Saturday, October 15, 2011

कॉग्निटिव्ह थेरपीज्‌

May 22, 2011

नेक दशकं मानसशास्त्राच्या शाखेत बिहेवियर थेरपीजनी अबाधित राज्य केलं. त्यानंतर 1940 आणि 1950 च्या दशकामध्ये "कॉग्निटिव्ह सायकोथेरपी'ची बीजं रोवली गेली. अल्बर्ट एलिस हा कॉग्निटिव्ह थिअरीचा जनक समजला जातो. आपल्या विचारांमुळेच आपल्या भावना बदलतात किंवा आपण बदलू शकतो, असं एलिसचं मत होतं.

एलिसनं 1955 मध्ये "रॅशनल इमोटिव्ह थेरपी (आरईटी)' नावाची नवीनच थेरपी शोधून काढली. एलिसनं या थेरपीचं नाव बदलून "रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी (आरईबीटी)' असं ठेवलं. या थेरपीला "कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी'सही काही लोक म्हणतात. खरं तर कॉग्निटिव्ह थेरपी आणि बिहेवियरल थेरपी यांचा फोकस वेगळा आहे. बिहेवियरल थेरपी ही रुग्णांना शेळ्या-मेंढ्यांप्रमाणे समजते. "डी-सेन्सिटायझेशन' किंवा "कंडिशनिंग'चे इतर प्रकार किंवा "रिवॉर्ड आणि पनिशमेंट' अशा पद्धती वापरून त्या माणसाच्या भावना बदलायच्या, असे प्रयत्न बिहेवियरल थेरपी करते. याउलट कॉग्निटिव्ह थेरपी ही त्या रुग्णाचे विचार बदलून त्याच्या भावना बदलण्याचा प्रयत्न करते. या दोघांच्या मिश्रणातून "कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी'चा जन्म झाला.

रुग्णाला जेव्हा न्यूरॉसिस झालेला असतो तेव्हा तो तर्कानं किंवा विवेकवादानं विचार करत नसतो. जर त्याच्या वागणुकीतला तर्काचा अभाव आपण त्याला दाखवून दिला आणि त्याला शांतपणे विवेकवादानं विचार करायला शिकवलं तर त्याचा न्यूरॉसिस जाऊ शकतो, असं एलिसचं म्हणणं होतं. एलिसच्या मते, हे दोन प्रकारांनी करता येतं. एक म्हणजे आक्रमक पद्धतीनं त्याला थेट प्रश्‍न विचारून विचार करायला लावणं. याला "कन्फ्रॉंटेशनल आरईटी' असं एलिस म्हणे. दुसरी पद्धत म्हणजे त्या रुग्णाच्या कलाकलानं घेऊन जास्त वेळ खर्च करून त्याला विवेकवादाचं महत्त्व पटवून देणं. याला तो "नॉन कन्फ्रॉंटेशनल आरईटी' म्हणे. एलिसच्या मते "कन्फ्रॉंटेशनल आरईटी' हे "नॉन कन्फ्रॉंटेशनल आरईटी'पेक्षा जास्त परिणामकारक होतं.
एलिसनं आपल्या कल्पना "एबीसी थिअरी ऑफ आरईबीटी' या स्वरूपात मांडायला सुरवात केली. 31 ऑगस्ट 1956 रोजी शिकागो येथे भरलेल्या "अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन'च्या वार्षिक अधिवेशनात एलिसनं "रॅशनल सायकोथेरपी'वरचा आपला निबंध सादर केला. एलिसनं त्याविषयीचं एकदम सोपं आणि सुटसुटीत असं "एबीसी' मॉडेल मांडलं. या मॉडेलमध्ये "ए, बी, सी' अशा टप्प्याप्रमाणे माणसाच्या भावना आणि वागणूक घडते, असं त्याचं म्हणणं होतं. "ए' म्हणजे माणसाच्या आयुष्यात एखादी घटना घडणं, तर "बी' म्हणजे त्या घडलेल्या घटनेमुळे आपल्या मनात काही विचार येणं आणि "सी' म्हणजे त्या विचार किंवा दृष्टिकोनानुसार आपली प्रतिक्रिया व्यक्त होणं. समजा एखाद्या मालकानं आपल्या पाकिटातले पैसे नोकरानेच घेतले असावेत, असं समजून त्याला रागवायला सुरवात केली ("ए' टप्पा), त्या वेळी नोकराच्या मनात विचार येतो, की "मी इतका प्रामाणिक असून हा माजलेला मालक माझ्यावर आरोप कसा करू शकतो?' ("बी' टप्पा), आणि त्यामुळे नोकराला एकदम राग येतो (हा झाला "सी' टप्पा). हेच उदाहरण दुसऱ्या पद्धतीनंही घडू शकतं. म्हणजे घटना तीच घडली (ए टप्पा तोच), त्या वेळी नोकराच्या मनात विचार आला, की "हे काय भलतंच मालकाच्या मनात आलंय! आता माझी नोकरी गेली तर? मी निरपराध आहे हे कसं सिद्ध करू?' ("बी' टप्पा), आणि या विचारांनी तो नोकर एकदम चिंताग्रस्त होतो ("सी' टप्पा). असे माणसाच्या स्वभावाप्रमाणे, जडणघडणीप्रमाणे त्याच घटनेसाठी (ए टप्पा) अनेक एबीसीचे प्रकार होऊ शकतात आणि त्यावर राग, आनंद, मत्सर, दुःख, नैराश्‍य आणि चिंता अशा अनेक प्रतिक्रिया (टप्पा सी) उमटू शकतात. पण यातली आपल्याला सकारात्मक आणि चांगलीच प्रतिक्रिया निवडून आपण आपल्या भावना नियंत्रित करू शकतो, असं एलिसला वाटे.

