Friday, October 14, 2011

फ्रेनॉलॉजी नावाचं 'फसवं विज्ञान'

sakal, Jan 16 2011

ग्रीक भाषेत "फ्रेन' म्हणजे मन आणि "लागोस ' म्हणजे ज्ञान किंवा विचार. यावरूनच "फ्रेनॉलॉजी' हा शब्द आला. फ्रेनॉलॉजीमध्ये डोक्‍याच्या आकारावरून मनाविषयीचे अंदाज बांधले जात.

डॉ. फ्रॅंझ जोसेफ गॉल (1758-1928) या जर्मन डॉक्‍टर आणि शरीरशास्त्रज्ञानं 1770 च्या दशकात योहॅन स्पर्झेम या त्याच्या विद्यार्थ्यासमवेत "फ्रेनॉलॉजी' नावाचं एक "फसवं विज्ञान' (स्यूडोसायन्स) निर्माण केलं. ग्रीकमध्ये "फ्रेन' म्हणजे मन आणि "लागोस' म्हणजे ज्ञान किंवा विचार. यावरूनच "फ्रेनॉलॉजी' हा शब्द निघाला. फ्रेनॉलॉजीमध्ये डोक्‍याच्या आकारावरून मनाविषयीचे अंदाज बांधले जात. मेंदूतच आपलं मन असतं, हे गॉलला समजलं होतं. मनाला अनेक बाजू आणि कंगोरे असल्यामुळे मेंदूतले वेगवेगळे भाग मनाच्या निरनिराळ्या आविष्कारांना जबाबदार किंवा कारणीभूत असतात; तसेच मोठा मेंदू असलेल्यांचं मनही जास्त सक्षम आणि सशक्त असतं असं तो माने. एखाद्याच्या मनाचा जो कंगोरा जास्त सक्षम असेल, त्याचप्रमाणे मेंदूचाही तो भाग जास्त मोठा असेल आणि कवटीच्या आकारावरून, खाच-खळग्यांवरून आणि उंचवट्यांवरून कवटीच्या खालच्या मेंदूची आपल्याला कल्पना येईल आणि त्यामुळे कुठलाही माणूस मोकळ्या स्वभावाचा आहे का रागीट आहे, फसवा आहे की प्रामाणिक आहे, हे डोक्‍याच्या आकारावरून ओळखता येणं शक्‍य आहे असा हास्यास्पद दावा फ्रेनॉलॉजी करे.

फ्रेनॉलॉजीची मूळ कल्पना तशी जुनी आहे. चेहऱ्याच्या आकारावरून माणसाचा स्वभाव आणि मानसिक अवस्था ओळखता येतात, असे "फिजिओनॉमी' या ग्रीक काळातल्या थिअरीत पूर्वी सांगितले होते. अठराव्या शतकात "योहॅन कॅस्पर लॅव्हेटर' या स्विस धर्मपंडिताने आणि गूढवाद्याने "सायन्स ऑफ फिजिओनॉमी' या आपल्या चारखंडीय ग्रंथाने या तंत्राला पुन्हा लोकप्रियता मिळवून दिली आणि आश्‍चर्य म्हणजे 1775 ते 1810 यादरम्यान त्याच्या 55 आवृत्या निघाल्या!

डार्विनचा जगप्रसिद्ध प्रवास झालेल्या बीगल बोटीचा कॅप्टन फिट्‌झरॉय याच लॅव्हेटरचा शिष्य होता. त्याच्याच तत्त्वाप्रमाणे फिट्‌झरॉयने डार्विनचे नाक तपासले होते आणि अशा नाकाच्या माणसाला असला कठीण प्रवास करता येईल की नाही, याची त्याला शंका आल्याने त्याने डार्विनला जवळपास नापासचं केले होते. शेवटी फिट्‌झरॉयसमोर आपले नाक घासूनच डार्विनला बीगल बोटीवर पाऊल टाकता आले! या फिजीओनॉमीचा मानसशास्त्रावर थेट परिणाम झाला नसला तरी त्याचा फ्रेनॉलॉजीवर नक्कीच प्रभाव पडला होता.

जर माणसाच्या मेंदूचा कॉर्टेक्‍स प्राण्याच्या मेंदूच्या कॉर्टेक्‍सपेक्षा विकसित आणि मोठा असल्यामुळे माणूस जास्त बुद्धिमान ठरत असेल, तर कॉर्टेक्‍समधल्या इतरही गोष्टींमुळे माणसाच्या स्वभावातले कंगोरे कळू शकतील, असे गॉलला वाटले. त्याच्या बालमित्राचे डोळे खूप मोठे आणि बाहेर आल्यासारखे असल्यामुळे त्याच्या मेंदूचा मागचा भाग मोठा असला पाहिजे आणि त्याचा मेंदू त्याची भाषा आणि स्मरणशक्ती यावर नियंत्रण ठेवत असला पाहिजे आणि म्हणूनच आपल्या बालमित्राची भाषा आणि स्मरणशक्ती चांगली आहे, असे गॉलला वाटे! याचा अर्थ मेंदूचे वेगवेगळे भाग शरीराच्या आणि मनाच्या निरनिराळ्या भागांवर नियंत्रण ठेवत असतील, असे गॉलला वाटले. "थॉमस रीड' याने मनाच्या अनेक छटांविषयी लिहून ठेवले होतेस हे गॉलला माहीत होते. या मनाच्या प्रत्येक छटेसाठी किंवा गुण-अवगुण यांच्यासाठी मेंदूतील एक विशिष्ट जागा राखीव ठेवलेली असते, असे गॉलला वाटले. गॉलचे हे विचार म्हणजे मानसशास्त्रातले पुढचे पाऊलच होते; पण तरीही तो एक "क्रॅकपॉट' म्हणूून इतिहासात गणला गेला.

