Saturday, October 15, 2011

'मनात'ला अर्धविराम...

September 25, 2011

मग माणूस काम का करतो? त्याच्यामागच्या प्रेरणा कुठल्या? आज आपल्याला सांगितलं जातं तसं तो फक्त पैशाकरिता काम करतो का? कोट्यवधी माणसं आपल्या मुलांना जन्म देतात आणि वाढवतात ते पैशाकरिता का? सीमारेषेवरचे हजारो-लाखो सैनिक जेव्हा लढता लढता प्राण गमावतात तो पैशांसाठी का? किंवा जीव तळहातावर घेऊन जगाची सफर करणारी, नवनवे प्रदेश शोधणारी साहसी माणसं किंवा अंतराळवीर किंवा निसर्गाचं आणि माणसाचं गूढ उकलण्यासाठी रात्रंदिवस संशोधन करणारे वैज्ञानिक हे काय फक्त पैशाकरिता काम करत असतात का? नवनिर्मितीचा आनंद आणि पाठीवर कौतुकाची थाप ही मिळणाऱ्या पैशांपेक्षा जास्त महत्त्वाची असेल तर पूर्ण समाज सहकारावर का उभा राहू शकणार नाही?

'मनात' या मालिकेचा हा शेवटचा लेख! ही मालिका लिहिताना खूपच मजा आली. एक तर मानसशास्त्र हा विषय खूप वेगळा होता आणि त्यामुळे त्यातले वेगवेगळे सिद्धान्त आणि कल्पना सोप्या भाषेत सर्वांना समजतील अशा तऱ्हेनं पण अचूकपणे लिहिण्याची गरज होती. या भानगडीत वाचनही भरमसाट झालं आणि शिकायलाही भरपूर मिळालं. कॉलेजच्या दिवसांपासूनच मानसशास्त्राविषयी खूप कुतूहल वाटत होतंच. मुख्य म्हणजे माणूस मुळातच स्वार्थी असतो का? मानवी समाज हा स्वार्थावर आणि स्पर्धेवर (कॉम्पिटिशन) उभा आहे का, सहकारावर (कोऑपरेशन) उभा आहे? सहकाराची भावना ही कृ त्रिम आहे; स्वार्थ हाच माणसाचा मूळ स्वभाव आहे आणि प्रत्येकानं स्वार्थानं वागलं तर सगळ्या समाजाचं भलं होईल, अशी थिअरी ऍडम स्मिथच्या काळापासून आजपर्यंत आणि विशेषतः मुक्त अर्थव् यवस्थेमध्ये रोज हजारो वेळा वेगवेगळ्या तऱ्हेनं आपल्या मनावर ठसवली जात होती; पण हे कितपत खरं आहे हे शोधण्यासाठी माणसाच्या मनात आणि त्याच्या इतिहासात डोकावण्याची गरज होती. मानवी इतिहासात बघितलं तर माणसा-माणसात स्पर्धा आणि भांडणं होतीच, पण नैसर्गिक आपत्ती आणि वन्य पशू यांना तोंड देण्यासाठी- थोडक्‍यात, केवळ जिवंत राहण्यासाठी- सहकाराशिवाय पर्याय नाही, असं समजल्यामुळे माणसाची हजारो वर्षं खरं तर सहकारातच गेली. आजसुद्धा स्वार्थाचं आणि स्पर्धेचं तोंड फाटेपर्यंत गुणगान करताना आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना मात्र सहकार म्हणजेच टीमवर्क हे शिकवण्याकरता हजारो मॅनेजमेंटचे महागडे सेमिनार घेतले जातात. मग सहकारावरच उभा असलेला समाज निर्माण होणं का शक्‍य नाही, असे प्रश्‍न डोक्‍यात यायला लागले आणि मग माणूस काम का करतो? त्याच्यामागच्या प्रेरणा कुठल्या? आज आपल्याला सांगितलं जातं तसं तो फक्त पैशाकरता काम करतो का? कोट्यवधी माणसं आपल्या मुलांना जन्म देतात आणि वाढवतात ते पैशाकरता का? सीमारेषेवरचे हजारो-लाखो सैनिक जेव्हा लढता लढता प्राण गमावतात तो पैशांसाठी का? किंवा जीव तळहातावर घेऊन जगाची सफर करणारी, नवनवे प्रदेश शोधणारी साहसी माणसं किंवा अंतराळवीर किंवा निसर्गाचं आणि माणसाचं गूढ उकलण्यासाठी रात्रंदिवस संशोधन करणारे वैज्ञानिक हे काय फक्त पैशाकरता काम करत असतात का? नवनिर्मितीचा आनंद आणि पाठीवर कौतुकाची थाप ही मिळणाऱ्या पैशां पेक्षा जास्त महत्त्वाची असेल तर पूर्ण समाज सहकारावर का उभा राहू शकणार नाही? एवढंच काय, पण आनंद म्हणजे काय? सुख म्हणजे काय? दुःख म्हणजे काय? या भावना प्राण्यांत असतात का? म ाणसांत त्या कशा निर्माण झाल्या? तसंच मनाच्या या सगळ्या व्यापारात, आपल्या भावनांमध्ये, बुद्धीमध्ये आणि मनोविकारांमध्ये आनुवंशिकतेचा (नेचर) प्रभाव किती असतो आणि बाह्य परिस्थिती आणि स ंगोपन (नर्चर) यांचा प्रभाव किती असतो, याविषयीचे विचार मनात घोळायला सुरवात झाली.

याच वेळी एव्हॅल्युशनरी सायकॉलॉजीवरची बरीच पुस्तकं वाचायला मिळाली. त्यातल्या कल्पना तर भन्नाटच होत्या. त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्या सगळ्या भावना या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत तयार झालेल्या आहेत, किंबहुना उत्क्रांतीच्या प्रक्रियेत माणसाचेही जे अनेक प्रकार निर्माण झाले, त्यापैकी ज्या प्रकारांमध्ये अशा तऱ्हेच्या भावना निर्माण झाल्या तेच मानवी जीव तगून राहिले आणि ज्यांच्यात त्या निर्माण झाल्या नाहीत ते मानवी जीव नॅचरल सिलेक्‍शनच्या प्रक्रियेमध्ये नष्ट झाले. उदाहरणार्थ - जर आपल्याला भीती वाटलीच नसती तर आपण सरळ आगीत चालत गेलो असतो किंवा दरीत उडी मारली असती किंवा सिंहाच्या पुढ्यात जाऊन बसलो असतो आणि नष्ट झालो असतो. असंच इतर भावनांचं.

याच सुमाराला भावना आणि मनोविकार यांचा मेंदूतल्या प्रक्रियांबरोबरचा संबंध यांच्याविषयी बरंच वाचनात आलं. त्यामध्ये सुझन ग्रीनफील्ड, जॉन मॅक्रॉन, व्ही. एस. रामचंद्रन, रॉबर्ट विन्स्टन, रिचर्ड रेस् टक, स्टीव्हन पिंकर, ऑलिव्हर सॅक्‍स अशा अनेक मोठमोठ्या लेखकांची आणि संशोधकांची प्रत्येकी दोन-तीन पुस्तकं हातात पडली. आपला मेंदू 10,000 कोटी न्यूरॉन्सनं बनलेला आहे. हे न्यूरॉन्स एकमेकांना जोडून त्यांचं एक जाळं बनलेलं आहे. मेंदूत निर्माण होणारा कुठलाही संदेश हा विद्युतरासायनिक प्रक्रियेनं एका न्यूरॉनपासून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे असं करत करत अनेक न्यूरॉन्स मध्ये पसरतो. तो मेंदूतल्या ज्या भागात पसरतो तो भाग किंवा त्यातले न्यूरॉन्स हे "फायर' झाले आहेत, असं आपण म्हणतो. आपल्या वेगवेगळ्या भावनांमुळे मेंदूतल्या वेगवेगळ्या भागातले न्यूरॉन्स फायर होतात, तसेच मेंदूतल्या रसायनांच्या कमी-जास्त होण्यामुळे अनेक मनोविकार उद्‌भवतात. आज एमआरआय, पीईटी, ईईजी अशांसारख्या तंत्रांचा वापर करून मेंदूचे सखोल स्कॅन्स घेऊन मेंदूच्या कुठल् या भागात काय चाललंय, हे हळूहळू कळायला लागलं आहे. थोडक्‍यात, आपल्या डोक्‍यात आलेला कुठलाही विचार किंवा भावना किंवा आपल्याला झालेला कुठलाही मनोविकार याचा मेंदूच्या स्कॅनशी संब ंध लावणं थोडंफार शक्‍य होतंय. उद्या जर हे तंत्र खूपच प्रगत झालं तर केवळ या स्कॅन्सकडे पाहून त्या माणसाच्या मनातल्या भावना, एवढंच काय, पण डोक्‍यातले विचारसुद्धा कळू शकतील की काय, अशी एक कल्पना पुढे यायला लागली. एकदा तर मानसशास्त्राची जागा हळूहळू मेंदूविज्ञानच घेईल आणि सगळ्यात शेवटी कित्येक वर्षांनी फक्त मेंदूविज्ञानच उरेल, असं वाटायला लागलं होतं. कुठलाही म नोरुग्ण आला, की त्याच्या मेंदूचे स्कॅन्स काढून त्याचा मनोविकार ओळखायचा आणि मग तो बरा करण्यास
ाठी त्याला फक्त गोळ्या देऊन त्याच्या मेंदूतली रसायनं बदलायची, की काम झालं, असं चित्र उद्या निर्माण होईल, असं वाटायला लागलं होतं. मग माणसाचं मन कसं चालतं? त्यातल्या भावना का आणि कशा निर्माण होतात, याचा अभ्यास करण्याची, म्हणजेच थोडक्‍यात, मानसशास्त्राची तरी गरजच काय, असंही वाटायला लागलं होतं.

