Saturday, October 15, 2011

फोबियाज कारणं आणि उपाय

July 10, 2011

फ्रॉईडनं फोबियाजवरती 1890 च्या दशकाच्या मध्यावर बरेच लेख लिहिले होते. यामध्ये त्यानं नादिष्टपणा आणि भयगंड यांच्यामधला फरकही स्पष्ट केला होता. मृत्यू, आजारपण, साप, रात्र अशा गोष्टींच्या भयगंडांना तो "कॉमन फोबियाज' असं म्हणायचा. विशिष्ट गोष्टींच्या भयगंडांना तो "स्पेसिफिक फोबियाज' म्हणे. फोबियाज हे लैंगिक ताणतणावामुळे किंवा नपुंसकत्व असेल तर उद्‌भवतात, असं तो म्हणे. स्त्रियांमध्ये फोबियाज जास्त प्रमाणात आढळून येतात, असंही त्याचं मत होतं.

फ्रॉईडनं 1909 मध्ये "ए फोबिया इन हे फाइव्ह इयर ओल्ड बॉय' हे पुस्तक प्रकाशित केलं. यामध्ये त्यानं हॅन्स नावाच्या मुलाचं 140 पानांत विश्‍लेषण केलं होतं. हॅन्सला घोड्याची इतकी प्रचंड भीती वाटत असे, की तो घराबाहेरच पडत नसे. आपल्या वडिलांविषयी वाटणारा सुप्त द्वेष घोड्यांच्या रूपात त्याच्या समोर ठाकत असे, असं फ्रॉईडनं त्याचं विश्‍लेषण केलं होतं. पण हा युक्तिवाद बिहेवियरिस्ट मानसशास्त्रज्ञांना मान्य नव्हता. चार वर्षांचा असताना हॅन्सनं घोड्यांचा एक अपघात बघितला होता, आणि म्हणूनच त्याला हा फोबिया झाला होता, असं वोल्प आणि रॅचमन यांनी म्हटलंय. कुठलीशी गोष्ट (उदा.- प्राणी) बघताना त्याच वेळी एखादी धक्कादायक (ट्रॉमॅटिक) घटना घडली तर त्या गोष्टीची भीती वाटायला लागते आणि ती वाढत जाऊन त्याचा फोबिया बनतो. आणि हे जसं निसर्गतःच किंवा अचानक घडू शकतं तसंच आपल्याला स्टिमुलस-रिस्पॉन्सची बिहेवियरल पद्धती वापरून एखाद्या गोष्टीचा भयगंड एखाद्या माणसात निर्माणही करता येतो, असं बिहेवियरिस्ट म्हणायला लागले.

यासंबंधी 1990 च्या दशकात मिनेका, कूक आणि त्यांचे सहकारी यांनी माकडांवर प्रयोग केले. प्रयोगशाळेत वाढवलेल्या काही माकडांना प्रथम सापांची भीतीच वाटत नसे. मग त्यांना काही जंगली माकडं दाखवण्यात आली. ती जंगली माकडं मात्र साप दाखवल्यावर खूप घाबरायची. हे बघून ही प्रयोगशाळेत वाढलेली माकडंही सापांना घाबरायला लागली. ही भीती पुढचे तीन महिने टिकली. याचा अर्थ मास मीडियाही असे फोबियाज निर्माण करू शकतो, असं संशोधकांना वाटायला लागलं.

पण एवढं असूनही प्रत्यक्ष अनुभवातून किंवा दुसऱ्यांबद्दलचं दृश्‍य बघून जो फोबिया निर्माण होतो तो पुन्हा व्यक्तीप्रमाणे बदलतो. त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व, जडणघडण आणि पूर्वीचे अनुभव, यामुळेही या फोबियामध्ये फरक पडू शकतो. उदाहरणार्थ- जर खूप शांत आणि खेळकर कुत्र्यांबरोबर एखाद्याला खूप चांगले अनुभव पूर्वी आले असतील तर नंतर जरी एखादा सतत भुंकणारा कुत्रा बघितला तरी कुत्र्यांविषयीचा फोबिया निर्माण होत नाही. मिनेका आणि कूक यांनी जे सापाला घाबरत नाहीत अशा माकडांचे व्हिडिओ प्रथम प्रयोगशाळेतल्या माकडांना बराच काळ दाखवले आणि मग त्यांना एक भीतिदायक साप दाखवला. या वेळी तो भीतिदायक साप बघून त्या माकडांमध्ये भीती निर्माण झाली नव्हती.