आपण सगळेच आपल्या स्वतःविषयी, इतर लोकांविषयी आणि समाजाविषयी जे दृष्टिकोन ठेवतो त्यांना एलिस "आरईबीटी'तले महत्त्वाचे तीन पायाभूत आवश्‍यक घटक ("द थ्री बेसिक मस्ट्‌स') म्हणायचा. पहिला दृष्टिकोन म्हणजे, "मी जे काही करेन त्याची इतरांनी दखल घ्यायला पाहिजे.' दुसरा दृष्टिकोन म्हणजे, "इतर लोक माझ्याशी चांगलं वागत नसतील तर त्यांना त्याबद्दल चांगलीच अद्दल घडली पाहिजे.' तिसरा दृष्टिकोन म्हणजे "मला जे हवं ते मिळण्यासाठी परिस्थिती अनुकूल असलीच पाहिजे.' एलिसच्या मते, हे तीनही दृष्टिकोन अविवेकी असून, ते बदलण्यासाठी "आरईबीटी थेरपी' मदत करते आणि क्‍लाएंट विवेकवादानं वागू लागतो.

"कॉग्निटिव्ह थिअरीज'मध्ये जर सर्वांत जास्त कोणी भर टाकली असेल, तर तो ऍरॉन "टिम' बेक यानं. एकदा बेककडे एक नैराश्‍याचा रुग्ण आला. त्याला आपण संपूर्ण अपयशी आहोत, अशीच स्वप्नं पडायची. त्याच्या पूर्वीच्या सायकोडायनॅमिक थिअरीप्रमाणे त्याचा अर्थ तो रुग्ण स्वतःला शिक्षा देतोय; इतरांनी त्याला झिडकारावं म्हणून प्रयत्न करतोय असा होत होता. पण खोलवर विचार केल्यावर त्या स्वप्नाचा अर्थ बेकनं त्या रुग्णाच्या स्वतःविषयीच्या अत्यंत खालावलेल्या आत्मसन्मानाशी (सेल्फ-रिस्पेक्‍ट) जोडला. आपण त्याच्या मनातला हा आत्मसन्मान वाढवू शकलो तर त्याला या नैराश्‍यातून बाहेर काढता येईल, असं बेकला वाटायला लागलं. बेकनं मग त्या रुग्णाला अनेक प्रश्‍न विचारले; ज्याच्या अनेक चाचण्या घेतल्या त्या वेळी त्याला प्रचंड न्यूनगंड (डिफिडन्स) असल्याचं आणि आत्मसन्मान नसल्याचं दिसून आलं आणि हे खरं असेल तर त्याला विवेकवादानं, तर्कानं यातून बाहेर काढता येईल, असा आत्मविश्‍वास बेकला वाटायला लागला.

मग यावर विचार करून बेकनं त्याची नैराश्‍याची थिअरी काढली. 1963 मध्ये "डिप्रेशन, क्‍लिनिकल, एक्‍स्परिमेंटल अँड थिअरॅटिकल आस्पेक्‍ट्‌स' नावाचं एक पुस्तकही लिहिलं. नंतर दर आठवड्याला अनेकांबरोबर चर्चा करून, अनेक भाषणं ऐकून/ देऊन त्यानं आपली कॉग्निटिव्ह थेरपी नैराश्‍य सोडून इतरही विकारांना कशी लागू पडेल, यावर विचार केला.

