आणि ही वाढ अशी होतच राहते.

टोपीखाली एखादं खेळणं लपवलं तर ते लहान बाळाच्या लक्षात येत नाही, याचं कारण या टप्प्यापर्यंत डोळ्यासमोर जे दिसतं तेवढंच त्या मुलाच्या लक्षात राहतं. पूर्वी बघितल्याची स्मृती त्याच्याकडे साठवलेली नसते. पण जेव्हा रांगत जाताना त्याला ते खेळणं दिसतं तेव्हा तो हळूहळू शिकत जातो. यानंतर टोपीखाली लपवलेलं खेळणं त्याच्या लक्षात राहायला लागतं. असे असंख्य प्रयोग करून त्यानं सखोल अभ्यास केला. या अभ्यासावरून पिअँजेनं मुलाच्या मानसिक वाढीमधले चार टप्पे मांडले. जन्मापासून ते दीड-दोन वर्षांपर्यंतचा "सेन्सरीमोटर' टप्पा, सात वर्षांपर्यंतचा दुसरा "प्रीऑपरेशनल' टप्पा, 7 ते 12 या वयोगटाचा "कॉंक्रीट ऑपरेशन्स'चा तिसरा टप्पा आणि "फॉर्मल ऑपरेशन्स' हा 12 वर्षांनंतरचा अखेरचा चौथा टप्पा, असे हे चार टप्पे होते.

पहिल्या "सेन्सरीमोटर' टप्प्यात मुलाला फक्त संवेदना (सेन्सेशन) जाणवतात. त्यांचा तो बाहेरच्या वस्तूंशी संबंध जोडायला जात नाही. अनेक सेन्सेसमध्ये सुसूत्रपणाही मुलाला जाणवत नाही. त्यामुळे खेळण्याकडे बघून ते घेण्यासाठी हात पुढे करणं यालाही काही काळ जावा लागतो आणि जरी वस्तू हाती लागल्या तरी त्या कशा आहेत, हे त्याला माहीत नसतं. मग प्रयोग चालू होतात. यामुळे मग स्पर्श करणं, तोंडात घेणं, हुंगणं, हलवणं असं कुठल्याही हाती लागलेल्या वस्तूंविषयी सुरू होतं. यातूनच बाह्य जगाचं त्याचं प्राथमिक ज्ञान वाढत जातं.
याबरोबरच स्मृतीची वाढ होत गेल्यानं मुलं मग त्या वस्तूंचे स्पर्शांचे, चवीचे, आकाराचे, वासाचे अनुभव साठवून ठेवायला लागतात. यामुळेच काही महिन्यांनंतर टोपीखाली लपवलेल्या गोष्टींची त्यांना आठवण किंवा भान राहायला लागतं. एखादी वस्तू दिसत नसली तरी त्याचं अस्तित्व जाणवणं या अवस्थेला पिअँजे "ऑब्जेक्‍ट पर्मनन्स' म्हणायचा.

पहिल्या टप्प्याच्या शेवटी मुलं त्यांच्या या साठवलेल्या ज्ञानभंडाराचा उपयोग वेगवेगळे प्रश्‍न सोडवण्यासाठी करायला लागतात. त्यानं त्याच्या ल्यूसिन आणि जॅकलिन या दोन मुलींवर याच वयात असताना अनेक प्रयोग करून हे निष्कर्ष काढले आहेत.

वाढीचा दुसरा "प्रीऑपरेशनल' टप्पा दीड-दोन वर्षांपासून ते सात वर्षांपर्यंत टिकतो. या काळात मूल अनेक शब्द आणि अनेक संकल्पना शिकतं. बाहेर दिसणाऱ्या वस्तूंविषयी ते चिन्हं, संकल्पना, शब्द, गुणधर्म या स्वरूपात विचार करायला लागतं आणि शिकतं. दोन वर्षांचा मुलगा एक लाकडी वस्तू जमिनीवरून फिरवून आगगाडीसारखा आवाज काढायला शिकतं. तीन वर्षांचा मुलगा रिकाम्या कपातून पिण्याचं सोंग करायला लागतो. पण अजूनही वेळ, तुलना, मोजमापं (क्वांटिटी) आणि पर्स्पेक्‍टिव्ह या गोष्टी मुलाला कळलेल्या नसतात. मुलाला या टप्प्यात केवळ संकल्पनांवर विचार करून निष्कर्ष काढणं अशा गोष्टी अजून शक्‍य नसल्यामुळेच पिअँजे या टप्प्याला "प्रीऑपरेशनल' म्हणे. वर्गीकरण करणं, संपूर्ण गोष्टीतला किंवा कल्पनेतला काही विशिष्ट भाग ओळखता येणं, थोडक्‍यात, माहितीचं रूपांतर (ट्रान्स्फर्मेशन) करणं, याला पिअँजे "ऑपरेशन' म्हणे. यामुळेच जर आठ सोंगट्या एकत्र ठेवल्या तर त्यांची संख्या त्याच सोंगट्या पसरून ठेवल्यानंतर वाटणाऱ्या संख्येपेक्षा कमी आहे, असं पाच वर्षांचा मुलगा सांगतो किंवा तेच पाणी एका भांड्यातून दुसऱ्या अरुंद पण उंच भांड्यात टाकलं तर ते त्याला जास्त आहे असं वाटतं. अजूनही 2 ु 4 आणि 4 ु 2 हे एकच आहेत, हे या टप्प्यातल्या सगळ्यांना कळतंच असं नाही.

