Saturday, October 15, 2011

'ऑपरॅंट कडिशनिंग'चा कर्ता बी. एफ. स्किनर

May 01, 2011

बी. एफ. स्किनर या नवबिहेवियरिस्टनं मानसशास्त्रात वैयक्तिक पातळीवर केलेले प्रयोग आणि संशोधन यांना महत्त्व दिलं. 20 मार्च 1904 रोजी पेन्सिल्व्हानियामधल्या एका छोट्या गावात जन्मलेल्या स्किनरचं लहानपण शिस्तीच्या वातावरणात गेलं. लहान असताना एकदा स्किनरनं शिवी दिलीय हे कळताच त्याच्या आईनं चक्क साबणाने त्याची जीभ आणि तोंड घासून काढलं होतं! एकदा तर त्याच्या वडिलांनी त्याला गुन्हेगाराला शिक्षेला तोंड कसं द्यावं लागतं हे कळावं म्हणून तुरुंगातून फिरवून आणलं होतं. लहानपणी स्किनरला वेगवेगळ्या खेळण्यांची मॉडेल्स बनवण्याचा प्रचंड नाद होता. त्यामुळेच पुढे प्राण्यांवर प्रयोग करताना लागणारी उपकरणं त्यानं स्वत:च बनवली. शाळेत असल्यापासूनच त्यानं "कमवा आणि शिका' हा मंत्र आचरणात आणला. 1926 मध्ये कला शाखेतली पदवी मिळाल्यावर स्किनरनं लेखक व्हायचं ठरवलं. अधूनमधून तो लघुकथाही लिहीत असे. मानवी वागणुकीचं निरीक्षण केल्यामुळे लिहायला स्फूर्ती मिळेल असं त्याला वाटे. याच काळात त्यानं बिहेवियरिझमची तत्त्वं पटल्यामुळे पाव्हलॉव्ह आणि वॉटसन यांच्या पुस्तकानं प्रभावित होऊन हार्वर्ड विद्यापीठात मानसशास्त्राचा अभ्यास सुरू केला. त्यानं मानसशास्त्रात "प्राणिवर्तन' या विषयात डॉक्‍टरेट, तर "प्राण्यांची नससंस्था' या विषयावर पोस्ट डॉक्‍टरेट केली.

मानसशास्त्रीय तत्त्वं आणि विचारप्रणाली प्रयोगांच्या आधारेच मांडायला हवी, असं स्किनरचं ठाम मत होतं. "माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर आणि वागण्यावर आजूबाजूच्या वातावरणाचा आणि परिस्थितीचा परिणाम कसा होतो, याचा अभ्यास करणंही महत्त्वाचं आहे. मन, विचार, स्मृती वगैरे गोष्टी अस्तित्वातच नसतात; त्या आपण फक्त भाषेच्या सोयीसाठी वापरतो. आपल्याला फक्त बाहेरून काय केलं (स्टिम्युलस) म्हणजे त्याची काय प्रतिक्रिया (रिस्पॉन्स) मिळेल, याचाच अभ्यास करता येतो. (यालाच स्टिम्युलस-सिस्पॉन्स किंवा ड-ठ किंवा एस-आर असं म्हणतात). थोडक्‍यात, आपल्या मनाप्रमाणे निर्णय घेणारा स्वच्छंदी माणूस नसतोच, असं स्किनर म्हणायचा.

