Saturday, October 15, 2011

बिहेवियरिस्ट्‌स थॉर्नडाईक-वॉटसन

April 24, 2011

एखाद्या अळीजवळ काडीसारखा पदार्थ नेला (स्टिम्युलस) तर अळी संपूर्ण शरीर आखडून घेते (रिस्पॉन्स), त्याप्रमाणे प्राण्यांच्या इतर हालचालीही या "रिफ्लेक्‍स ऍक्‍शन्स'सारख्याच असतात. कुठल्या स्टिम्युलसला कुठला प्राणी कसा रिस्पॉन्स देतो, त्यावरून त्याची वागणूक ठरते. या थिअरीतूनच "बिहेवियरिझम'चा जन्म झाला. या "बिहेवियरिझम'चे नियम शोधण्याचा प्रयत्न प्रामुख्यानं थॉर्नडाईक (1874 - 1947) या मानसशास्त्रज्ञानं केला.

थॉर्नडाईकनं "कोंबड्याची बुद्धिमत्ता आणि त्यांच्या इंस्टिक्‍ट्‌स' यावर संशोधन केलं. कोंबड्यांच्या पिल्लांसाठी थॉर्नडाईकनं एक चक्रव्यूह तयार करून त्याच्या एका कोपऱ्यात अन्न ठेवलं. त्या पिल्लांनी चक्रव्यूह पार केल्यावरच त्यांना ते अन्न मिळणार होतं. पण चक्रव्यूहाच्या फसव्या रचनेमुळे पिल्लं बऱ्याचदा गरगर फिरून मूळ ठिकाणीच परत येत. बऱ्याच प्रयत्नांनंतर जेव्हा एखादं पिल्लू त्या अन्नापर्यंत पोचे, तेव्हा थॉर्नडाईक त्याला पुन्हा चक्रव्यूहाच्या मूळ ठिकाणी आणे. आता ते दुसऱ्या वेळी काही "शिकून' अन्नापर्यंत पोचायला कमी वेळ घेतं का, हे त्याला बघायचं होतं. जसजसा एखादा प्राणी जास्त वेळा प्रयत्न करे तसतसा या शिकण्यामुळे तीच गोष्ट पुन्हा करण्याचा त्याचा वेळ कमी कमी होत जाई. मग त्यानं कोंबड्या, मांजरं, कुत्री, माकडं अशा अनेक प्राण्यांवरही अनेक वेळा असेच वेगवेगळे प्रयोग केले. ते प्राणी कसे "शिकतात' यावर संशोधन करून त्यांची शिकण्याची वेळ एका आलेखात मांडली. त्यालाच मग "लर्निंग कर्व्ह' म्हणायला लागले.

""मला कुठल्याही वंशाची किंवा क्षमतेची एक डझनभर निरोगी मुलं द्या; त्याचं संगोपन करून मी मनात आणेन तसं या मुलांना घडवू शकेन. त्यांना डॉक्‍टर, वकील, कलाकार, व्यापारी, एवढंच कशाला, पण भिकारी किंवा चोरसुद्धा बनवून दाखवेन.'' जॉन बी. वॉटसनचे (1878-1958) हे उद्‌गार मानसशास्त्राच्या इतिहासात खूपच गाजले. माणसाची जडणघडण आनुवंशिकतेने आलेल्या गुणांमुळे (नेचर) होते, का त्याच्यावरच्या संस्कारांमुळे आणि बाह्य परिस्थितीमुळे (नर्चर) होते, याविषयी मानसशास्त्रात वाद होता. वॉटसननं "नेचर'ऐवजी "नर्चर'ला, म्हणजेच बाह्य वातावरणाला जास्त महत्त्व दिलं आणि हे सिद्ध करण्याकरता त्यानं "सी-बर्डस्‌'सारख्या अनेक प्राण्यांवर अनेक प्रयोग केले. हॉपकिन्स विद्यापीठात प्राध्यापक असलेला वॉटसन स्वतःच्या कल्पना इतरांना पटवून देणारा निष्णात सेल्समन होता. यामुळेच तो बिहेवियरिस्ट चळवळीचा नेता बनला.

आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा वॉटसन अत्यंत ठामपणानं आणि आत्मविश्‍वासानं बोले. कुठल्याही समारंभात तो एक आकर्षणाचा भाग असे. तो देखणा असल्यामुळे आयुष्यभर त्याची अनेक मुलींशी लफडी झाली; पण त्याच्या या बाह्य रूपामागे एक अत्यंत असुरक्षित व्यक्तिमत्त्व दडलेलं होतं. कुठल्याही गंभीर भावनांविषयी चर्चा सुरू झाली की तो तिथून चक्क पळ काढे. त्याच्या स्वतःच्या मुलांचेही त्यांच्या लहानपणी त्याने कधी लाड केले नव्हते. त्याला त्याची दुसरी बायको आवडत असे, पण तिचा मृत्यू झाल्यावर तिच्याविषयी संपूर्ण आयुष्यात तो एकही अक्षर बोलला नाही. अशा या त्याच्या स्वभावामुळे रुग्णानं स्वतःच्या भावनांविषयी डॉक्‍टरांपाशी उघडपणे बोलण्यावर विश्‍वास ठेवणाऱ्या फ्रॉईडच्या थिअरीजमध्ये त्याला रस न वाटणं आणि माणसांपेक्षा उंदरांवर त्यानं प्रयोग करणं, हेही साहजिकच होतं!

1878 मध्ये साऊथ कॅरोलिनामधल्या ग्रीनव्हील शहरात वॉटसन जन्मला. त्याचे वडील खूपच आक्रमक होते, तर आई मात्र अत्यंत धार्मिक आणि शांत होती. त्यामुळे वॉटसनच्या समोर दोन परस्परविरोधी आदर्श लहानपणापासूनच ठेवले गेले. वॉटसनच्या गावंढळ वागणुकीमुळे त्याला वर्गातली मुलं सतत चिडवायची. वॉटसन मग खूपच वैतागायचा. वॉटसन 13 वर्षांचा असताना त्याचे वडील एका बाईबरोबर पळून गेले. या गोष्टीचा त्याच्यावर बराच परिणाम झाला होता. यामुळे शाळेत तो जेमतेम पास होऊन पुढच्या इयत्तेत ढकलला जायचा. त्याचं त्याच्या मित्रांशी कधीच पटायचं नाही. मित्रांबरोबर बॉक्‍सिंग करत असताना दोघंही रक्तबंबाळ होईपर्यंत तो ठोसे लगावतच राही. तो वंशद्वेष्टाही होता. तिथल्या काळ्या लोकांना पकडून तो बदडत असे. त्याला एकदा वंशद्वेषाबद्दल, तर एकदा बंदूक बाळगल्याबद्दल अटकही झाली होती.

शिकागो विद्यापीठात प्रथम तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून वॉटसन मानसशास्त्राकडे वळला. अभ्यास करतानाच पैसे मिळवण्यासाठी काही काळ वेटर, तर काही काळ मानसशास्त्राच्या प्रयोगशाळेतल्या उंदरांची काळजी घेणारा सेवक किंवा सफाई कामगार, असे अनेक उद्योग त्यानं केले. या सगळ्याचा खूपच ताण पडल्यानं त्याचा नर्व्हस ब्रेकडाऊन झाला. त्यातून बाहेर आल्यावर 1901-02 मध्ये त्याने डॉक्‍टरेट पूर्ण केली. लहान उंदीर कशा तऱ्हेनं शिकतात आणि माणूस कसा शिकतो, यांचा काय संबंध आहे, याविषयीचा त्यानं प्रबंधही लिहिला होता.

