Saturday, October 15, 2011

कार्ल रॉजर्स आणि इतर मानसोपचार पद्धती

May 29, 2011

मानसोपचाराच्या दुनियेत बारा थेरपीपासून सहाशे थेरपीपर्यंतचा प्रवास झाला. रेकी, डान्स थेरपी, ऍरोमा थेरपी अशा विविध थेरपी आल्या.कपल्स थेरपी आणि फॅमिली थेरपीनेही काही काळ राज्य केलं. फॅमिली थेरपीमध्ये बरेच प्रकार आणि बऱ्याच विचारधारा आहेत. मात्र या सगळ्या थेरपी फ्रॉईडियन, बिहेवियरल आणि कॉग्निटिव्ह या तीन मुख्य थेरपीजचं कमी जास्त प्रमाणात मिश्रण करून तयार झालेल्या होत्या. यातील अनेक थेरपीना शास्त्रीय आधार होते तर काहींना कोणताही आधार नव्हता.


1950 च्या अगोदर मानसोपचाराच्या एकूण बाराएक थेरपीज अस्तित्वात होत्या; पण 1970 ते 2000 या कालावधीत हा आकडा 600 पर्यंत पोचला. मानसोपचारामध्ये फ्रॉईडच्या मनोविश्‍लेषणामध्ये फेरफार करून निर्माण झालेली "डायनॅमिक सायको थेरपी' माणसाला यंत्राप्रमाणे मानून स्टिम्युलस-रिस्पॉन्सच्या तत्त्वावर आधारलेली "बिहेवियर थेरपी' आणि बुद्धीचा वापर करून आपल्या विचारांनी भावना बदलता येतात असं मानणारी "विवेकवादी कॉग्निटिव्ह थेरपी', अशा तीन महत्त्वाच्या थेरपीज गाजल्या. याशिवाय अब्राहम मॅस्लॉव्हची मानवतावादी मानसोपचाराची पद्धत (ह्युमॅनिस्टिक थेरपी), कार्ल रॉजर्सची "क्‍लायंट सेंटर्ड थेरपी', फ्रेडरिक पर्ल्सची "जेस्टाल्ट थेरपी, एरिक बर्न आणि थॉमस ए. हॅरिस यांची "ट्रान्झॅक्‍शनल ऍनॅलिसिस'ची थेरपी, गट (ग्रुप), जोडपी (कपल्स) आणि कुटुंब (फॅमिली) यांची थेरपी, संगीताची थेरपी (म्युझिक थेरपी), खेळांची थेरपी (प्ले थेरपी) आणि ऑड्‌ज अँड एण्ड्‌ज थेरपी असे या वेगवेगळ्या थेरपीजचे काही मुख्य प्रकार होते. यातल्या बऱ्याचशा थेरपीज या फ्रॉईडियन, बिहेवियरल आणि कॉग्निटिव्ह या तीन मुख्य थेरपीजचं कमी-जास्त प्रमाणात मिश्रण करून तयार झालेल्या होत्या.