"ऑपरॅंट कंडिशनिंग' या कल्पनेमुळे स्किनरचं स्थान मानसशास्त्रात खूप मोठं मानलं जातं. आपल्याला एखाद्या प्राण्यानं जी कृती करायला हवी असेल, (उदाहरणार्थ, कबूतरानं चोचीनं टेबल टेनिस खेळणं) त्या कृतीचे लहान लहान भाग करायचे आणि या प्रत्येकाला "ऑपरॅंट' म्हणायचं. आता त्या प्राण्यानं केलेली हालचाल आपल्या ध्येयाकडे नेणारी असेल, तर त्या प्राण्याला बक्षीस देणं, नाही तर बक्षीस न देणं, असं सतत दर ऑपरॅंटला करत राहायचं. या "रिवॉर्ड आणि पनिशमेंट'च्या कंडिशनिंगमुळे तो प्राणी मग अपेक्षित कृती चटकन करायला लागतो. असं करत करत त्याला पाहिजे ते शिकावायचं. उदाहरणार्थ, जर कबूतरानं पिंजऱ्याच्या एका टोकापासून दुसऱ्यापर्यंत येऊन तिथे ठेवलेल्या पियानोच्या ठराविक "की'वर चोच दाबावी असं आपल्याला वाटत असेल तर ते कबूतर एक पाऊल जरी पियानोच्या दिशेनं पुढे आलं असेल तरी त्याला थोडंसं अन्न बक्षीस म्हणून द्यायचं, नाहीतर नाही द्यायचं. कबूतरानं योग्य दिशेनं स्टेप घेतली की पुन्हा त्याला बक्षीस द्यायचं. असं करत करत शेवटी कबूतर पियानोजवळ जाऊन आपली चोच पाहिजे त्या "की'वर आदळेपर्यंत हे सगळं चालू ठेवायचं. यालाच "ऑपरॅंट कंडिशनिंग' म्हणतात. याच पद्धतीनं लहान मुलंही बोलायला, गायला, नाचायला आणि खेळायला शिकतात, असं स्किनरला वाटे.

गर्विष्ठ असूनही स्किनरच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाची आणि ओघवत्या वाणीची लोकांवर चटकन छाप पडे. "आपल्या प्रत्येक कृतीमागे बक्षीस आणि शिक्षा (रिवॉर्ड अँड पनिशमेंट) यांचीच गणितं असतात,' असंच तो म्हणे. कंडिशनिंगमधलं हे सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी त्यानं एका कबूतराला पियानोमधून एक विशिष्ट ट्यूनही वाजवायला शिकवली होती, तर दोन कबूतरं आपल्या चोचींनीच चक्क टेबल-टेनिस खेळत! स्किनरची ही प्रात्यक्षिकं बघून लोक थक्क होऊन जात. कित्येकदा त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे गदारोळ होई; पण यामुळे त्याला टेलिव्हिजनवर भाषण आणि मुलाखती देण्यासाठी अनेक बोलावणीही यायला लागली आणि तो जास्तच प्रसिद्ध होत गेला.

स्किनरचं "बिहेविरल मॉडिफिकेशन'चं तत्त्व मनोरुग्णांसाठी आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल मुलांना शिकवण्यासाठी आजही वापरलं जातं. 1940 च्या दशकात स्किनरनं याबाबत बॉस्टनजवळच्या मनोरुग्णांच्या हॉस्पिटलमध्ये प्रयोग केले. योग्य वर्तणूक दाखवली तर रुग्णाला बक्षीस/शाबासकी द्यायची, असे ते प्रयोग होते. तिथल्या एका बाईनं नैराश्‍याच्या गर्तेत जाऊन खाणं-पिणंच सोडलं होतं. तिला फुलं, पुस्तकं, टीव्ही वगैरे गोष्टी आवडायच्या. मग मानसोपचारतज्ज्ञांनी तिला यातल्या कुठल्याच गोष्टी नसलेल्या एका खोलीत ठेवलं. तिथे तिला जेवण दिलं, पण तिनं काहीच खाल्लं नाही. नंतर त्यांनी खोलीत एक फुलांचा गुच्छ आणून ठेवला. तो बघितल्यावर दुसऱ्या दिवशी तिनं थोडं खाल्लं. त्यानंतर तिला आवडणारी आणखी एक गोष्ट खोलीत आणून ठेवल्यावर तिने आणखी थोडं खाल्लं. असं करत करत ती व्यवस्थित जेवायला लागली, तेव्हा पुस्तकं, टीव्ही अशा तिला आवडणाऱ्या अनेक गोष्टी तिला मिळाल्या. 18 महिन्यांनंतर ती पूर्णपणे बरी होऊन व्यवस्थितपणे राहत असल्याचं आढळून आलं होतं.

