Saturday, October 15, 2011

ओसीडी/बीडीडी कारणं आणि उपाय

June 26, 2011

अकाली पडलेली जबाबदारी किंवा लहानपणी वडिलांची अतिशिस्त आणि कठोर टीका सहन करणाऱ्या लोकांना ओसीडी जास्त प्रमाणात होतो, असं आढळलंय. पण तरीही ओसीडीमध्ये शारीरिक (बायॉलॉजिकल) घटक सर्वांत महत्त्वाचे असतात. साधारणपणे 40-50 टक्के केसेसमध्ये ओसीडीची कारणं जेनेटिक घटक, तर उरलेल्या केसेसमध्ये ती बाह्यप्रसंग, अनुभव, आघात यांच्यावर अवलंबून असतात, असं दिसून आलंय. ओसीडी असलेल्या आणि नसलेल्या म्हणजेच नॉर्मल माणसांच्या मेंदूच्या स्कॅन्समध्ये बराच फरक आढळून आलाय. मेंदूच्या स्ट्रेटियम या भागातली सर्किट्‌स ओसीडीच्या रुग्णामध्ये नॉर्मल माणसापेक्षा वेगळी होती, तसंच सीरोटोनिन आणि डोपामाईन या मेंदूतल्या रसायनांचं असंतुलन असणं हेही ओसीडीचं कारण असल्याचं या स्कॅन्सवरून दिसून आलं. ओसीडीनं त्रस्त रुग्णांच्या मेंदूमधल्या स्ट्रायटम या भागातली सर्किट्‌स नॉर्मल माणसापेक्षा वेगळी आढळली.

ओसीडीचे रुग्ण क्वचितच उपचारासाठी येतात. नादिष्टपणा म्हणून बऱ्याचदा त्यांच्याकडे दुर्लक्षच केलं जातं. या विकारावर एक उपाय म्हणजे "कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी'. या थेरपीत रुग्णाला चिंतामुक्त ठेवणं, कंपल्शन किंवा वेडे चाळे न करू देणं, असाही प्रयत्न असतो. यासाठी ते "एक्‍स्पोजर अँड रिच्युअल प्रिव्हेन्शन' ही पद्धत वापरतात. यामध्ये कुठलीही गोष्ट हळूहळू करायला सांगतात. ओसीडीच्या रुग्णांमध्ये यामुळे चिंता निर्माण होऊ शकते. त्यावर विवेकवादानं नियंत्रण ठेवायला हळूहळू शिकवणं आणि तीच गोष्ट वारंवार करण्यापासून परावृत्त करणं आणि तिच्यावर ताबा ठेवणं हे मग सवयीनं जमायला लागतं.

औषधांमुळे ओसीडीच्या नियंत्रणासाठी चांगला परिणाम होतो. या औषधांमुळे 50 ते 70 टक्के रुग्णांमध्ये 25 टक्के सुधारणा दिसून आली, पण ओसीडीवरली औषध घेणं बंद केलं तर 90 टक्के रुग्णांमध्ये ओसीडीची लक्षणं पुन्हा दिसायला लागली. त्यामुळे जे लोक जास्त काळपर्यंत टिकणाऱ्या आणि जास्त परिणामकारक असा "कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी'चा उपयोग करीत नाहीत त्यांना सतत औषधं घेतच राहावं लागतं. पण एकदा "कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी' चालू केली की त्यानंतर औषधं घेतली किंवा नाही, यानं फारसा फरक पडलेला आढळला नाही. पण लहान मुलांमध्ये मात्र औषधांमुळे थोडासा फरक पडू शकतो. ओसीडीचं टोकाचं रूप इतकं भयानक असतं, की त्यावर मेंदूच्या शस्त्रक्रियेनं काही फायदा होतो का, यावरही विचार करावा लागतो. मेंदूच्या ज्या भागांवर ओसीडीमुळे परिणाम होतो, त्यावर शस्त्रक्रिया केल्यास 33 टक्के रुग्णांमध्ये थोडीफार सुधारणा दिसून आली आहे. शक्‍यतोवर फक्त कमीत कमी पाच वर्षं ज्या रुग्णांनी औषधं किंवा "कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी' यापैकी कशालाच दाद दिली नसेल, त्यांच्याचवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्‍टर घेतात. तीव्र स्वरूपात ओसीडी असलेल्या रुग्णांसाठी शॉक्‍सची थेरपी परिणामकारक ठरू शकते.

