Sunday, January 9, 2011

कल्पनाशक्ती कशात? मेंदूत की हृदयात?

सौजन्य - सकाळ - सप्तरंग, ९ जाने २०१०

ऍरिस्टॉटलच्या काही थिअरीज मात्र पूर्णपणे वेडगळ होत्या. "उन्हाळ्यात पाणी प्यायले तर उंदीर मरतात', "ईल मासा अचानकच शून्यातून निर्माण होतो' किंवा "माणसाच्या शरीरात फक्त आठ बरगड्या असतात', "स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी दात का असतात', अशा अनेक हास्यास्पद थिअरीज्‌ तो मांडे.

प्राचीन काळापासून माणसाला झोप, जागेपण, स्वप्न, भीती, राग, लोभ, वासना, आनंद आणि दुःख अशा अनेक गोष्टींविषयी कुतूहल वाटे. मन म्हणजे काय? की मन म्हणजेच आत्मा, हेही प्रश्‍न माणसाला भेडसावत होतेच. तसेच या भावनांचे कल्लोळ मेंदूत उमटतात की हृदयात, या प्रश्‍नानेही त्याला भंडावून सोडले होते. अनेक शतकांनंतर शेक्‍सपीअरने "मर्चट ऑफ व्हेनिस'मध्ये "आपली कल्पनाशक्ती कशात वास्तव्य करते? हृदयात की मेंदूत?' असा सवाल केला होता.

कित्येकांना मेंदूपेक्षा हृदयच महत्त्वाचं वाटे. इजिप्तमध्ये माणूस मेल्यानंतर त्याचे हृदय अतिप्राचीन काळी बराच काळ जपून ठेवले जाई; पण मेंदू मात्र नष्ट करण्यात येई! नाकाच्या मागच्या बाजूने कवटीला एक मोठे भोक पाडून त्यातून तो मेंदू खरवडून काढून मग तो फेकून देत असत. तसे केले नाही तर मेंदूचा भाग कुजून जाईल म्हणून ते हा उपद्‌व्याप करत असत; पण कित्येकांना मेंदू महत्त्वाचा वाटे. मेंदूच्या रचनेचा अभ्यास फार पूर्वीपासून सुरू झाला आहे. ही रचना कळण्यासाठी माणसांनी मेलेल्या माणसांच्या कवटीला भोक पाडून मेंदूचे निरीक्षण करायला सुरवात केली.

ग्रीक भाषेत आत्म्याला "सायकी' आणि अभ्यासाला "लॉजिया' असे म्हणतात. म्हणूनच आत्म्याचा अभ्यास म्हणजे "सायकॉलॉजी'. प्रत्यक्षात मात्र "सायकॉलॉजी' हा शब्द जर्मन तत्त्वज्ञ रुडॉल्फ गॉकेल (1547 ते 1628) याने प्रथम वापरला आणि ख्रिस्तिऍन वोल्फ (1679 ते 1754) या दुसऱ्या जर्मन तत्त्वज्ञाने तो लोकप्रिय केला. ख्रिस्तपूर्व 510 मध्ये अल्क्‍मेऑन याने सर्वप्रथम विच्छेदनाची कल्पना मांडली. आपल्याला होणाऱ्या संवेदनांचे, जाणिवांचे (सेन्सेशन) केंद्रस्थान मेंदूतच आहे, हे त्याने ओळखले होते. त्याने एका प्राण्याचा डोळा काढला आणि डोळ्यापासून संदेश कसा आणि कुठे जातो, याचा मागोवा घेतला, तेव्हा तो संदेश मेंदूपर्यंत जातो, हे त्याच्या लक्षात आले. अल्क्‍मेऑनची काही मते मात्र गमतीशीरच होती. "आपल्या मेंदूतल्या रक्तवाहिन्या पूर्णपणे भरलेल्या असल्या की, आपल्याला झोप येते आणि त्या रिकाम्या झाल्यावर आपल्याला जाग येते; तसेच आपल्या डोळ्यांत अश्रूंप्रमाणेच अग्नीही असतो', अशी चमत्कारिक मते तो मांडत असे! गंमत म्हणजे "संदेश आपल्या सेन्सेसमधून मेंदूपर्यंत हवेतून प्रवास करतात', असे तो म्हणे.
हिपोक्रेटस हा ग्रीक डॉक्‍टर आधुनिक वैद्यकशास्त्राचा जनक मानला जातो. त्यालाही हृदयापेक्षा मेंदूच महत्त्वाचा वाटे. "मेंदूमधूनच सुख-दुःख, वेदना, आनंद, हास्य आणि द्वेष वगैरेंसारख्या भावना निर्माण होऊन आपल्यासमोर प्रकट होतात,' असे तो म्हणे. "आपण वेडे आहोत की शहाणे, आपल्याला वाटणारी भीती आणि चिंता, आपल्या झोपेचे वेळापत्रक; आपली स्मरणशक्ती आणि विसरभोळेपणा या सगळ्यांचे रहस्य मेंदूत दडले आहे', असे तो म्हणे.
इतक्‍या पूर्वी आधुनिक प्रयोगशाळा आणि उपकरणे नसताना त्याने हे म्हणून ठेवावे, हे एक आश्‍चर्यच होते.