1950 च्या दशकात ऍब्राहम मॅस्लॉव्हच्या नेतृत्वाखाली मानवी क्षमतेची चळवळ (ह्यूमन पोटेन्शियल मुव्हमेंट) सुरू झाली. मानवतावादी मानसशास्त्र (ह्युमॅनिस्टिक सायकॉलॉजी) हा या चळवळीचा आत्माच होता. फ्रॉईडचं मनोविश्‍लेषण हे माणसाचं व्यक्तिमत्त्व आणि त्याची वागणूक ही पूर्णपणे त्याच्या/ तिच्या आयुष्यातल्या (विशेषतः लहानपणच्या) लैंगिक अनुभवांवर अवलंबून असते असं मानत. तसेच बिहेवियरिस्ट मानसशास्त्र तर माणसाला एखाद्या यंत्राप्रमाणेच माने. त्यावर कुठली चेतना (स्टिम्युलस- ड) दिल्यावर त्याची काय प्रतिक्रिया (रिस्पॉन्स - ठ) मिळते, अशा एस-आर जोड्यांचाच अभ्यास बिहेवियरिस्ट मंडळी करत आणि मग त्यावर आधारलेल्या रिवॉर्ड-पनिशमेंटच्या कल्पनेप्रमाणे थेरपी देत. हे ह्युमॅनिस्ट विचारवंतांना मान्य नव्हतं. त्यांच्या मते, प्रत्येकात काही क्षमता (पोटेन्शियल्स) दडलेल्या असतात. प्रत्येकाला त्या क्षमतांपर्यंत पोचून त्यांचा पूर्णपणे उपयोग आणि वापर करण्याचा हक्क आहे आणि त्याच्या/ तिच्या त्या क्षमतांपर्यंत प्रत्यक्षात तो/ती किती प्रमाणात पोचण्यात यश मिळवते, यावर त्याचं/ तिचं यश मोजण्यात यावं. उदाहरणार्थ- एखाद्या स्लो लर्नरनं एखादं सोपं गणित सोडवणं आणि एखाद्या हुशार माणसानं अवघड गणित सोडवणं, यात ह्युमॅनिस्ट मंडळी दोघांना तेवढेच मार्क्‍स देतील. कारण दोन्ही व्यक्तींनी त्यांच्या क्षमतेच्या तुलनेत तितकंच चांगलं काम केलंय असं ह्युमॅनिस्ट मानत. ह्युमॅनिस्टिक थेरपी रुग्णांमध्ये त्याच्या क्षमता परिपूर्ण होण्यासाठी त्याच्या मार्गातले जे मानसिक अडथळे असतील ते दूर करण्याचा प्रयत्न करे. उदाहरणार्थ- एखाद्याला उगाचच स्वतःविषयी न्यूनगंड असेल किंवा एखाद्याच्या मनात स्वतःविषयीची प्रतिमा (सेल्फ इमेज) वाईट असेल तर ह्युमॅनिस्टिक थेरपी ही इमेज बदलण्याचा प्रयत्न करे. ह्युमॅनिस्टिक तत्त्वज्ञान व्यक्तिगत निवडींना आणि स्वातंत्र्याला महत्त्व देत. उदाहरणार्थ- एखाद्यानं अविवाहित राहावं की लग्न करावं? लग्नानंतर जोडीदाराशी निष्ठेनं राहावं की लैंगिक स्वातंत्र्य मानावं? अर्थातच बंडखोर, व्यक्तिवादी अशा 1960 च्या दशकातल्या तरुणांना हे विचार खूपच जवळचे वाटले.

"क्‍लायंट सेंटर्ड थेरपी'चा जनक कार्ल रॉजर्स हा एक प्रचंड आशावादी, प्रभावशाली मानसोपचारतज्ज्ञ (सायकोथेरपिस्ट) म्हणून अमेरिकेत गाजला. फ्रॉईडच्या पद्धतीप्रमाणे लहानपणच्या आठवणी खणून काढण्यापेक्षा वर्तमानकाळातल्या प्रश्‍नांकडे जास्त चांगलं लक्ष द्यावं; माणसं ही मूलतः चांगली असतात आणि आपण आपल्या आयुष्याला पाहिजे तसं वळणही देऊ शकतो, हे एकदा लोकांना समजलं, की ते त्यांचे प्रश्‍न स्वतःच चांगल्या रीतीनं सोडवू शकतात, असं रॉजर्स माने. त्यामुळे रॉजर्स त्याच्या थेरपीमार्फत क्‍लायंटचा स्वतःमध्ये हे बदल घडवण्याविषयीचा (रॉजर्स "पेशंट' हा शब्द न वापरता "क्‍लायंट' हा शब्द वापरे.) आत्मविश्‍वास वाढवे. डायनॅमिक सायकोथेरपी वापरणाऱ्या नवफ्रॉईडियन्सना रॉजर्सची "क्‍लायंट सेंटर्ड थेरपी' फारशी पटायची नाही, पण 1950 च्या आणि 1960 च्या दशकात अनेक मानसशास्त्रज्ञांनी आणि थेरपिस्ट मंडळींनी रॉजर्सच्या पद्धतीचं स्वागतच केलं, पण कालांतरानं रॉजर्सच्या थिअरीचा प्रभाव ओसरत गेला.
याच सुमारास कित्येक इंटरपर्सनल थेरपीज निघाल्या. आपण जेव्हा काही गोष्टी करतो किंवा ठराविक तऱ्हेनं वागतो तेव्हा त्याचा इतरांवर काय परिणाम होतो, याची जाणीव या थेरपीत करून दिली जाते. त्यामुळे क्‍लायंटची भावनिक अवस्था आणि त्याचे/तिचे इतरांबरोबरचे संबंध सुधारतील अशी यात कल्पना असते. यातल्या ग्रुप थेरपीजचे शेकडो प्रकार निघाले. 1960 च्या दशकात सामूहिकतेला, कम्युन्सना महत्त्व आलं होतं. अशा वेळी थेरपिस्टनं क्‍लायंटबरोबर एकट्यानं बसून थेरपी देण्याऐवजी सगळ्या गटानं एकत्र बसून एक-एक करून प्रत्येकानं आपले प्रश्‍न मांडावेत आणि इतरांनी त्याच्या प्रश्‍नांची चेष्टा न करता त्यांच्याकडे सहानुभूतीनं बघावं, त्यांच्यावर चर्चा करावी आणि त्यातून एकमेकांना समजावून घेऊन, सल्ले देऊन मैत्रीपूर्वक पद्धतीनं प्रश्‍न सोडवावेत, ही यामागची धारणा होती. या सगळ्यासाठी फक्त एकच थेरपिस्ट लागे. तो या चर्चेचं नियंत्रण करे आणि दिशा दाखवे. यामध्ये सर्वसाधारणपणे आठ जणांचे गट असत आणि दर आठवड्याला तो गट एकदा भेटे. सर्वच जण व्यक्तिगत थेरपीला गेले तर त्यासाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा या ग्रुप थेरपीचा खर्चही कमी येई. ग्रुप थेरपी ही प्रथम अमेरिकेत सुरू झाली आणि नंतर ती इतर देशांतही पसरली.