एखाद्याला एखाद्या गोष्टीचा फोबिया कसा आणि किती निर्माण होतो, हे जेनेटिक आणि टेंपरामेंटल घटकांवरही अवलंबून असतं. 2003 मध्ये कगान आणि त्याचे सहकारी यांनी याविषयी अनेक मुलांवर प्रयोग केले. लहानपणापासून लाजरीबुजरी असणारी आणि हसरी, धीट असणारी अशी दोन्ही तऱ्हेची बरीच मुलं त्यांनी निवडली आणि त्यांच्यात वेगवेगळ्या गोष्टींमुळे किती भीती निर्माण होते, ते बघितलं. 1999 मध्ये केंडलर, कार्कोव्हस्की आणि प्रेस्कॉट यांनी जुळ्यांवर केलेल्या प्रयोगांवरून आनुवंशिकतेचा आणि फोबियाचा संबंध दिसून आला. पण याच वेळी जर या जुळ्यांपैकी नंतरच्या आयुष्यात एखाद्याच्या वाट्याला काही भीतिदायक अनुभव आले असतील तर त्याला फोबियाज असण्याची शक्‍यता बरीचशी वाढत होती. थोडक्‍यात, यात "नेचर (आनुवंशिकता, जीन्स)' आणि "नर्चर (आयुष्यातले अनुभव, आजूबाजूचं वातावरण)' या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरत होत्या.

हे फोबियाज किंवा ही भीती घालवण्यासाठी अशा रुग्णांना त भीतिदायक वस्तू (उदा. - कुत्रा) किंवा घटनेपाशी हळूहळू नेण्यात येतं. हे करत असताना त्याच्याबरोबर कोणीतरी मित्र किंवा थेरपिस्ट असावा लागतो. हे असं बराच काळ टप्प्याटप्प्यानं त्या वस्तूच्या किंवा घटनेच्या जवळ जाणं चालू राहतं. "अरेच्या! ती वस्तू जवळ असूनही भीतिदायक काहीच घडत नाहीये' हे त्या रुग्णाच्या मनावर ठसवलं जातं. असं करत शेवटी मग त्या रुग्णाची खात्री पटून त्याची भीती कमी कमी होत जाते, अशी ही थिअरी आहे. प्राण्यांच्या, बंद जागांच्या, रक्ताच्या अशा वेगवेगळ्या फोबियाजसाठी ही थिअरी उपयोगी पडते. यालाच "एक्‍स्पोजर थेरपी' असं म्हणतात. यातल्या "एक्‍स्पोजर'सारख्या कित्येक बिहेवियरल थेरपीजमध्ये पूर्वी फक्त भीती घालवण्यावर भर असे. पॅनिक ऍटॅक्‍सवर फारसा भर नसायचा. 1980 च्या दशकात "इंटरोसेटिव्ह एक्‍स्पोजर' ही पद्धत यासाठी निघाली. यामध्ये त्या रुग्णाला व्यायाम करायला सांगतात. या व्यायामामुळे पॅनिक ऍटॅक्‍सवर मात करता यावी, हा यामागचा उद्देश असतो.