पण नंतर यातला फोलपणा लक्षात यायला लागला. एखाद्या माणसाच्या मेंदूचा स्कॅन घेऊन तो चिंताग्रस्त आहे हे एकवेळ कळू शकेल; पण त्याला ती चिंता घटस्फोट झाल्यामुळे वाटते आहे, का बेरोजगारीमुळे वाटते आहे, का त्याच्या मुलाच्या आजारामुळे वाटते आहे, हे त्या मेंदूच्या स्कॅनवरून कळण्याची आज तरी सोय नाही आणि उद्याही ती सहजासहजी असेल असं वाटत नाही. म्हणजे थोडक्‍ यात, आपल्या मनात ज्या भावना निर्माण होतात त्यांचा सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितीशी असलेला संबंध तपासून बघण्याची गरज होतीच आणि इथे मेंदूविज्ञान थिटंच पडत होतं. मानसशास्त्राच्या अ भ्यासाची गरज थोडक्‍यात अबाधितच होती.

हे सगळं कळल्यानंतर आणि या मानसिक द्वंद्वानंतर मग मानसशास्त्राचा अभ्यास करायचं ठरवलं. मानसशास्त्राचा अभ्यास करताना ग्रीकांनी अतिप्राचीन काळापासून घेतलेला मेंदू अभ्यासाचा शोध जाणून घेता आला. मनोविकार झालेल्या रुग्णांसाठीची खास रुग्णालयं आणि मनोरुग्णांवर होत असलेल्या अघोरी प्रकारांनी अंगावर अक्षरशः काटा आला. भारतीय संस्कृतीत वेदांपासून ते अनेक संतांनी मनाचा वेध घेण् याचा प्रयत्न केला होता, तर पाश्‍चिमात्य संस्कृतीत फ्रॉईड हा मानसशास्त्रज्ञ युगप्रवर्तक ठरला. त्यानं मनुष्याला पडलेल्या स्वप्नांचे अर्थ शोधून मनाच्या तळापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. मानसशास्त्रातलं स ंशोधन आणि त्यातले चित्रविचित्र प्रयोग चित्तथरारक होते. या प्रवासात मेस्मर, शार्को, फ्रॉईड, युंग, पॅव्हलॉव्ह, वुण्ड, थॉर्नडाईक, वॉटसन, स्किनर, टोलमन, हल, एरिकसन, एलिस, पिअँजे यांच्यासारखे विलक्षण मानसशास्त्रज्ञ भेटले. त्यांची रंजक चरित्रं आणि त्यांचं कार्य तपासून बघता आलं. मानसशास्त्र उलगडताना जेस्टॉल्ट सायकॉलॉजी, पर्सनॅलिटी सायकॉलॉजी, बिहेवियरल सायकॉलॉजी, कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी, सोशल सायकॉलॉजी, डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी अशा मानसशास्त्राच्या विविध शाखा आणि त्यातल्या वेगवेगळ्या थेरपीजचा अभ्यास करता आला. ही चरित्रं, या थिअरीज आणि सिस्टीम एकत्र करून सुसूत्रपणे आदिमानवापासून आतापर्यंतचा मानसशास्त्राचा इतिहास रंगवावा, त्याच वेळी त्यातली तत्त्वंही सांगावीत आणि ती मांडणारी माणसं, त्यांच्यातले वाद, त्यांच्यातल्या मारामाऱ्या, त्यांच्या आयुष्यातली वादळं, त्यांना मिळणारी योग्य-अयोग्य नोबेल पारितोषिकं यांच्याही रंजक कहाण्या या सगळ्यांसकट सोप्या भाषेत उभ्या कराव्या, असं वाटलं. यासाठी मग मी पुस्तकच लिहायला घेतलं आणि त्याची 500-550 पानं लिहूनही तयार झाली. तेवढ्
यात "सप्तरंग'बरोबर या मालिकेबद्दल बोलणं चालू झालं आणि मग "सप्तरंग'चं नवीन आकर्षक स्वरूप बघून मीही त्याला मान्यता दिली आणि ही मालिका चालू झाली.

आता मात्र मी ही मालिका संपवतोय. आणि याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे वाढलेला कामाचा आणि प्रवासाचा व्याप, दुसरं म्हणजे मानसशास्त्राचं सविस्तर, मोठं पुस्तक जास्त लवकर प्रकाशित होण् याची गरज आणि इच्छा! अर्थातच दर महिना-दोन महिन्यांनी एकदा तरी वेगवेगळ्या विषयांवर "सप्तरंग'मध्ये लेख लिहिण्याच्या अटीवर "सप्तरंग'नंसुद्धा माझं हे म्हणणं मोठ्या मनानं स्वीकारलं. या प्रक्रियेमध्ये अक्षरशः शेकडो वाचकांचे ई-मेल, फोन आणि एसएमएस आले. काही तर प्रत्यक्ष येऊन भेटले. त्या सगळ्यामुळे मला खूपच प्रोत्साहन मिळालं आणि लोकांमध्ये एकूणच या विषयाविषयी किती प्रचंड उत् सुकता आहे, याची मला जाणीव झाली आणि नवीनच हुरूप चढला.

मनोविकारांविषयी लिहायचं म्हणून मी चक्क "ऍबनॉर्मल सायकॉलॉजी' या विषयाची 600-700 पानी मोठ्या आकाराची पाच-सहा पुस्तकं आणून वाचायला सुरवात केली, तेव्हा एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे अलीकडे मनोविकारांचं प्रमाण खूपच वाढतंय. समाजात असलेली प्रचंड स्पर्धा, विभक्त कुटुंबपद्धती, आई-वडील आणि मुलगा किंवा नवरा आणि बायको यांना एकत्र राहणं किंवा एकत्र वेळ काढणं हे कठीण होऊन बसणं, रात्री दहा-अकरा वाजेपर्यंत तणावपूर्ण कामाचं स्वरूप, कामाचा खालावलेला दर्जा, नोकरीतलं अस्थैर्य, वाढणारी बेरोजगारी, सतत होणारं स्थलांतर, टोकाचा युक्तिवाद, ज्ञान, सुसंस्कृतपणा, माणुसकी आणि समता, बंधुत्व यांच्याऐवजी पैसा, स्वार्थ, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा या मूल्यांमध्ये लडबडलेला समाज, त्याच ध्येयानं अहोरात्र परिश्रम करणारी पण त्यातल्या काहींनाच ते साध्य झाल्यामुळे इतर लाखो-कोट्यवधींना नैराश्‍यात ढकलणारी ही समाजव्यवस्था, मैत्री आणि नाती पैशांच्या तराजूमध्ये क्षणभंगुर ठरल्यामुळे येणारा गर्दीतलाही एकाकीपणा या सगळ्यामुळे मनोविकारांचं प्रमाण हे गेल्या 20-30 वर्षांत प्रचंड वाढलं. "वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन'च्या अहवालाप्रमाणे काहीच वर्षांत साधारण 24 टक्के माणसं या ना त्या लहान-मोठ्या मनोविकारांनी त्रस्त असतील असं भाकीत आहे आणि हे औषधांच्या बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या पथ्यावरच पडणार आहे. कारण त्यांची नैराश्‍य आणि इतर मनोविकारांवरची औषधं भरमसाट खपणार आहेत. हे विकार जास्त तीव्र करणाऱ्या समाजव्यवस् थेवर टीका करून त्यात सुधारणा करण्याऐवजी उलट मनोरुग्णांवर औषधांचा मारा करत राहणं, हे या बहुराष्ट्रीय कंपन्यांना फावणारच आहे. या सगळ्यांविरुद्ध एक चळवळ निर्माण करून एक सुसंस्कृत, सम ाधानी, सुसंवादी समाज निर्माण करण्याची आज गरज आहे, हे मात्र खरं! बाय बाय!