ही पद्धत सगळ्यांनाच लागू पडेल असं नाही, पण मतिमंद किंवा आत्ममग्न (ऑटिस्टिक) मुलांची आक्रमक वागणूक नियंत्रित करणं, त्यांना दैनंदिन आयुष्यातल्या आणि इतर गोष्टी शिकवणं यासाठी स्किनरची "बिहेवियरल मॉडिफिकेशन'चीच पद्धती वापरली जाते. व्यसनमुक्तीच्या उपचारांमध्येही "बिहेवियरल मॉडिफिकेशन'चे उपाय योजले जातात.

"ऑपरॅंट कंडिशनिंग' तंत्राचा वापर करून मुलांचं शिक्षणही सोपं करता येईल, असं स्किनरला वाटायला लागलं. कठीण, गुंतागुंतीच्या विषयांची फोड करून त्याचे सोपे, सुटसुटीत भाग पाडायचे आणि प्रत्येक भाग शिकवून झाल्यावर प्रश्‍न विचारायचे आणि उत्तर बरोबर आलं तर शाबासकी (रिवॉर्ड) द्यायची, या पद्धतीला मग "प्रोग्रॅंड इन्स्ट्रक्‍शन' असं म्हणायला लागले. या तंत्राचा उपयोग करून नवीन पाठ्यपुस्तकंही लिहिणं सुरू झालं. एखाद्या विषयाचे बारीक बारीक भाग करून तो समजावून सांगायचा आणि त्यावर प्रश्‍न विचारायचे. त्यांची उत्तरं बरोबर आली तर विद्यार्थ्यानं उत्साहानं पुढचं वाचायला सुरवात करायची. नाहीतर तो भाग नीट कळण्यासाठी पुन्हा वाचायचा. शिकण्याच्या या पद्धतीसाठी स्किनरनं काही यंत्रंही तयार केली होती. अमेरिकेत मग कुठलीही गोष्ट शिकताना "प्रोग्रॅम्ड इन्स्ट्रक्‍शन'ची लाटच आली. विज्ञान, गणित याबरोबरच टीव्ही कसा दुरुस्त करायचा, वगैरेही गोष्टींचं शिक्षण याच पद्धतीनं व्हायला लागलं. अनेक दशकं शिक्षण पद्धतीवर याचा प्रचंड प्रभाव पडला. आजही "कम्प्युटर बेस्ड ट्रेनिंग (सीबीटी)'च्या पद्धतीत स्किनरच्या "ऑपरॅंट कंडिशनिंग'चा उपयोग केला जातो.

पण नंतर त्यातल्या त्रुटीही शिक्षणतज्ज्ञांच्या लक्षात यायला लागल्या. या पद्धतीमुळे लहान लहान तुकडे समजत होते, पण विषयाचं संपूर्ण सार कळत नव्हतं. थोडक्‍यात, ही पद्धत "ऍटॉमिस्टिक' होती. मुख्य विषयाच्या संपूर्ण अवलोकनापासून सुरू करून मग त्यांच्या शाखांकडे किंवा विभागांकडे येणं, अशा उतरंडीचे किंवा हायरार्किकल पद्धतीचे जास्त फायदे आहेत, हे शिक्षणतज्ज्ञांच्या लक्षात आलं, तसेच उत्तर बरोबर आल्यावर त्याचं बक्षीस किंवा शाबासकी लगेच देण्याऐवजी काही काळानं दिलं तर त्याचा परिणाम जास्त चांगला होतो, हेही लक्षात आलं. पण तरीही स्किनरचं लगेच बक्षीस देण्याचं तत्त्व आजही सर्वत्र शिक्षण पद्धतीत मोठ्या प्रमाणात वापरलं जातं.
स्किनरनं त्याच्या प्रयोगांसाठी खूप वेगवेगळी यंत्रं, उपकरणं तयार केली. आज जगभरात स्किनरनं आपल्या यांत्रिकी कौशल्याचा उपयोग करून तयार केलेले चक्रव्यूह (पझल बॉक्‍स) अजूनही वापरले जातात. यांना "स्किनर बॉक्‍स' किंवा "बेबी बॉक्‍स' असं म्हणतात. स्किनरने 1930 मध्ये हे उपकरण बनवलं. त्यात त्याच्या बायकोनंही त्याला मदत केली. त्याच्या बायकोनं प्रयोग करताना तर चक्क आपल्या मुलीचाच "सब्जेक्‍ट' म्हणून वापर केला होता.

