Saturday, October 15, 2011

स्वप्नांचे अर्थ

February 27, 2011

"आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा आवाज म्हणजे स्वप्नं' असं सॉक्रेटिस माने. यामुळे इतर तत्त्वांप्रमाणे तोही स्वप्नांना खूप महत्त्व देई आणि त्यांच्याकडे गंभीरपणे बघे. ऍरिस्टॉटल मात्र स्वप्नांकडे विवेकवादानं बघायचा.


स्वप्नातल्या परीला, स्वप्नात फक्त पंख
दिवसास पाय पंगू, अन्‌ हात शापिलेले

विंदा करंदीकरांसारखा थोर कवीनं स्वप्नातलं काल्पनिक सुरम्य जग कसं सुखावह असतं आणि वास्तव किती दाहक असतं हेच वरील ओळींमध्ये सांगितलंय. स्वप्नांविषयी खूप रंजक गोष्टी प्रसिद्ध आहेतच. सत्यवचनी राजा हरिश्‍चंद्र स्वप्नात दिलेलं वचन पाळण्यासाठी आपलं सगळं राज्य विश्‍वामित्राला दान करून स्वतः कंगाल झाला! अब्राहम लिंकनला आपल्यावर कोणीतरी गोळी झाडतोय असं स्वप्नं पडलं होतं असं म्हणतात आणि झालंही तसंच! एलियास होव याला स्वप्नांवरूनच शिवणयंत्राची कल्पना सुचली होती म्हणे! रामानुजम या प्रसिद्ध गणिततज्ज्ञालाही अनेक गणितं सोडवायला स्वप्नात येणारी देवी मदत करते, असंच वाटे. केक्‍युल या बेंझिनची रचना शोधून काढणाऱ्या शास्त्रज्ञालाही त्या रचनेचं चित्र स्वप्नातच दिसलं होतं! आचार्य अत्रेंच्या स्वप्नातही एकदा तुळजापूरची भवानी आली आणि मग अत्रे तडक भवानीमातेच्या दर्शनाला तुळजापूरला जाऊन पोचले! कवी बोरकरांनीही मेघदूताच्या एका अवघड श्‍लोकाचा अनुवाद स्वप्नात केला होता असं सांगतात!

स्वप्नांवर अनेक चित्रपट आधारलेले आहेत. 1945 मध्ये अल्फ्रेड हिचकॉकच्या स्वप्नांवर आधारलेल्या "स्पेसबाऊंड' या सिनेमातल्या स्वप्नांची कल्पना आणि रचना सॅल्व्हॅडॉर दाली या प्रसिद्ध सररिऍलिस्ट चित्रकाराची होती. यात इनग्रिड बर्गमन आणि ग्रेगरी पॅक यांचा अफलातून अभिनय होता. अकिरा कुरोसावा या जगप्रसिद्ध दिग्दर्शकाला आयुष्याच्या वेगवेगळ्या कालखंडांत पडलेल्या स्वप्नांवर आधारलेला 1990 सालचा "ड्रीम्स' हा चित्रपटही खूप गाजला. इंग्रजी साहित्यात तर स्वप्नं अनेकदा येतात. फ्रॅंझ काफ्काच्या "मेटॅमॉर्फिसिस' या प्रसिद्ध दीर्घकथेची सुरवातच त्यातला नायकच स्वप्नातून जागा होऊन होते. "अल्केमिस्ट' या पाउलो कोहेलोच्या प्रसिद्ध पुस्तकात सॅंटियागोला आयुष्यात पुढे काय घडणार आहे, याचे संकेत त्याच्या स्वप्नातून मिळतात, असं दाखवलंय. शेक्‍सपिअरच्या "हॅम्लेट'मध्ये स्वप्नं येतातच. रवींद्रनाथ टागोरांचीही "इन ए डस्की पाथ ऑफ ए ड्रीम' अशी एक स्वप्नांवर सुंदर कविता आहे. गुलजारच्या अनेक कवितांमध्ये स्वप्नांचा उल्लेख सुंदरपणे येतो.