स्मृती आणि विस्मरण

September 18, 2011

स्मृती आणि विस्मरणाबाबत बरंच संशोधन झालंय. स्मृतीचा विचार मानसशास्त्रीय आणि शरीरशास्त्रीय अशा दोन्ही पद्धतींनी झालाय. जेव्हा कुठलीही नवीन माहिती मेंदूकडे येते तेव्हा ती स्मृतीच्या वेगवेगळ् या तुकड्यांना विशिष्ट तऱ्हेने जोडली जाते. संगणकाच्या डाटाबेसपेक्षा अनेक पटीनं हे गुंतागुंतीचं असतं. या परिस्थितीचा वेध या वेळी...


कदा सत्तरीच्या घरातल्या एका जोडप्यानं एक पार्टी आयोजित केलेली असते. पार्टी झकास चाललेली असते. दर 10 मिनिटांनी त्या जोडप्यातला पुरुष आपल्या बायकोला "डार्लिंग, हनी, माय डिअर' अशा छान छान नावांनी पुकारायचा. दोनएक तास ते ऐकल्यावर त्याचा मित्र त्याच्याजवळ जाऊन म्हणाला, ""तुमच्या लग्नाला इतकी वर्षं झाली, पण अजून तू तिला अशा काही हाका मारतो आहेस, की जणू कालच तुमचं लग्न झालंय! किती प्रेम आहे तुमच्यात!'' त्यावर तो म्हातारा त्या मित्राच्या कानात म्हणतो, ""अरे, दहा वर्षांपूर्वीच मी तिचं खरं नाव विसरलोय!''

स्मरणशक्तीचे किंवा विसराळूपणाविषयीचे अनेक किस्से आपण ऐकत असतो. हर्मन एबिंगहॉस या जर्मन मानसशास्त्रज्ञानं विसाव्या शतकाच्या सुरवातीला स्मृतीवर प्रथमच संशोधन केलं. स्मृतीच्या प्रक्रियेत तीन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे माहिती मिळवणं (ऍक्विझिशन), ती साठवणं (स्टोअरेज) आणि ती पुन्हा बाहेर आणणं (रीट्रिव्हल). या तीन गोष्टींपैकी एका गोष्टीत जरी गडबड झाली तरीही आपल्या स्मृ तीत गोंधळ उडू शकतो, असं त्यानं म्हटलं. उदाहरणार्थ आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे त्या वेळी आठवत नाही, पण काही वेळानं ती आपल्याला आपोआपच आठवते किंवा त्या गोष्टीचं पहिलं अक्षर आठवलं तर मग ती आठवते. याचा अर्थ ती आपल्या स्मृतीतून नष्टच झालेली असते असा नाही.

स्मृतीचा विचार मानसशास्त्रीय आणि शरीरशास्त्रीय अशा दोन्ही पद्धतींनी झालाय. मानसशास्त्रीय पद्धतीप्रमाणे आपली स्मृती एखाद्या पेटीप्रमाणे असते असं काहींनी मांडलंय. एखाद्या टोपलीत जशा आपण वस्तू जमा करत जातो, तशा गोष्टींच्या, घटनांच्या आठवणी आणि कल्पना आपण डोक्‍यात/ मनात साठवत जातो. शरीरशास्त्राच्या दृष्टीनं विचार करता जेव्हा आपल्यासमोर काही माहिती, दृश्‍यं किंवा विचार येतात तेव्हा आपल्या मेंदूतले विशिष्ट न्यूरॉन्स क्रियाशील होतात. या सगळ्या न्यूरॉन्सना जोडणारा एक मेमरी ट्रेस किंवा स्मृतीतला ठसा तयार होतो. तीच गोष्ट पुन्हा पुन्हा समोर आली, वाचली किंवा आठवली तर हे ठसे गडद किंवा पक्के होत जातात आणि मग त्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात.

1960, 1970 आणि 1980 च्या दशकात कॉग्निटिव्ह सायकॉलॉजिस्टांनी स्मृतीविषयी अनेक प्रयोग केले आणि यानंतर त्यांनी आपल्या स्मृतीच्या क्षणिक स्मृती, (संवेदनिक नोंद किंवा सेन्सरी रजिस्टर्स किंवा बफर्स), लघुकालिक स्मृती (शॉर्ट टर्म मेमरी) आणि दीर्घकालिक स्मृती (लॉंग टर्म मेमरी) अशा तीन पातळ्या असतात असं मांडलं. संवेदनिक स्मृती किंवा सेन्सरी रजिस्टर्स किंवा बफर्स यांचं अ िस्तत्व तपासून बघण्यासाठी जॉर्ज स्परलिंग यानं प्रयोग केले. आपण जेव्हा एखादं दृश्‍य बघतो तेव्हा त्या दृश्‍याची प्रतिमा आपल्या बफरमध्ये पाव ते अर्धा सेकंद राहते हे त्याला आढळलं; पण ऐकलेला आवाज मात्र या बफरमध्ये जास्त वेळ म्हणजे 2 ते 4 सेकंदांएवढा टिकतो, असं डार्विन आणि त्याचे सहकारी यांनी दाखवून दिलं. 1992 मध्ये डी लो लो यानं केलेल्या प्रयोगावरून दृश्‍य स्मृती ही ज्ञानें द्रियात साठवली जात नसून, मध्यवर्ती मज्जासंस्थेत (सेंट्रल नर्व्हस सिस्टीम - सीएनएस) साठवली जात असावी, असं दिसून आलंय. ती एवढी लहान असल्यामुळे आपण जेव्हा काही बघत, ऐकत असतो तेव्हा फक्त खूप महत्त्वाचं, गरजेचंच टिपतो. यामुळेच आदिमानव जंगलातल्या आपल्या वास्तव्यात टिकून राहू शकला. अनावश्‍यक गोष्टीही जर आपण लक्षात ठेवू शकत असतो, तर निर्णय घेताना आपला गोंधळ होऊन काय करायचं, याचा निर्णय होईपर्यंत वन्य प्राण्यानं आपल्याला खाऊन टाकलं असतं, असं उत्क्रांतिवादी मानसशास्त्रज्ञ म्हणतात. अल्पकालिक स्मृती ही सर्वसाधारणपणे 1 ते 2 मिनिटंच टिकते. यासाठी पीटरसन दांपत्यानं एक प्रयोग केला. त्या प्रयोगात फक्त 18 सेकंदांनंतर 90 टक्के अल्पकालिक स्मृती नष्ट होऊन फक्त 10 टक्के उरली होती, हे त्यांच्या लक्षात आलं. कॉग्निटिव्ह क्रांती होण्यापूर्वी 1955 मध्ये जॉर्ज मिलरनं "स्मृती'वर भाषण दिलं. त्यात आपण सात गोष्टी सहजरीत्या चटकन लक्षात ठेवू शकतो, अशी ही थिअरी होती. ती वुंडनं प्रथम मांडली होती. उदाहरणार्थ 7 अंक असलेला एखादा 4354672 असा आकडा असेल तर तो चटकन लक्षात राहू शकतो. एकदा बघून आपण तो दुसरीकडे पुन्हा न बघता लिहू शकतो; पण त्यापेक्षा खूप जास्त अंक असतील तर तो आकडा लक्षात ठेवणं अवघड जातं, अशी ही थिअरी होती. या अल्पकालिक स्मृतीचेही दोन भाग असतात. एक म्हणजे व्हर्बल. यात आकडे, अक्षरं, शब्द वगैरे गोष्टी मोडतात. दुसरा भाग म्हणजे कॉन्से प्चुअल. यात वेगवेगळ्या संकल्पना येतात. रामरक्षेसारख्या उजळणी केलेल्या कित्येक गोष्टी अल्पकालिक स्मृतीतून दीर्घकालिक स्मृतीमध्ये जात असतात. वेगवेगळे आकडे, अक्षरं, वाक्‍यं, संकल्पना, सिद्धान्त, चेहरे, वास, स्पर्श आणि अशा अनेक गोष्टी आपल्या मेंदूत या वेगवेगळ्या स्मृतींमध्ये साठवतो. जॉन ग्रिफिथ या गणितज्ञाच्या मते आयुष्यभर आपण कुठल्या ना कुठल्या वेळी स्मृतीत साठवून ठेवलेल्या गोष्टींची संख्या 10 चा 11 वा घात (1011) किंवा 10,000 कोटी आहे! संपूर्ण एन्सायक्‍लोपीडिया ब्रिटानिकामधल्या माहितीच्या ती 500 पट आहे!

