Saturday, October 15, 2011

'नाझींनी मध्ययुगात मलाच जाळलं असतं!'

March 27, 2011

फ्रॉईडला उत्तरायुष्यात नाझी राजवटीचा त्रास सहन करावा लागला. आयुष्यातील शेवटची काही वर्षे सोडली तर त्याने कायम लेखन आणि संशोधन सुरू ठेवलं होतं. नाझी सैनिकांनी फ्रॉईडचं लिखाण ज्यू पोर्नोग्राफी म्हणून जाळून टाकलं होतं. नाझी राजवटीला कंटाळून फ्रॉईडला लंडनला यावं लागलं. तेथेही त्याच्या भेटीसाठी अनेक विचारवंत व कलाकार येत असत. फ्रॉईडच्या या अखेरच्या दिवसांबद्दल...


फ्रॉईडची ब्रुअरबरोबर मैत्री संपून बराच काळ लोटला होता आणि त्याचे फ्लीसबरोबरचे संबंधही दुरावत चालले होते. फ्रॉईडला खूपच एकाकी वाटायला लागलं होतं. आपली बायको मार्था हिच्याबरोबरच्या संबंधांतली उत्कटता आणि तीव्रता खूपच कमी झाल्यामुळे त्याचा एकटेपणा वाढला होता.
1901 सालापासून पुन्हा फ्रॉईडच्या आयुष्यात थोडेसे आशेचे किरण डोकवायला लागले. त्याला व्हिएन्ना विद्यापीठात प्राध्यापकाची बढती मिळाली.

यानंतरच्या त्याच्या आयुष्यात तो "प्रोफेसर फ्रॉईड' म्हणूनच ओळखला जायला लागला. 1902 मध्ये विल्हेम स्टेकेलसमवेत त्यानं "वेनस्डे सायकॉलॉजिकल सोसायटी' स्थापन केली. 1906 पर्यंत या सोसायटीचे 17 सदस्य झाले आणि दोन वर्षांनंतर तो गट आणखी बराच वाढला. आता त्याचं नाव "व्हिएन्ना सायकोऍनॅलिटिक सोसायटी' असं झालं होतं. या सोसायटीचा बुद्धिवाद्यांमध्ये दबदबा होताच; मग हे लोण जगभर पसरलं. यातूनच त्याच साली नरेम्बर्गच्या एका सभेत "दि इंटरनॅशनल सायकोऍनेलेटिक असोसिएशन'ची स्थापना झाली. या सगळ्यामुळे फ्रॉईडची प्रसिद्धी तर वाढलीच, पण त्याची प्रॅक्‍टिसही उत्तम चालायला लागली. आता त्यानं एक मोठं घर घेतलं होतं आणि पॉश ऑफिसही थाटलं होतं. 9 महिने तो प्रचंड परिश्रम करून मग 3 महिने सुटीवर जायचा आणि मग मार्था आणि त्याची सहा मुलं यांना घेऊन तो कुठल्याशा डोंगराळ भागात मनसोक्त भटकायचा.

मार्था पतिव्रता होती. फ्रॉईडची सेवा करण्यातच ती आनंद माने. त्याचे घालायचे कपडे बाहेर काढून ठेवण्यापासून त्याच्या टूथब्रशवर टूथपेस्ट लावून देण्यापर्यंत त्याची सर्व कामं ती करायची. त्यामुळे फ्रॉईडला त्याच्या लिखाणात, संशोधनात आणि कामात वेळ देता आला. दररोज 8-9 तास काम केल्यानंतर तो अनेक तास आपल्या लिखाणात घालवे. यामुळेच संपूर्ण आयुष्यात तो 20 च्या वर ग्रंथ लिहू शकला!

1906 मध्ये फ्रॉईडच्या चाहत्यांनी त्याचा वाढदिवस साजरा केला. तोपर्यंत आपलं लिखाण आणि संशोधन यात त्यानं प्रचंड नावलौकिक मिळवला होता. त्याला वाढदिवसाची भेट म्हणून एक पदक देण्यात आलं. त्याच्यावर एका बाजूला शिल्पकार कार्ल श्‍वेर्डट्‌न यानं फ्रॉईडचं चित्र कोरलेलं होतं, तर दुसऱ्या बाजूला ग्रीक दैवतकथांमधला पण फ्रॉईडच्या विचारसरणीशी जुळणारा असा प्रसंगही कोरला होता. स्फिंक्‍सला उत्तर देणाऱ्या इडिपसचं त्यावर चित्र होतं आणि त्यावर सोफोक्‍लिज्‌च्या शोकांतिकेतली वाक्‍यं होती. त्या पदकावर "अत्यंत कठीण प्रश्‍नांची उकल करणारा हा सर्वांत समर्थ महान मानव आहे' अशी फ्रॉईडच्या स्तुतिपर वाक्‍यं होती.

