Saturday, October 15, 2011

पिअँजे आणि डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी

August 28, 2011

हानपणापासून आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपली वाढ कशी होते आणि आपल्यामध्ये लहानपणापासून बुद्धी, तर्कशक्ती, विवेक, भावना या कसकशा विकसित होत जातात, याचा मानसशास्त्रज्ञांना अभ्यास करायचा होता. पूर्वी या ज्ञानशाखेला "मुलांचं मानसशास्त्र (चाइल्ड सायकॉलॉजी) म्हणत. 1920 नंतर याला "डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी' म्हणायला लागले. यासाठी अनेक मानसशास्त्रज्ञांनी आतापर्यंत किती चित्रविचित्र प्रयोग करावेत! उदाहरणार्थ, एकच कविता एकदा त्याच्या आईच्या आवाजात आणि एकदा कुणा अनोळखी माणसाच्या आवाजात गर्भवती स्त्रीच्या पोटातल्या अर्भकाला ऐकवायची आणि दोन्ही वेळी त्या अर्भकाच्या हृदयाचे ठोके मोजून काही फरक पडतो का ते बघायचं आणि अनोळखी माणसाच्या आवाजानं हे ठोके वाढल्याचं सिद्ध करून दाखवायचं, किंवा चार महिन्यांच्या मुलाच्या डोळ्यांवर प्रकाशझोत कमी-जास्त प्रमाणात पाडून त्याच्या चेहऱ्यावरचं आश्‍चर्य टिपायचं, किंवा खेळण्यातला कुत्रा चादरीखाली लपवला तर तो कुठेतरी आहे हे मुलांना केव्हा आणि कसं जाणवतं, याची नोंद ठेवायची, अशा तऱ्हेचे भन्नाट प्रयोग हे डेव्हलपमेंटल सायकॉलॉजिस्ट वर्षानुवर्षे करत बसत.

17 व्या शतकापर्यंत डेव्हल्पमेंटल सायकॉलॉजी या विषयात मानसशास्त्रज्ञांना फारसा रस नसे. कारण मूल म्हणजे मोठ्या माणसांचंच एक छोटेखानी स्वरूप असतं अशीच त्या काळी समजूत होती. "लहान मुलांचं मन हे कोऱ्या पाटीसारखं असतं,' असं जॉन लॉक या तत्त्वज्ञानं मांडलं होतं. यामुळे आपण आपल्या आयुष्यात आलेल्या अनुभवांमुळे घडत जातो असं बऱ्याच जणांना वाटायला लागलं. पण दोन शतकांनंतर डार्विनच्या थिअरीमुळे याला आणखीनच एक वेगळं वळण लागलं. साध्या एकपेशीय जीवांपासून गुंतागुंतीच्या मनुष्यप्राण्यापर्यंत जशी उत्क्रांतीची वाटचाल झाली तसंच आपलं मनही लहानपणापासून वृद्धावस्थेपर्यंत घडत जातं असं त्यानंतर मानसशास्त्रज्ञांना वाटायला लागलं.

तो काळच प्रयोगांचा आणि मोजमापांचा होता. मग डेव्हलपमेंटॅलिस्टांनी भावनांच्या विकासाची मोजमापं करायला सुरवात केली. 1920 ते 1950 च्या दरम्यान अक्षरशः दर आठवड्याला दर महिन्याला शेकडो, हजारो मुलांवर प्रयोग करण्यात आले. त्यांची असंख्य मोजमापं घेण्यात येत. अमेरिकेत बर्कली, येल, हार्वर्ड अशा अनेक विद्यापीठांत हे प्रयोग चालत. मुलं केव्हा, कसं आणि काय शिकतात, कसं वागतात, कसं, काय आणि केव्हा लक्षात ठेवतात, कसा विचार करतात, हे या डेव्हलपमेंटॅलिस्टांना शोधायचं होतं. या सगळ्या प्रयत्नांना आणि प्रयोगांना एक भक्कम पाया आणि वेगळंच वळण एका प्रचंड गाजलेल्या मानसशास्त्रज्ञांमुळे मिळणार होतं. त्याचं नाव होतं जिऍ पिअँजे. मानसशास्त्रातली एकही पदवी नसतानाही स्किनवर आणि फ्रॉईड यांच्या खालोखाल नाव घेतलं जाणारा आणि बालमानसशास्त्रात क्रांती घडवून आणणारा हा जिऍ पिअँजे होता तरी कोण?

जिऍ पिअँजे (1896-1980) हा विसाव्या शतकातला सर्वश्रेष्ठ बालमानसशास्त्रज्ञ होता. "1920 च्या दशकात पिअँजे तरुण असताना त्यानं या क्षेत्रात फ्रान्स आणि स्वित्झर्लंडमध्ये आणि 30 वर्षांनंतर अमेरिकेत चक्क क्रांती घडवून आणली,' असं पिअँजेविषयी पीटर ब्रायंट हा प्रसिद्ध ब्रिटिश डेव्हलपमेंटॅलिस्ट म्हणतो. ""हा शोध लावायला इतका सोपा होता, की तो एखाद्या जीनियसलाच लागला असता,'' असं आइनस्टाइननं पिअँजेविषयी म्हणून ठेवलं होतं. पिअँजेनं यासाठी अतोनात कष्ट घेऊन असंख्य प्रयोग केले. लहान मुलांच्या वरवर बालिश वाटणाऱ्या विचारांमागेही काहीतरी लॉजिक (तर्क) असतं असं पिअँजेला वाटे.