1960 आणि 1970 च्या दशकात दीर्घकालिक स्मृतीविषयी बरंच संशोधन करण्यात आलं. जेव्हा कुठलीही नवीन माहिती येते, तेव्हा ती आपल्या सध्या अस्तित्वात असलेल्या स्मृतींच्या वेगवेगळ्या तुकड्यांना विशिष्ट तऱ्हेनं जोडली जाते. हे कॉम्प्युटरच्या डेटा बेससारखंच असतं. खरं तर त्यापेक्षाही अनेक पटीनं गुंतागुंतीचं असतं. आई जेव्हा आपल्या मुलाला एक मांजर दाखवते आणि "ते मांजर आहे' असं त्याला सांगते आणि जेव्हा मांजर "म्यॉव' असा आवाज करतं, तेव्हा तो मुलगा त्या मांजराचं चित्र, त्याचा रंग, उंची, त्याची चाल आणि "म्यॉव' असा आवाज असे त्या मांजराचे गुणधर्म आणि "मांजर' ही अक्षरं आणि "मांजर' हा शब्द उच्चारल्यानंतरचे ध्वनी हे सगळं स्मृतीत साठवून ठेवतो. या सगळ्या गोष्टी मेंदूत एकाच ठिकाणी साठवून ठेवल्या असतील असं आपल्याला वाटेल; पण तसं होत नाही. ही माहिती मेंदूत खूपच विखरून ठेवलेली असते. पण जेव्हा "मांजर' हा शब्द जरी कुणी उच्चारला किंवा कुणी "म्यॉव' असा आवाज ऐकला किंवा कुणी मांजर जरी बघितलं तरी त्याची उंची, चाल आ णि इतर अनेक गोष्टी आपल्या चटकन डोळ्यांसमोर येतात. याचं कारण त्या सगळ्या गोष्टी मेंदूत जिथे वेगवेगळ्या ठिकाणी साठवलेल्या असतात त्या सगळ्या ठिकाणांहून त्या एकत्र केल्या जातात आणि मग आपल्यासमोर सादर केल्या जातात.
जर त्या मुलानं अनेक महिन्यांनंतर/ वर्षांनंतर पूर्वी पाहिलेल्या मांजरापेक्षा वेगळ्या रंगाचं, आकाराचं आणि मुख्य म्हणजे वेगळ्या स्थितीत (पोझिशन) बसलेलं मांजर बघितलं तरी तो मुलगा क्षणार्धात ते मांजर आहे हे ओळखतो. हे नक्की कसं होतं, याचं कोडं अजून पूर्णपणे सुटलेलंच नाहीये. पूर्वी बघितलेल्या गोष्टी आपण जशाच्या तशा आठवू शकणं याला "दृश्‍य स्मृती' (व्हिज्युअल मेमरी) असं म् हणतात. आपण एखादी गोष्ट लक्षात ठेवतो किंवा शिकतो म्हणजे नेमकं काय होतं? आणि जर या शिकण्याचा मेंदूच्या रचनेशी आणि त्यांच्या रसायनाशी संबंध असेल तर ती कायमच टिकायला पाहिजे. मग आपण काही गोष्टी विसरतो त्या कशा? एखाद्या म्हाताऱ्या माणसाला त्याच्या लहानपणी खेळलेला क्रिकेटचा एक सामना आणि त्यात त्यानं कशी सेंच्युरी मारली होती हे काल घडल्याप्रमाणे अचूकपणे आठवत असतं; पण नुकताच पेपर वाचल्यानंतर चष्मा कुठे ठेवलाय आठवत नाही.

ऍगाथा ख्रिस्ती या प्रचंड प्रसिद्ध ब्रिटिश रहस्यकथा लेखिकेची गोष्ट गंमतशीर आहे. 3 डिसेंबर 1926 रोजी तिच्या बर्कशायरमधल्या घरातून ती अचानक गायबच झाली. वर्तमानपत्रात तिच्याविषयी उलटसुलट बातम्या येत असल्यामुळे सगळीकडे गूढ वातावरण वाढतच चाललं होतं. शेवटी अनेक पोलिस तिचा शोध घेण्यासाठी पाठविण्यात आले. ऍगाथाच्या नवऱ्याचं- अर्चीचं एका मुलीबरोबर प्रे मप्रकरण चालू असल्यानं त्यानंच ऍगाथाचा खून केला असल्याचा बऱ्याच लोकांना संशय येत होता. त्यानंतर 14 डिसेंबरला हॅरोगेटमधल्या एका हॉटेलमध्ये राहत असलेली एक बाई म्हणजे आपली बायको ऍगाथाच आहे, हे अर्चीनं ओळखलं. पत्रकारांनी ऍगाथावर प्रश्‍नांचा भडिमार केला; पण ती तिच्या पुढच्या संपूर्ण आयुष्यातही गायब होण्याविषयी चकार शब्द बोलली नाही. तिला ऍम्नेशियाचा झटका (विस्मरणाचा ऍटॅक) आल्यामुळे ती अशी वागली, असं स्पष्टीकरण अर्चीनंच पत्रकारांना दिलं. ऍगाथा ख्रिस्ती आगामी पुस्तकाचा खप वाढावा म्हणून स्टंट्‌स करतेय, असं सगळ्या वर्तमानपत्रांनी छापलं. प्रसिद्धीपासून दूर पळणाऱ्या ऍगाथा ख्रिस्तीला तिच्या या स्मृतिभ्रंशाचे लोकांनी असे वेडेवाकडे अर्थ लावावेत याचं अतीव दुःख झालं. त्यातून ती कधीच सावरली नाही.

गोडार्डच्या मते, आपल्या मेंदूत स्मृतीमुळे तयार झालेले मेमरी ट्रेसेस किंवा न्यूरॉन्सची सर्किट्‌स जर क्षीण होत गेली तर आपण गोष्टी विसरायला लागतो. जसजसा काळ लोटतो तसतसं आपण जास्त जा स्त विसरतो. पण एबिंगहॉसच्या मते, आपण पूर्णपणे कधीच विसरत नाही. त्यानं केलेल्या प्रयोगात एक गंमतशीर गोष्ट दिसून आली. कुठलीही गोष्ट शिकल्यानंतर उजळणी झाली नाही तर 15 मिनिटांत त् याची आठवण किंवा स्मृती ही 100 टक्‍क्‍यांवरून धाडकन 35 टक्‍क्‍यांवर येते. म्हणजे 15 मिनिटांत आपण 65 टक्के विसरतो. पण नंतर काळाबरोबर हा विसरण्याचा दर कमी कमी होत जातो. 31 दिवसांनंतरही स्मृतीचं प्रमाण फक्त 10 टक्‍क्‍यांवर घसरतं.

मेंदूच्या टेम्पारेल लोब, फ्रॉंटल लोब आणि हिप्पोकॅंपस यांना दुखापत झाल्यावर स्मृतीविषयक अनेक विकार होऊ शकतात, असं मेंदूतज्ज्ञांना दिसून आलंय. मानसशास्त्रीय किंवा शारीरिक कारणांमुळे स्मृ तिनाश किंवा स्मृतिभ्रंश (ऍम्नेशिया), अपघातामुळे रेट्रोग्रेड ऍम्नेशिया, ताणतणावांमुळे ऍम्नेशिया, तर दीर्घकाळच्या मद्यपानामुळे किंवा व्यवस्थित सात्त्विक खाणं खाल्लं नाही तरीही स्मृतिनाश होऊ शकतो. शॉर्ट टर्म मेमरी लॉस, डिमेन्शिया, हटिंग्टन्स डीसी, अल्झायमर्स यांचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे.

भावना

September 11, 2011

नॅ
शनल जिओग्राफिक चॅनेलवर अनेक दृश्‍यं आपण बघतो. उदाहरणार्थ, मादी अगदी जोरात पळत असते आणि नर तिच्यामागे धावत असतो. शेवटी तो तिला पकडतो आणि मग त्यांचं मिलन होतं किंवा एका पक्ष्याच्या नरानं खेकडा पकडलेला असतो. मादीलाही तो खायचा असतो, पण नर सारखा त्या मादीला हाकलून लावत असतो. एका आठवड्यानं बघावं तर तोच नर आपल्या शिकारीतला काही भाग मादीनं खेचून घेतला तर त्या मादीला पिटाळून लावत नाही. आणखी एका आठवड्यानं तर तो नर आपल्यातला एक तुकडा चक्क मादी च्या तोंडात टाकून तिला भरवत असतो. हे प्राणी त्यांच्या नैसर्गिक वृत्तीनं जगत असतात, पण त्यांना आपण असे का वागतोय याचा पत्ताच नसतो. आपण असं का वागतो, हा प्रश्‍न जीवसृष्टीत स्वतःलाच माणूसच विचारतो. याच प्रश्‍नावर म ानसशास्त्राची इमारत उभी आहे.

पूर्वीचे लोक या प्रश्‍नाची उत्तरं आत्मा, चेटूक, जादूटोणा वगैरे गोष्टींत शोधून म ोकळे झाले होते! प्राण्यांच्या शरीराचे ठराविक भाग जर खाल्ले तर माणूस अमुक अमुक तऱ्हेनं वागतो, अशीही त्या काळी समजूत होती. त्यानंतर ग्रीक तत्त्वज्ञांनी मात्र आपल्या भावना आणि आपले विचार हे आपल्या शारीरिक प्रक्रियांमधून निमार् ण होतात असं म्हणायला सुरवात केली. प्लेटोच्या मते आपली भूक किंवा गरज आणि आपल्यातला विवेकवाद या दोन वेगवेगळ्या गोष्टी आपल्या मनावर परिणाम करतात. या दोन परस्परविरुद्ध गोष्टींच्या बॅलन्समधून आपली वागणूक ठरते.