1909 मध्ये अमेरिकेतल्या क्‍लार्क विद्यापीठात प्रमुख वक्ता म्हणून फ्रॉईडला आमंत्रण आलं. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला प्रथमच एवढा बहुमान मिळत होता. वेर मिचेलसारख्या काही तज्ज्ञांना त्याची लैंगिकतेविषयीची मतं अनैतिक वाटली, तर "फ्रॉईड आपल्याला पुन्हा रानटी माणसांसारखंच वागण्याचा सल्ला देतोय,' असं कॅनडातल्या एका विद्यापीठाचा प्रमुख म्हणाला! पण विल्यम जेम्ससकट इतर अनेक मानसशास्त्रज्ञ फ्रॉईडच्या भाषणांनी खूपच प्रभावित झाले. त्याची भाषणं "अमेरिकन जर्नल ऑफ सायकॉलॉजी'मध्ये छापलीही गेली. फ्रॉईड युरोपमध्ये परतला तोपर्यंत अमेरिकेत तो खूपच प्रसिद्ध झाला होता.

याच काळात फ्रॉईडनंच सुरू केलेल्या "व्हिएन्ना सायकोऍनॅलिटिक सोसायटी'मध्ये खूप वाद सुरू झाले. त्याचे आल्फ्रेड ऍडलर, ऑट्टो रॅंक आणि कार्ल युंग हे तीन शिष्य आणि सहकारी यांच्याबरोबर मतभेद विकोपाला गेले. फ्रॉईडचे त्याच्या सगळ्याच मित्रांबरोबर आणि शिष्यांबरोबरचे संबंध बिघडल्यामुले फ्रॉईड आणखीच एकाकी पडला. पहिल्या महायुद्धाच्या धुमश्‍चक्रीत त्याची प्रॅक्‍टिस कमालीची खालावली. फ्रॉईडनं अंतर्मनात खोलवर शिरून त्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला खरा; पण आपण शिकतो कसं, तर्क कसा चालवतो, बुद्धी म्हणजे काय, सर्जनशीलता म्हणजे काय वगैरे गोष्टींवर फ्रॉईडनं फारसा विचार केलाच नव्हता. 1920 च्या दशकापर्यंत बिहेविअरिझमची थिअरी खूप लोकप्रिय झाली होती. पण फ्रॉईडला ती फारशी महत्त्वाची वाटली नाही.
फ्रॉईडच्या काळात अनेकांना फ्रॉईडच्या मानसोपचाराच्या पद्धतीमधल्या मर्यादा लक्षात यायला लागल्या होत्या. अंतर्मनातल्या आणि अनकॉन्शसमधल्या भावना आणि विचार हे एवढ्या गुंतागुंतीचे असतात, की एखाद्याला "फ्री असोसिएशन'च्या पद्धतीप्रमाणे मुक्तपणे बोलकं करून त्याच्या अंतर्मनातलं सगळं बाहेर काढणं म्हणजे जवळपास अशक्‍यप्राय आणि प्रचंड वेळखाऊ काम असतं. मग फ्रॉईडच्या काही शिष्यांनी फ्रॉईडच्या पद्धतीतच 1913 सालाच्या सुमारास शॉर्टकट काढून बदल करायला सुरवात केली. फ्रॉईडनं या नव्या पद्धतीला जोरदार विरोध केला. दोन महायुद्धांच्या मधल्या काळात, म्हणजे 1920 ते 1940 च्या दरम्यान फ्रॉईडच्या प्रसिद्धीनं आणि लोकप्रियतेनं कळस गाठला. आइनस्टाइनच्या बरोबरीनं जग बदलणाऱ्यांमध्ये त्याचंही नाव आता घेतलं जाऊ लागलं. 1927 मध्ये "द फ्युचर ऑफ ऍन इल्युजन' हे धर्मसंस्थेच्या उगमावर विवेचन करणारं पुस्तक, तर 1930 मध्ये "सिव्हिलायझेशन अँड इट्‌स डिसकंटेट्‌स' हे समाजकारण आणि राजकारणाविषयीचेच विचार मांडणारं पुस्तक त्यानं लिहिलं. फ्रॉईड म्हणतो, "ज्याला आपण सुसंस्कृत जीवन म्हणतो ते म्हणजे आपल्या इच्छा आणि लैंगिक प्रवृत्ती दडपून टाकणं आणि त्यांच्यात तडजोड करणं.' त्यानं एकच देव मानणाऱ्या धर्माच्या उगमाविषयी "मोझेस अँड मोनोथेईझम' हे पुस्तक 1939 मध्ये लिहिलं.