गॉल आणि स्पर्टझाईम यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांच्या; तसेच तुरुंग, वेड्यांची इस्पितळे वगैरे ठिकाणच्या हजारो लोकांच्या कवट्या तपासल्या. या तपासानंतर त्यांनी मेंदूतले 27 भाग शोधून काढले. स्पर्टझाईमने नंतर हा आकडा 37 वर नेला. यातला प्रत्येक भाग हा मनाच्या राग, आनंद, दयाळूपणा वगैरे गोष्टींसाठी कारणीभूत असतो, असे मत त्यांनी मांडले.

गॉलची पुस्तके आणि स्पर्टझाईमची भाषणे यांच्यामुळे फ्रेनॉलॉजीचा प्रभाव पुढचे एक शतक टिकला. इंग्लंडमध्ये तर कहरच झाला. आज जशा कंपन्या कामावर ठेवताना बुद्‌ध्यंक चाचण्या घेतात, तसे त्या वेळचे उद्योगपती अर्जदारांना फ्रेनॉलॉजिस्टकडून त्यांच्या कवट्या तपासून घ्यायला सांगू लागले. मग वंश, रंग आणि इतर अनेक गोष्टींवरून भेदभाव करून अनेकांना नोकऱ्या नाकारण्यासाठीही फ्रेनॉलॉजीचा उपयोग वरिष्ठ वर्गानं करून घेतला! कित्येक बाबतीत फ्रेनॉलॉजिस्ट मंडळींनी ज्योतिषी म्हणूनच वावरायला सुरवात केली. लग्नाअगोदर वधू-वरांनी आपल्या कवट्या तपासून घेण्याचे प्रकारही सुरू झाले.
माणसे मग फ्रेनॉलॉजिस्ट मंडळींकडे आपले डोके तपासायला जात. मग टेप, कंपास आणि चित्रविचित्र तऱ्हेची साधने वापरून ते फ्रेनॉलॉजिस्ट्‌स त्यांच्या डोक्‍याच्या गुंतागुंतीची मोजमापे घेत आणि यावरून कुठला माणूस कुठला व्यवसाय करेल किंवा कुठला माणूस गुन्हेगार किंवा खुनी होईल, याची भाकितंही करत; पण त्यावरची टीकाही वाढत होती.

अमेरिकेत तर डोक्‍याची मोजमापे करून त्यावरून निष्कर्ष काढण्यासाठी काही स्वयंचलित यंत्रेही निघाली होती! अशाच तऱ्हेचे "ऑटोमॅटिक इलक्‍ट्रिक फ्रेनॉमीटर' हे यंत्र अजूनही मिनेसोटा येथील सायन्स म्युझियममध्ये "कलेक्‍शन ऑफ क्वेश्‍चनेबल मेडिकल डिव्हाइसेस' या विभागात ठेवलेले आहे. लोरेन्झो नाईल्स फाउलर आणि ऑर्सन स्क्वीअर फाउलर हे अमेरिकन बंधू त्या काळातले प्रसिद्ध फ्रेनॉलॉजिस्ट होते. त्यापैकी ऑर्सनने न्यूयॉर्कमध्ये तर लोरेन्झोने इंग्लंडमध्ये फ्रेनॉलॉजीचा व्यवसाय सुरू केला. फ्रेनॉलॉजीला काहीच वैज्ञानिक आधार नाही, असे वैज्ञानिकांच्या खूप पूर्वी लक्षात येऊनही नाझी जर्मनीत नाझी मंडळींनी त्याचा उपयोग त्यांना पाहिजे तसा करून घेतला. या कवटीच्या आकारावरून तो मनुष्य आर्य वंशाचा आहे की नाही, हे ठरवण्याचा हुकूमही हिटलरच्या जर्मनीमध्ये दिला गेला होता. कोण ज्यू आहे, हे तपासण्यासाठीही फ्रेनॉलॉजीचा वापर झाला.

1876 साली सीझर लोम्ब्रोसो या वंशवादी इटालियन डॉक्‍टरने "दी क्रिमिनल मॅन' नावाचे पुस्तक लिहिलं. ते खूपच गाजले. माणसाची कवटी तपासून आणि मोजून त्याच्यातल्या गुन्हेगारी प्रवृत्तीविषयी अंदाज बांधता येतात, असे त्याने त्यात सांगितले होते. यासाठी त्याने जिवंत आणि मेलेल्या अशा अनेक गुन्हेगारांच्या कवट्या तपासल्या होत्या!