जोडप्यांमधल्या बिघडलेल्या संबंधांच्या प्रश्‍नांसाठी "कपल्स थेरपी' असते. यात थेरपिस्टची भूमिका बजावणं अवघड असतं. अगदी त्यातल्या एकाची बाजू जरी पटली तरी दुसऱ्याला न दुखावता थेरपिस्टला आपली भूमिका समजावून सांगून दोघांत सख्य निर्माण करायचं असतं. सर्वसाधारणपणे ही थेरपी सेशन्स दर आठवड्याला एक याप्रमाणे वर्षभर चालतात. काही वेळा उगाचच फरफटत दोघांचं आयुष्य चाललेलं असतं. अशा वेळी थेरपिस्ट त्या दोघांना शांततेनं, सहमतानं विभक्तही व्हायचा सल्ला देतात.
1950 च्या दशकात "फॅमिली थेरपी' हा प्रकार सुरू झाला. समजा कुटुंबातल्या एकाला भयगंड, नैराश्‍य किंवा तत्सम विकार झालेला असेल, तर सगळ्या कुटुंबानंच ही थेरपी घ्यावी. कारण या कौटुंबिक संबंधातच या विकारांचं मूळ दडलंय, असंच हे थेरपिस्ट मानत. मग थेरपिस्ट मंडळी ते कुटुंब कसं चालतं, घरातलं- बाहेरची कामं कोण करतं, निर्णय कोण घेतं, वगैरे गोष्टींवर चर्चा करून त्या कुटुंबातले संबंध तपासत. त्या कुटुंबात हुकूमशाही चालते का, ते सगळे एकत्र मजेत वेळ काढतात का, त्यांच्यात एकी ("टुगेदरनेस') आहे का, कुटुंबामध्ये एखाद्याचेच खूप लाड आणि दुसऱ्याकडे दुर्लक्ष होतंय का, वगैरे प्रश्‍नांवर काथ्याकूट होतो. कुटुंबाशी चर्चा करून थेरपिस्ट काही आकृत्या काढतो. त्यांना "जेनोग्राम्स' असं म्हणतात. तीन पिढ्यांपर्यंतचे कौटुंबिक संबंध यात रेखाटलेले असतात. फॅमिली थेरपीमध्ये बरेच प्रकार आणि बऱ्याच विचारधारा आहेत.