1938 मध्ये स्किनरचे मानवी जीवनाचा अभ्यास वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून कसा करावा, याविषयी "दी बिहेवियर ऑफ ऑरगॅनिझम' आणि "सायन्स अँड ह्यूमन बिहेवियर' हे ग्रंथ प्रसिद्ध झाले. त्यांची 1948 मध्ये "वॉल्डन टू' नावाची एक कादंबरीही खूपच गाजली. "बिहेवियरल इंजिनिअरिंग' वापरून निर्माण झालेल्या आदर्श समाजाचं चित्र त्यानं या कादंबरीत उभं केलं होतं. अमेरिकेतल्या लाखो लोकांच्या विचारसरणीवर तिचा प्रचंड परिणाम झाला.

आपल्यातला लेखक स्किनरनं सतत जिवंत ठेवला. त्यानं एक संक्षिप्त आणि दुसरं तीन खंडांतलं दीर्घ असं "दी पर्टिक्‍युलर्स ऑफ माय लाइफ' या नावानं दोन आत्मचरित्रं लिहिली. त्याच्या "दी टेक्‍नॉलॉजी ऑफ टीचिंग' आणि "अबाऊट बिहेवियरिझम' या पुस्तकात त्यानं आयुष्यभर केलेल्या संशोधनाची आणि विकसित केलेल्या संकल्पनांची माहिती दिलीय. "साहित्यिकांना फारसं काहीच कळत नाही. यामुळेच मी साहित्याकडून मानसशास्त्रकडे वळलो,' असं स्किनरनं एका मुलाखतीत गमतीनं म्हटलं. "प्रयोग केलेल्यापैकी इतर लोकांपेक्षा उंदीर आणि कबूतरं अशा प्राण्यांवर माझ्या विचारांचा जास्त परिणाम झाला,' असं तो उपरोधानं म्हणत असे.

हे सगळं असलं तरी माणसांच्या वागणुकीच्या बाबतीत बिहेवियरिझम संपूर्णपणे स्पष्टीकरण देऊच शकत नव्हतं. व्यक्तिमत्त्व, प्रेरणा (मोटिव्हेशन), तर्कविवेकबुद्धी, वेगवेगळ्या भावना आणि सर्जनशीलता या खूप गुंतागुंतीच्या असतात. फक्त बिहेवियरिस्ट थिअरी या सगळ्याचं स्पष्टीकरण करू शकत नाही, हेही आता समजायला लागलं होतं. याच सुमारास "आर्टिफिशियल इंटेलिजन्स' आणि "इन्फर्मेशन प्रोसेसिंग' यांच्यावर संशोधन चालू झालं. त्यातूनच "कॉग्निटिव्ह सायन्स' या ज्ञानशाखेमध्ये खूपच भर पडली. यानंतर बिहेवियरल सायकॉलॉजीचा ऱ्हास झाला आणि कॉग्निटिव्ह सायन्सचा विकास झाला. पुढची अनेक दशकं कॉग्निटिव्हिस्ट विचारसरणी अमेरिकन मानसशास्त्रावर राज्य करणार होती. पण तरी अनेक मनोविकारांवर बिहेवियर मॉडिफिकेशनची उपचार पद्धती मात्र अनेक दशकं चालूच राहिली आणि अजूनही चालूच आहे! स्किनरला त्याच्या कारकिर्दीत खूपच सन्मान मिळाले. त्याची तुलना सिग्मंड फ्रॉईडसारख्या विख्यात मानसोपचार तज्ज्ञासोबत केली गेली. 18 ऑगस्ट 1990 रोजी कॅन्सरनं स्किनरचा मृत्यू झाला.

1 comment:

  1. Sands Casino: Home - Treasure Island Resort & Casino
    Welcome to Treasure Island Resort & Casino - worrione your home for the best in entertainment! Play online slots, table games, 인카지노 and more!‎Hotel · septcasino ‎Restaurants

    ReplyDelete