गॉलचे मेंदूवरचे संशोधन रोमन कॅथॉलिक चर्चला धर्माच्या विरोधात जाणारे वाटले, तर वैज्ञानिकांना त्यात कुठलाच शास्त्रीय आधार नाही, असे वाटले. त्याच्यावर ऑस्ट्रियात टीका होऊ लागली. त्याच्या या शिकवणुकीवर सम्राट फ्रान्सिस पहिला खूपच वैतागला. आत्मा, मन वगैरे गोष्टींपेक्षा डोके, मेंदू यांच्यासारख्या गोष्टींवर गॉल भर देतोय, तो नास्तिक आहे, अनैतिक आहे, तो जडवादी आहे, या आरोपांखाली सम्राटाने गॉलला भाषण देण्यावर बंदी घातली. शेवटी 1807 साली व्हिएन्ना सोडून गॉल काही दिवस जर्मनीमध्ये राहून नंतर पॅरिसला आला. तेथेही नेपोलियनने त्याच्या शिकवणुकीवर बंधने लादली. शिवाय "इन्स्टिट्यूट ऑफ फ्रान्स'ने त्याच्या कल्पना धुडकावल्या; तरीही फ्रेंच सुशिक्षित आणि बुद्धिवंतांमध्ये गॉलला खूप मान होता. 1823 साली त्याला "रॉयल स्वीडिश ऍकॅडमी ऑफ सायन्सेस'मध्ये फॉरेन मेंबर म्हणून सन्माननीय सभासदत्व मिळाले.

फ्रेनॉलॉजीला विरोधक होतेच. कवटीच्या आकारावरून माणसाचे मन कळते, याला तर विरोध होताच; पण मेंदूतले वेगवेगळे भाग शरीरातल्या आणि मनाच्या वेगवेगळ्या भागांवर नियंत्रण ठेवतात, हेही कित्येकांना मान्य नव्हते. याच संदर्भातला गॉल विरुद्ध फ्लोरॉन्स हा वाद पूर्वी रंगला होता. 19 व्या शतकात प्येर जॉं फ्लोरॉन्स (1794-1867 ) या प्रसिद्ध शरीरविज्ञानशास्त्रज्ञाने फ्रेनॉलॉजीला कडाडून विरोध केला. तो तर गॉलला "माणसांच्या कवट्या गोळा करण्याचे खूळ लागलेला वेडा'च समजे. फ्लोरॉन्सने "होलिझम' या तत्त्वाचा पुरस्कार केला. मेंदूच्या वेगवेगळ्या भागाचे कार्य शोधण्यापेक्षा मेंदूकडे एक संपूर्ण एकसंध घटक म्हणून पाहिले पाहिजे, या विचारपद्धतीला "होलिझम' (हेश्रळीा) असे म्हणतात. कित्येक पक्षी, उंदीर, मांजरे, कुत्रे यांच्यावर अनेक राक्षसी प्रयोग केल्यावर तो या निष्कर्षापर्यंत येऊन पोचला होता. तो प्राण्यांच्या मेंदूचे भाग छाटून टाके. प्रथम एक लहान भाग कापे. त्याच्यावर होणारा परिणाम बघे. मग आणखी मोठा भाग कापे. असे करत करत प्राण्यांच्या मेंदूतला खूप मोठा भाग काढून टाकला तरी त्या प्राण्याच्या वागणुकीत काहीच फरक पडत नाही, असे त्याचे म्हणणे होते. त्यामुळे श्रवण, दृष्टी, स्पर्श आणि इतर अनेक गोष्टींसाठी मेंदूमध्ये वेगेवेगळे विभाग नसतात, तर ते मेंदूत विखुरलेले असतात, असे तो मांडायला लागला. मग गॉल बरोबर होता की फ्लोरॉन्स? शेवटी या दोन विचारप्रवाहांत तडजोड झाली. खूप सोप्या आणि मूलभूत गोष्टी यांच्यासाठी मेंदूतले विशिष्ट भाग असतात; पण स्मृती, बुद्धी, कारणमीमांसा वगैरे गोष्टी मात्र नियंत्रित करणारी केंद्रे मेंदूत विखुरलेली असतात, असे 19 व्या शतकातले बहुतेक सगळे वैज्ञानिक मानायला लागले.

गॉल शेवटपर्यत फ्रान्समध्येच राहिला. गॉलकडे अनेक कवट्या संग्रही होत्या. पण न्यूरॉलॉजीच्या इतिहासातला दैवदुर्विलास बघा! 1828 साली गॉल हा मेंदूच्या "स्ट्रोक'मुळे मरण पावला आणि त्याच्याकडे अभ्यासाला असलेल्या कवट्यांमध्ये आणखी एकीची भर पडली!

No comments:

Post a Comment