Saturday, October 15, 2011

अतर्क्‍य प्रयोगांनी भुलवणारा मेस्मर

२० फेब्रुवरी, २०११

सन 1780 पर्यंत रुग्णांची संख्या वाढायला लागल्यावर मेस्मर एकेकट्याप्रमाणेच समूहावरही उपचार करू लागला. त्यासाठी तो जिच्याभोवती वीस तरी रुग्ण बसू शकतील, अशा आकाराची एक दीड फूट उंचीची बादली घेई. या बादलीपासून एक दोरखंड घेऊन मेस्मर एका रुग्णापासून दुसऱ्या, दुसऱ्यापासून तिसऱ्या अशा वर्तुळाकार बसलेल्या सगळ्या रुग्णांना वेढत असे आणि मग रुग्णांना स्पर्शही न करता तो हातांच्या आणि डोळ्यांच्या विचित्र हालचाली करून रुग्णांवर उपचार करी!


ठराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मेस्मरिझम हा अचाट आणि विचित्र प्रकार धुमाकूळ घालत होता. हे मेस्मरिझम म्हणजे नक्की काय प्रकार होता? आणि तो निर्माण करणारी मेस्मर ही व्यक्‍ती होती तरी कोण?

जर्मनीतल्या "कॉन्स्टन्झ' या गावात 23 मे 1734 रोजी फ्रांझ मेस्मरचा जन्म झाला. धर्मगुरू किंवा वकील होण्याच्या अयशस्वी प्रयत्नांनंतर त्यानं व्हिएन्ना विद्यापीठात वैद्यकशास्त्रातली पदवी मिळवली. यानंतर त्यानं गुरुत्वाकर्षणाचा माणसाच्या शरीरावर काय परिणाम होतो, या विषयावर "ऑन द इन्फ्लुअन्स ऑफ द प्लॅनेट्‌स' हा शोधनिबंध लिहिला. सुदैवानं त्याच्या गाईडनं तो न वाचल्यामुळं त्याला पीएच.डीही मिळाली! चंद्राचा जसा समुद्राच्या भरती-ओहोटीवर परिणाम होतो आणि त्यामुळं माणसाला अनेक तऱ्हेचे विकार का होतात, याचं स्पष्टीकरण मिळतं, तसा आकाशातल्या इतरही अनेक ग्रह-ताऱ्यांच्या गुरुत्वाकर्षणाचा माणसाच्या आरोग्यावर परिणाम होतच असतो, असं मेस्मरनं आपल्या शोधनिबंधात म्हटलं होतं; पण ग्रह-ताऱ्यांचा हा प्रभाव माणसापर्यंत पोचण्यासाठी या सर्व विश्‍वात एक अदृश्‍य असा द्रवपदार्थ भरून राहिलाय, असं त्याला वाटत होतं. मॅग्नेटिक थेरपीचा जन्म यातूनच होणार होता.