पिअँजे एक खूपच सौम्य, दयाळू आणि प्रेमळ माणूस होता. त्याचे सहकारी त्याला प्रेमानं "बॉस' म्हणत. त्याच्या डोक्‍यावरच्या चपट्या टोपीच्या दोन्ही बाजूंनी पांढऱ्या केसांचे कल्ले दिसत. तोंडाच्या डाव्या बाजूनं पाइप ओढत तो सतत स्मित करत बोलत असे. पण तो इतका गंभीर असे, की लहान मुलांचे विनोद आणि खोड्या यांच्यात मात्र तो भाग घेऊ शकत नसे. वयाच्या 20 व्या वर्षापासून ते 80 वर्षांपर्यंत तो सतत मुलांची निरीक्षणं करत राहिला. वेगवेगळ्या वयाच्या मुलांना गोष्टी सांगणं, त्यांच्याबरोबर खेळणं, त्यांना कोडी घालणं यातून तो त्याचं निरीक्षण करून खूप बारकाईनं टिपणं ठेवे.

त्याचे प्रयोगही गंमतशीरच असत. तो लहान मुलाला एक खेळणं दाखवे आणि नंतर तो त्यावर एक टोपी ठेवे. हे प्रयोग तो वेगवेगळ्या वयाच्या (एक-एक आठवड्याच्या अंतरानं) अनेक मुलांवर अनेक वेळा करे. नऊ महिने वयाच्या आतली लहान मुलं ते खेळणं विसरत; पण त्यापेक्षा मोठ्या मुलांना ते खेळणं अजून टोपीखाली आहे, याची जाणीव असे आणि ती मुलं ते खेळणं घेण्यासाठी झेपावत किंवा तो मुलांना दोन एकसारख्या आकाराची काचेची भांडी दाखवे. दोघांत तो तितकंच पाणी भरे. नंतर कुठल्या भांड्यात पाणी जास्त आहे ते विचारे. सगळे जण दोघांत तेवढंच पाणी असल्याचं सांगत. नंतर त्यातल्या एका भांड्यातलं पाणी तो एका अत्यंत कमी व्यास असलेल्या पण उंच काचेच्या नळीवजा भांड्यात ओते. आता ते नळीवजा उंच भांडं आणि दुसरं काचेचं भांडं यापैकी कशात जास्त पाणी आहे ते विचारे आणि हे प्रश्‍न तो वेगवेगळ्या वयातल्या अनेक मुलांना वारंवार विचारत राही. सात वर्षांच्या आत वय असणारी मुलं त्या उंच, निमुळत्या नळीत जास्त पाणी असल्याचं सांगत, तर त्यापेक्षा मोठी मुलं दोघांत सारखंच पाणी असल्याचं सांगत.

असे असंख्य प्रयोग पिअँजेनं शेकडो, हजारो मुलांवर अनेक दशकं केले आणि त्यांच्या निरीक्षणांना तत्त्वज्ञान, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र यांची जोड घालून स्वतःची अशी त्यानं एक थिअरी तयार केली. आपल्या आयुष्यात जसजसं वय वाढेल, तसतसे आपल्या मनात आणि त्याच्या रचनेत आणि क्षमतेत टप्प्याटप्प्यात अनेक बदल होत जातात असा एक महत्त्वाचा निष्कर्ष त्यानं या सगळ्यांवरून काढला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे जन्मापासून साधारणपणे 15 वर्षे वय होईपर्यंत ही घडण्याची प्रक्रिया चालू असते.

स्वित्झर्लंडमधल्या न्यूशटेल इथे पिअँजे 9 ऑगस्ट 1896 रोजी जन्मला. फ्रॉईडसारखा तो "आऊटसायडर' कधीच नव्हता. त्यामुळे फ्रॉईडला ज्यू वातावरणातून जसा स्वतःचा मार्ग काढावा लागला तसा पिअँजेला काढावा लागला नाही. पाव्हलॉव्हला जशा आर्थिक संकटांचा सामना करावा लागला तसाही पिअँजेला करावा लागला नाही. विल्यम जेम्ससारखा पिअँजेचा ब्रेकडाऊनही झाला नाही. पण एवढं असूनही त्याला चांगलं आनंदी बालपण लाभलंच नाही. कदाचित म्हणूनच त्याला लहान मुलांमध्ये एवढा रस निर्माण झाला असावा. त्याचे वडील आर्थर पिअँजे इतिहासाचे प्राध्यापक होते. त्याची आई रिबेका जॅक्‍सन ही एक प्रचंड बुद्धिमान आणि उत्साही बाई होती, पण ती न्यूरॉटिक होती. त्याचे वडील नास्तिक होते तर आई प्रचंड धार्मिक होती. त्यांच्या स्वभावात इतके फरक होते, की त्यांचे नेहमी वाद होत. यामुळे पिअँजेचं लहानपण अस्थिर आणि वादळीच गेलं. त्यामुळे परीकथा, वेगवेगळे खेळ हे त्याच्या लहानपणी नव्हतेच. तोही मग त्याच्या वडिलांसारखा अभ्यासू आणि गंभीरच बनला. वयाच्या सातव्या वर्षापासून त्याला पक्षी, प्राणी, जीवाश्‍म, शंख, शिंपले, मासे यांच्यातच रस निर्माण झाला.