"प्राण्यांच्या वागणुकीवरून (बिहेवियर) त्यांच्या मनोवस्थेविषयी अंदाज बांधता येतात,' असं वॉटसन म्हणे. त्यानं आणि जेम्स ऍग्नेला यांनी स्वतंत्रपणे "बिहेवियरिझम' हा शब्द निर्माण केला. 1913 मध्ये त्यानं "सायकॉलॉजिकल रिव्ह्यू'मध्ये याविषयी एक लेख लिहिला. त्याला "बिहेवियरिस्ट मॅनिफेस्टो' असं म्हटलं जातं. तेव्हापासूनच औपचारिकरीत्या बिहेवियरिस्ट विचारसरणी सुरू झाली. "जाणीव', "मनोवस्था', एवढंच काय, पण "मन' असे शब्दही वापरणं वॉटसननं सोडून दिलं. "आपली वागणूक (कुठल्या स्टिम्युलसला कसा रिस्पॉन्स) हाच मानसशास्त्राचा पाया आहे,' असं वॉटसन म्हणे. आणि एकदा जाणीव ही आपल्या अभ्यासक्षेत्रातून काढून टाकली की मग प्राणी आणि माणूस या दोघांवरही प्रयोग केले तरी ते सारखेच, असं त्याचं मत होतं. वॉटसननं "कंडिशन्ड रिफ्लेक्‍स'ची पद्धत सुचवली.

1920 मध्ये वॉटसन आणि रोझली रेनर यांनी केलेला "अल्बर्ट बी'चा प्रयोग मानसशास्त्राच्या इतिहासात खूपच गाजला. अल्बर्ट हा 11 महिन्यांचा, कधीही न रडणारा शांत मुलगा होता. अल्बर्टच्या मनात कुठल्याही केसाळ प्राण्यांबद्दल आणि वस्तूंबद्दल भीती निर्माण करायचं वॉटसननं ठरवलं. हा प्रयोग सुरू करण्यापूर्वी अनेक दिवस अल्बर्ट एका पांढऱ्या उंदराबरोबर बराच वेळ खेळत बसे. पण अल्बर्ट 11 महिन्यांचा झाल्यावर जेव्हा त्या उंदराला पकडायला गेला तेव्हा वॉटसननं त्याच वेळी त्याच्या डोक्‍यामागे एका हातोड्यानं मोठा आवाज केला. अल्बर्ट ते ऐकून एकदम दचकला आणि घाबरला. त्याच्या चेहऱ्यावर प्रथमच भीती दिसली. काही दिवसांनी अल्बर्ट पूर्वीचा अनुभव विसरून गेला असेल असं त्यांना वाटलं. त्यांनी पुन्हा त्याच्यासमोर एक पांढरा उंदीर ठेवला. अल्बर्टनं डावा हात पुढे करून त्या उंदराला स्पर्श करताच त्याच क्षणी त्यांनी त्या हातोड्यानं तोच मोठा आवाज काढला. त्याबरोबर अल्बर्ट भीतीनं दचकलाच! उंदीर पकडणं आणि आवाजामुळे वाटणारी भीती यांच्या संबंधाचं समीकरण अल्बर्टच्या डोक्‍यात पक्कं व्हायला लागलं होतं. पुन्हा प्रयोग सुरू झाले. पुन्हा तो पांढरा उंदीर ठेवण्यात आला. या वेळी अल्बर्टनं आपल्या उजव्या हातात उंदीर पकडण्याचा प्रयत्न केला. पण याही वेळी वॉटसन आणि कंपनीनं त्या हातोड्याचा मोठा आवाज केला. अल्बर्ट पुन्हा रडायला लागला. यानंतर सहाएक वेळा हाच प्रयोग झाला. आता उंदराचं दृश्‍य आणि भीती याचं नातं अल्बर्टच्या डोक्‍यात पूर्णपणेच पक्कं झालं होतं. शेवटी पांढरा उंदीर समोर दिसल्याबरोबर अल्बर्ट त्याला बघून कुठलाच आवाज न करतासुद्धा घाबरायला लागला. त्याच्यामध्ये "कंडिशन्ड फिअर रिस्पॉन्स' निर्माण करम्यात वॉटसन आणि रेनर यशस्वी झाले होते. अल्बर्टनं आता त्या भीतीचं "जनरलायझेशन' केलं होतं. आता त्याला अंगावर केस असणाऱ्या कुठल्याही प्राण्याची भीती वाटायला लागली होती.

