Saturday, October 15, 2011

स्किझोफ्रेनिया भ्रम आणि भास

July 17, 2011

नाही हाकारा, पण उठले रान
घरटे सापडेना वाट
बेभान पाखरू, समजेना कोणा
का कल्लोळ कल्लोळ

अभिनेता अतुल कुलकर्णीची ही कविता "देवराई' या चित्रपटातली. स्किझोफ्रेनियाबद्दल भाष्य करणारा मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातला हा मराठीतला एक पहिलाच प्रयोग होता. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या "देवराई' या सिनेमाचा नायक हा स्किझोफ्रेनिक असतो. स्किझोफ्रेनियामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वात होत जाणारे बदल या चित्रपटात अत्यंत बारकाईनं टिपले आहेत. या चित्रपटाचे सल्लागार प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी होते.

मनोविकारांमध्ये स्किझोफ्रेनिया हा एक भयानक विकार आहे. कुठल्याही देशातल्या, वंशातल्या, जातीतल्या किंवा धर्मातल्या माणसांना तो होऊ शकतो. स्किझोफ्रेनिया झालाय, हे कसं ओळखावं? त्याची पाच मुख्य लक्षणं म्हणजे सतत भ्रम होणं (डिल्युजन्स), सतत आभास होणं (हॅल्युसिनेशन्स), विस्कळित, असंबद्ध बोलणं, लिहिणं किंवा असंबद्ध वागणं आणि नकारात्मक विचार. हा विकार झाल्यावर रुग्णाचं वास्तवाचं भान सुटून त्याचं विचार करणं आणि कृतीच बदलून जातात. या पाचापैकी कुठलीही दोन लक्षणं किंवा कुठलंही एक लक्षण खूप तीव्रपणे सतत सहा महिने दिसून आलं तर त्याला "स्किझोफ्रेनिया' म्हणतात. या विकारातली प्रत्येक केस ही इतरांपेक्षा वेगळी असते. रुग्णाचं विचित्र आणि अव्यवस्थित वागणं हे कुणाच्याही लक्षात येऊ शकतं. प्रचंड उकाड्यामुळे खूप घाम येत असतानाही कोट, स्कार्फ, हातमोजे, कानटोपी घालणं, घरीसुद्धा नेकटाय घालून बसणं, स्वतःची राहणी आणि आरोग्य यांच्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करणं, असले प्रकार हे रुग्ण वरचेवर करतात. ज्या घरात स्किझोफ्रेनिया झालेला असतो त्या घरातलं वातावरणच पूर्णपणे बिघडून गेलेलं असतं.

स्किझोफ्रेनिया हा सर्वसामान्यांना ओळखीचा वाटायला लागला तो नोबेल पुरस्कारविजेता जॉन नॅश या प्रचंड बुद्धिमत्ता असलेल्या शास्त्रज्ञावर 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या "ब्यूटिफुल माइंड' या सिनेमामुळे. या चित्रपटानं ऑस्करची चार पारितोषिकं पटकावली. भासांच्या दुनियेत जगणाऱ्या नायकाच्या आयुष्यात अनेक वादळं निर्माण होतात. या चित्रपटात जॉन नॅशच्या स्किझोफ्रेनिया विकारातले अनेक बारकावे रसेल क्रो या अभिनेत्यानं अचूकपणे साकारले होते. स्किझोफ्रेनियाच्या विळख्यातून नॅश कसा बाहेर येतो आणि 1994 मध्ये त्याला "गेम थिअरी'मधल्या योगदानाबद्दल अर्थशास्त्रातलं नोबेल पारितोषिक कसं मिळतं, याची सुंदर गोष्ट या चित्रपटात चितारली आहे.

