Saturday, October 15, 2011

फ्रॉईड आणि कला

April 03, 2011

रे
नायसांससारख्या काळातला "लिओनार्डो डा विंची (1452-1519)' हा एक प्रचंड हुशार, ज्ञानी, संशोधक आणि कलाकार म्हणून गाजला. अजूनही तो जगातल्या थोर चित्रकारांपैकी एक मानला जातो. फ्लॉरेन्सजवळच्या गावात 15 एप्रिल 1452 रोजी जन्मलेल्या लिओनार्डोला आयुष्यभर "अनौरस' म्हणूनच हिणवलं गेलं. कुठल्याही उच्चभ्रू, प्रसिद्ध विद्यापीठात प्रवेश न मिळाल्यामुळे त्याला स्वतःच निरीक्षण आणि प्रयोग करून बऱ्याच गोष्टी एकलव्यासारख्या आत्मसात कराव्या लागल्या. लिओनार्डो हा समलिंगी होता असंही बोललं जातं.

लिओनार्डोचं "मोनालिसा' हे इतिहासातलं सगळ्यात गाजलेलं चित्र! आतापर्यंत त्या चित्राचे बरेच अर्थ काढले गेले आहेत. "फ्रान्सेस्को डेल गिओकोंडो' या व्यापाऱ्याच्या बायकोचं ते चित्र आहे अशी जरी सर्वसामान्यपणे समजूत असली तरी काहींच्या मते आपल्या आईचं आदर्श रूप लिओनार्डोनं त्यात रंगवलंय, तर आणखीन काहींच्या मते स्त्रीचा वेष घातलेल्या स्वतःचंच लिओनार्डोनं पोर्टेट काढलंय. काहींना तर ते अर्धं पुरुषाचं आणि अर्धं स्त्रीचं चित्र आहे असं वाटतं! ती स्त्री नक्की कोण होती, याविषयी जरी अनेक तर्क आणि वाद अजून चालू असले, तरी त्या चित्रातल्या स्त्रीच्या चेहऱ्यानं आणि त्यावरच्या तिच्या त्या अत्यंत मंद स्मितानं अनेकांची अनेक शतकं झोप उडवली, हे मात्र निश्‍चित! 2 मे 1519 रोजी लिओनार्डोचं निधन झालं.
आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत लिओनार्डोनं वेगवेगळ्या विषयांवर 5000 पानी नोट्‌स करून ठेवल्या होत्या. 1910 मध्ये फ्रॉईडनं लिओनार्डोच्या नोट्‌स आणि त्याची चित्रं तपासून लिओनार्डोचं चक्क मनोविश्‍लेषण केलं. फ्रॉईडनं लिओनार्डोच्या समलिंगित्वाचा त्याच्या आईबरोबरच्या मानसिक संबंधांशी आणि घरी कायम गैरहजर असणाऱ्या त्याच्या वडिलांशी लावला. लिओनार्डोच्या लैंगिक भावना तीव्र होत्या, पण त्या भावना पूर्ण न होऊ शकल्यामुळे त्याचंच त्याच्या कलेच्या रूपात "सब्लिमेशन' झालं, असं फ्रॉईडनं म्हणायला सुरवात केली. लिओनार्डोनं कित्येक प्रकल्प चालू केले खरे, पण ते पूर्णच केले नाहीत. याचं कारण फ्रॉईडनं लिओनार्डोच्या अपूर्ण राहिलेल्या लैंगिक इच्छांमध्ये शोधलं. लिओनार्डो त्याच्या चित्रात व्हर्जिन मेरी आणि सेंट ऍन अशा दोन स्त्रिया दाखवे. लिओनार्डोला प्रत्यक्ष जन्म देणारी आई आणि त्याचा सांभाळ करणारी दाई या दोघींचं ते प्रतीक होतं, असं फ्रॉईड माने.
फ्रॉईडनं लिओनार्डोचं मनोविश्‍लेषण करण्यासाठी तीन तऱ्हेची माहिती वापरली होती. लिओनार्डोच्या लहानपणीच्या आठवणींमध्ये सतत येणारं गिधाड, लिओनार्डोची चित्रं आणि त्या चित्रांची रचना आणि लिओनार्डोच्या लिखाणातल्या चुका (स्लिप्स) या सगळ्यांचा अभ्यास करून लिओनार्डोचं "न्यूरॉटिक ऑब्सेशनल' व्यक्तिमत्त्व होतं, असाच फ्रॉईडनं निष्कर्ष काढला. या निष्कर्षांवर कडाडून टीका झाली. इटालियन शब्द "निब्बिओ' याचा खरा अर्थ गिधाड नसून, दुसराच पक्षी (काईट) आहे. पण फ्रॉईडनं चुकीच्या भाषांतरामुळे त्याचा अर्थ "गिधाड' असा घेतला आणि त्यामुळे त्याचे निष्कर्षही चुकले, असं अनेकांचं म्हणणं होतं.