अलीकडे काही थेरपिस्ट कॉंप्युटरच्या साह्यानं व्हर्चुअल रिऍलिटी (व्हीआर)चा वापर करतात. व्हीआरमध्ये कॉंप्युटरच्या पडद्यावर आपल्याला तीन भीतीतली अनेक दृश्‍यं, वस्तू किंवा घटना यांचे व्हिडिओज दाखवतात. क्रमाक्रमानं भीतिदायक वस्तूंविषयी किंवा घटनांविषयी असे व्हिडिओज दाखवून मग प्रत्यक्षात रुग्णाला त्याकडे पुन्हा हळूहळू न्यायचं, हेही थेरपिस्ट करतात. काही जण "कॉग्नेटिव्ह पद्धत' वापरतात. अशा प्रकारची भीती वाटण्यात कसा अर्थ नाही, हे ते विवेकवादानं रुग्णांना दाखवून देतात आणि त्यांच्या भीतीवर हळूहळू मात करायला हे कॉग्निटिव्ह थेरपिस्ट मदत करतात. मात्र यापेक्षा "बिहेवियरल एक्‍स्पोजर पद्धत'च जास्त उपयोगी असल्याचं आढळलंय. भयगंड कमी करण्यासाठी औषधांचाही वापर होऊ शकतो. त्यांचाही थोडाफार उपयोग काही जणांना दिसून आलाय. प्राण्यांबद्दलच्या भीतीवर मात्र औषधं उपयोगी ठरू शकतात, असा कित्येकांचा अनुभव आहे.

"सोशल फोबिया'ला "सोशल अँक्‍झायटी डिसऑर्डर' असंही म्हणतात. मोठ्या सभेत भाषण करण्यापासून ते सार्वजनिक मुताऱ्यांमध्ये मूत्रविसर्जन करण्यापर्यंत अनेक सामाजिक, सार्वजनिक गोष्टींची भीती या फोबियाजच्या रुग्णांना वाटू शकते. त्यामुळे असा विकार झालेले लोक असे प्रसंग किंवा ठिकाणं एक तर टाळतात किंवा त्यांना सामोरं जावंच लागलं तर त्यांना प्रचंड असह्य, तणावपूर्ण परिस्थितीतून जावं लागतं. पब्लिक स्पीकिंगची भीती हा यातला सर्वांत जास्त आढळणारा प्रकार आहे.

काही लोकांना पब्लिक स्पीकिंगसारख्या ठराविक गोष्टींचीच भीती न वाटता कुठल्याही सामूहिक, सार्वत्रिक, सार्वजनिक गोष्टींची भीती वाटते. डीएसएम-4-टीआरमध्ये यालाच "जनरलाइज्ड सोशल फोबिया' असं म्हटलंय. याला डॉक्‍टर "अव्हॉयडंट पर्सनॅलिटी डिसऑर्डर' असं म्हणतात.
एका सर्वेक्षणाप्रमाणे 12 टक्के लोकांना कुठल्या ना कुठल्या तऱ्हेचा सोशल फोबिया असतो. त्यातही बायकांमध्ये तो 60 टक्के, तर पुरुषांमध्ये कमी म्हणजे 40 टक्के आढळतो. हा फोबिया लहानपणापासून सुरू होण्याऐवजी बहुतांश वेळा पौगंडावस्थेत चालू होतो. हा फोबिया असणाऱ्यांपैकी 50 टक्के लोकांना नैराश्‍याचेही झटके येतात असं आढळलंय, तर 33 टक्के हे आपली चिंताग्रस्तता कमी करण्यासाठी दारू घेतात किंवा व्यसनीही असतात, असं दिसून आलंय. उदाहरणार्थ- एखाद्या समारंभाला जाण्यापूर्वीच हे लोक दारू पिऊन जातात.

स्पेसिफिक (विशिष्ट) फोबियाजप्रमाणेच सोशल फोबियाजसुद्धा प्रत्यक्ष धक्कादायक अनुभवांमुळे किंवा तसे अनुभव दुसऱ्याला आल्याचं बघून निर्माण होतात असं आढळलंय. ज्यांना असे सोशल फोबियाज झाले होते त्यांच्यापैकी 56-58 टक्के लोकांच्या पूर्वायुष्यात काहीतरी धक्कादायक घटना घडल्याचं आढळलं होतं. दुसऱ्या एका अभ्यासात ज्यांना मोठेपणी अशी सर्वांसमोर जाण्याची भीती वाटत होती अशांपैकी 92 टक्के लोकांना लहानपणी खूप चिडवलं किंवा अपमानित केलं गेलं होतं, किंवा काहींनी इतरांची अशीच चेष्टा झालेली बघितली होती.