स्किझोफ्रेनियाचं अचूक वर्णन जर कोणी केलं असेल तर ते एमिल क्रॅपेलिन (1856 - 1926) यानं. क्रॅपेलिननं 1896 मध्ये या विकाराला "डेमेन्शिया प्रॅकॅक्‍स' असं नाव दिलं होतं. यूजेन ब्लुलर (1857 - 1939) या स्विस मानसोपचारतज्ज्ञानं "स्किझोफ्रेनिया' हा शब्द प्रथम वापरला. स्किझोफ्रेनियाचं प्रमाण एपिलेप्सीएवढंच आहे. हा विकार बहुतांशी तरुणपणीच होतो. स्किझोफ्रेनिया होण्याचं सरासरी वय पुरुषांत 25, तर स्त्रियांमध्ये 29 मानलं जातं. पुरुषांमध्ये या विकाराचं प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त असतं. एस्ट्रोजन हेच सेक्‍स-हार्मोन्स स्त्रियांना स्किझोफ्रेनियापासून थोडंफार वाचवत असेल, असं संशोधकांना वाटतंय.

स्किझोफ्रेनियामध्ये भ्रम (डिल्युजन्स) होण्याच्या अनेक तऱ्हा असतात. आपले विचार कुणीतरी दुसरी व्यक्ती किंवा बाहेरची कुठली तरी शक्ती नियंत्रित करताहेत, आपले विचार कुणीतरी बाहेर प्रसारित करतंय, कुठल्या तरी टीव्ही किंवा रेडिओवरच्या प्रोग्रॅममधली वाक्‍यं आपल्यालाच उद्देशून म्हटली जाताहेत; आपले अवयवच कुणीतरी काढून घेऊन जातोय किंवा आपणच शिवाजी महाराज किंवा नेपोलियन आहोत, असे भ्रमाचे गंमतशीर वाटणारे पण खूपच क्‍लेशदायक प्रकार असतात. आभास किंवा हॅल्युसिनेशन्स हेही तितकेच विचित्र आणि भीतिदायक असतात. हे परिणाम आवाजाचे, स्पर्शाचे, दृश्‍याचे, चवीचे आणि वासाचे असे कुठलेही असू शकतात. निरोगी माणसांच्या स्वभावात राग, लोभ, प्रेम हे पैलू दिसतात; पण स्किझोफ्रेनिया या विकारात भावनाशून्य असणं, कुठल्याही ध्येयाशिवाय विचित्र तऱ्हेनं वागणं, अशी नकारात्मक लक्षणं बऱ्याचदा दिसतात.

आइन्स्टाइनचा मुलगा एडुवर्ड आइन्स्टाइन, जेम्स जॉईस या प्रसिद्ध लेखकाची नर्तिका मुलगी ल्युसिया जॉईस, जगप्रसिद्ध गणिततज्ज्ञ आणि नासाचे वैज्ञानिक डॉ. वसिष्ठ नारायण सिंग, इंग्लंडमधला गिटारवादक रॉक स्टार पीटर ग्रीन आणि प्रसिद्ध ड्रमर जिम गॉर्डन यांनाही स्किझोफ्रेनियानं ग्रासलं होतं असं म्हणतात.

स्किझोफ्रेनिया पॅरेनॉइड, डिसऑर्गनाइज्ड, कॅटेटॉनिक, अनडिफरन्शिएटेड आणि रेसिड्युअल असे पाच प्रकार मानतात. पॅरेनॉईड प्रकारात रुग्णाला आपल्याविषयी सतत कोणीतरी बोलतोय किंवा कुणीतरी आपला पाठलाग करतोय, आपल्यावर वॉच ठेवतोय, आपल्याला विष देणार आहे किंवा आपण जगातले सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ, तत्त्वज्ञ किंवा शास्त्रज्ञ अशा तऱ्हेची कोणी मोठी व्यक्ती आहोत असं वाटल्यामुळे कोणीतरी आपल्या मागावर आहे, या प्रकारचे अनेक तऱ्हेचे भास होतात. सततच्या असुरक्षिततेमुळे रुग्णामध्ये संशयी वृत्ती वाढते. कानात कोणीतरी पुटपुटतंय असे भास त्याला होऊ लागतात. एकूणच अशा रुग्णांमध्ये विचार, भावना, इच्छाशक्ती या सगळ्यांवर परिणाम होत असल्यामुळे अशा व्यक्ती समाजापासून तुटतात. जर योग्य औषधं वेळेवर घेतली तर अशा रुग्णांमध्ये इतर प्रकारच्या स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांपेक्षा जास्त प्रमाणात सुधारणा दिसून येते.

