Saturday, October 15, 2011

इडिपस कॉम्प्लेक्‍स

March 20, 2011

ज्या
प्रमाणे हिमनगाचा 90 टक्के भाग पाण्याखाली असतो त्याप्रमाणेच मानवी मनाची अवस्था असते. थोडक्‍यात, आपल्याला जाणवणाऱ्या मनापेक्षा अनेक पटीनं मनाचा भाग आप ल्याला अज्ञातच असतो,' असं फ्रॉईड म्हणे. आपल्याला ज्या गोष्टीचं भान असतं अशा मनाच्या स्तराला "जाणीव', "आत्मभान' किंवा "कॉन्शसनेस' म्हणतात. 19 व्या शतकापर्यंत "मनात जे काही चालतं ते फक्त जाणीवपूर्वकच (कॉन्शसली) चालतं,' असं बरेच मानसशास्त्रज्ञ म्हणत. पण फ्रॉईडला ते मान्य नव्हतं. आपल्या जाणिवेपलीकडेही काहीतरी मनोविश्‍व असतं, यावर फ्रॉईडनं प्रथमच खोलवर विचार सुरू केला. फ्रॉईडनं आत्मभानाच्या (कॉन्शस) मानसिक पातळीखाली "प्रीकॉन्शस'ची आणि त्याखाली "अनकॉन्शस'ची, अशा दोन पातळ्या मानल्या होत्या. आपण कित्येक वेळा कोणाला तरी भेटतो, पण त्याचं नाव किंवा फोन नंबर आपल्याला चटकन आठवत नाही. पण थोडं डोकं खाजवलं की त्या गोष्टी आठवतात. कारण या गोष्टी आपल्या प्रीकॉन्शसमध्ये साठवलेल्या असतात. या प्रीकॉन्शसच्या पातळीखालच्या अनकॉन्शसमध्ये दडपून टाकलेल्या, अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा आणि वासना असतात.

आपण दडपलेल्या अनकॉन्शसमधल्या सगळ्या इच्छा, वासना आणि विचार स्स्वप्नातून व्यक्त व्हायला बघत असतात, पण आपल्या मनावर कॉन्शस मनाचा पहारा एवढा जबरदस्त असतो, की स्वप्नातही त्या गोष्टी पूर्णपणे बाहेर पडू शकत नाहीत. यातून अर्थातच तणाव निर्माण होतो, असं फ्रॉईडला वाटे. त्यामुळे स्वप्नातून त्या व्यक्त होण्यासाठी त्या स्वप्नां मध्ये थोडाफार तरी बदल घडावा लागतो. प्रीकॉन्शसमुळे हा बदल घडू शकतो. "अनकॉन्शस'मधल्या अनेक दडपल्या गेलेल्या इच्छा, वासना जेव्हा त्या दिवसाच्या "प्रीकॉन्शस'मध ल्या घटनांशी मिसळल्या जातात तेव्हा त्यातून चित्रविचित्र स्वप्नं तयार होतात. म्हणून कित्येकदा स्वप्नात काही गोष्टी खूप लहानपणीच्या (अनकॉन्शस) आणि काही कालपरवा घडलेल्या (प्रीकॉन्शस) अशा किंचित गूढ पद्धतीनं मिसळून जाऊन बाहेर येतात.

फ्रॉईडनं "कॉन्शस', "प्रीकॉन्शस' आणि "अनकॉन्शस' या मनोरचनेच्या पातळ्या मांडल्या. मनोरचनेच्या विश्‍लेषणानंतर फ्रॉईडनं व्यक्तिमत्त्वाच्या आविष्कारांविषयी विश्‍लेषण करायला सुरवात केली. त्यानं यासाठी "इड', "इगो' आणि "सुपरइगो' या संकल्पना मांडल्या. त्यानं कल्पिलेल्या मनाच्या तीन पातळ्या आणि व्यक्तिमत्त्वाचे आविष्कार यांच्यात संबंध होते, असं फ्रॉईडला वाटे.

"इगो' या शब्दाचा लॅटिनमध्ये अर्थ होतो "मी'. 19 व्या शतकाच्या मानसशास्त्रात हा शब्द बरेचदा वापरला जाई, पण फ्रॉईडच्या मॉडेलमध्ये "इगो' म्हणजे आपल्या अनुभवांतून आणि संवेदनांमधून तयार होणारा, जाणीव असणारा मनाचा बाह्य भाग. हाच इगो "अनकॉन्शस'मधल्या कल्पनांना, विचारांना आणि इच्छांना सतत दाबून ठेवत असतो. समाजाला कुठल्याही व्यक्तीच्या मनाचा जो दृश्‍य भाग असतो तो इगोच असतो. सामाजिक रूढीरिवाजांचा या इगोवरच जास्तीत जास्त परिणाम होत असतो. थोडक्‍यात, "इगो' हा बराचसा कॉन्शस म नासारखा असतो.