आपल्या मनात येणाऱ्या भावनांपैकी काही मूळ किंवा प्राथमिक भावना असतात आणि बाकीच्या भावना त्यांच्यापासून आपल्याला मिळू किंवा समजू शकतात असं समजलं जातं. रेने देकार्त, इमॅन्युएल कॅंट आणि विल्यम जेम्स यांनी भावना किती असतात याविषयी आपली मतं मांडली; तर एका मानसोपचारतज्ज्ञानं एकदा तब् बल 154 भावनांची यादी बनवली होती. पुढे अनेक मानसशास्त्रज्ञांनी यावर काम केलं. आतापर्यंत भावनांविषयी शंभरच्या वर थिअरीज मांडण्यात आल्या आहेत.

सर चार्लस्‌ बेल यानं माणसाला आपल्या चेहऱ्याचे स्नायू वेगवेगळ्या तऱ्हेनं हालचाल करून भावना व्यक्त करता येतात आणि ही फक्त मानवालाच देवाकडून मिळालेली देणगी आहे असं मत मांडलं; पण वैज्ञानिक पद्धतीनं माणसाच्या भावनांविषयी सर्वप्रथम जर कोणी भाष्य केलं असेल तर ते चार्लस्‌ डार्विननं. डा र्विन हा एक प्रयोगशील मानसशास्त्रज्ञही होता, हे ऐकून आपल्याला आश्‍चर्य वाटेल. बेलचं म्हणणं डार्विनला पटत नव्हतं. बेलला उत्तर देण्यासाठी डार्विननं " दि एक्‍सप्रेशन्स ऑफ दि इमोशन्स इन मॅन अँड ऍनिमल्स' हे पुस्तक लिहिलं. सगळी माणसं आणि प्राणीसुद्धा त्यांच्या भावना एकसारख्याच तऱ्हेनं व्यक्त करतात आणि आपल्या भावना उत्क्रांतीच्याच प्रक्रियेतून निर्माण झाल्या आहेत, असं डार्विननं त्यात मांडलं होतं. बेलप्रमाणेच ड्युचेनला माणसाच्या भावना आ णि त्या व्यक्त करण्यासाठीचे चेहऱ्यावरचे हावभाव ही माणसाला देवाकडून मि ळालेली देणगीच वाटे. माणूस खरं मनापासून हसतो तेव्हा ते व्यक्त करताना फ क्त तोंडाचेच नाही, तर डोळ्यांपासचे स्नायूही वापरतो, असं ड्युचेन हा म ानसशास्त्रज्ञ म्हणे. माणसाच्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या 60 तऱ्हेच्या भावना उमटू सकतात, असं ड्युचेनला वाटे. प्रत्येकासाठी चेहऱ्याचे कुठले स्नायू वापरले जातात, याचाही त्यानं अभ्यास केला होता. याउलट आपला चेहरा खूपच कमी भावना व्यक्त करू शकतो, असं डार्विनला वाटे.

ड्युचेननं यासाठी काही गमतीशीर प्रयोगही केले होते. चेहऱ्याचे कुठले स्नायू विजेच्या प्रवाहानं उत्तेजित करायचे यासाठी त्यानं चार्लस्‌ बेलच्या विचारांचा खूपच उपयोग केला. फोटोग्राफीचा नुकताच शोध लागला होता. ड्युचेननं त् याचाही वापर करायचं लगेच ठरवलं. या प्रयोगासाठी त्यानं सहा माणसांचा उपयोग केला. यातले पाच तर त्याचेच पेशंट्‌स होते. पण यातले मुख्य प्रयोग जर त्यानं केले असतील तर त्यासाठी त्यानं एका हडकुळ्या, दात पडलेल्या माणसाला निवडलेलं होतं. ड्युचेननं त्याचा उल्लेख फक्त "एक म्हातारा' एवढाच केला होता. त्यानं चेहऱ्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अनेक तऱ्हेचे वीजप्रवाह सोडून तिथले स्नायू ताठ करणं किंवा आकुंचन पावायला लावणं, असे प्रकार करून दर वेळी चेहऱ्याचे फोटो काढले. या फोटोग्राफिक स्लाइड्‌सवरून त्याला 60 वेगवेगळ्या तऱ्हेचे चेहरे मिळाले. यातला प्रत्येक चेहरा कुठला तरी भाव दाखवतो, असं समजून त्यानं मानवी भावनांचे 60 प्रकार असतात असं मांडलं. माणसांना एकमेकांशी सुसंवाद साधता येण्यासाठीच माणसाला देवानं दिलेली ही देणगी आहे, असं त्याचं मत होतं. त्यानं आपल्या संशोधनावर 1862 मध्ये "दी मेकॅनिझम ऑफ ह्यूमन फेशल एक्‍स्प्रेशन' हे पुस्तकही लिहिलं. पण ड्युचेनचं व्यक्तिमत्त्व आणि बोलणं प्रभावी नसल्यामुळे त्याकडे कोणीही फारसं गांभीर्यानं बघितलं नाही.

डार्विनला ड्युचेनचं म्हणणं पटलं नाही. एक तर राग किंवा भीती वाटल्यावर प्राण् यांच्या आणि माणसांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि त्यांच्या हालचाली/ कृती यां च्यात खूपच साम्य होतं. म्हणजे भावना आणि चेहऱ्यावरचे भाव ही फक्त म ाणसालाच देवाकडून मिळालेली देणगी नव्हती. शिवाय या वेगवेगळ्या भावना किती असू शकतात, याविषयीही डार्विनला ड्युचेनचं म्हणणं पटत नव्हतं. ड्य ुचेनला 60 वेगवेगळे चेहरे मिळाले होते हे खरंच होतं, पण त्यातला प्रत्येक चेहरा वेगळी भावना दाखवत नव्हता, असं डार्विनला वाटलं आणि मग हे तपासून बघण्यासाठी डार्विननं आपल्या केंटमधल्या घराचीच प्रयोगशाळा बनवली. त्यानं ड्युचेनच्या फोटोग्राफिक स्लाइड्‌सपैकी 11 स्लाइड्‌स निवडल्या. त्यानंतर त्या र ँडम तऱ्हेनं त्याच्याकडे येणाऱ्या 20 पाहुण्यांना एकेक करत वेगवेगळ्या दाखव ल्या. हे करत असताना त्यानं त्यांना काहीच प्रश्‍न विचारले नाहीत. प्रत्येक स्लाइड बघून त्यातल्या चेहऱ्यावर कुठला भाव दिसतोय हे फक्त त्यांना लिहून ठेवायला सांगितलं. नंतर त्यानं सगळी उत्तरं एकत्र करून त्याचा एक तक्ताच बनवला.

डार्विनच्या पाहुण्यांचं दुःख, आनंद, भीती, आश्‍चर्य यांच्यासारख्या काही ठराविक भावना आणि ते दाखवणारे चेहरे यांच्याविषयी एकमत झालं होतं, पण इतर अनेक चेहऱ्यांविषयी आणि भावनांविषयी एकमत होत नव्हतं. याशिवाय डार्विननं अनेक प्राण्यांची आणि स्वतःच्या मुलांची केलेली निरीक्षणं, त्यानं जगभर शेकडो लोकां ना पाठवलेली प्रश्‍नावली या सगळ्यांचाही डार्विननं उपयोग केला होता. यावरून एकूण मूलभूत भावना 60 नसून खूपच कमी आहेत, असं डार्विननं मांडलं. डा र्विननं त्याच्या "एक्‍सप्रेशन्स'मध्ये या प्रयोगाविषयी लिहिलंय. 19 व्या शतकातला आणि कदाचित त्यानंतरच्या सर्व काळातही डार्विन हा एक अत्यंत प्रभावशाली वै ज्ञानिक होता. त्यानंच ड्युचेनचं म्हणणं खोटं ठरवलं म्हटल्यावर ड्युचेनचं लिखाण आणखीनच दुर्लक्षित राहिलं. मात्र ड्युचेनच्या म्हाताऱ्या माणसाचा चेहरा मात्र जगप्रसिद्ध झाला!

शेवटी कुठल्याही भावनेमुळे जो चेहरा होतो त्याचा उत्क्रांतीत जीवन टिकवून धरण्यासाठी फायदा असेल तरच ते चेहऱ्यावरचे भाव पिढ्या न्‌ पिढ्या टिकतात, चालू राहतात. उदाहरणार्थ भीती वाटल्यावर आपले डोळे मोठे होतात याचं कारण आपण नीटपणे बघू शकावं आणि संकटाचा सामना करू शकावं म्हणून. अशाच तऱ्हेनं वेगवेगळ्या भावनांसाठी चेहऱ्यावरचे हावभाव जे जीवन टिकवून धरण् यासाठी उपयोगी होते ते टिकले. ते इतरांशी संवाद साधण्याकरता देवानं वगैरे काही दिलेले नाहीत, असं डार्विननं मांडलं.