मानवी इतिहासात स्वप्नांचा अर्थ दोन तऱ्हांनी लावला गेला. स्वप्नं ही देव-दानवांनी निर्माण केलेली असतात; स्वप्नांद्वारा ते माणसांना पुढे काय होणार आहे याचे संकेत देतात किंवा रोगाचं निदान करायला मदत करतात, असं एका पद्धतीत मानत. स्वप्नात आलेल्या वस्तू, चिन्हं, त्यांचे रंग यावरून त्यांचा अर्थ लावला जाई. त्यामुळे या पद्धतीत ते स्वप्न कोणाला पडतंय, त्याची मनःस्थिती काय आहे, याचा त्याच्या अर्थाशी फारसा संबंध नसे. दुसऱ्या पद्धतीत स्वप्नं ही माणसाच्या मनाच्या अवस्थेशी जोडली गेली. मध्ययुगानंतर दुसरी पद्धत वापरायला सुरवात झाली, पण तरीही पहिल्या पद्धतीचा प्रभाव आजही आहेच.

पहिल्या पद्धतीत काही काही स्वप्नांचे तर अर्थ खूपच गंमतशीर तऱ्हेनं कित्येक जणांनी लावले होते. उदाहरणार्थ समजा, तुमच्या स्वप्नात दुपारचं दृश्‍य आलं तर म्हणे तुमची ज्याच्याबरोबर मैत्री असेल, ती मैत्री घट्ट होईल आणि दीर्घकाळ टिकून राहील किंवा स्वप्नात मुंग्या आल्या तर तुम्हाला दिवसभर कसला तरी त्रास होत राहील म्हणे. समजा, तुमच्या स्वप्नात तुमची आत्या आली तर त्याचा अर्थ तुम्हाला कुणाची तरी बोलणी खावी लागतील; तुमच्या स्वप्नात केळं दिसलं तर तुम्हाला अगदीच अरसिक आणि कोरडा, प्रेम न करणारा जोडीदार मिळेल; तुम्हाला अंघोळीचं स्वप्नं पडलं तर तुमच्या आयुष्यात मोठे बदल होतील; स्वप्नात मधमाश्‍या आल्या तर काहीतरी चांगलं होईल; स्वप्नात घंटानाद आला तर दूरच्या कुठल्यातरी मित्राचा मृत्यू ओढवेल; स्वप्नात पारदर्शक द्रवपदार्थानं भरलेल्या बाटल्या दिसल्या तर काहीतरी आनंदमय होणार असतं. (जागेपणी जिन किंवा व्होडकांच्या पारदर्शक बाटल्या बघून वाटतं तसंच!); पक्षी असलेला पिंजरा स्वप्नात आला तर तुम्हाला खूप पैसा आणि सुंदर मुलं या दोन्ही गोष्टी मिळतील; स्वप्नात घड्याळ दिसणं म्हणजे शत्रूपासून धोका पोचेल; स्वप्नात ढग दिसणं म्हणजे काहीतरी वाईट घडण्याची सुरवात होईल; हातरुमालाचं स्वप्न म्हणजे प्रेमप्रकरण होईल; घोड्याचं स्वप्नं पडलं म्हणजे प्रेम आणि उद्योगधंदा यात यश मिळेल, पण उशिरा मिळेल; स्वप्नात जांभई दिली तर मित्राला कुठलातरी प्रचंड त्रास होईल किंवा धोका पोचेल; बायको स्वप्नात येणं म्हणजे घरी असमाधानाचं लक्षण (काही लोकांना जागेपणीही असंच वाटतं, हा भाग वेगळा.), अशा अनेक चित्रविचित्र गोष्टी यात असायच्या आणि यामध्ये एखादं स्वप्न कुणालाही पडलं तरी त्याचा अर्थ तोच असायचा, म्हणून मग स्वप्नांचे अर्थ सांगणारी बरीच पुस्तकंही निघाली. ती अजूनही चालू आहेत!