"इड' हे बरंचसं "अनकॉन्शस'सारखं असतं. मनाच्या तळाशी वावरणाऱ्या स्वाभाविक प्रेरणांना फ्रॉईड "इड' असं म्हणतो. लहानपणी हा "इड'च असतो. त्यात बेलगाम इच्छा, वासना आणि उत्कटता यांचं राज्य असतं. "इड' हा सतत सुखाच्या मागे असतो आणि तो "प्लेझर प्रिन्सिपल'वर चालतो. पण आजूबाजूचा समाज आणि त्याची मूल्यं त्या इच्छा, वासना पूर्ण करू देत नाही. मग हळूहळू, कालांतरानं या "इड' वर "इगो'चा थर तयार होतो. "इगो'चं काम हे "इड'मध्ये सतत उत्पन्न होणाऱ्या इच्छा आणि आजूबाजूचं वास्तव यांच्यामधली दरी भरू न काढणं हे असतं. "इगो' हा सुसंबद्ध असतो, तर "इड' हा असंबद्ध असतो. "इगो' हा विवेकवादी असतो, तर "इड' अविवेकवादी असतो. "इगो' हा मनाचा बाह्य पापुद्रा असतो, तर " इड' हा मनाच्या खोलवरचा गाभा असतो. "इगो' हा कल्पना, विचार, तत्त्वं यांच्या भाषेत बोलतो, तर "इड' हा चिन्हांच्या (सिम्बॉल्स) गूढ भाषेत बोलतो असं फ्रॉईडला वाटे.

फ्रॉईडनं मनाची तिसरी मानलेली पातळी म्हणजे "सुपरइगो'ची. माणसावर नीतिमत्तेचं, मूल्यांचं, आदर्शाचं आणि ध्येयाचं दडपण असल्यामुळे एका ठराविक तऱ्हेनं वागण्याचं अलि खित बंधन असतं. याला फ्रॉईड "सुपरइगो' असं म्हणतो. कुठल्याही व्यक्तीला जे व्हायचं असतं, जो तिच्यापुढे आदर्श असतो, त्याचं दर्शन सुपरइगोमध्ये दिसतं. यामध्येच नै तिकता, कर्तव्य, आदर्श, ध्येयं आणि विश्‍वास वगैरे गोष्टी येतात. "सुपरइगो' कायम व्यक्तीचं वास्तव (ती आता कशी आहे) आणि त्याचे आदर्श (तिला काय व्हायचंय) यातला फरक दाखवत असतो. यामुळे "इड'मधली ऊर्जा ही चॅनलाइज होऊन माणूस काहीतरी उच्च दर्जाचं काम करायची धडपड करतो. या प्रक्रियेलाच फ्रॉईड "सब्लिमेशन' म्हणतो.

फ्रॉईडनं "इडिपस कॉम्प्लेक्‍स' ही धक्कादायक कल्पना मांडली. याप्रमाणे प्रत्येक लहान मुलाला त्याच्या आईबद्दल लैंगिक आकर्षण वाटतं आणि त्याचमुळे त्याला वडिलांचा मत्सर वाटायला लागतो. ग्रीक नाटककार सोफोकल्स (ख्रिस्तपूर्व 496-406) यानं लिहिलेल्या "इडिपस-रेक्‍स' ही शोकांतिका फ्रॉईडला एवढी आवडली, की त्यानं तोच शब्द वापरायला सुरवात केली.

खरं तर इडिपसच्या या शोकांतिकेची कहाणी वेगळीच होती. कोरियान्थचा राजपुत्र इडिपस हा देवदूताकडून "इडिपस आपल्या वडिलांचा खून करेल आणि त्याच्या आईबरोबरच लैं गिक संबंध ठेवेल,' अशी आकाशवाणी ऐकतो. ती ऐकून ते टाळण्यासाठी इडिपस थेब्ज हे शहर सोडून पळून जातो. पण त्याचा काही प्रवाशांबरोबर इतका मोठा वाद होतो, की शेवटी चिडून इडिपस त्या सगळ्या प्रवाशांना मारून टाकतो. पण त्या प्रवाशांमध्येच अनेक वर्षांपूर्वी ज्यांनी इडिपसला वाऱ्यावर सोडून दिलेलं असतं ते इडिपसचे वडीलही असतात. नंतर थे ब्जचा नवीन राजा म्हणून इडिपसचा राज्याभिषेक होतो आणि तो तिथल्या डोकास्टा या विधवा राणीशी लग्न करतो. पण नंतर ती जोकास्टा म्हणजे आपली स्वत:चीच आई असल्याचं इडिपसच्या लक्षात येतं. या गोष्टीत इडिपसला त्याच्या आईविषयी लैंगिक आकर्षण वगैरे काही वाटत नसतं. सगळं योगायोगानंच घडलेलं असतं. पण फ्रॉईडनं तरीही या आकर्षणाला "इडिपस कॉम्प्लेक्‍स' हे नाव दिलं.