डेमोक्रॅटस (ख्रिस्तपूर्व 460 ते 362) याला आजूबाजूच्या लोकांच्या चुका आणि वेडेपणा बघून हसूच येई. त्यामुळे त्याला "लाफिंग फिलॉसॉफर' असेच म्हणत असत. त्यालाही मेंदूच मानवी शरीराचा केंद्रबिंदू आहे, असे वाटे. सगळ्या वस्तू अणूंच्या बनलेल्या असतात, हे तत्त्व त्यानेच मांडले. "आपण एखादी गोष्ट बघतो, तेव्हा त्या वस्तूचे काही अणू त्यांच्या संपर्कात असलेल्या हवेच्या अणूंवर आपला ठसा उमटवतात. हे हवेचे अणू मग प्रवास करत करत आपल्या डोळ्यांपर्यंत येतात आणि आपल्या डोळ्यांतल्या अणूंवर आणि मनावर परिणाम करतात, तेव्हा ती वस्तू आपल्याला दिसायला लागते, असे तो म्हणायचा.
शरीर आणि मेंदू यांच्यापासून आपला आत्मा वेगळा असतो, असे सॉक्रेटिस माने. सॉक्रेटिस सगळ्यांत ज्ञानी आणि शहाणा माणूस आहे, असे त्याच्याविषयी म्हटले जायचे. त्यावर तो म्हणे, "मला काय माहीत नाही, हे मला चांगले माहीत आहे आणि त्या अज्ञानाच्या बाबतीत मी इतरांपेक्षा ज्ञानी आहे.' सॉक्रेटिस प्रश्‍न विचारून लोकांना विचार करायला लावायचा. म्हणून त्याला "विचारांची सुईण' (मिडवाईफ ऑफ थॉट) म्हटले जायचे.

प्लेटो (ख्रिस्तपूर्व 427-347) या सॉक्रेटिसच्या शिष्याचाही आत्म्यावर विश्‍वास होता. आज आपण ज्याला "मन' असे म्हणतो, त्याला प्लेटो "आत्मा' म्हणत असे. गंभीर वृत्तीचा प्लेटो कधीही खळखळून हसत नसे. त्याने लिहिलेल्या काही प्रेमकविता अजूनही उपलब्ध आहेत. प्लेटोने ख्रिस्तपूर्व 387 साली एक अकादमी काढली. त्याला भूमितीचे इतके वेड होते की, त्याच्या अकादमीत भूमिती न येणाऱ्यास प्रवेशास मनाई असल्याची पाटी चक्क लावलेली होती. त्याच्या मते गोलाकार हा परिपूर्ण (परफेक्‍ट) आकार असतो. माणसाचे डोके हे सर्वसाधारणपणे गोलाकार असल्यामुळेच त्यातला मेंदू आपले मन नियंत्रित करत असला पाहिजे, असे त्याचे मत बरोबर असले तरी ते विचित्र युक्तिवादाने तयार झालेले होते! आपली कारणमीमांसा आपल्या मेंदूत, आपले स्पिरिट आपल्या हृदयात; तर आपली भूक आपल्या पोटात दडलेली असते आणि या सगळ्या गोष्टी आपल्या पाठीतल्या कण्यातल्या "मॅरोज'ने एकमेकांशी जोडलेल्या असतात. आपल्या भावना रक्तवाहिन्यांमधून वाहतात, असे प्लेटोला वाटायचे.