"चेस्टर बेऍटी पॅपिरस' हे इजिप्तमधलं स्वप्नांवरचं जगातलं पहिलं पुस्तक होतं. ब्रिटिश म्युझियममध्ये ठेवलेल्या या पुस्तकात आपल्याला ख्रिस्तपूर्व 1350 मध्ये केलेल्या 200 स्वप्नांचे अर्थ कळतात. जर आपला दात पडल्याचं स्वप्नं पडलं तर आपल्या नातेवाइकांकडून आपला मृत्यू ओढवेल, असा त्याचा अर्थ होतो, असं ते मानत. इजिप्तमध्ये पूर्वीच्या काळी आयुष्यात काही संकट असलेल्यांना काही खास देवळांत झोपायला सांगत. अशा देवळांत झोपल्यास देव तिथे स्वप्नात येऊन आपल्याला उपाय सुचवतो, अशी समजूत होती. कित्येक वेळा आपल्याला स्वतःला त्या स्वप्नांचा अर्थ कळला नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी तिथला स्वप्नांचे अर्थ लावणारा पुजारी त्यांना पडलेली स्वप्नं ऐके आणि त्यांचा अर्थ लावून त्यांना सल्ला देई. इजिप्तमध्ये देवळातले पुजारीच स्वप्नांचा अर्थ लावणारे तज्ज्ञ म्हणून वावरायचे. त्या वेळी काही लोकांना पडलेल्या स्वप्नांचे तपशील "हायरोग्लिफिक्‍सवर' नोंदवलेले आहेत. ज्यांना पडलेली स्वप्नं स्पष्टपणे आठवतात, ते खूप नशीबवान असतात, अशीही त्या काळी समजूत होती.

चांगली स्वप्नं पडण्यासाठी हेलनिस्टिक काळात "ऍस्लेपायन्स' नावाची खास देवळंही निर्माण केली होती. त्या माणसांचा "चांगली' आणि हितकारक अशी स्वप्नं पडेपर्यंत रोज देवळात झोपायला जावं लागायचं. थोडक्‍यात, त्या देवळात चांगल्या स्वप्नांकरता केलेल्या "तीर्थयात्रे'साठी शेकडो लोकांची झुंबड उडे. "एपिडॉरस' इथे भरणारी "एस्क्‍युलॅपियस'ची स्वप्नांची तीर्थयात्रा सर्वात प्रसिद्ध होती. या स्वप्नांवर त्या काळी एवढा विश्‍वास असायचा, की राज्यकर्तेही कुठलं धोरण आखताना या स्वप्नांचा आधार घेत. युद्धाच्या वेळी योग्य डावपेच सुचवण्यासाठी राजांबरोबर स्वप्नांचे अर्थ लावणारे तज्ज्ञही मग मोहिमेवर जात!
"आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा आवाज म्हणजे स्वप्नं' असं सॉक्रेटिस माने. यामुळे इतर तत्त्वांप्रमाणे तोही स्वप्नांना खूप महत्त्व देई आणि त्यांच्याकडे गंभीरपणे बघे. संगीत आणि कला यांचं शिक्षण एका स्वप्नामुळे सॉक्रेटिसनं कसं घेतलं होतं, याविषयी प्लेटोने "फेडो'मध्ये सांगितलं आहे. "आपल्यामध्ये दडलेल्या "अविवेकवादी' इच्छा आणि वासना स्वप्नांमध्ये डोकावतात' असं काहीसं फ्रॉईडसारखंच मत प्लेटोचंही होतं. ऍरिस्टॉटल मात्र स्वप्नांकडे विवेकवादानं बघायचा. सगळ्याच स्वप्नांना अर्थ असतोच असं नाही. देव-दानवांनी ती पाठवलेली नसतात; दिवसभरात घडलेल्या घटनांचा त्या रात्रीच्या झोपेत पडलेल्या स्वप्नांवर परिणाम होतो, असं ऍरिस्टॉटलनं "पर्व नॅचरलिया' या ग्रंथात म्हणून ठेवलं. आपल्या स्वप्नांवर आपल्या शारीरिक अवस्थेचाही परिणाम होत असतो. जेव्हा कानात बारीकसा आवाज येत असेल तेव्हा लोकांना विजेच्या आणि ढगांच्या गडगडाटाची स्वप्नं पडतात; किंवा जर शरीरात थोडीशी गरमी जाणवत असेल तर लोकांना आग लागल्याची स्वप्नं पडतात, असं तो म्हणे.