भाषांतरात झालेली चूक लक्षात आल्यावर फ्रॉईडला खूप वाईट वाटलं, याचं कारण आपल्या लिखाणामधलं लिओनार्डोवरचं लिखाण हे खूपच उच्च दर्जाचं असल्याचं तो कायम माने! फ्रॉईडच्या अनुयायांनी मग ही चूक सुधारण्याचा प्रयत्न केला. पण एवढं असलं तरी लिओनार्डो जिवंत नसताना केवळ त्याच्या काही नोट्‌स, चित्रं आणि स्वप्नं यांच्या जोरावर त्याचं मनोविश्‍लेषण करणं हा काही खेळ नव्हता. फ्रॉईडनं ते केलं आणि "लिओनार्डो डा विंची- अ स्टडी इन सायकोसेक्‍श्युऍलिटी' या नावाचं एक पुस्तकही लिहिलं!

एखाद्या कुमारिकेचे कपडे एका बाजूनं बघितले की ते किंचितसे गिधाडासारखे दिसतात. यामुळे गिधाडांचे विचार मनात येणं किंवा त्यांचं स्वप्न पडणं याचा संबंध फ्रॉईडनं "पॅसिव्ह समलिंगी' असा केला होता. लिओनार्डोला अत्यंत लहानपणी पाळण्यात असताना आपलं तोंड एक गिधाड आपल्या शेपटीनं उघडतंय असे वारंवार आभास होत. लिओनार्डोनं हे त्याच्या "कोडेक अटलांटिकस'मध्ये लिहून ठेवलं होतं. याचा अर्थ लिओनार्डोच्या आईचं स्तनाग्र लिओनार्डोनं लहानपणी चोखण्याशी फ्रॉईडनं लावला. इजिप्शियन पुराणकथांप्रमाणे आणि लोककथांप्रमाणे गिधाडामध्ये नर नसतोच. गिधाडाची मादी वाऱ्यापासून गर्भवती राहते, अशी समजूत होती. फ्रॉईडनं ही कथाही त्याच्या विश्‍लेषणात वापरली होती, असं काहींचं म्हणणं आहे.