डिसऑर्गनाइज्ड स्किझोफ्रेनियाचा प्रकार तरुणपणापासूनच चालू होतो आणि तो हळूहळू वाढत जातो. विचित्र भाषा, विचित्र बोलणं, लिहिणं आणि वागणं यामुळे रुग्ण एकाकी पडत जातो. तो आपल्या दिवास्वप्नातच, फॅंटसीतच मग्न असतो. विनाकारण हसणं, रडणं, कळायला अवघड उच्चार, सारखं तेच ते बोलणं, विचित्र हावभाव आणि चेहरे, विचित्र आभास आणि भ्रम या सगळ्या गोष्टी हळूहळू वाढायला लागतात.

कॅटेटॉनिक हा स्किझोफ्रेनियाचा एक खूपच विचित्र प्रकार आहे. त्यात एकदम पुतळ्यासारखं स्थिर होणं आणि हालचाल पूर्ण थांबवणं किंवा अचानक प्रचंड हालचाल किंवा पळापळ करणं, त्याच त्या विचित्र हालचाली करणं, प्रश्‍न विचारल्यावर उत्तरादाखल तोच प्रश्‍न विचारणं (इकोलॅलिया), अशा गोष्टी तो करायला लागतो. कॅटाटॉनिक स्किझोफ्रेनियामध्ये रुग्णांना वारंवार झटके येतात. नियमित औषधोपचारानं ते आटोक्‍यात राहू शकतात. अनडिफरन्शिएटेड प्रकारात भ्रम, आभास, विस्कळित आचार-विचार ही सगळी लक्षणं दिसतात; पण स्पष्टपणे आणि ठळकपणे दिसत नाहीत. रेसिड्युअल प्रकारात भ्रम किंवा आभास यांची लक्षणं फारशी दिसतच नाहीत.

स्किझोफ्रेनियासारखेच इतर काही विकार आहेत. "स्किझोऍफेक्‍टिव्ह डिसऑर्डर' हा त्यातलाच एक प्रकार. यात स्किझोफ्रेनिया आणि तीव्र मूड डिसऑर्डर यांचं मिश्रण आपल्याला सापडतं. स्किझोफ्रेनिफॉर्म डिसऑर्डर विकारात स्किझोफ्रेनियाची लक्षणं दिसतात, पण ती सहा महिने एवढा काळ न दिसता त्यापेक्षा कमी काळ म्हणजे एक-दोन महिने अशी दिसतात. हा विकार जास्त लवकर बरा होऊ शकतो. सहा महिने सलग अशी लक्षणं दिसली तरच डॉक्‍टर त्याला स्किझोफ्रेनिया म्हणतात. डिल्युजनल डिसऑर्डर, ब्रीफ सायकॉटिक डिसऑर्डर हेही या विकाराचे भाईबंदच आहेत. एखाद्याला स्किझोफ्रेनिया असेल तर त्याच्यासारख्याच जुळ्यालाही (आयडेंटिकल ट्‌विन्स) स्किझोफ्रेनिया होईल, याची शक्‍यता 48 टक्के, तर इतर जुळ्यांना तो होण्याची शक्‍यता 17 टक्के असते. स्किझोफ्रेनियात आनुवंशिक किंवा "नेचर'चा घटक मोठा मानला जातो.

स्किझोफ्रेनिया झालेल्या रुग्णांचा सीएटी, पीईटी किंवा एमआरआय यांच्या साह्यानं मेंदूचा अभ्यास सुरू झाला. त्या वेळी अशा रुग्णांच्या मेंदूतली पोकळी (व्हेंट्रिकल्स) नेहमीपेक्षा मोठी असल्याचं संशोधकांना आढळलं. स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांच्या मेंदूचा व्हॉल्युमही साधारणपणे तीन टक्‍क्‍यांनी कमी असतो. म्हणजेच अशा रुग्णांमध्ये मेंदूचे टिश्‍यूज इतरांच्या मानानं कमी असतात.

