Saturday, October 15, 2011

मास हिस्टेरिया

August 21, 2011

जे
वेड मजला लागले तुजलाही ते लागेल का?' या बाबूजींनी गायिलेल्या गीताप्रमाणेच जर एखाद्या गोष्टीचं वेड हळूहळू आजूबाजूच्या हजारोंना लागलं तर कसा गोंधळ उडतो, याची अनेक उदाहरणं इतिहासात घडली आहेत आणि अजूनही ती घडताहेत. कुठल्याही दंगलीत, युद्धात आणि आनंदाच्या किंवा दुःखाच्या अनेक प्रसंगी एखादी गोष्ट एकानं केल्यावर अनेक लोक वेड्यासारखं करायला लागतात, यालाच "मास हिस्टेरिया' म्हणतात.

1480 ते 1700 या काळामध्ये युरोपमध्ये एक "विचहंट' नावाचा प्रकार गाजला. त्या काळात आपल्यावर कोणीतरी चेटूक करतंय असं अनेकांना वाटे. या चेटूक करणाऱ्या बायकांनाच "चेटकीण' किंवा "विच' असं म्हणत. त्यांच्यामुळेच आपल्यावर संकटं ओढवतात, असं समजून कित्येक चेटकिणींना लोक ठार मारत असत. त्यांना पकडून एका जागी आणत आणि त्यानंतर एक जण रागारागानं त्यांच्यावर दगड मारायला सुरवात करे. त्याचं बघून दुसरा, दुसऱ्याचं बघून तिसरा असं करत शेकडो/हजारो लोक आरडाओरडा करत यात मग सामील होत. हा एक तऱ्हेचा मास हिस्टेरियाच होता. 1480 ते 1700 दरम्यान सुुमारे 40,000 ते 1 लाख चेटक्‍यांना प्राण गमवावे लागले. या प्रकाराला मग "विचहंट' म्हणायला लागले.

मध्ययुगात नन्स होणाऱ्या मुलींना कडक शिस्त, उपास, अनेक धार्मिक बंधनं अशा वातावरणात सतत राहावं लागत असल्यानं बऱ्याचदा त्यांचं मानसिक संतुलन बिघडत असे आणि मग त्या खूप चित्रविचित्र गोष्टी करत. फ्रान्समध्ये एक नन एकदा मांजरासारखी "म्याऊ' आवाज करत ओरडायला लागली आणि थोड्याच वेळात सगळ्याच नन्स मांजरासारखं तास न्‌ तास ओरडायला लागल्या. शेवटी त्या परिसरातल्या इतर रहिवाशांनी तक्रार केली. तेव्हा मग चक्क सैनिकांना तिथे पाचारण करण्यात आलं होतं! एकदा जर्मनीमधली एक नन इतर नन्सना जेव्हा चावायला लागली तेव्हा हजारो नन्स ते बघून इतरांना चावायला लागल्या. हळूहळू हा "बाइटिंग मॅनिया' झपाट्यानं हॉलंड आणि इटलीमध्येही पसरत गेला. शेवटी ही चावाचावी थांबवता थांबवता युरोपमधल्या अनेक राज्यकर्त्यांची आणि धर्मगुरूंची दमछाक झाली!

मास हिस्टेरियाचा गमतीदार प्रकार म्हणजे "डान्स मॅनिया'. इतिहासात याची बरीच उदाहरणं आहेत. 1278 मध्ये 200 लोक जर्मनीत एका पुलावरून बेधुंदपणे आणि जोरकसपणे इतके नाचत होत,क्‍किी शेवटी तो पूल कोसळून पडला! यात बरेच लोक मरण पावले. 1373-74 च्या दरम्यान या डान्स मॅनियाच्या अनेक घटना इंग्लंडमधे नोंदवल्या गेल्या. त्यानंतर जर्मनी, नेदरलॅंड्‌स, पुढे इटली, मादागास्कर आणि फ्रान्स इथे या प्रकारानं थैमानच घातलं. 1518 मध्ये जुलै महिन्यात फ्रान्समधल्या स्ट्रासबर्ग ऍलसेस इथे एका बाईनं नाचायला सुरवात केली. चार दिवसांनी तिच्यासोबत नाचणाऱ्यांची संख्या 33 झाली, तर महिन्याभरात 400 झाली! त्यातल्या बऱ्याच जणांना हार्ट अटॅक्‍स येऊन ते मेले! डान्स मॅनिया सतराव्या शतकाच्या मध्याला अचानक थांबला.