ख्रिस्तपूर्व 384 ते 322 च्या दरम्यान ऍरिस्टॉटल हा एक मोठा प्रभावशाली विचारवंत आणि तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या विचारांनी पुढची 1500 वर्षे पाश्‍चिमात्य तत्त्वज्ञानावर राज्य केले. प्लेटोजवळ 20 वर्षे शिकल्यानंतर दोघांमधल्या मतभेदांमुळे ऍरिस्टॉटलने अकादमी सोडून स्वतःची मते स्वतंत्रपणे मांडायला सुरवात केली. त्याने खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, नीतिशास्त्र, धर्म, सौंदर्यशास्त्र, जीवशास्त्र, राज्यशास्त्र आणि मानसशास्त्र या सगळ्यांमध्ये खोलवर विचार केला. स्मृती, संवेदना, प्रेरणा, भावना, व्यक्तिमत्त्व अशा मानसशास्त्राशी निगडित अनेक गोष्टींवर त्याने भाष्ये केली. त्याच्या "डी ऍनिमा' या ग्रंथात तो प्रेरणा आणि व्यक्तिमत्त्वं यांच्याविषयी बोलतो. "शरीर आणि आत्मा यांचे अस्तित्व वेगळे असून, आत्मा हा माणसाच्या सगळ्या विचारधारेचे मूळ आहे', असे ऍरिस्टॉटल म्हणे.

ऍरिस्टॉटलला मेंदूपेक्षा हृदय सगळ्यांत महत्त्वाचे वाटे. किडे, अळ्या, शेलफिश अशा अनेक प्राण्यांच्या शरीरातल्या सगळ्या रक्तवाहिन्या हृदयाकडेच धाव घेत होत्या, असे त्याने अभ्यासले होते. स्पर्श केल्यावर हृदय एकदम झटका लागल्यासारखे आखडते; पण मेंदूला स्पर्श केल्यावर तसे काहीच होत नाही, हेही ऍरिस्टॉटलने अभ्यासले होते. कोंबडीचे डोके कापल्यावरही ती काही काळ का होईना पण पळू शकते, हे त्याने पाहिले, तेव्हा तर मेंदूपेक्षा हृदयच जास्त महत्त्वाचे आहे आणि तेच शरीराला नियंत्रित करते, त्यातच आपल्या आत्म्याचे वास्तव्य असते, याबद्दल त्याची खात्री पटली. इसवीसन 130 ते 200 दरम्यानचा प्रसिद्ध डॉक्‍टर आणि वैज्ञानिक गेलन याला मात्र आपल्या मेंदूत आपले मन दडलेले आहे, याची खात्री होती. त्या काळी माणसाच्या मृतदेहाचे विच्छेदन करणे, हा त्या मृत माणसाचा अपमानच समजला जाई. त्यामुळे गेलनने अनेक डुकरे, माकडे आणि गुरे-ढोरेंचे विच्छेदन केले. त्याने डुकराच्या मेंदूपासून त्याच्या अवयवापर्यंत जाणाऱ्या नर्व्हज्‌ कापून याचे त्यांच्यावर काय परिणाम होतात, याविषयीच्या निरीक्षणांची बारकाईने टिपणे करून ठेवली. त्याने पाठीच्या कण्यापासून निघणारे अनेक मज्जातंतू एकेक करत कापायला सुरवात केली.

कुठला मज्जातंतू कापल्यावर शरीरातल्या कुठल्या भागावर काय परिणाम होतो, हे गेलनला बघायचे होते. स्वरयंत्राकडे जाणारा मज्जातंतू कापला तर स्वरयंत्रातून आवाजच येत नाही, हे त्याने न्याहाळले होते. त्या काळी ग्लॅडिएटर्स योद्‌ध्यांची हिंस्र प्राण्यांशी किंवा आपापसात झुंज लावून त्यांची गंमत बघायची हा रोममधल्या श्रीमंतांचा विरंगुळाच होता. ग्लॅडिएटर्सचा डॉक्‍टर म्हणून काम बघत असल्यामुळे गेलनला अनेक डोकी, मेंदू, मज्जातंतू यांचा अभ्यास करणे शक्‍य झाले. त्यावरून आपल्या संवेदना आणि सुख-दुःखे यांना मेंदूच कारणीभूत असतो, असे गेलनचे मत झाले होते. एकूण काय तर, मेंदूच्या रचनेने संशोधकांचे चांगलेच डोके खाल्ले होते!