दुसऱ्यांच्या पर्स्पेक्‍टिव्हमधून गोष्टी कशा दिसतात हे या टप्प्यात अजून लक्षात येत नाही. यामुळेच पिअँजे या अवस्थेला "इगोसेंट्रिक' म्हणायचा. ते तपासण्यासाठी पिअँजेनं एका डोंगराच्या प्रतिकृतीपाशी एक बाहुली ठेवली. यानंतर त्याच डोंगराचे तीन वेगवेगळ्या पर्स्पेक्‍टिव्ह्‌जमधले फोटो त्या मुलाला दाखवले आणि बाहुलीला तो डोंगर कसा दिसत असेल असं मुलांना विचारलं. त्याचबरोबर बहुतांशी मुलांनी बाहुलीऐवजी त्यांना स्वतःलाच तो डोंगर जसा दिसत होता तसाच फोटो निवडला. या टप्प्यात इतर लोक किंवा मुलं एखाद्या गोष्टीविषयी कसा विचार करताहेत, याविषयी कल्पना किंवा विचार करणं मुलांना जड जातं.

पिअँजेनं केलेला एक प्रयोग खूप प्रसिद्ध आहे. त्यानं एक लंबक (पेंड्युलम) घेतला आणि त्याची लांबी, त्याचं वजन आणि त्याला झोका देताना लावलेला जोर यांचा त्यात लंबकाच्या झोक्‍याच्या वेगावर आणि काढलेल्या अंतरावर काय परिणाम होतो, ते बघायला अनेक वयोगटांतल्या मुलांना सांगितलं. "प्रीऑपरेशनल' गटातल्या मुलांकडे हे तपासण्यासाठी काहीच योजना नव्हती. त्यांनी लंबकाची लांबी, वजन आणि लावलेला जोर या गोष्टी एकाच वेळी रॅंडमली बदलल्या; आणि कसेही वेडेवाकडे प्रयोग करून निरीक्षणं केली. थोडक्‍यात, त्यांची तर्कबुद्धी पूर्णपणे विकसित न झाल्यामुळे त्यांचे निष्कर्ष कित्येकदा चुकतच होते!

7 ते 12 या वयोगटातल्या टप्प्याला पिअँजे "कॉंक्रीट ऑपरेशन्स' म्हणे. या टप्प्यात मुलगा मोजणं, वर्गीकरण करणं अशा गोष्टी शिकतो. गोष्टींमधले संबंध, त्यांच्यातल्या तुलनाही त्याला कळायला लागतात. पूर्वीच्या "प्रीऑपरेशनल' अवस्थेतल्या मुलांना "बहीण' हा शब्द माहीत असतो, पण त्याचा अर्थ कळत नसतो. त्याला "लहान' हा शब्द माहीत असतो, पण दोन वस्तू समोर ठेवल्या तर त्यातली कुठली लहान आहे ते त्याला नक्की सांगता येत नाही. पण 7 ते 12 वयातल्या "कॉंक्रीट ऑपरेशन्स'च्या टप्प्यात मुलगा या दोन्ही गोष्टी सहजपणे करतो. या वयोगटातल्या मुलांना स्वतःपेक्षा बाहेरचंही जग असतं, हे जाणवायला लागतं. थोडक्‍यात, तो मुलगा फक्त "इगोसेंट्रिक' राहत नाही. पूर्वीच्या "प्रीऑपरेशनल' अवस्थेतल्या मुलाला "रात्री अंधार का पडतो?' असं विचारलं तर "आपल्याला झोपायचं असतं म्हणून' असं तो उत्तर देईल; पण या कॉंक्रीट ऑपरेशन्स'च्या अवस्थेत "सूर्य मावळल्यामुळे रात्र होते' असं तो उत्तर देतो. दुसऱ्याचंही पर्स्पेक्‍टिव्ह, त्यांचा दृष्टिकोन, विचार, म्हणणं त्याला समजायला लागतं. पण अजून तर्कानं योग्य निष्कर्ष काढणं त्यांना पूर्णपणे जमत नाही.