"एक्‍सप्रेशन्स' लिहिताना डार्विननं त्या वेळच्या अनेक तज्ज्ञांशी पत्रव्यवहार केला होता. आपल्या भावना आपल्याला उपयुक्त कृती करायला लावतात आणि त्याम ुळे आपण जगायला (सर्व्हायव्हल) जास्त लायक (फिट) होतो आणि या उत्क्रां तीच्या स्पर्धेत टिकून राहू शकतो. भीती, राग, लैंगिक आकर्षण या भावना आपल् या अस्तित्वासाठी आवश्‍यक आहेत. आपल्याला भीतीच वाटली नाही, तर आपण आगीत चालत जाऊ, दरीत उडी मारू किंवा सिंहाकडे आपणहून चालत जाऊ आ णि अर्थातच नष्ट होऊ. तसंच राग आला नाही तर आपण प्रतिकूल परिस्थिती किंवा आपल्यावर हल्ला करणारे प्राणी यांचा मुकाबला करू शकणार नाही आणि पुन्हा नष्ट होऊ. तसंच लैंगिक आकर्षण वाटलं नाही, तर पुनरूत्पादनच होणार नाही आ णि पूर्ण मानवजातच नष्ट होईल. थोडक्‍यात, सर्व मानवी भावनांना आपलं आयुष्य चालू राखण्यात काही विशिष्ट स्थान आहे, असं डार्विननं मांडलं.

1971 मध्ये एकमन आणि वॉलेस फ्रीसेन यांनी अनेक भाव दाखवणारे चेहऱ्यांचे फोटोग्राफ्स बनवले. पूर्वी असेच फोटो डार्विननं आणि नंतरच्या संशोधकांनी दाखवून भावनांचं वैश्‍विकत्व सिद्ध केलंच होतं. एकमन आणि फ्रीसेन यांनी तेच फोटो जगातल्या अशिक्षित, गरीब आदिवासींपासून ते प्रचंड समृद्ध, श्रीमंत संस्कृ तीतल्या लोकांना दाखवले. ते त्यांना एक गोष्ट सांगत आणि ती सांगताना कुठल् याही भावनेचा उल्लेख झाला की ती भावना दाखवणारा फोटो त्या सगळ्या फोटों मधून निवडायला सांगत. या वेगवेगळ्या देशांतल्या, संस्कृतींतल्या, वर्गांमधल्या सगळ्यांना सगळ्या भावना आणि ते दाखवणारे चेहरे ओळखता आले. फक्त भीती आणि आश्‍चर्य सोडता त्यांचे निष्कर्ष पाश्‍चिमात्य संस्कृतीतल्या लोकांसारखेच होते. यामुळे डार्विनचा आणि एकमनच्या भावनेच्या वैश्‍विकतेविषयीचा सिद्धान्त सिद्ध होत होता, असं एकमननं मांडलं. एकमनच्या या प्रयोगातून एक "फेशल अ ॅक्‍शन कोडिंग सिस्टीम (एफएसीएस) निघाली. आजही जगभरचे वैज्ञानिक ती वापरतात.

भावनांचं संशोधन करण्यात थॉर्नडाईक, फ्रॉईड, विल्यम जेम्स, विल्यम मॅग्डुगॉ ल, कार्ने लॅडिस, वॉलेस फ्रींसेन, एल्सवथ, मॉऊरर, कॅरोल इझार्ड, जोसेफ, रॉबटर् प्लुटचिक, ई लीडॉक्‍स आणि अँटोनियो दामागिओ या संशोधकांचा पुढाकार म ोलाचा मानला जातो. आज अनेक संशोधक माणसाच्या मूलभूत भावना कुठल्या आहेत आणि त्या कशा निर्माण होतात, त्यांचा उत्क्रांतीशी काय संबंध आहे, त्या निर्माण झाल्यावर मेंदूत काय प्रक्रिया होतात आणि कुठल्या भागातली कुठली सकिर् ट्‌स जोडली/ तोडली जातात याविषयी बरंच संशोधन करत आहेत. पण एवढं असलं तरी अजूनही भावना म्हणजे नक्की काय, त्या कशा निर्माण होतात, त्या आपल्याला कशा जाणवतात, यावर वाद चालूच आहेत!

पिअँजेचं बालमानसशास्त्र

September 04, 2011

पली वाढ ही "कंडिशनिंग' आणि अनुकरण यांच्यामधून होत असते, असं बिहेवियरिस्ट मानत. पण पिअँजेचं या दोन्हींबद्दल दुमत होतं. भोवतालची परिस्थिती आणि लहान मुलं यांच्यातल्या परस्परसंबंधांवर आणि इंटरऍक्‍शनवर त्या मुलाची वाढ अवलंबून असते असं तो माने. उदाहरणार्थ, अर्भक प्रथम फक्त दूधच पचवू शकतं, पण त्या दुधामुळेच त्याच्यामध्ये सॉलिड अन्न पचवण्याची शक्ती येते, तसंच बुद्धीचं असतं. सर्वप्रथम मुलांना अगदी सोप्या गोष्टीचं आकलन होऊ शकतं, पण या आकलनामुळेच त्याची आकलनशक्ती वाढते आणि तो जास्त गुंतागुंतीच्या गोष्टी समजून घेऊ शकतो आणि ही वाढ अशी होतच राहते.

टोपीखाली एखादं खेळणं लपवलं तर ते लहान बाळाच्या लक्षात येत नाही, याचं कारण या टप्प्यापर्यंत डोळ्यासमोर जे दिसतं तेवढंच त्या मुलाच्या लक्षात राहतं. पूर्वी बघितल्याची स्मृती त्याच्याकडे साठवलेली नसते. पण जेव्हा रांगत जाताना त्याला ते खेळणं दिसतं तेव्हा तो हळूहळू शिकत जातो. यानंतर टोपीखाली लपवलेलं खेळणं त्याच्या लक्षात राहायला लागतं. असे असंख्य प्रयोग करून त्यानं सखोल अभ्यास केला. या अभ्यासावरून पिअँजेनं मुलाच्या मानसिक वाढीमधले चार टप्पे मांडले. जन्मापासून ते दीड-दोन वर्षांपर्यंतचा "सेन्सरीमोटर' टप्पा, सात वर्षांपर्यंतचा दुसरा "प्रीऑपरेशनल' टप्पा, 7 ते 12 या वयोगटाचा "कॉंक्रीट ऑपरेशन्स'चा तिसरा टप्पा आणि "फॉर्मल ऑपरेशन्स' हा 12 वर्षांनंतरचा अखेरचा चौथा टप्पा, असे हे चार टप्पे होते.

पहिल्या "सेन्सरीमोटर' टप्प्यात मुलाला फक्त संवेदना (सेन्सेशन) जाणवतात. त्यांचा तो बाहेरच्या वस्तूंशी संबंध जोडायला जात नाही. अनेक सेन्सेसमध्ये सुसूत्रपणाही मुलाला जाणवत नाही. त्यामुळे खेळण्याकडे बघून ते घेण्यासाठी हात पुढे करणं यालाही काही काळ जावा लागतो आणि जरी वस्तू हाती लागल्या तरी त्या कशा आहेत, हे त्याला माहीत नसतं. मग प्रयोग चालू होतात. यामुळे मग स्पर्श करणं, तोंडात घेणं, हुंगणं, हलवणं असं कुठल्याही हाती लागलेल्या वस्तूंविषयी सुरू होतं. यातूनच बाह्य जगाचं त्याचं प्राथमिक ज्ञान वाढत जातं.
याबरोबरच स्मृतीची वाढ होत गेल्यानं मुलं मग त्या वस्तूंचे स्पर्शांचे, चवीचे, आकाराचे, वासाचे अनुभव साठवून ठेवायला लागतात. यामुळेच काही महिन्यांनंतर टोपीखाली लपवलेल्या गोष्टींची त्यांना आठवण किंवा भान राहायला लागतं. एखादी वस्तू दिसत नसली तरी त्याचं अस्तित्व जाणवणं या अवस्थेला पिअँजे "ऑब्जेक्‍ट पर्मनन्स' म्हणायचा.

पहिल्या टप्प्याच्या शेवटी मुलं त्यांच्या या साठवलेल्या ज्ञानभंडाराचा उपयोग वेगवेगळे प्रश्‍न सोडवण्यासाठी करायला लागतात. त्यानं त्याच्या ल्यूसिन आणि जॅकलिन या दोन मुलींवर याच वयात असताना अनेक प्रयोग करून हे निष्कर्ष काढले आहेत.