गेलन यानं "डायग्नॉसिस फ्रॉम ड्रीम्स' लिहिलं. यात कुठलं स्वप्नं पडलं तर कुठला रोग झाला असला पाहिजे, याविषयीचे तर्क बांधले होते. उदाहरणार्थ, जर एखाद्याला आग लागल्याचं स्वप्न पडलं तर त्याला "यलो बाईलचा' त्रास होत असणार; तसंच बर्फाचं स्वप्न पडलं तर कफ आणि थंडी यांचा त्रास होत असणार, असं गेलननं लिहून ठेवलं होतं. आपल्या डाव्या मांडीचं संगमरवरामध्ये रूपांतर झालं आहे असं गेलनच्या एका पेशंटला एकदा स्वप्नं पडलं आणि त्यानंतर त्याच मांडीला रोग झाल्यामुळे त्याचा तो पाय कापून टाकावा लागला होता. तसंच त्याच्या एका पहिलवान पेशंटला आपण रक्ताच्या थारोळ्यात उभे आहोत, असं स्वप्नं पडलं. त्या वेळेला त्या माणसाला प्लुरसी झाली असावी आणि त्यामुळे त्याचं रक्त वाहू दिलं पाहिजे, असा निष्कर्ष गेलननं काढला आणि त्याप्रमाणे उपचार केल्यानंतर तो पहिलवान चक्क बरा झाला, अशी नोंद आहे!

स्वप्नं पडत असताना आपला आत्मा आपलं शरीर सोडून बाहेर भ्रमण करत असतो आणि त्यानंतर तो पुन्हा शरीरात परत येतो, अशीही त्या काळी चीनमध्ये समजूत होती. पण स्वप्नातून तुम्ही अचानक जागे झालात आणि तोपर्यंत आत्मा जर शरीरात परतू शकला नाही तर ते मात्र त्यांना खूप धोक्‍याचं वाटे. या समजुतीमुळे आजही काही चिनी लोक गजराचं घड्याळही वापरत नाहीत. काही रेड इंडियन टोळ्यांमध्ये "स्वप्नं' हे आपल्या पूर्वजांबरोबर चाललेल्या संवादाचं लक्षण मानतात.

स्वप्नांचा अर्थ लावण्यामध्ये सिग्मंड फ्रॉईड हा सगळ्यात मोठा मानसशास्त्रज्ञ समजला जातो. आपल्या लहानपणापासूनच्या अनेक इच्छा, अपेक्षा, आकांक्षा आणि वासना या आपल्या स्वप्नातून व्यक्त होत असतात, असं फ्रॉईडनं मांडलं. फ्रॉईडच्या मते, प्रत्येक स्वप्न हे खूप महत्त्वाचं असतं. ज्युलियस सीझर, चंगीझखान आणि हिटलर हे सगळे स्वप्नांना खूप महत्त्व देत.

विसाव्या शतकात यावर खूप मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू झालं. मेंदूतल्या रासायनिक प्रक्रियेमधूनच स्वप्नं जन्म घेतात अशी थिअरी खरं तर पूर्वीच- 1878 मध्ये कार्ल बिंत्स या जर्मन फिजिऑलॉजिस्टनं मांडली होती. यासाठी ईईजी आणि इतर तंत्रांचा वापरही आता सुरू झाला. पण अजून स्वप्नांचा पूर्ण अर्थ कळणं हे माणसाच्या दृष्टीनं एक स्वप्नच राहिलंय, हे मात्र खरं!

थोडक्‍यात,
भास आम्ही पाहिले, आभास आम्ही पाहिले,
स्वप्नांच्या मृगजळामध्ये, गूढ सत्य पाहिले

No comments:

Post a Comment