फ्रेंच कवी आंद्रे ब्रेटन याच्या लिखाणापासून "सररिऍलिझम'ची चळवळ सुरू झाली असं समजलं जातं. ब्रेटन फ्रॉईडला व्हिएन्नामध्ये 1921 मध्ये भेटला होता. "फ्री असोसिएशन' ही फ्रॉईडनं काढलेली मानसोपचारातली एक पद्धत होती. या पद्धतीत रुग्ण एका कोचावर बसत असे. फ्रॉईड मग त्यानंतर त्यांना सर्व काही मनमोकळेपणानं बोलू देई. यामुळे स्वतःच स्वतःचा घातलेला बुरखा फाडून रुग्ण आपल्या सुप्त भावना, इच्छा, वासना, आठवणी आणि स्वप्नं या सगळ्या मुक्तपणे बाहेर काढू शके. यामुळे त्यांचा निचरा (कॅथार्सिस) होऊन रुग्णालाही थोडंसं बरं वाटे आणि फ्रॉईडलाही त्या रुग्णाच्या अंतर्मनात शिरून त्याचं विश्‍लेषण करायला या सगळ्या गोष्टींची मदत होई. या फ्री असोसिएशनचा आणि स्वप्नांचा बाह्य जगापेक्षा किंवा बाह्य मनापेक्षा अंतर्मनाशी आणि त्यातल्या कोलाहलाशी संबंध असल्यामुळे सररिऍलिझमच्या तत्त्वज्ञानावर या फ्री असोसिएशनचा आणि स्वप्नांचा परिणाम झाला. या सगळ्यांचा ब्रेटनवर परिणाम झाला. अनेक चित्रकार जेव्हा ब्रेटनला भेटायचे तेव्हा फ्रॉईडचा प्रभाव मग ब्रेटनच्या मार्फत त्या कलाकारांवरही पडायला लागला.
कित्येक सररिऍलिस्टिक चित्रांमध्ये प्रत्यक्ष आपल्याला वस्तू जशा दिसतात तशा काढतच नाहीत. "स्टिल लाइफ' या प्रकारात त्या आहेत तशा दाखवण्याची पद्धत आहे. पण "सररिऍलिझम'मध्ये त्या वस्तू स्वप्नांमध्ये कशा दिसतात, यावर ते चित्र अवलंबून असतं आणि म्हणूनच फ्रॉईडचा "सररिऍलिझम'वर खूपच मोठा प्रभाव पडला. सॅल्वेदॉर दाली, फेलिक्‍स लाबीझ, जीऑर्जिओ डी चिरिओ आणि पॉल डेलावॉक्‍स या चित्रकारांनी फ्रॉईडचा अभ्यास केला होता. 1937 मध्ये सॅल्व्हेदॉर दालीनं "दी मेटॅमॉफॉसिस ऑफ नार्सिसस' हे चित्र काढलं. फ्रॉईडनं दालीचं आणि या चित्राचं खूप कौतुक केलं. फ्रॉईड आणि दाली यांच्या भेटीबद्दल मात्र खूपच गूढ आणि वाद आहेत.

फेलिक्‍सनं 1950 मध्ये "दी स्ट्रेंज लेडा' नावाचं चित्र काढलं. या पुराणकथेचा फ्रॉईडनं जो अर्थ लावला होता त्यावर हे चित्र आधारलेलं होतं. जॉर्जिओ डी चिरिओसारख्या सररिऍलिस्ट कलाकारांनी पुराणकथा आणि फ्रॉईडची स्वप्नांची आणि लैंगिक चिन्हांची (सेक्‍श्युअल सिम्बॉल्स) थिअरी यांचं मिश्रण करायला सुरवात केली. 1940 मध्ये त्यानं "किलिंग द ड्रॅगन' या शीर्षकाचं चित्र काढलं. पॉल डेलावॉक्‍सला स्वप्नांचे अर्थ लावणं आणि फ्री असोसिएशन या दोन्हींमध्ये रस होता. 1944 मध्ये त्यानं "व्हीनस स्लीपिंग' या चित्रात नग्न व्हीनस फ्री असोसिएशनमध्ये फ्रॉईडला अभिप्रेत असल्याप्रमाणे पारंपरिक दिवाणावर टेकून आडवी झालेली दाखवलीय. चित्राच्या उजवीकडे आणखी एक नग्न स्त्री एका व्हिक्‍टोरियन स्त्रीचं स्वागत करतेय आणि ती व्हिक्‍टोरियन स्त्री मात्र एका सापळ्याशी संभाषण करतेय, असं दाखवलंय. फ्रॉईडच्या आणि आपल्या सगळ्यांच्या नशिबानं हे सगळं बघायला आणि त्यावर टीकाटिप्पणी करायला फ्रॉईड जिवंत नव्हता. प्रसिद्ध क्‍युबिस्ट चित्रकार पिकासो याच्या "ला डिमॉयसेलेस द ऍव्हिग्नॉन', "गुर्निका' या चित्रांवर, तसंच अमेरिकन चित्रकार जॅक्‍सन पोकॉक याच्या चित्रांवर फ्रॉईडचा प्रभाव दिसून येतो. विशेषतः चित्रांत स्त्रियांचं चित्रण आता वेगळ्या तऱ्हेनं व्हायला लागलं.

