Friday, October 14, 2011

एक मेंदू झेलतो हे दुःख सारे!

सकाळ , जाने २३, २०११

मनाविषयी बालकवी एक झकास गोष्ट सांगून जातात : शून्य मनाच्या घुमटात, कसले तरी घुमते गीत; अर्थ कळेना कसलाही, विश्रांती परी त्या नाही... नकळे असला, घुमट बनवला, कुणी कशाला?

या मनाचा थांगपत्ता लागत नाही आणि म्हणून त्याला समजून घेण्यासाठी मेंदूच्या रचनेबद्दल जाणून घेण्याचे प्रयत्न सतत होतच राहिले. गेलननंतर साधारणपणे 1300 वर्षांनी लिओनार्डो दा विंची (1452-1519) यानं मेंदूतल्या टिश्‍यूज्‌चं महत्त्व दाखवून दिलं. त्यानं बैलाच्या मेंदूतल्या पोकळीमध्ये वितळलेलं मेण ओतलं; ते स्थिर होऊ दिलं आणि नंतर मेंदूचं विच्छेदन करून आजूबाजूच्या टिश्‍यूज्‌चं निरीक्षण केलं. मज्जातंतू हे मेंदूपर्यंत येऊन संपुष्टात येतात हे त्यानं शोधून काढलं. मेंदूच्या या भागाला कालांतरानं "थॅलॅमस' असं म्हणायला लागले.

व्हेसॅलियस (1514-1564) या शरीरशास्त्रज्ञानं अनेक प्राण्यांचे मेंदू तपासले. कित्येक वेळेला कुठल्याही प्राण्याचं डोकं उडवलं की, अजूनही ज्यातून रक्‍त ठिबकतंय अशी प्राण्यांची गरम गरम मुंडकी व्हेसॅलियसकडे आणली जायची. या अभ्यासानंतर मेंदू हाच आपल्या सगळ्या कृतीच्या आणि भावनांच्या केंद्रस्थानी असतो, या निष्कर्षापर्यंत तोही येऊन पोचला. व्हेसॅलियसनं विच्छेदन केलेल्या मेंदूची चित्रं "टिशियन्स स्टुडिओ'मधल्या कलाकारांकडून काढून घेतली होती. मेंदूच्या रचनेविषयीच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातली सर्वात चांगली चित्रं म्हणून त्यातली ताम्रपटांवर कोरलेली पंधरा चित्रं जतन केली गेली आहेत.

आधुनिक तत्त्वज्ञानाचा आणि शास्त्रीय पद्धतीचा पितामह समजला जाणारा रेने देकार्त (1596-1650) हा एक महान फ्रेंच तत्त्वज्ञ आणि गणितज्ज्ञ होता. त्याच्या जन्मानंतर काहीच दिवसात त्याची आई मरण पावली. देकार्त लहानपणापासून खूपच अशक्‍त होता. यामुळे त्याच्या शिक्षकांनी त्याला बिछान्यात पडूनच अभ्यास करायची परवानगी दिली होती. त्याची हीच सवय आयुष्यभर टिकली. वयाच्या 53 व्या वर्षी देकार्तला ख्रिस्तिना या स्वीडनच्या राणीनं तिला तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी पाचारण केलं; पण पहाटे पाचलाच सुरू होणाऱ्या या शिकवणीमुळे सकाळभर बिछान्यात लोळत पडणाऱ्या देकार्तवर मोठं संकटच येऊन पडलं. कडक थंडीत त्याला आठवड्यातले तीन दिवस पहाटे उठून राणीच्या वाचनालयात हजर राहावं लागे. यामुळं न्यूमोनियानं त्याचा मृत्यू झाला.
देकार्तच्या मते माणसामध्ये आश्‍चर्य, प्रेम, द्वेष, इच्छा, आनंद आणि दुःख अशा सहा मूळ भावना असतात. मेंदूच्या पोकळीत एक द्रवपदार्थ भरलेला असतो आणि तो मेंदूमधून संदेश पोचवण्यासाठी उपयोगी पडतो असं देकार्तनं सांगितलं. या मेंदूतल्या द्रवपदार्थाला तो "ऍनिमल स्पिरिट' असं म्हणे.

मनात जेव्हा शरीरामधल्या एखाद्या विशिष्ट भागाची हालचाल घडवून आणायची इच्छा होते, तेव्हा मन मेंदूचा द्रवपदार्थानं भरलेला एक विशिष्ट भाग एका ठराविक दिशेनं वाकवतो. त्यामुळं मेंदूतलं द्रव त्या दिशेच्या मज्जातंतूंमधून वाहायला लागतं. त्यामुळं त्या मज्जातंतूंच्या आजूबाजूचे स्नायू फुगतात आणि हालचाल करायला लागतात आणि शरीरातल्या मज्जातंतूंमध्ये असलेल्या झडपांमुळं हा द्रवपदार्थ मज्जातंतूंमध्ये किती येतो आणि त्यातून तो किती बाहेर पडतो, हे नियंत्रित होतं, अशी त्याची "हायड्रॉलिक-यांत्रिक' थिअरी होती. उदाहरणार्थ ः आपण जर पेटलेल्या आगीत हात नेला तर आपल्या त्वचेजवळचे रिसेप्टर्स उत्तेजित होऊन मेंदूतल्या पोकळीजवळची ठराविक झडप उघडली जाते आणि त्यामुळं तो द्रवपदार्थ तिथल्या मज्जातंतूंमध्ये वाहायला लागतो. त्यामुळे आपल्या तिथल्या स्नायूंना सूचना मिळून आपण हात बाजूला घेतो, असं देकार्तनं मांडलं; पण ही हात चटकन्‌ काढून घेण्याची क्रिया खूप विचारपूर्वक केलेली नसते. ती आपोआपच होते. म्हणून तिला "रिफ्लेक्‍स ऍक्‍शन' म्हणायला लागले.