अल्बर्टला डी-कंडिशनिंग करून याच्या उलट्या पद्धतीनं हळूहळू त्याची भीती कमी करायला पाहिजे होती. पण तसं न केल्यानं त्याचं मोठेपणी काय होणार, याविषयी बरेच वाद झाले. अल्बर्टची आई या प्रयोगानंतर त्याच्याबरोबर दूर कुठेतरी राहायला गेल्यामुळे अल्बर्टविषयी देशभर बराच काळ गूढ होतं. शेवटी हॉल पी. बेक या मानसशास्त्रज्ञानं त्याचा शोध घेतला. अल्बर्ट बीचं खरं नाव डग्लस मेरिट होतं. वयाच्या सहाव्या वर्षी तो मेंदूत पाणी झाल्यामुळे मृत्युमुखी पडला होता, पण वॉटसननं बिहेवियरिझमचा पाया घातला होता. आपण ठराविक तऱ्हेचं वातावरण निर्माण करून कुठल्याही माणसाची वागणूक बदलू शकतो, हेच बिहेवियरिझमचं म्हणणं होतं.

हे प्रयोग करत असतानाच वॉटसन रेनरमध्ये पूर्णपणेच गुंतला. त्यामुळे त्यानं त्याची बायको मेरी हिच्याशी घटस्फोट घेऊन रेनरशी लग्न केलं. त्या काळी कुठल्याही प्राध्यापकाची अशी वागणूक गुडनाऊ विद्यापीठात भयानक वाईट मानली जायची. त्यामुळे वॉटसननं राजीनामा दिला आणि तो तडक न्यूयॉर्कला निघून गेला. क्षणार्धात त्याची देदीप्यमान कारकीर्द संपुष्टात आली होती. त्यानंतर जे. वॉल्टर थॉम्प्सन या नावाजलेल्या जाहिरात कंपनीत तो मानसशास्त्राचा सल्लागार झाला. पॉंड्‌सच्या कोल्ड क्रीमचया एका लोकप्रिय जाहिरातीत वापरण्यासाठी तर त्यानं स्पेन आणि रोमानिया या देशांतल्या राण्यांनी या क्रीमविषयी काढलेले गौरवोद्‌गार मिळवले होते! मॅक्‍स्वेल कंपनीची कॉफी खपावी म्हणून वॉटसननं शोधून काढलेली "कॉफी ब्रेक' ही कल्पना इतकी सर्वमान्य झाली, की मोठमोठ्या मीटिंग्जचे वारंवार असे "कॉफी ब्रेक्‍स' व्हायला लागले.

बरीच वर्षं वॉटसन पुस्तकं, लेख आणि प्रबंध लिहीतच राहिला. बिहेवियरिझमचा तो कट्टर पुरस्कर्ता होता, पण वॉटसननं आता प्रयोग करणं मात्र पूर्णपणे बंदच केलं होतं. 1930 च्या नंतर त्यानं लिखाणही बंद केलं. आपल्या कनेटिकटमधल्या मोठ्या इस्टेटीवर तो आणि रेनर राहायला गेले. त्यांचं आयुष्य शांततेत, सुखात चाललेलं असतानाच अतिसाराचं निमित्त होऊन रेनर तिशीत असतानाच मरण पावली. 58 वर्षांच्या वॉटसनला याचा धक्काच बसला. यानंतर त्यानं चक्क शेती केली. दिवसेंदिवस तो स्वतःविषयी जास्तच निष्काळजी होत गेला. तो बराच लठ्ठही झाला होता. तो एकाकी बनत चालला होता. 1958 मध्ये वॉटसन मरण पावला!

आज वॉटसनची बिहेवियरिझमची तत्त्वं तंतोतंत कोणीच मानत नाहीत, पण तरीही वॉटसनच्या क्रांतिकारी विचारांनी जवळपास अर्धशतक एवढा काळ अमेरिकन मानसशास्त्रावर राज्य केलं.

No comments:

Post a Comment