वयाच्या 10 व्या वर्षापासून पिअँजेनं त्या प्रदेशातल्या सजीवांवर चक्क एक पुस्तकही लिहिलं, पण वडिलांनी त्याचं फारसं कौतुक केलंच नाही. दहाव्या वर्षी त्यानं एक विशिष्ट तऱ्हेची चिमणी बघून त्यावर एक संशोधनप्रबंध लिहिला आणि "नॅचलर हिस्ट्री जर्नल'कडे पाठवून दिला. इतक्‍या लहान मुलानं ते लिहिलं आहे याची कल्पना नसल्यामुळे त्या जर्नलनं त्याचा तो लेख छापला. तिथल्या डायरेक्‍टरनं पिअँजेला मदतनीस म्हणूनही घेतलं. तिथल्या संग्रहालयातल्या शिंपल्यांवर लेबलं चिकटवण्याचं पिअँजे काम करायला लागला. दर आठवड्याला दोनदा असं चार वर्षे त्यानं हे काम केलं. 16 वर्षांचा होईपर्यंत तो शिंपल्यावर शोधनिबंधही लिहायला लागला होता.

हायस्कूलमधलं शिक्षण संपवून पिअँजे न्यूशटेल विद्यापीठात आला, पण सततच्या अभ्यासानं आणि लिखाणानं तो आजारी पडला. शेवटी हवापालटासाठी डोंगराळ भागात काही काळ राहिल्यानं त्याची तब्येत सुधारली आणि पुन्हा तो कामाला लागला. पिअँजे स्वतःला नॅचरल सायंटिस्टच समजे. त्याने याच विषयात डॉक्‍टरेटही मिळवली. यानंतर त्याला तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र यांच्यात रस निर्माण झाला. त्यानं काही काळ झ्युरिकमधल्या मानसशास्त्रावरच्या योगशाळेत काम केलं. त्यानं झ्युरिकमध्येच युंगची खूप लेक्‍चर्सही ऐकली. नंतर पॅरिसमधल्या सोर्बोन इथे त्यानं लॉजिक आणि ऍबनॉर्मल सायकॉलॉजीचा अभ्यास केला आणि त्यानंतर बिनेटचा सहकारी थिओडोर सायमन याच्या हाताखाली पॅरिसमधल्या 5 ते 8 वर्षांच्या मुलांच्या चाचण्या घेण्याचं काम दोन वर्षं केलं. कुठल्या वयापासून मुलं प्रश्‍नांची बरोबर उत्तरं द्यायला सुरवात करतात यापेक्षाही ठराविक वयाची मुलं तशाच चुका का करतात, या प्रश्‍नाचं उत्तर पिअँजे शोधत होता. या वेळी त्यानं शेकडो मुलांना जे हजारो प्रश्‍न विचारले तेव्हा तो या विषयात गुंततच गेला आणि हेच आपलं पुढचं कार्यक्षेत्र आहे, हे त्याच्या लक्षात आलं.

यानंतर जिनिव्हामधल्या अनेक संशोधनसंस्था आणि विद्यापीठं यांच्यात त्यानं काम केलं. त्यातल्याच रोसो इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या एका व्हॅलेंटाइन शॅटने नावाच्या विद्यार्थिनीबरोबर त्यानं लग्न केलं. त्यांना तीन मुलंही झाली. या दांपत्यासाठी आपली स्वतःची मुलं त्यांच्या संशोधनासाठी आयतीच "प्रयुक्त (सब्जेक्‍ट)' झाली. या काळात आणि यानंतर त्यानं अनेक मुलांवर अविरत प्रयोग केले. या सगळ्यातनं त्याला मुलांची भावनिक, बौद्धिक आणि वैचारिक वाढ वेगवेगळ्या वयात कशी होते, हे लक्षात यायला लागलं. यातूनच त्यानं मग त्याची थिअरी मांडली. पिअँजेनं 60 पेक्षा जास्त पुस्तकं आणि 100 हून अधिक लेख लिहिले मृत्यूच्या अखेरपर्यंत 16 सप्टेंबर 1980 पर्यंत त्याचं लिखाण आणि प्रयोग चालूच होते. बालमानसशास्त्रात पिअँजेनं आपल्या कामाचा कायमस्वरूपी ठसा उमटवला, हे मात्र नक्की!

No comments:

Post a Comment