वाढीचा दुसरा "प्रीऑपरेशनल' टप्पा दीड-दोन वर्षांपासून ते सात वर्षांपर्यंत टिकतो. या काळात मूल अनेक शब्द आणि अनेक संकल्पना शिकतं. बाहेर दिसणाऱ्या वस्तूंविषयी ते चिन्हं, संकल्पना, शब्द, गुणधर्म या स्वरूपात विचार करायला लागतं आणि शिकतं. दोन वर्षांचा मुलगा एक लाकडी वस्तू जमिनीवरून फिरवून आगगाडीसारखा आवाज काढायला शिकतं. तीन वर्षांचा मुलगा रिकाम्या कपातून पिण्याचं सोंग करायला लागतो. पण अजूनही वेळ, तुलना, मोजमापं (क्वांटिटी) आणि पर्स्पेक्‍टिव्ह या गोष्टी मुलाला कळलेल्या नसतात. मुलाला या टप्प्यात केवळ संकल्पनांवर विचार करून निष्कर्ष काढणं अशा गोष्टी अजून शक्‍य नसल्यामुळेच पिअँजे या टप्प्याला "प्रीऑपरेशनल' म्हणे. वर्गीकरण करणं, संपूर्ण गोष्टीतला किंवा कल्पनेतला काही विशिष्ट भाग ओळखता येणं, थोडक्‍यात, माहितीचं रूपांतर (ट्रान्स्फर्मेशन) करणं, याला पिअँजे "ऑपरेशन' म्हणे. यामुळेच जर आठ सोंगट्या एकत्र ठेवल्या तर त्यांची संख्या त्याच सोंगट्या पसरून ठेवल्यानंतर वाटणाऱ्या संख्येपेक्षा कमी आहे, असं पाच वर्षांचा मुलगा सांगतो किंवा तेच पाणी एका भांड्यातून दुसऱ्या अरुंद पण उंच भांड्यात टाकलं तर ते त्याला जास्त आहे असं वाटतं. अजूनही 2 ु 4 आणि 4 ु 2 हे एकच आहेत, हे या टप्प्यातल्या सगळ्यांना कळतंच असं नाही.

दुसऱ्यांच्या पर्स्पेक्‍टिव्हमधून गोष्टी कशा दिसतात हे या टप्प्यात अजून लक्षात येत नाही. यामुळेच पिअँजे या अवस्थेला "इगोसेंट्रिक' म्हणायचा. ते तपासण्यासाठी पिअँजेनं एका डोंगराच्या प्रतिकृतीपाशी एक बाहुली ठेवली. यानंतर त्याच डोंगराचे तीन वेगवेगळ्या पर्स्पेक्‍टिव्ह्‌जमधले फोटो त्या मुलाला दाखवले आणि बाहुलीला तो डोंगर कसा दिसत असेल असं मुलांना विचारलं. त्याचबरोबर बहुतांशी मुलांनी बाहुलीऐवजी त्यांना स्वतःलाच तो डोंगर जसा दिसत होता तसाच फोटो निवडला. या टप्प्यात इतर लोक किंवा मुलं एखाद्या गोष्टीविषयी कसा विचार करताहेत, याविषयी कल्पना किंवा विचार करणं मुलांना जड जातं.

पिअँजेनं केलेला एक प्रयोग खूप प्रसिद्ध आहे. त्यानं एक लंबक (पेंड्युलम) घेतला आणि त्याची लांबी, त्याचं वजन आणि त्याला झोका देताना लावलेला जोर यांचा त्यात लंबकाच्या झोक्‍याच्या वेगावर आणि काढलेल्या अंतरावर काय परिणाम होतो, ते बघायला अनेक वयोगटांतल्या मुलांना सांगितलं. "प्रीऑपरेशनल' गटातल्या मुलांकडे हे तपासण्यासाठी काहीच योजना नव्हती. त्यांनी लंबकाची लांबी, वजन आणि लावलेला जोर या गोष्टी एकाच वेळी रॅंडमली बदलल्या; आणि कसेही वेडेवाकडे प्रयोग करून निरीक्षणं केली. थोडक्‍यात, त्यांची तर्कबुद्धी पूर्णपणे विकसित न झाल्यामुळे त्यांचे निष्कर्ष कित्येकदा चुकतच होते!

7 ते 12 या वयोगटातल्या टप्प्याला पिअँजे "कॉंक्रीट ऑपरेशन्स' म्हणे. या टप्प्यात मुलगा मोजणं, वर्गीकरण करणं अशा गोष्टी शिकतो. गोष्टींमधले संबंध, त्यांच्यातल्या तुलनाही त्याला कळायला लागतात. पूर्वीच्या "प्रीऑपरेशनल' अवस्थेतल्या मुलांना "बहीण' हा शब्द माहीत असतो, पण त्याचा अर्थ कळत नसतो. त्याला "लहान' हा शब्द माहीत असतो, पण दोन वस्तू समोर ठेवल्या तर त्यातली कुठली लहान आहे ते त्याला नक्की सांगता येत नाही. पण 7 ते 12 वयातल्या "कॉंक्रीट ऑपरेशन्स'च्या टप्प्यात मुलगा या दोन्ही गोष्टी सहजपणे करतो. या वयोगटातल्या मुलांना स्वतःपेक्षा बाहेरचंही जग असतं, हे जाणवायला लागतं. थोडक्‍यात, तो मुलगा फक्त "इगोसेंट्रिक' राहत नाही. पूर्वीच्या "प्रीऑपरेशनल' अवस्थेतल्या मुलाला "रात्री अंधार का पडतो?' असं विचारलं तर "आपल्याला झोपायचं असतं म्हणून' असं तो उत्तर देईल; पण या कॉंक्रीट ऑपरेशन्स'च्या अवस्थेत "सूर्य मावळल्यामुळे रात्र होते' असं तो उत्तर देतो. दुसऱ्याचंही पर्स्पेक्‍टिव्ह, त्यांचा दृष्टिकोन, विचार, म्हणणं त्याला समजायला लागतं. पण अजून तर्कानं योग्य निष्कर्ष काढणं त्यांना पूर्णपणे जमत नाही.

12 वर्षांनंतरच्या वाढीच्या शेवटच्या अवस्थेला पिअँजे "फॉर्मल ऑपरेशन्स' म्हणे. या अवस्थेत मुलं ऍब्स्ट्रॅक्‍ट गोष्टींविषयी विचार करायला शिकतात. बीजगणितातले "क्ष' किंवा "य' हे काही प्रत्यक्षातले आकडे नसतात. ते कुठल्यातरी आकड्यांचं प्रतिनिधित्व (रिप्रेझेंटेशन) करत असतात, म्हणून ते ऍब्स्ट्रॅक्‍टच असतात. यामुळेच या अवस्थेनंतर मुलांना बीजगणित कळायला लागतं. वैज्ञानिक गोष्टी, त्यांची तत्त्वं आणि त्यांच्यातले ऍब्स्ट्रॅक्‍ट संबंधही याच वयात लक्षात यायला लागतात. ते कुठल्या गृहितांवर आधारलेले आहेत तेही समजायला लागतं. ते आता गुंतागुंतीची कोडी सोडवायला लागतात. आजूबाजूचं जग, त्यातल्या शक्‍यता (पॉसिबिलिटीज, प्रोबॅबिलिटीज) यांच्याविषयीचं आकलन आणि अंदाज आता ते करायला लागतात. या जगात काय अशक्‍य आहे, हेही आता त्याला कळायला लागतं. त्याला आता कुठल्याही गोष्टीचा फॉर्म आणि कंटेंट (बाह्यस्वरूप) यातला फरक कळायला लागतो.

जेरोम कगान यानं पिअँजेच्या या सगळ्या विचारांना महत्त्वाचं आणि "ओरिजनल' मानलं. टीनएजर्समध्येच जास्त आत्महत्या का होतात, त्याअगोदर का नाही, हा प्रश्‍न मानसशास्त्रज्ञांना बरेच दिवस भेडसावत होता. पण आता त्याचं उत्तर मिळालं होतं. याच वयात आता आपल्यासमोर काय पर्याय आहेत आणि त्यातले कुठले शक्‍य आहेत, याविषयीचे विचार परिपक्व होतात आणि म्हणून जेव्हा आयुष्यातल्या या सगळ्या शक्‍यता संपतात; सगळेच रस्ते बंद झाल्यासारखं वाटतं तेव्हाच आत्महत्येचे विचार येतात. त्यापूर्वी हा विचार न येण्याचं कारण तोपर्यंत सगळ्या शक्‍यतांविषयी मुलाला पूर्णपणे कल्पनाच नसते.
याच वयात कुणाचेही विचार (उदा.- विवेकानंद, वैज्ञानिक दृष्टिकोन) आणि प्रत्यक्षातली वागणूक (उदा.- बाबा, साधू, नवस. अशी अविवेकवादी, अवैज्ञानिक वागणूक) यातला परस्परविरोध लक्षात येतो. त्यामुळेच या वयात बंडखोरी वाढते. याच वयात आई-वडील किंवा मोठे केवळ सांगताहेत म्हणून बरोबर मानणं, याविरुद्धही संघर्षही सुरू होतो.