पैसा मिळवण्याच्या हव्यासानं माणसांनी केलेल्या सट्टेबाजीच्याही अनेक घटना मास हिस्टेरिया म्हणूनही गाजल्या. 1636-37 च्या काळात "ट्युलिपोमॅनिया'नं नेदरलॅंडमधे अक्षरश: धुमाकूळ घातला. याच काळात नेदरलॅंड्‌समध्ये व्यापाराच्या जोरावर श्रीमंत झालेल्या मंडळींना ट्युलिपची फुलं बाळगणं म्हणजे प्रतिष्ठेचं लक्षण वाटू लागलं. मागणीच्या मानानं ट्युलिपच्या फुलांचा पुरवठा कमी असल्यानंही त्यांच्या किमती भरमसाट वाढायला लागल्या. यातूनच ट्युलिप्स जास्त भावानं विकण्याची सट्टेबाजी सुरू झाली. या वेळी एका कंदाची किंमत 5200 फ्लॉरिन्स इतकी झाली होती. एका कंदाची किंमत एखाद्याच्या आयुष्यभराच्या कमाईपेक्षाही जास्त किंवा 30 लाख इतकी झाली होती. हे भाव वाढत वाढत गगनाला भिडले.
पण हा वेडेपणा कुठेतरी थांबणारच होता. 1637 च्या फेब्रुवारी महिन्यात तीन तारखेला हार्लेमच्या बाजारात एक दिवस अचानकपणे या कंदांसाठी ग्राहक कमी झाले. आता भाव घटतच राहणार, त्यापेक्षा आत्ताच ते कंद विकलेले बरे, असं समजून सगळ्यांनी ते विकण्यासाठी ही गर्दी केली! मागणीच्या मानानं पुरवठा वाढल्यानं ट्युलिपच्या किमती आणखीनच धडाधड कोसळायला लागल्या. कालांतरानं मग जे कंद पूर्वी 5000 फ्लॉरिन्सला विकले जात होते ते शेवटी जेमतेम 100 फ्लॉरिन्सला विकले जायला लागले! त्याचा परिणाम असंख्य व्यापाऱ्यांचं आणि ग्राहकांचंही अतोनात नुकसान झालं. शेकडो मंडळी कंगाल होऊन भिकेला लागली. ट्युलिपचा हा बबल असा फुटल्यानं नेदरलॅंड्‌समध्ये नंतर बराच काळ मंदीचं वातावरण निर्माण झालं. ट्युलिप मॅनियाप्रमाणेच साऊथ सी बबल आणि मिसिसिपी बबल हेही इतिहासात गाजले. अगदी अलीकडेसुद्धा डॉटकॉम बबल आणि हाऊसिंग बबल हासुद्धा याच वेडेपणाचा एक प्रकार होता. 1920 आणि 30 च्या दशकामध्ये इंग्लंड आणि अमेरिकेमधे ग्रेट डिप्रेशनमुळे मास हिस्टेरियाचे अनेक प्रकार घडले. यातले दोन खूपच गाजले.

याच काळात इंग्लंडमध्ये रेडिओवरून एक उपहासात्मक नाटक (सटायर) प्रक्षेपित करण्यात आलं. यामध्ये एक बेरोजगारांचा घोळका बेफाम आणि बेछूट वागायला लागला आहे, अशी बातमी दिली जातीय असं रंगवलं होतं. श्रोत्यांना ही नाटकातली नव्हे, तर खरोखरचीच बातमी सांगताहेत असं वाटावं इतकं ते नाट्य हुबेहूब रंगलं होतं. त्या काळात तरुणांमध्ये बेरोजगारी खरोखरच वाढली होती आणि असंतोषही पसरला होता. यामुळे खरोखरच लोकांमध्ये प्रचंड घबराट उडाली. हजारो/लाखो लोक रस्त्यावर आले, हजारो फोन खणखणायला लागले आणि एकाच दिवसात असंख्य पत्रं याविषयी लिहिली गेली. याच काळात अमेरिकेतही रेडिओवर एका नाटकात मंगळावरून एक भलंमोठं सैन्य पृथ्वीवर चालून आलंय आणि सध्या त्यानं न्यू जर्सीमध्ये तळ ठोकलाय, असं चित्र उभं केलं होतं. त्या काळात परग्रहावरील जीवांविषयी बरीच उलटसुलट चर्चा चालू होतीच आणि हे नाटकसुद्धा जसं काही प्रत्यक्षात घडलंच आहे, असं वाटावं इतक्‍या प्रभावशाली पद्धतीनं मांडलं होतं. हे ऐकून अन्नपदार्थ, पांघरण्यासाठी घोंगडी घेऊन आपल्या मुलांना दिसेल त्या गोष्टी गाडीत कोंबून लाखो अमेरिकन रडत, एकमेकांचं सांत्वन करत मिळेल त्या दिशेनं देवाचा धावा करत सुसाट बाहेर पडले होते. जेव्हा हे सगळं खोटं आहे हे लक्षात आलं त्या वेळी सगळ्या देशाला हायसं वाटलं, पण अनेकांना सीबीएस रेडिओचा राग येऊन त्याच्यावर अनेक खटले भरले गेले.