देकार्त आपल्या शरीराला एका यंत्रासारखं माने. ते आपल्या आत्म्याकडून किंवा मनाकडून आज्ञा स्वीकारतं आणि त्यांचं पालन करतं. पण या आज्ञा शरीरापर्यंत पोचतात कशा? मन आणि मेंदू यांच्यातला संवाद हा मेंदूतल्या पोकळीजवळ असणाऱ्या "पिनियल ग्लॅंड'मध्ये होतो, असं तो म्हणे. पण देकार्त आज प्रसिद्ध आहे तो त्याच्या पिनियल ग्लॅंडविषयीच्या विचारांमुळे नसून, त्यानं मन आणि मेंदू हे वेगळे मानल्यामुळे आहे. माणसाला मन असल्यामुळंच माणूस हा जगातल्या इतर गोष्टींपेक्षा वेगळा ठरतो; मनाला विश्‍वाचे नियम लागू पडत नाहीत; इतर सगळ्या गोष्टींना मात्र हे नियम लागू पडतात, असं देकार्त म्हणे 17 व्या शतकातला जॉन लॉक (1632-1704) यानं 1690 साली "एसे कन्सर्निंग ह्यूमन अंडरस्टॅडिंग' हे पुस्तक लिहिलं. तो मनाला मऊ मातीसारखंच माने. मनाच्या कोऱ्या पाटीवर अनुभवाचे बोल लिहिले जातात आणि त्यातूनच भावना आणि कल्पना निर्माण होतात असं लॉकला वाटे. लॉकनं ज्ञान हे फक्‍त निरीक्षण करून, अनुभव घेऊन आणि त्यावर विचार करूनच मिळतं असं सांगणारी "एम्पिरिसिझम' थिअरी मांडली.

मन आणि शरीर यांच्यात फरकच नसल्यामुळं एकानं दुसऱ्यावर प्रभाव पाडण्याचा प्रश्‍नच येत नाही, असं स्पिनोझा (1632-1676) हा तत्त्वज्ञ म्हणायचा. सुख, दुःख आणि इच्छा या तीन प्रमुख भावना आणि त्यांच्यापासून निर्माण होणाऱ्या आशा, आत्मविश्‍वास आणि नैराश्‍य वगैरे अठ्ठेचाळीस वेगवेगळ्या भावनांच्या छटांवरही स्पिनोझानं भाष्य केलं.

मन कसं काम करतं हेही अनुभवावरूनच सांगता येतं; याकरता देव किंवा आत्मा यांची गरजच नसते, असं मत डेव्हिड ह्यूमनं (1711-1776) मांडलं; तर मन हे "वस्तूं'नी बनलेलं असतं, असं सांगणारी जडवादाची (मटीरिऍलिस्टिक) थिअरी जेम्स मिल (1773-1836) या स्कॉटिश विचारवंतानं मांडली. त्यानं मानसशास्त्रावर लिहिलेलं "ऍनॅलिसिस ऑफ ह्यूमन माइंड' हे पुस्तक खूपच गाजलं.

मग वेगवेगळ्या चित्र-विचित्र थिअरीज निघाल्या. या मज्जातंतूंमधून वेगवेगळे अणू प्रवास करून आपली मनोवस्था ठरवतात, असं हॉब्जला वाटलं; तर मज्जातंतू कंप पावून मनोवस्था दाखवतात, असं डेव्हिड हार्टले म्हणायचा. माणूस हा यंत्रासारखा आहे, हे दाखवणारं "मॅन ः ए मशिन' या शीर्षकाचं पुस्तकसुद्धा फ्रेंच तत्त्वज्ञ ज्युलियां द ला मात्री यानं लिहिलं. मेंदूविषयीचं आपलं ज्ञान अनेक मार्गांनी वाढलं. त्यात कित्येक वाद-विवाद दडलेले आहेत; तर कित्येक प्रयोग आणि काही अपघातही! उदाहरणार्थ : अमेरिकेमध्ये सुमारे 160 वर्षांपूर्वी झालेल्या रेल्वे अपघातामुळे आपल्या मेंदूच्या ज्ञानात एवढी भर पडेल, असं कोणालाही वाटलं नसतं!