12 वर्षांनंतरच्या वाढीच्या शेवटच्या अवस्थेला पिअँजे "फॉर्मल ऑपरेशन्स' म्हणे. या अवस्थेत मुलं ऍब्स्ट्रॅक्‍ट गोष्टींविषयी विचार करायला शिकतात. बीजगणितातले "क्ष' किंवा "य' हे काही प्रत्यक्षातले आकडे नसतात. ते कुठल्यातरी आकड्यांचं प्रतिनिधित्व (रिप्रेझेंटेशन) करत असतात, म्हणून ते ऍब्स्ट्रॅक्‍टच असतात. यामुळेच या अवस्थेनंतर मुलांना बीजगणित कळायला लागतं. वैज्ञानिक गोष्टी, त्यांची तत्त्वं आणि त्यांच्यातले ऍब्स्ट्रॅक्‍ट संबंधही याच वयात लक्षात यायला लागतात. ते कुठल्या गृहितांवर आधारलेले आहेत तेही समजायला लागतं. ते आता गुंतागुंतीची कोडी सोडवायला लागतात. आजूबाजूचं जग, त्यातल्या शक्‍यता (पॉसिबिलिटीज, प्रोबॅबिलिटीज) यांच्याविषयीचं आकलन आणि अंदाज आता ते करायला लागतात. या जगात काय अशक्‍य आहे, हेही आता त्याला कळायला लागतं. त्याला आता कुठल्याही गोष्टीचा फॉर्म आणि कंटेंट (बाह्यस्वरूप) यातला फरक कळायला लागतो.

जेरोम कगान यानं पिअँजेच्या या सगळ्या विचारांना महत्त्वाचं आणि "ओरिजनल' मानलं. टीनएजर्समध्येच जास्त आत्महत्या का होतात, त्याअगोदर का नाही, हा प्रश्‍न मानसशास्त्रज्ञांना बरेच दिवस भेडसावत होता. पण आता त्याचं उत्तर मिळालं होतं. याच वयात आता आपल्यासमोर काय पर्याय आहेत आणि त्यातले कुठले शक्‍य आहेत, याविषयीचे विचार परिपक्व होतात आणि म्हणून जेव्हा आयुष्यातल्या या सगळ्या शक्‍यता संपतात; सगळेच रस्ते बंद झाल्यासारखं वाटतं तेव्हाच आत्महत्येचे विचार येतात. त्यापूर्वी हा विचार न येण्याचं कारण तोपर्यंत सगळ्या शक्‍यतांविषयी मुलाला पूर्णपणे कल्पनाच नसते.
याच वयात कुणाचेही विचार (उदा.- विवेकानंद, वैज्ञानिक दृष्टिकोन) आणि प्रत्यक्षातली वागणूक (उदा.- बाबा, साधू, नवस. अशी अविवेकवादी, अवैज्ञानिक वागणूक) यातला परस्परविरोध लक्षात येतो. त्यामुळेच या वयात बंडखोरी वाढते. याच वयात आई-वडील किंवा मोठे केवळ सांगताहेत म्हणून बरोबर मानणं, याविरुद्धही संघर्षही सुरू होतो.

कगानप्रमाणेच पिअँजेची अनेकांनी खूप स्तुती केली, पण कित्येकांनी पिअँजेच्या थिअरीत सुधारणाही सुचवल्या. काहींनी तर त्याच्या विचारांना चक्क विरोध केला. आतापर्यंत पिअँजेच्या विचारांविषयी अक्षरश: हजारो, लाखो लेख आणि संशोधनप्रबंध प्रकाशित झाले आहेत!

पिअँजेचे विचार युरोपमध्ये उगम पावले आणि तिथेच फुलले, बहरले. ते जेव्हा 1920 च्या दशकात अमेरिकेत आले तेव्हा तिथे बिहेवियरिझमचा एवढा प्रभाव होता, की पिअँजेच्या थिअरीकडे सगळ्यांनी जातीनं दुर्लक्षच केलं. जेव्हा 1960 च्या दशकात कॉग्निटिव्ह विचार पुढे आले; स्मृती, शिक्षण, भाषा अशा गोष्टींवर विचार सुरू झाला तेव्हा पुन्हा पिअँजेच्या थिअरीजवर अमेरिकेत नव्यानं विचार सुरू झाला. कॉग्निटिव्ह आणि डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी एकत्र आल्यामुळे संशोधक आता नव्यानं प्रश्‍न विचारायला लागले. लहान मुलांमध्ये स्मृती कशी आणि केव्हा निर्माण होते, लहान मुलाला स्वत:ची जाणीव केव्हा होते, तो भाषा केव्हापासून आणि कसा शिकतो, असे ते प्रश्‍न होते. यांच्याविषयी मग अनेक प्रयोग करण्यात आले आणि त्यामुळे या दोन्ही ज्ञानशाखा खूप पुढे गेल्या. या सगळ्यात पिअँजेनं घातलेला पाया हा प्रचंड महत्त्वाचा होता. पिअँजेला विसाव्या शतकातला सर्वश्रेष्ठ बालमानसशास्त्रज्ञ मानतात ते काही उगीचच नाही!

No comments:

Post a Comment