मेस्मरनं व्हिएन्नामधल्या एका श्रीमंत विधवेशी लग्न केलं आणि तिच्या मदतीनं व्हिएन्नातल्या सधन लोकांमध्ये जम बसवायला सुरवात केली. बेंजामिन फ्रॅंकलिननं शोध लावलेलं "ग् लास हार्मोनिका' हे वाद्य मेस्मर वाजवायला शिकला. मेस्मरला संगीताची आवड होतीच. मोझार्टच्या पहिल्या ऑपेराचा प्रयोग मेस्मरच्या बागेतच झाला होता. 1773 मध्ये एक सत्त्ावीस वर्षांची बाई त्याच्याकडे उपचारांसाठी आली. तिच्यावर कुठल्याच औषधांचा परिणाम होत नव्हता. याच वेळी मॅक्‍सिमिलियन हेल या जेझुईट धर्मगुरूनं, चुंबकत्वाचा आरोग् यावर परिणाम होतो, असं सांगितल्याचं त्याला आठवलं. मेस्मरनं दोन शक्‍तिशाली चुंबक त्या रुग्ण बाईच्या शरीरावरून फिरवायला सुरवात केली. याबरोबर ती थरथर कापायला लागली आणि काही काळ तिची शुद्ध हरपली; पण ती जेव्हा जागी झाली तेव्हा ती पूर्णपणे "बरी' झाली होती! यामुळे मेस्मरचा चुंबकत्वावरचा विश्‍वास दृढ झाला. शरीरात चुंबकत्वाचं द्रव भरून राहिलेलं असतं आणि जर या द्रवात काही "गडबड' झाली किंवा त्याची दिशा बदलली तर रोग जडू शकतात, असं मेस्मरला वाटे.मेस्मरनं चुंबकत्वाचाच उपयोग करून उपचार करायची आणखी वेगळीच पद्धत शोधून काढली. मेस्मरची ही पद्धत खूपच नावीन्यपूर्ण होती. रोग्याला एका टबच्या बाजूला बसवलं जाई. या टबमध्ये चुंबकत्व प्राप्त झालेला लोखंडाचा कीस पसरलेला असे. या टबाच्या मध्यापासून परिघाकडं जाणारे लोखंडाचे काही दंडुकेही त्या टबात ठेवलेले असत. त्यामुळे या चुंबकीय लोखंडी किसामुळं त्या लोख ंडी दंडुक्‍यातही चुंबकत्व येई. मग मेस्मर त्या रुग्णांना या चुंबकत्व प्राप्त झालेल्या दंडुक्‍यावर हात ठेवायला सांगत असे. त्यामुळे चुंबकत्वाचा परिणाम त्या रुग्णांच्या शरीरावर होईल, असा तो घाट होता. या प्रक्रियेत कित्येक रुग्णांना मानसिक आणि शारीरिक कोलाहल जाणवे; पण या कोलाहलानंतर कित्येक रुग्णांना चक्क बरंही वाटे!

मेस्मरच्या प्रयोगांच्या बातम्या व्हिएन्नाच्या वर्तमानपत्रात झळकायला लागल्या. त्या वाचून मॅक्‍सिमिलियन हेल खवळला आणि आपली कल्पना मेस्मरनं चोरली आहे, असा आरोप त् यानं करायला सुरवात केली. यामुळे मेस्मरला काहीतरी वेगळं करायला पाहिजे, असं वाटायला लागलं. मग त्यानं चुंबक वापरणंच सोडून दिलं. प्राण्यांच्या आणि माणसांच्या मज्जासं स्थेतच ऍनिमल मॅग्नेटिझम नावाचं चुंबकत्व असतं आणि ते विशिष्ट तऱ्हेनं जागृत करता येतं, असं तो म्हणायला लागला. 1777 मध्ये तर एक विचित्रच घटना घडली. एकदा मारिया थेरेसा फॉन पॅरेडिस नावाची एक पियानो वाजवणारी तीन वर्षांपासून आंधळी असणारी मुलगी मेस्मरकडे 18 वर्षांची असताना आली. मोझार्टनं या मुलीसाठी एक संगीतरचनाही केली होती. मेस्मरनं तिच्यावर "उपचार' सुरू केले. काही काळात "तिला आता थोडंबहुत दिसायला लागलंय; पण ते फक्‍त मी हजर असतानाच तिला दिसतं, मी नसताना नाही,' असं मेस्म रनं सांगायला सुरवात केली. प्रत्यक्षात त्या मुलीला दिसायला वगैरे काही लागलेलं नव्हतं. 1778 मध्ये शेवटी तिच्या वडिलांनी हे "उपचार' कंटाळून थांबवले. यावर व्हिएन्नातल्या डाॅक्‍टर्सनी मेस्मर ढोंगी असल्याची आरडाओरड सुरू केली. शेवटी वैतागून मेस्मर व्हिएन्नाहून पॅरिसला कायमचा 0निघून गेला!