फ्रॉईडचं दुसरं महत्त्वाचं पुस्तक "थ्री एसेज ऑन दी थिअरी ऑफ सेक्‍शुऍलिटी' हे 1905 मध्ये बाहेर आलं. त्यात त्यानं लहान मुलांच्या लैंगिकतेविषयी (इन्फटाईल सेक्‍युऍ लिटीवर) चर्चा केली होती. सगळी माणसं जन्मापासून विकृत (पव्हर्स) असतात, पण पुढे जर मुलाची निरोगी तऱ्हेनं वाढ झाली तर या लैंगिक विकृतीवर मात मिळवता येते, असं त् यात सांगितलं होतं. वयात आल्यावर आपल्या लैंगिकतेमध्ये कसे आणि काय बदल घडून येतात, याविषयी यात फ्रॉईडनं लिहिलं होतं. मुलगा आणि मुलगी यांच्या वागणुकीत फरक का आणि कसा पडत जातो, याविषयीही यात चर्चा केली होती.

"इन्फटाईल सेक्‍शुऍलिटी'ची कल्पना खूप वादग्रस्त मानली जाते. या लैंगिकतेला फ्रॉईड "लिबिडो' म्हणत असे. जेव्हा मुलगा स्तनपान करत असतो तेव्हा तोंड या अवयवामार्फत त् याला लैंगिक सुखच मिळत असतं. याला "तोंडाची अवस्था' (ओरल फेज) असं म्हणतात. जेव्हा मूल हे दीड ते तीन या वयाचं होतं तेव्हा त्याचं गुदद्वार हे लैंगिक सुखाचा मार्ग ठरतं. याला "गुदद्वाराची अवस्था (ऍनल फेज)' म्हणतात. जेव्हा मूल तीन ते सहा वर्षांचं होतं तेव्हा ते स्वत:च्या लिंगाबरोबर खेळायला लागतं आणि स्वत:ला उत्तेजित करत असतं. याला "शिस्नाची अवस्था (फॅलिक फेज)' असं म्हणतात. पण आई-वडील मात्र या सगळ्या गोष्टींवर करडी नजर ठेवून त्याला चांगलं टॉयलेट ट्रेन करणं, हस्तमैथुन करू न देणं, अशा गोष्ट ी शिकवतात. कालांतरानं स्तनपानही बंद होतं आणि त्यामुळे शरीराच्या इतर भागांमुळे मिळणारं लैंगिक सुख कमी होऊन ते फक्त जननेंद्रियावरच केंद्रित होतं, अशी फ्रॉईडची थिअरी होती.

फ्रॉईडच्या मते, मुलींच्या बाबतीत हे सगळं थोडंसं वेगळ्या रीतीनं घडतं. एक तर मुलांसारखं आपल्याला शिस्न नाही म्हणून तिला असूया वाटत असतेच आणि आपल्याला आपल्या आईनं असं लिंग नसलेलं जन्माला घातलं किंवा ते असूनही नंतर छाटू दिलं, अशा कल्पनेनं ती आपल्या आईचा द्वेष करायला लागते. हे जे आपलं नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्यासाठी आपल्याला आपल्याच वडिलांपासून मूल व्हावं अशी ती सुप्त इच्छा बाळगायला लागते आणि तशी स्वप्नंही बघायला लागते. पण हे सगळं शक्‍य नसतं. त्यामुळे ती आइ र्-वडिलांशी जुळवून घेते. ज्यामुळे आपली चिंता वाढतेय अशा आईवरचा आपला द्वेष कमी करून ती आईसारखंच बनण्याचा प्रयत्न करते. पण आपल्याला शिस्न नसल्याची भावना तिच्यावर आयुष्यभर परिणाम करत राहते. एकंदरीतच मुली म्हणजे "अपयशी ठरलेली मुलं' किंवा "मोठी बाई म्हणजे ज्याचं लिंग काढून टाकलेलं आहे असा मोठा पुरुष' अशाच तऱ् हेनं फ्रॉईडनं मुलींकडे किंवा स्त्रियांकडे बघितलं. "फ्रॉईडला स्त्रियांचं मानसशास्त्र हे फारसं उलगडलंच नाही आणि त्या वेळच्या पुरुषप्रधान संस्कृतीचाही हा परिणाम होता' अशीही त् याच्यावर टीका झाली.

फ्रॉईडनं लहान मुलांच्या लैंगिकतेविषयी उघडउघडपणे आणि निर्भीडपणे लिहिलं होतं. यामुळेच युरोप आणि अमेरिका येथल्या उच्चभ्रू, नैतिकता पाळणारा भोंदू मध्यमवर्ग हादरून गेला. फ्रॉईड हा लैंगिक विचारांनी बरबटलेल्या घाणेरड्या विचारांचा आहे, अशी त्याच्यावर टीका झाली. त्याच्या पुस्तकांना तर कित्येक जण "पोर्नोग्राफी' म्हणायला लागले. पण मानसशास्त्रीय वर्तुळात मात्र त्याच्या थिअरीजविषयी बरीच चर्चा झाली आणि बऱ्याच वर्षांनंतर का होईना, फ्रॉईडकडे अनेक बुद्धिवंतांनी खूपच गंभीरपणे बघायला सुरवात केली.

No comments:

Post a Comment