फ्रॉईडच्या प्रभावामुळे अनेक लेखक आपल्या लिखाणात अंतर्मनाचा शोध घेऊ लागले. डी. एच. लॉरेन्सच्या "सन्स अँड लव्हर्स' या कादंबरीवरही फ्रॉईडच्या विचारांचा प्रभाव दिसतो. मिसेस मॉरेल ही एक बाई आणि तिची तीन मुलं यांच्यातल्या संबंधांवर ही कादंबरी आधारित होती. तिचे विल्यम या तिच्या मोठ्या मुलाबरोबर खूपच प्रेमाचे संबंध असतात, पण त्याचा मृत्यू होतो. यानंतर पॉल या सर्वांत लहान मुलाबरोबर तिचे खूपच घनिष्ठ संबंध निर्माण होतात. पॉल तिचं तिच्या नवऱ्यापासून म्हणजे स्वतःच्या वडिलांपासून संरक्षण करतो, यामुळे त्यांचे संबंध आणखीनच घट्ट होतात. पॉलचे वडील मॉरेल कोळशाच्या खाणीत काम करत असतात. त्यांचं वाईट आणि क्रूर वागणं, दारू पिणं या सगळ्यांमुळे त्यांच्यात आणि पॉल आणि पॉलची आई यांच्यात खूपच दुरावा निर्माण झालेला असतो. मॉरेल आपल्या बायकोला खूप बदडून काढत असतो. पॉलला ते बघवत नसतं. लॉरेन्सला फ्रॉईडची "इडिपस कॉम्प्लेक्‍स'ची थिअरी माहीत होती. याप्रमाणे मुलाला आईबद्दल लैंगिक आकर्षण असतं; त्यामुळे तो वडिलांना आपला शत्रू मानून त्यांचा तिरस्कार करायला लागतो. हे सगळं आपल्याला वेगळ्या स्वरूपात "सन्स अँड लव्हर्स'मध्ये दिसतं. पॉलचं त्याच्या आईवरचं प्रेम हे फक्त साधं प्रेम नसतं. त्यात चक्क लैंगिक आकर्षणाचाही भाग असतो, हेही लॉरेन्सनं सूचित केलं होतं. फ्रॉईडच्या "इरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स' या पुस्तकानंतर काही काळातच "सन्स अँड लव्हर्स' ही लॉरेन्सची कादंबरी प्रकाशित झाली होती.

व्हर्जिनिया वोल्फच्या "टु दी लाइटहाऊस' या कादंबरीवरही फ्रॉईडच्या कल्पनांचा परिणाम झाला. "कॉन्शसनेस'च्या कल्पनेचा वापर विल्यम जेम्सनं त्याच्या "स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेस'मध्ये केला होताच. व्हर्जिनिया वोल्फच्या या कादंबरीवरही या कॉन्शसनेसचा, फ्री असोसिएशनचा प्रभाव होताच. थॉमस मॅननंही त्याची "डेथ इन व्हेनिस' ही कादंबरी फ्रॉईडच्या विचारांच्या प्रभावाखालीच लिहिली. डी. एच. लॉरेन्सप्रमाणेच प्राऊस्ट, जॉईस आणि काफ्का यांच्या लिखाणामागच्या प्रेरणांमागे फ्रॉईड कुठेतरी होताच. डोस्टोव्हस्कीच्या कादंबऱ्यांतही वडिलांविषयीचा द्वेष आणि कित्येकदा खून आपल्याला सापडतो. त्यातही फ्रॉईडची "इडिपस कॉम्प्लेक्‍स'ची थिअरी डोकावते. 1913 मध्ये फ्रॉईडनं "टोटेम अँड टाबू' या त्याच्या पुस्तकात पितृहत्येविषयी लिहिलं होतं. एकंदरीत, फ्रॉईडचा आधुनिक चित्रकलेवर, साहित्यावर आणि सर्वच कलाप्रकारांवर प्रचंड प्रभाव पडला हे मात्र खरं!

No comments:

Post a Comment