ओसीडीबरोबरच 12 टक्के केसेसमध्ये "बॉडी डिस्मॉफिक डिसऑर्डर (बीडीडी)' नावाचाही मनोविकार होऊ शकतो. या बीडीडीच्या रुग्णांना शरीरातल्या कुठल्यातरी भागाचं ऑब्सेशन असतं. त्या भागात काहीतरी व्यंग आहे असं वाटल्यामुळे अशी माणसं दिवसातून सतत आरशात बघत राहतात आणि विनाकारण वारंवार डॉक्‍टरकडे तपासणीला जातात. ही बीडीडी झालेली मंडळी सतत मित्रांना आपल्या व्यंगाविषयी विचारतात. मग त्यांना बरं वाटावं म्हणून ते मित्र ते व्यंग नसल्याचं किंवा ते व्यंग किरकोळ असल्याचं सांगतात, पण त्यामुळे या लोकांना तात्पुरतंच बरं वाटतं. काही काळातच गाडी पुन्हा मूळ पदावर येते. आपलं (काल्पनिक) व्यंग इतरांना दिसेल म्हणून मग कित्येक जण नोकऱ्याही करत नाहीत किंवा असलेल्या सोडून ते स्वत:ला कोंडून घेतात. आपण कसे दिसतो, याची किंवा आपल्यातल्या वैगुण्याचीही जाणीव नॉर्मल माणसांना असते, पण याची परिसीमा ओलांडली तर मात्र तो बीडीडी समजायाचा.

एकदा एका रुग्णाला आपलं नाक खूपच मोठं आहे असंच सारखं वाटत होतं. त्याला या मंत्रचळेपणामुळे नुकतंच नोकरीवरूनही काढून टाकलं होतं आणि त्याची मैत्रीणही या नाकाच्या काल्पनिक प्रकरणाला कंटाळून त्याला सोडून गेली होती. शेवटी परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर तो मानसोपचारतज्ज्ञांकडे गेला, पण तिथेही त्या डॉक्‍टरनं आपलं नाक बघून हसू नये म्हणून त्यानं या भेटीच्या वळी सगळे दिवे मालवून अंधार करण्याची विनंती केली होती. या भेटीच्या वेळी त्यानं आपलं नाक झाकण्यासाठी एक लांब टोपी डोक्‍यावर घातली होती. गेली 15 वर्षे सतत याच कारणासाठी तो ही टोपी घालत होता, असं त्यानं त्या मानसोपचारतज्ज्ञाला सांगितलं. सगळे आपल्या नाकाला हसतात याचं त्याला खूप दु:ख होई. मानसोपचारतज्ज्ञाबरोबर संभाषण चालू असताना एकदा त्यानं चेहरा चुकून वर केला तेव्हा त्या मानसोपचारतज्ज्ञानं त्याचं नाक चोरून, हळूच बघितलं तेव्हा त्याला आश्‍चर्यच वाटलं. कारण त्याला त्याच्या नाकात काहीच वैगुण्य आढळलं नाही. उलट तो खूप देखणा असल्याचं त्या मानसोपचारतज्ज्ञाला वाटलं. "या नाकानं माझं आयुष्य बरबाद केलंय; मी त्याचाच सतत विचार करत बसतो; कामालाही मग मी दांड्या मारतो; मित्रांना टाळतो आणि स्वत:ला घरीच कोंडून घेतो....' त्याची टकळी चालूच होती. त्यानं आपलं नाक "ठीक' करण्यासाठी प्लॅस्टिक सर्जनलाही गाठलं होतं, पण "तुझ्या नाकात काही बिघाड नाहीये' असं सांगून त्या डॉक्‍टरनं त्याला पिटाळलं होतं. त्याचे मित्रही त्याला वारंवार हेच सांगत होते. पण त्याला ते न पटल्यामुळे शेवटी त्यानं आत्महत्येचाही प्रयत्न केला होता! तो फसल्यामुळे तो मग मानसोपचारासाठी या तज्ज्ञाकडे आला होता.

आपण काळे आहोत किंवा आपली त्वचा रखरखीत कोरडी आहे; आपले स्तन लहान आहेत, अशा अनेक कल्पना बीडीडी झालेल्यांच्या मनात सतत येत असतात. एका अभ्यासावरून 73 टक्के लोकांना त्वचेची वैगुण्यं, 56 टक्के लोकांना केसांची वैगुण्यं, 37 टक्के लोकांना नाकाची वैगुण्यं, 20 टक्के लोकांना डोळ्यांची वैगुण्यं, 18 टक्के लोकांना पायाची वैगुण्यं, 11 टक्के लोकांना हनुवटीची वैगुण्यं, 12 टक्के लोकांना ओठांचं वैगुण्य, अशी सगळी वैगुण्यं जाणवलेली असतात.

एका अभ्यासावरून बीडीडी झालेल्या रुग्णांपैकी 99 टक्के केसेसमध्ये त्यांच्या मैत्रीवर आणि सामाजिक संबंधांवर परिणाम झाला होता, तर 95 टक्के लोकांनी स्वत:ला कोडून घेतलं होतं. 80 टक्के लोकांच्या शाळा किंवा ऑफिसवर परिणाम झाला होता. 94 टक्के लोकांना कधीतरी घोर नैराश्‍य आलं होतं. 26 टक्के लोकांना सायकायट्री डिपार्टमेंटमध्ये एकदा तरी भरती करावं लागलं होतं; 63 टक्के लोकांना केव्हातरी आत्महत्या करावीशी वाटली होती आणि 25 टक्के लोकांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला होता!