स्किझोफ्रेनियावर उपचार काय आहेत? 1950 च्या अगोदर अशा रुग्णांना भवितव्यच नसायचं. अमेरिकेत त्यांना प्रचंड गर्दी असलेल्या अकार्यक्षम सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये घालावं लागे. भारतासारख्या देशात तर अशी हॉस्पिटल्सही नसल्यामुळे कुटुंबाची प्रचंडच ओढाताण आणि कुचंबणा व्हायची. काहींना शॉकथेरपी द्यायचे. अजून स्किझोफ्रेनियामुळे नक्की मेंदूतला कुठला भाग, किती प्रमाणात आणि कशा तऱ्हेनं बिघडतो हे खात्रीपूर्वक कळलेलं नाहीये. आपल्या मेंदूमधल्या रसायनांमुळे आपल्या मनोवस्था बदलतात. 1947 मध्ये एलएसडी हे एक रसायन निघालं. व्यसनाधीन लोक त्याचा वापर पुढे करायला लागले; पण हा पदार्थ घेऊन त्याचा मेंदूवर आणि त्यामुळे मनाच्या अवस्थेवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास केला तेव्हापासून मेंदूच्या रासायनिक अभ्यासाला आणखीनच चालना मिळाली. या रसायनांनाच न्यूरोट्रान्समीटर्स असं म्हणतात.

स्किझोफ्रेनियाच्या संशोधनात "डोपमाईन' हा महत्त्वाचा न्यूरोट्रान्समीटर ठरला आहे. "ऍफीटमाईन्स' औषधांमुळे डोपमाईनचं प्रमाण वाजवीपेक्षा जास्त असल्यासारखा आपला मेंदू वागायला लागतो आणि स्किझोफ्रेनियाच्या लक्षणांसारखीच लक्षणं तो दाखवायला लागतो. त्यामुळे मेंदूत डोपमाईन जास्त होण्यामुळे स्किझोफ्रेनिया होतो की काय, यावर संशोधन सुरू झालं. 1952 मध्ये स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांसाठी क्‍लोरप्रोमाझाईन किंवा थोरझाईन हे औषध द्यायला डॉक्‍टरांनी सुरवात केली. या औषधाचा बराच उपयोगही दिसायला लागला. या औषधामुळे मेंदूतले डोपमाईन रिसेप्टर्स ब्लॉक होतात, हेही पुढं लक्षात आलं.

1950 च्या आणि 1980 च्या दशकात "अँटिसायकोटिक्‍स' या गटातली औषधं निघाली आणि या औषधांनी रुग्णाला शांत करणं, त्याची आक्रमकता कमी करणं, अशासारख्या गोष्टी शक्‍य झाल्या. त्यामुळे त्यांच्या मानसिक स्थितीतही सुधारणा झाल्या. पण स्किझोफ्रेनियावर फक्त औषधं घेऊनही चालत नाही. शिवाय या औषधांचे झोप येणं, वजन वाढणं, रक्तातल्या पांढऱ्या रक्तपेशी कमी होणं, असे साइड-इफेक्‍टही होऊ शकतात. या सगळ्यांमुळे ही औषधं डॉक्‍टरांच्या सल्ल्यानंच घ्यावी लागतात आणि त्याचबरोबर मानसोपचारही करण्याची गरज असते. "कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी' (सीबीटी) या तंत्राचा उपयोग स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांसाठी सुरू झालाय.

संशोधनावरून शहरी आयुष्यातल्या ताणतणावांमुळे, गतीमुळे आणि इतर कारणांमुळेही स्किझोफ्रेनियाचं प्रमाण वाढलेलं आढळलंय. स्किझोफ्रेनिया होऊ नये याकरिता गरोदरपणात किंवा बाळंतपणात आईच्या प्रकृतीची खूप काळजी घेणं, हा एक प्रतिबंधक उपाय आहे. कारण काही वेळा याच प्रक्रियेत बिघाड झाल्यामुळे किंवा प्रसूतीच्या वेळी मुलाला ऑक्‍सिजन कमी मिळाल्यामुळे आणि इतरही वेगवेगळ्या संबंधित कारणांमुळे स्किझोफ्रेनियाची शक्‍यता वाढते. अशी काळजी घेतल्यास निदान काही केसेस तरी स्किझोफ्रेनिया होण्यापासून वाचू शकतील; पण तरीही स्किझोफ्रेनिया पूर्णपणे टाळता येईल, असं अजूनही चित्र नाही.

No comments:

Post a Comment