नाझी विचारसरणीचा जोर या काळात वाढत होता. त्यांना फ्रॉईडचे "विकृत' विचार मुळीच पटत नव्हते. 1933 मध्ये त्यांनी फ्रॉईडची पुस्तकं जाहीररीत्या जाळायला सुरवात केली. "मध्ययुगात त्यांनी मलाच जाळलं असतं. आता त्यांना माझ्या पुस्तकांवरच समाधान मानावं लागतंय,' असं फ्रॉईड त्या वेळी म्हणाला. फ्रॉईडच्या सगळ्या बहिणी नाझी राजवटीत मारल्या गेल्या. 1938 मध्ये नाझी राजवटीनं ऑस्ट्रियावर कब्जा मिळवला आणि त्यांनी फ्रॉईडचा पासपोर्ट रद्द केला! नाझी लोकांनी फ्रॉईडचं लिखाण "ज्यू पोर्नोग्राफी' म्हणून जाळून टाकलं! याच सुमाराला फ्रॉईडची प्रकृती खूपच खालावली होती. लंडनमधल्या अर्न्स्ट जोन्स या फ्रॉईडच्या मित्रानं फ्रॉईडनं लंडनला स्थायिक होण्यासाठी त्याच्याशी चर्चाही केली, पण फ्रॉईडला लंडनला जाण्यात रस नव्हता. शेवटी लंडनला गेल्यामुळे फ्रॉईडच्या मुलांना चांगलं भवितव्य मिळेल, असा जोन्सनं केलेला युक्तिवाद फ्रॉईडला पटला आणि तो लंडनला जायला तयार झाला. पण लंडनला जाण्यासाठी फ्रॉईडला नाझी राजवटीच्या परवानगीची गरज होती. शेवटी रुझवेल्टच्या मध्यस्थीनं ती कशीबशी मिळाली. पण फ्रॉईडला लंडनला जाण्यासाठी 20,000 पौंड्‌स एवढी रक्कम मोजावी लागली. शेवटी त्यानं लंडनला मुक्काम हलवला. तिथे त्याला भेटायला स्टीफन झ्वाईग, सॅल्व्हॅदॉर दाली, ब्रॉनिस्लाव्ह मॅनिनोव्हस्की, चेम वीझमॅन वगैरे विचारवंत आणि कलाकार येत. लंडनच्या रॉयल सोसायटीचे सचिवही एकदा त्याची सही घेण्यासाठी सोसायटीचं चार्टर बुक घेऊन त्याच्याकडे आले. असा मान यापूर्वी फक्त राजालाच मिळाला होता!

फ्रॉईड 67 वर्षांचा असताना फ्रॉईडला वरच्या जबड्याचा कॅन्सर झाला. पुढच्या 16 वर्षांत त्याच्यावर त्यासाठी 30 शस्त्रक्रिया होणार होत्या! या आजारामुळे त्याला बोलायला आणि खायला खूपच त्रास होई. कॅन्सरला तो "अतिरेकी घुसखोर' असं म्हणे. फ्रॉईड या काळातही प्रचंड प्रमाणात सिगारेट ओढत असे. कामासाठी लागणारी ऊर्जा आणि कल्पकता आपल्याला या सिगारेटमधल्या तंबाखूतून मिळते, असं त्याचं म्हणणं होतं.

फ्रॉईडला आयुष्याच्या अखेरीस कॅन्सरशिवाय अनेक शारीरिक व्याधींनी ग्रासलं होतं. "न्यूरेस्थेनिया' हा मनोविकारही त्याला जडला होता. "माणसाला त्याच्या शरीरानं साथ न देणं ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे' असं तो म्हणे. आपल्या विचारशक्तीवर परिणाम होईल, या भीतीनं तो पेनकिलर्स न घेता भयानक वेदना सहन करायचा! त्याचा कॅन्सर हा शरीरभर पसरतच चालला होता. डॉक्‍टरांना शेवटी त्याचा ट्यूमर काढण्यासाठी एक गाल कापावा लागला. त्याच्या उघड्या जखमांची दुर्गंधी इतकी होती, की त्याचा पाळलेला कुत्राही त्याच्या जवळ येण्यास कां-कूं करत असे. त्याच्याभोवती माशा घोंघावत असत. पण तरीही याही काळात तो काही रुग्णांना नियमितपणे तपासे. मृत्यूपूर्वी दोन दिवस आधी फ्रॉईडनं त्याचा मित्र आणि डॉक्‍टर मॅक्‍स श्‍करला "हा कॅन्सर एक भयंकर छळवाद आहे. त्यावर काहीही उपाय नाही. आता सहन करणं अशक्‍य आहे, त्यामुळे आपल्याला आत्महत्या करण्यात मदत करावी,' अशी विनंती केली होती. मॅक्‍सनं त्याला मार्फिनचे डोस दिले. दुसरा डोस दिल्यानंतर 12 तासांनंतर फ्रॉईड कोमामध्ये गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 24 सप्टेंबर 1939 रोजी फ्रॉईडचा मृत्यू झाला आणि एक महाप्रचंड वादळ शमलं. मानवी मनाचा खोलवर शोध घेण्याचा प्रयत्न फ्रॉईडच्या अगोदर कुणीच केला नव्हता. शिवाय चित्रकला, साहित्य आणि इतर अनेक गोष्टींवर आजपर्यंत फ्रॉईडच्या विचारांचा जेवढा प्रभाव पडला असेल तेवढा फारच थोड्यांच्या विचारांचा पडला. म्हणूनच मार्क्‍स, डार्विन, आइन्स्टाइन यांच्याबरोबर फ्रॉईडचंही नाव "एक युगप्रवर्तक' म्हणून घेतलं जातं, ते काही उगाचच नव्हे!

No comments:

Post a Comment