ता. 13 सप्टेंबर 1848 रोजी दुपारी व्हर्मोंटमधल्या कॅव्हेंडिश पासून पाऊण मैलावर रेल्वेची लाईन टाकण्याचं काम चालू होतं. 25 वर्षांचा फिनिआज्‌ गेज हा अत्यंत कष्टाळू माणूस त्याचं नेतृत्व करीत होता. या कामात डोंगरातून वाट तयार करण्याकरता त्यानां स्फोटकं वापरावी लागत होती. त्यातलंच एक स्फोटक विचित्र तऱ्हेनं फुटून सात किलो वजनाचा एक मोठा लोखंडी दांडा गेजच्या डाव्या गालातून घुसून त्याच्या मेंदूला आणि कवटीला भोक पाडून डोक्‍यातून चक्क वर आला. कवटीला एवढं मोठं भोक पडलं होतं की त्यातून एखाद्याची मूठसुद्धा आत जाईल!

या स्फोटानंतर गेज अनेक यार्ड दूर एका खड्ड्यात जाऊन आदळला. बऱ्याच वेळापर्यंत गेज तिथेच विव्हळत पडला होता. ख्रिस्तोफर गुडरीच नावाच्या माणसानं त्याला आपल्या बैलगाडीत घालून गावातल्या जोसेफ ऍडॅमच्या एका लॉजवर नेऊन ठेवलं. गेज जगण्याची आता कोणालाच आशा वाटत नव्हती. त्यामुळे मृतांसाठीच्या शवपेट्या तयार करणारा थॉमस विन्स्लो या माणसानं गेज जिवंत असताना त्याची शवपेटी करण्यासाठी चक्क त्याच्या शरीराची मोजमापंही करून नेली!

पण गेजच्या नशिबानं एडवर्ड विल्यम्स आणि जॉन हार्लो या दोन डॉक्‍टरांनी त्याच्या जखमांवर अँटिसेप्टिक्‍सचा मारा केला आणि आश्‍चर्य म्हणजे मरणोन्मुख अवस्थेतला गेज न्यू हॅमशायरमध्ये राहणाऱ्या त्याच्या कुटुंबाकडे विश्रांतीसाठी चक्क परतला! डॉक्‍टर हार्लोनं "बॉस्टन मेडिकल अँड सर्जिकल जर्नल'मध्ये याविषयी एक लेख लिहिला. असा लोखंडी दांडा डोक्‍यातून जाऊनसुद्धा गेज हा कसा व्यवस्थित बोलतोय, चालतोय, त्याचे हातपाय मुक्‍तपणे कसे हालवू शकतोय आणि त्याच्या संवेदनासुद्धा कशा नॉर्मल आहेत, याविषयी त्या लेखात लिहिलं होतं. हे वाचणाऱ्यांनी आश्‍चर्यानं तोंडात बोटंच घातली!

गेजच्या या गोष्टीचा उल्लेख मज्जाविज्ञानावरच्या बहुतेक सर्व पुस्तकांत झाला; पण गेज आता पूर्वीचा गेज राहिला नव्हता. गेजच्या डाव्या डोळ्यची दृष्टी गेली होती आणि त्या कपाळावर दीड ते दोन इंचाचा खोलवर व्रण शिल्ल राहिला होता. शांत आणि धीरगंभीर गेज आता चिडचिडा आणि आक्रमक झाला होता. त्याच्या सुस्वभावी आणि मनमिळाऊ स्वभावाचं रूपांतर आता हट्टी आणि अहंकारी स्वभावात झालं होतं. एवढंच नाही तर एके काळचा लाजाळू गेज आता कोणाकडेही आपली लैंगिक इच्छा व्यक्‍त करे. या सगळ्यांमुळे त्याची पूर्वीची नोकरीही गेली आणि तो आयुष्यात भरकटला. सफाई कामगार, कोचमन, वेटर, तबेल्यात घंची निगा राखणारा सेवक आणि काही काळ तर चक्क न्यूयॉर्कच्या बार्नमच्या सर्कशीतसुद्धा त्यानं काम केलं! पण हळूहळू त्याची प्रकृती खालावली. त्याला सतत फेपरं यायला लागलं आणि 1860 साली त्याचा मृत्यू झाला. 1867 त्याचं शरीर पुन्हा उकरून त्याचं पोस्टमार्टेम करण्यात आलं आणि डॉक्‍टर हार्लोनंच गेजची भोक पडलेली कवटी आणि तो कुप्रसिद्ध लोखंडी दांडा हे हार्वर्डमधल्या मेडिकल स्कूलला भेट दिलं. अजूनही "काउंट वे लायब्ररी ऑफ मेडिसिन'मध्ये ते आपल्याला पाहायला मिळतं.

या अपघातामुळे एक मात्र झालं. वेगवेगळ्या गोष्टींसाठी मेंदूत वेगवेगळे भाग असतात की नाही, यावर आता खूप संशोधन, चर्चा, वाद आणि एकूणच मेंदूविज्ञानाचा सखोल अभ्यास सुरू झाला. एकंदरीत मेंदूविषयी असं म्हणता येईल:

बांधतो मी व्यथांचे फक्‍त भारे
एक मेंदू झेलतो हे दुःख सारे!

No comments:

Post a Comment