बीडीडी या विकाराचं प्रमाण अलीकडे वाढलंय. याचं कारण पाश्‍चिमात्य आणि आता पौर्वात्य समाजात बाह्य सौंदर्य याला प्रचंडच महत्त्व आलंय. त्यामुळे या आपल्या रूपाची वाजवीपेक्षा जाणीव असणं, त्याची सारखी दखल घेणं आणि ते टिकवण्यासाठी वेगवेगळ्या तऱ्हेची सौंदयप्रसाधनं लावणं, ब्यूटी पार्लर्समध्ये जाणं, हे प्रकार प्रचंड वाढले. त्यातून जर कोणी एखाद्या अवयवाविषयी एखादा वाईट शेरा मारला तर तो चटकन लक्षात राहायला लागला.
या ओसीडी आणि बीडीडीनं अनेक सेलेब्रिटीजनाही पछाडलं होतं. मायकेल अँजेलो हा जगप्रसिद्ध शिल्पकार तर त्याचे बूट किंवा कपडे कधीच काढत नसे... अगदी झोपला तरीही! त्याच्या पायांना जरी इजा झाली तरी तो बूट काढत नसे. तो खूपच चिडका होता आणि इतरांमध्ये अजिबात मिसळत नसे. लोकांशी बोलता बोलता वाक्‍यही अर्धवट सोडून तो अचानक तिथून चालता होई. लुडविग बीथोवेन या जगप्रसिद्ध संगीतकारानं तो पूर्णपणे बहिरा असूनही अत्युत्कृष्ट संगीतरचना केल्या. वाईट भाग हा, की त्याच्या संगीतरचना ऐकून थक्क झालेले लोक जेव्हा टाळ्यांचा कडकडाट करत तेव्हा त्याला त्यातला कणही ऐकू येत नसे! त्याला मनातच सगळ्या भावना दडपून टाकाव्या लागत. त्यालाही बहिरेपणाबरोबरच ओसीडीच्या विकारानं पछाडलं होतं, असं सांगितलं जातं. मायकेल जॅक्‍सनला "बीडीडी'चा विकार होता. मायकेल जॅक्‍सननं आपल्या चेहऱ्यावर 30 हून जास्त शस्त्रक्रिया केल्या. तो स्वत:चा मेकअप कधीच उतरवत नसे!

ओसीडी आणि बीडीडी यांच्यात खूप साम्य आहे. बीडीडीचा रुग्णही मंत्रचळ लागल्यासारखं सतत आरशात बघणं, स्वत:ची त्वचा तपासणं असले प्रकार वारंवार ओसीडीच्या रुग्णांप्रमाणेच करत असतात. दोन्ही बाबतींत मेंदूच्या त्याच भागात बिघाड झालेला असतो आणि दोघांवर औषधंही सर्वसाधारणपणे सारखीच दिली जातात. अँटिडिप्रेसंट औषधांच्या प्रकारांचा ओसीडी या दोघांवर झालाच तर थोडा का होईना, पण चांगला परिणाम होतो. त्याचबरोबर बीडीडीवरही ओसीडीप्रमाणेच "कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी'चाही फायदा होऊ शकतो. यातही "एक्‍स्पोजर अँड रिच्युअल प्रिव्हेन्शन' हे तंत्र वापरलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ- ज्यानं आपलं काल्पनिक व्यंग "झाकलं' जाण्याऐवजी उठून दिसेल असेच कपडे घालायचे आणि मग त्याला ते व्यंग झाकण्यासाठी टोपी घालण्याची किंवा ते व्यंग आरशात बघण्याची तीव्र इच्छा झाली तरी ती थोपवून धरायची आणि त्यातून हळूहळू त्याची ही सवय मोडून काढायची, असं हे तंत्र आहे.

2011 मध्ये दिल्लीच्या निमहॅन्समध्ये डॉ. आलोक गुप्ता आणि डॉ. संजीवकुमार यांनी "डीप ब्रेन स्टिम्युलेटर (डीबीएस)'चा वापर करून एका ओसीडी/बीडीडीच्या रुग्णाच्या मेंदूत एक पेसमेकर बसवला. आतापर्यंत डीबीएसचा वापर पार्किन्सन्स आणि डायस्टोनिया याच विकारांसाठी केला जायचा. या वेळी प्रथमच तो ओसीडीसाठी केला गेला. भारतात घडलेल्या एका केसमध्ये एक रुग्ण स्त्री घाण वाटतं म्हणून अनेक वर्षं स्वत:च्या हातानं काहीही खात नसे; स्वत:हून टॉयलेटला जात नसे आणि गेलीच तर स्वत:ला साफही करत नसे. पण या उपचारांनंतर दोनच आठवड्यांत तिनं स्वत:च्या हातानं खाणं, स्वत:हून टॉयलेटला जाणं अशा सगळ्या गोष्टी चक्क 21 वर्षांनी सुरू केल्या! ओसीडीच्या रुग्णांसाठी बहुतांशी औषधं किंवा सायकोथेरपी यांचाच वापर करतात. पण 10 टक्के रुग्णांना त्यांचा फारसा फायदा होत नाही. अशा केसेसमध्ये डीबीएसमुळे आशेचा एक किरणच दिसणार आहे.

No comments:

Post a Comment