सोशल फोबियाज आनुवंशिक कारणानंही निर्माण होऊ शकतात, पण त्यांचा प्रभाव खूप जास्त नसतो. आपण विचित्र वागत असल्यामुळे आजूबाजूचे लोक आपल्याला नाकारतील, आपली चेष्टा करतील, या विचारांनी त्याची भीती आणखीनच वाढते. सोशल फोबियावर "बिहेवियरल थेरपी' आणि "कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी (सीबीटी)' हे दोन्ही उपयोगी पडू शकतात. थेरपीज सोडून औषधंही यावर उपयोगी पडतात. ती बऱ्याचदा अँटिडिप्रेसंट्‌स असतात.
एड झाईन या मुलानं त्याच्या आईला आपल्या डोळ्यांसमोर मरताना बघितलं. त्याचा त्याच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला. कुठलाही आवाज ऐकला तरी त्याला भीती वाटायची. त्यामुळे त्यानं स्वतःला तळघरात कोंडून घेतलं होतं. त्या खोलीतून बाहेर पडायचं म्हणजे तो दोन पावलं पुढे चालायचा, पण पुन्हा मागे यायचा. असं तास न्‌ तास चालायचं. त्यामुळे त्याला खोलीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला चक्क 10 तास लागायचे! अर्थातच त्याची काळजी घेताना घरच्यांची तारांबळ उडायची. हार्वर्डच्या मायकेल हेनिके या डॉक्‍टरनं एडला यातून कसं बाहेर काढलं याविषयी "लाइफ इन रिवाइंड' या पुस्तकात लिहिलंय.

ऍगोराफोबियानं त्रस्त असलेली मंडळी सार्वजनिक जागांना घाबरतात. त्यात मग रस्ते, दुकानं, मॉल्स, चित्रपटगृहं, ट्रेन्स, बसेस, उपाहारगृहं अशा अनेक गोष्टी येतात. त्याचबरोबर जिथून पळून जाणं अवघड आहे अशी बोगदे, लिफ्ट्‌स, पोहण्याचे तलाव अशीही ठिकाणं येतात. ऍगोराफोबिया हा पॅनिक ऍटॅकशिवायही असू शकत असला तरी बहुतांश वेळा यात पॅनिक ऍटॅकही सुरू होतो. मग चक्कर येणं, घाम येणं, छातीत धडधडणं असे अनेक प्रकार सुरू होतात. ऍगोराफोबिया असलेल्या निम्म्याहून अधिक लोकांना नैराश्‍य, स्पेसिफिक फोबिया, सोशल फोबिया, चिंताग्रस्तता अशा तऱ्हेचे इतरही मनोविकार असतात. ऍगोराफोबियाच्या रुग्णाला ट्रॅंक्विलायझर्स, अँटिडिप्रेसंट्‌स दिली जातात. अँटिडिप्रेसंट्‌ससोबत बिहेवियरल आणि कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीमुळे ऍगोराफोबियाच्या रुग्णांमध्ये सुधारणा दिसून येते.

इतक्‍या प्रकारच्या फोबियाजविषयी वाचल्यावर आपल्याला आश्‍चर्य तर वाटेल, पण ज्यांना ते होतात त्यांची परिस्थिती खूपच दयनीय असते. उदाहरणार्थ- ज्यांना वर बघायचीही भीती वाटते किंवा ज्यांना बसण्याची भीती वाटते किंवा झोपायची भीती वाटते, अशा रुग्णाचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं रोजचं जगणं किती कठीण होत असलं पाहिजे, याची आपण फक्त कल्पनाच केलेली बरी!

No comments:

Post a Comment