बेकच्या आणि एलिसच्या पद्धतीत साम्य असलं तरी बेकची पद्धत जास्त सहृदय, मैत्रीपूर्ण आणि कमी आक्रमक (नॉन- कन्फ्रॉंटेशनल) होती. शिवाय त्यानं न्यूरॉटिक विकारासाठी कॉग्निटिव्ह थिअरी एलिसपेक्षा खोलवर जाऊन मांडली. उदाहरणार्थ, घोर नैराश्‍याची बेक तीन कारणं देतो. यातलं पहिलं कारण म्हणजे "कॉग्निटिव्ह ट्रायड' म्हणजे नैराश्‍य आलेल्या माणसाचे स्वतःकडे आणि जगाकडे बघण्याचे तीन दृष्टिकोन. पहिला म्हणजे मी वाईटच आहे. दुसरा म्हणजे माझं आयुष्य खूपच असफल आहे आणि तिसरा म्हणजे गोष्टी कधीही सुधारणार नाहीत. नैराश्‍याचं दुसरं कारण म्हणजे "सायलेंट ऍझम्पशन्स'. उदाहरणार्थ "अमुक अमुक माझ्यावर चिडला आहे, म्हणजे ती माझीच चूक असली पाहिजे,' असं वाटणं. नैराश्‍याचं तिसरं कारण म्हणजे तार्किक चुका. उगाचच एखादी गोष्ट घेऊन त्याचे विपरीत अर्थ लावणे, वगैरे.

बेकनं नैराश्‍य सोडून इतरही अनेक विकारांची अशीच कारणं सखोल, विस्तारानं लिहून ठेवली आहेत. यावर उपायही सुचवले आहेत. थेरपिस्टनं पेशंटशी चांगलं आणि प्रेमानं वागण्याची गरज तो ठासून सांगतो. जी गोष्ट पेशंटला आवडत नाही किंवा ज्याची त्याला भीती वाटते, तीच गोष्ट हळूहळू, टप्प्याटप्प्यानं त्या पेशंटला वर्णन करायला बेक प्रोत्साहित करे आणि त्यातले त्या पेशंटचे विचार कसे चुकीचे, अविवेकवादी आहेत, याविषयी तो त्यांना पटवून देई. दोन सेशन्सच्या मध्येही तो पेशंटला "गृहपाठ' देई. त्याच्या या उपचार पद्धतीत पेशंटला आपल्या विचारांवर सतत नियंत्रण ठेवावं लागे आणि नकारात्मक, अविवेकी विचार डोक्‍यात आले की ते जाणीवपूर्वक डोक्‍यातून घालवून टाकावे लागत. शिवाय दर आठवड्याला तो पेशंटला आपल्या प्रगतीचा आढावा लिहून काढायला सांगे.
बेकची उपचाराची पद्धत सॉक्रेटिससारखीच असे. रुग्णाला तो सतत प्रश्‍न विचारी आणि त्याचं उत्तर आलं की त्या रुग्णाच्या बोलण्यातला परस्परविरोध दाखवण्यासाठी आणखी वेगळा प्रश्‍न विचारे. असं होत होत त्या रुग्णाला आपल्या विचारातली चूक जाणवे आणि तो आपले अविवेकवादी विचार सोडून देई. याच प्रक्रियेने बऱ्याच संभाषणानंतर आणि सेशन्सनंतर रुग्ण आपल्या विकारांतून बरा होई. उदाहरणार्थ, जर रुग्ण "अमुक अमुक माणसाला मी आवडत नाही' असं म्हणाला तर बेक "तुला असं का वाटतं?' असं विचारायचा. रुग्णाला यावर काहीच उत्तर सुचायचं नाही. कारण ते वास्तव नसून फक्त रुग्णाच्या मनातलेच खेळ असायचे. या संभाषणामुळे विवेकवादानं आपल्या भावना तपासायला आणि बदलायला मदत व्हायची.

1970 च्या दशकात कॉग्निटिव्ह थेरपी बऱ्यापैकी स्टॅंडर्डाईज झाली होती. कुठल्याही रुग्णासाठी सहा सेशन्सपासून अनेक महिने चालतील एवढी सेशन्स लागायची. 1980 च्या दशकातले साधारण 33 टक्के थेरपिस्ट हे मुख्यत्वे कॉग्निटिव्ह बिहेवियरल होते. घोर नैराश्‍यासारख्या प्रश्‍नावर तर ही पद्धत परिणामकारक असल्याचं सर्वमान्य झालं होतं. म्हातारा झालेला बेक हा सायकोथेरपीतला "दादा' म्हणवला जात होता.

1990 पासून "कॉग्निटिव्ह थेरपी'त बदल होत गेले तरी तिची लोकप्रियता वाढतच गेली. नैराश्‍याबरोबरच ती आत्महत्येची प्रवृत्ती, पॅनिक डिसऑर्डर, भयगंड आणि चिंता अशा विकारांसाठीसुद्धा मोठ्या प्रमाणावर वापरली जायला लागली. कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी या परिणामकारक आहेत हे हजारो, लाखो केसेसवरून दिसून आलंय. याबद्दलचे अनेक संशोधन प्रबंध आतापर्यंत प्रकाशित झालेले आहेत.

No comments:

Post a Comment