पॅरिसमधली मंडळी कुठलीही नवीन गोष्ट दिसली की तिच्यामागं धावत. अनेक तऱ्हेच्या व्याधी झालेल्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी मेस्मरच्या दाराशी उपचारांसाठी यायला लागल्या. उपचारांतील प्रयोगांबद्दल प्रचंड गुप्तता बाळगी. प्रयोगांच्या वेळी बराचसा काळोख करून शक्‍य तितक्‍या कमी प्रकाशातच जादूगारासारखे गडद रेशमी पायघोळ अंगरख्यासारखे चित्र-वि चित्र कपडे घालून मागे वाजणाऱ्या हार्मोनिकाच्या पार्श्‍वभूमीवर तो आपले प्रयोग करी. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा आणि आश्‍चर्यही अनेक पटींनी वाढे. 1785 सालापर्यंत या प्र योगातलं विज्ञान जवळपास संपलंच होतं. आता त्यानं चक्क जादूटोणा किंवा चमत्कृतीचे प्रयोग, असंच स्वरूप धारण केलं होतं. या प्रयोगांना जरी लोकांची झुंबड उडत असली तरी पॅरिसमधले वैज्ञानिक मात्र त्याच्यावर खूपच वैतागायला लागले; पण मेस्मरनंही त्या वैज्ञानिकांना धडा शिकवायचं ठरवलं. यासाठी मेस्मरनंच आपली राजाबरोबरची ओळख वापरून आपल्या दाव्याचा पडताळा करण्यासाठी राजालाच एक चौकशी आयोग नेमण्याची विनंती केली. शेवटी 1785 मध्ये मेस्मर बरोबर आहे की नाही, हे ठरवण्याकरता एक चौकशी आयोग नेमला गेला आणि त्यामध्ये तर प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ लेव्हायजे आणि प्रसिद्ध मुत्सद्दी आणि वैज्ञानिक बेंजामिन फ्रॅंकलिन या दोघांचाही समावेश होता. मेस्मर थापा मारत होता, हे त्यांनी चौकशीअंती दाखवून दिलं. या अहवालामुळं मेस्मर खूपच संतप्त झाला आणि पॅरिस सोडून निघून गेला. आयुष्याची शेवटची तीस वर्षं त्यानं स्वित्झर्लंडमध्ये जवळपास सं पूर्णपणे अज्ञातवासात काढली.

या सगळ्या काळात ऍनिमल मॅग्नेटिझमवर युरोपभर उलटसुलट चर्चा सुरू झाली आणि मेस्मरिझमचं हे खूळ खरं तर आणखीच पसरलं. यामुळे असाध्य रोग बरे होऊ शकतात, अशा जाहिराती काहीच आठवड्यांत लंडनच्या वर्तमानपत्रात यायला लागल्या. 1786 सालापर्यंत मेस्मरिझमला खूपच भरभराटीचे दिवस आले होते. फ्रान्समध्येही मेस्मरिझमचं हे खूळ पु न्हा वाढलं. 1820 मध्ये मेस्मरिझमचा सखोल अभ्यास करण्यासाठी फ्रान्समध्ये दुसरा एक चौकशी आयोग नेमण्यात आला. अनेक वर्षं अभ्यास केल्यानंतर दुसऱ्या चौकशी आयोगानं धक्कादायक अहवाल सादर केला. "मेस्मरच्या पद्धतीनं रुग्णांना खरंच बरं वाटतं; त्यात बरंचसं तथ्य आहे आणि इतर डॉक्‍टरना जमणार नाही, अशी ताकद या उपायांमध्ये आहे', असं त्यात म्हटलं होतं. यामुळे अनेक डॉक्‍टर प्रचंड चिडले. या चौकशी आयोगावर भरमसाट टीकाही झाली आणि या गदारोळात मग याचीही शहानिशा करण्यासाठी तिसरा चा ैकशी आयोग नेमण्यात आला! या तिसऱ्या आयोगानं त्या डॉक्‍टरांची बाजू घेत "ऍनिमल मॅग्नेटिझम'च्या थिअरीमध्ये काहीच तथ्य नसल्याचा निर्वाळा दिला. यानंतर मात्र फ्रान्समधून मेस्मरिझमच्या थिअरीचं जवळपास पूर्णपणे उच्चाटन झालं. अतर्क्‍य प्रयोगांनी जगाला भुलवणाऱ्या मेस्मरचा 5 मार्च 1815 रोजी मृत्यू झाला. यानंतर मात्र जवळपास एक शतकभर सगळ्या जगावर जादू टाकणाऱ्या मेस्मरिझमचा ऱ्हास होत गेला आणि शेवटी तो इंग्रजी भाषेत केवळ एक शब्द म्हणूनच शिल्लक राहिला!

No comments:

Post a Comment