1962 मध्ये टांझानियामधल्या एका शाळेत एका विद्यार्थ्याच्या हसण्याची बाकीच्या विद्यार्थ्यांना लागण झाली आणि नंतर हे प्रकरण वाढत वाढत जाऊन हळूहळू सगळी शाळा आणि नंतर सगळं गावच आणि त्याच्या आसपासची अनेक गावं आणि जिल्हे, आणि खरं म्हणजे सगळा देशच कित्येक दिवस आणि आठवडे हसत सुटला. शेवटी परिस्थिती काबूत आणण्यासाठी चक्क सैन्याला बोलवावं लागलं होतं! यातल्या कित्येक मंडळींना अति हसण्यानं पोटदुखीसारखे आजार उद्‌भवल्यानं शेवटी हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यावे लागले होते.

1963 मध्ये दक्षिण कोरियामध्ये तर कहरच झाला. तिथल्या काही ग्रामीण भागामधले बहुतांशी पुरुष पादायला लागले. हे पादण्याचं प्रमाण इतकं वाढत गेलं, की दक्षिण कोरियापुढे चक्क याचं पादसंकट उभं राहिलं! कोबीच्या आणि किमची नावाच्या एका मसाल्याच्या अतिरिक्‍त सेवनामुळे ही पादण्याची लाट पसरली होती असं म्हणतात.

1974 मध्ये संपूर्ण लेनिनग्राडमध्ये एका अफवेनं खळबळ माजली होती. तिथल्या एका प्रसिद्ध बागेतल्या कारंज्यामधून व्होडकाचे फवारे उडताहेत, अशी बातमी हां हां म्हणता सगळीकडे पसरली, आणि मग ही चकट फू व्होडका पिण्यासाठी लोकांनी इतकी मोठी रांग केली, की ती रांग 115 कि.मी. झाली होती! या कारंज्यातून निघणाऱ्या पाण्यात व्होडकाच काय, पण कुठल्याच मद्याचा लवलेशही नसल्याचं जाहीर करूनही लाखो रशियन पुरुष, महिला, मुलं त्या व्होडकाच्या आशेनं बागेकडे धाव घेत होती. आणि एवढंच नव्हे, तर ती प्यायलेले लोक दारूच्या नशेत असल्यासारखंच झोकांड्या देत फिरतही होते. ही परिस्थिती इतकी नियंत्रणाबाहेर गेली, की शेवटी रशियन पोलिसांना तिथे येऊन बराच काळ हवेत गोळीबार करून लोकांना पांगवावं लागलं आणि जेव्हा ती कारंजी स्फोटकं वापरून उद्‌ध्वस्त केली तेव्हा कुठे सारं कसं शांत शांत झालं!

1976 मध्ये फ्रान्समध्ये एक कागद देशभर फिरत होता. त्या कागदावर साइट्रिक ऍसिड ज्यात आहे अशा पदार्थांनी कॅन्सर होतो अशा पदार्थांची यादी टाइप केलेली होती. हे ऍसिड तर जवळपास सगळ्या फळांमध्ये सापडत होतं. त्यामुळे फळंच कोणी खाईना. इंग्लंड, जर्मनी, आफिका इथे अनेक फळांचे ढिगारे नुसते पडून राहायला लागले. संपूर्ण युरोपभर 1970 आणि 80 च्या दशकात फळांच्या विरुद्धच्या या मास हिस्टेरियाच्या चळवळीनं खूपच धुमाकूळ घातला होता.

21 डिसेंबर 1995 या दिवशी आपल्या भारतात- दिल्लीत, "गणपती दूध पितो' या अफवेनं असंच सगळ्यांना वेडं केलं होतं. ही बातमी वाऱ्यासारखी देशभर आणि परदेशातही पसरली. अगोदरच रोजच हिस्टेरिया झाल्यासारखं वागणाऱ्या टीव्ही चॅनेल्सना तर ऊतच आला होता! या घटनेवर अनेक राजकारणी, मंत्री, अभिनेते आणि कित्येक प्रसिद्ध मंडळींनीही विश्‍वास दाखवला होता, इतकंच नाही, तर आपल्याकडल्या गणपतीनंही दूध प्यायल्याचा दावा कित्येकांनी केला होता. शेवटी "दगडी मूर्तीतल्या दगडाच्या सच्छिद्र गुणधर्मामुळे दूध शोषलं जातं, गणपती काही ते पीत नाही,' असं संशोधकांनी जाहीर केल्यावर या प्रकरणावर पडदा पडला आणि गणपतीबाप्पानं हुश्‍श केलं आणि तो मोदक खायला मोकळा झाला!
आजही अनेक धार्मिक स्थळी प्रचंड चेंगराचेंगरी आणि हल्लकल्लोळ माजल्यामुळे शेकडो, हजारो लोक मृत्यूमुखी पडतात. तोही एक मास हिस्टेरियाचाच प्रकार असतो. हिस्टेरियाचा धुवॉं पसरून कोणतं रूप धारण करू शकतो हे अमिताभच्या "दोस्ताना' या चित्रपटातल्या गाण्यावरूनही आपल्या लक्षात येईल, दिल्लगीने दी हवा, थोडासा उठा धुवॉं, और आग जल गयी...

No comments:

Post a Comment