याशिवाय अमेरिकेत- विशेषतः कॅलिफोर्नियात आणि काही प्रमाणात अमेरिकेतल्या इतर भागातही थेरपीजच्या चित्रविचित्र पद्धती वापरणं चालूच आहे. यातल्या काही विक्षिप्त असल्या तरी काही वैज्ञानिक आहेत; पण काही वैज्ञानिकही नाहीत. उदाहरणार्थ - "प्रायमल थेरपी'मध्ये क्‍लायंटला जर खूप राग येत असेल तर तो काढून टाकण्यासाठी इतरांना बाहेर जायला सांगून जोरजोरात ओरडायला शिकवतात. त्यामुळे रागीटपणा कमी होईल, ही यामागची कल्पना असते. तसंच जपानमध्ये "मोरिटा थेरपी' निघाली. ही झेन तत्त्वांवर आधारलेली आहे. यात क्‍लायंटला सुरवातीला 4 ते 7 दिवस इतरांपासून दूर एकट्यानं अंथरुणात पडून राहावं लागतं. या काळात त्याला काहीही वाचणं, बोलणं, ऐकणं करता येत नाही. थोडक्‍यात, कुठलेच सेन्सरी अनुभव त्याला या काळात घेता येत नाहीत. या काळात क्‍लायंट अंतर्मुख होऊन स्वतःविषयी, चांगल्या-वाईट सगळ्या भावनांचा विचार करून त्या भावना स्वीकारायला शिकतो. पूर्वीच्या झालेल्या गोष्टींवर पश्‍चात्ताप आणि भविष्याबाबतची अनाठायी भीती यापेक्षा वर्तमानात जगायला ही थेरपी शिकवते. विपश्‍यनेमध्ये अशाच तऱ्हेचं तत्त्व सांगितलं आणि शिकवलं जातं.
"ऑर्डियल थेरपी' ही तर विचित्रच आहे. समजा कुणाला वाजवीपेक्षा राग जास्त येत असेल तर त्यावर मध्यरात्री गजर लावून उठून दमेपर्यंत व्यायाम करायचा. अर्थात या अशा विचित्र प्रकारांमुळे काही जणांना जो येत नव्हता तो राग यायला लागायचा, हा भाग वेगळा! "पॅराडॉक्‍सिकल प्रिस्क्रिप्शन'मध्ये ज्या गोष्टीपासून मुक्ती मिळवायची आहे (उदा.- दारू) ती गोष्ट मुक्तपणे सर्रास करायला सांगितल्यामुळे उलट ती करण्याची इच्छा कमी कमी होत जाईल, अशी यामागची थिअरी असते. "आय मुव्हमेंट डी-सेंटिटायझेशन अँड रिप्रोसेसिंग' किंवा एचऊठ या पद्धतीत क्‍लायंटला ज्या गोष्टीवर त्याला मात करायची आहे (उदा.- व्यसन, राग) त्या गोष्टीची आणि त्या गोष्टीला कारणीभूत असणारी गोष्ट, घटना किंवा व्यक्ती यांच्या प्रतिमा (उदाहरणार्थ - दारू आणि ज्यानं ती सवय लावली ती व्यक्ती) क्‍लायंटच्या डोळ्यांसमोर आणायला सांगतात. मग थेरपिस्ट क्‍लायंटच्या डोळ्यांसमोरून बोट फिरवतो. क्‍लायंटनं आपली बुबुळंही त्या बोटांप्रमाणे 20 ते 30 सेकंदं फिरवायची. असं बऱ्याचदा केल्यावर त्या गोष्टी मनातून निघून जातात, असं ही थिअरी मानते. अर्थातच याला काहीही वैज्ञानिक आधार नाही.

"एरहार्ड सेमिनार्स ट्रेनिंग किंवा एडढय हा थेरपीचा प्रकार अमेरिकेत 1970 च्या सुमारास सुरू झाला. ही थेरपी म्हणजे अफाटच भंकसगिरी होती. त्यासाठी प्रत्येकी 10,000 ते 12,000 रु. (250 डॉलर) द्यावे लागायचे. त्यामध्ये अनेकांना एका हॉलमध्ये एकत्र केलं जायचं आणि त्यांना स्टेजवरून काही माणसं प्रचंड शिवीगाळ करायची. या अनुभवानंतर प्रत्येकाला आपल्या जीवनाचं रहस्य उलगडेल आणि त्या सगळ्यांना बरं वाटेल, असं मानलं जाई. गंमत म्हणजे या शिव्या ऐकण्यासाठी माणसांची झुंबड उडत असे! मग हिप्नॉसिसचाही वापर थेरपी म्हणून होऊ लागला. त्यानंतर "रेकी', "डान्स थेरपी', "पास्ट लाइफ थेरपी', "मिरॅकल्स थेरपी', "ऍरोमा थेरपी' आणि इतरही अनेक प्रकार आणि थेरपीज येतच राहिल्या आणि मानसोपचाराच्या दुनियेत त्यांचं राज्य सुरूच राहिलं.

No comments:

Post a Comment