कगानप्रमाणेच पिअँजेची अनेकांनी खूप स्तुती केली, पण कित्येकांनी पिअँजेच्या थिअरीत सुधारणाही सुचवल्या. काहींनी तर त्याच्या विचारांना चक्क विरोध केला. आतापर्यंत पिअँजेच्या विचारांविषयी अक्षरश: हजारो, लाखो लेख आणि संशोधनप्रबंध प्रकाशित झाले आहेत!

पिअँजेचे विचार युरोपमध्ये उगम पावले आणि तिथेच फुलले, बहरले. ते जेव्हा 1920 च्या दशकात अमेरिकेत आले तेव्हा तिथे बिहेवियरिझमचा एवढा प्रभाव होता, की पिअँजेच्या थिअरीकडे सगळ्यांनी जातीनं दुर्लक्षच केलं. जेव्हा 1960 च्या दशकात कॉग्निटिव्ह विचार पुढे आले; स्मृती, शिक्षण, भाषा अशा गोष्टींवर विचार सुरू झाला तेव्हा पुन्हा पिअँजेच्या थिअरीजवर अमेरिकेत नव्यानं विचार सुरू झाला. कॉग्निटिव्ह आणि डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी एकत्र आल्यामुळे संशोधक आता नव्यानं प्रश्‍न विचारायला लागले. लहान मुलांमध्ये स्मृती कशी आणि केव्हा निर्माण होते, लहान मुलाला स्वत:ची जाणीव केव्हा होते, तो भाषा केव्हापासून आणि कसा शिकतो, असे ते प्रश्‍न होते. यांच्याविषयी मग अनेक प्रयोग करण्यात आले आणि त्यामुळे या दोन्ही ज्ञानशाखा खूप पुढे गेल्या. या सगळ्यात पिअँजेनं घातलेला पाया हा प्रचंड महत्त्वाचा होता. पिअँजेला विसाव्या शतकातला सर्वश्रेष्ठ बालमानसशास्त्रज्ञ मानतात ते काही उगीचच नाही!

पिअँजे आणि डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी

August 28, 2011

हानपणापासून आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपली वाढ कशी होते आणि आपल्यामध्ये लहानपणापासून बुद्धी, तर्कशक्ती, विवेक, भावना या कसकशा विकसित होत जातात, याचा मानसशास्त्रज्ञांना अभ्यास करायचा होता. पूर्वी या ज्ञानशाखेला "मुलांचं मानसशास्त्र (चाइल्ड सायकॉलॉजी) म्हणत. 1920 नंतर याला "डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी' म्हणायला लागले. यासाठी अनेक मानसशास्त्रज्ञांनी आतापर्यंत किती चित्रविचित्र प्रयोग करावेत! उदाहरणार्थ, एकच कविता एकदा त्याच्या आईच्या आवाजात आणि एकदा कुणा अनोळखी माणसाच्या आवाजात गर्भवती स्त्रीच्या पोटातल्या अर्भकाला ऐकवायची आणि दोन्ही वेळी त्या अर्भकाच्या हृदयाचे ठोके मोजून काही फरक पडतो का ते बघायचं आणि अनोळखी माणसाच्या आवाजानं हे ठोके वाढल्याचं सिद्ध करून दाखवायचं, किंवा चार महिन्यांच्या मुलाच्या डोळ्यांवर प्रकाशझोत कमी-जास्त प्रमाणात पाडून त्याच्या चेहऱ्यावरचं आश्‍चर्य टिपायचं, किंवा खेळण्यातला कुत्रा चादरीखाली लपवला तर तो कुठेतरी आहे हे मुलांना केव्हा आणि कसं जाणवतं, याची नोंद ठेवायची, अशा तऱ्हेचे भन्नाट प्रयोग हे डेव्हलपमेंटल सायकॉलॉजिस्ट वर्षानुवर्षे करत बसत.

17 व्या शतकापर्यंत डेव्हल्पमेंटल सायकॉलॉजी या विषयात मानसशास्त्रज्ञांना फारसा रस नसे. कारण मूल म्हणजे मोठ्या माणसांचंच एक छोटेखानी स्वरूप असतं अशीच त्या काळी समजूत होती. "लहान मुलांचं मन हे कोऱ्या पाटीसारखं असतं,' असं जॉन लॉक या तत्त्वज्ञानं मांडलं होतं. यामुळे आपण आपल्या आयुष्यात आलेल्या अनुभवांमुळे घडत जातो असं बऱ्याच जणांना वाटायला लागलं. पण दोन शतकांनंतर डार्विनच्या थिअरीमुळे याला आणखीनच एक वेगळं वळण लागलं. साध्या एकपेशीय जीवांपासून गुंतागुंतीच्या मनुष्यप्राण्यापर्यंत जशी उत्क्रांतीची वाटचाल झाली तसंच आपलं मनही लहानपणापासून वृद्धावस्थेपर्यंत घडत जातं असं त्यानंतर मानसशास्त्रज्ञांना वाटायला लागलं.

तो काळच प्रयोगांचा आणि मोजमापांचा होता. मग डेव्हलपमेंटॅलिस्टांनी भावनांच्या विकासाची मोजमापं करायला सुरवात केली. 1920 ते 1950 च्या दरम्यान अक्षरशः दर आठवड्याला दर महिन्याला शेकडो, हजारो मुलांवर प्रयोग करण्यात आले. त्यांची असंख्य मोजमापं घेण्यात येत. अमेरिकेत बर्कली, येल, हार्वर्ड अशा अनेक विद्यापीठांत हे प्रयोग चालत. मुलं केव्हा, कसं आणि काय शिकतात, कसं वागतात, कसं, काय आणि केव्हा लक्षात ठेवतात, कसा विचार करतात, हे या डेव्हलपमेंटॅलिस्टांना शोधायचं होतं. या सगळ्या प्रयत्नांना आणि प्रयोगांना एक भक्कम पाया आणि वेगळंच वळण एका प्रचंड गाजलेल्या मानसशास्त्रज्ञांमुळे मिळणार होतं. त्याचं नाव होतं जिऍ पिअँजे. मानसशास्त्रातली एकही पदवी नसतानाही स्किनवर आणि फ्रॉईड यांच्या खालोखाल नाव घेतलं जाणारा आणि बालमानसशास्त्रात क्रांती घडवून आणणारा हा जिऍ पिअँजे होता तरी कोण?

जिऍ पिअँजे (1896-1980) हा विसाव्या शतकातला सर्वश्रेष्ठ बालमानसशास्त्रज्ञ होता. "1920 च्या दशकात पिअँजे तरुण असताना त्यानं या क्षेत्रात फ्रान्स आणि स्वित्झर्लंडमध्ये आणि 30 वर्षांनंतर अमेरिकेत चक्क क्रांती घडवून आणली,' असं पिअँजेविषयी पीटर ब्रायंट हा प्रसिद्ध ब्रिटिश डेव्हलपमेंटॅलिस्ट म्हणतो. ""हा शोध लावायला इतका सोपा होता, की तो एखाद्या जीनियसलाच लागला असता,'' असं आइनस्टाइननं पिअँजेविषयी म्हणून ठेवलं होतं. पिअँजेनं यासाठी अतोनात कष्ट घेऊन असंख्य प्रयोग केले. लहान मुलांच्या वरवर बालिश वाटणाऱ्या विचारांमागेही काहीतरी लॉजिक (तर्क) असतं असं पिअँजेला वाटे.

पिअँजे एक खूपच सौम्य, दयाळू आणि प्रेमळ माणूस होता. त्याचे सहकारी त्याला प्रेमानं "बॉस' म्हणत. त्याच्या डोक्‍यावरच्या चपट्या टोपीच्या दोन्ही बाजूंनी पांढऱ्या केसांचे कल्ले दिसत. तोंडाच्या डाव्या बाजूनं पाइप ओढत तो सतत स्मित करत बोलत असे. पण तो इतका गंभीर असे, की लहान मुलांचे विनोद आणि खोड्या यांच्यात मात्र तो भाग घेऊ शकत नसे. वयाच्या 20 व्या वर्षापासून ते 80 वर्षांपर्यंत तो सतत मुलांची निरीक्षणं करत राहिला. वेगवेगळ्या वयाच्या मुलांना गोष्टी सांगणं, त्यांच्याबरोबर खेळणं, त्यांना कोडी घालणं यातून तो त्याचं निरीक्षण करून खूप बारकाईनं टिपणं ठेवे.

त्याचे प्रयोगही गंमतशीरच असत. तो लहान मुलाला एक खेळणं दाखवे आणि नंतर तो त्यावर एक टोपी ठेवे. हे प्रयोग तो वेगवेगळ्या वयाच्या (एक-एक आठवड्याच्या अंतरानं) अनेक मुलांवर अनेक वेळा करे. नऊ महिने वयाच्या आतली लहान मुलं ते खेळणं विसरत; पण त्यापेक्षा मोठ्या मुलांना ते खेळणं अजून टोपीखाली आहे, याची जाणीव असे आणि ती मुलं ते खेळणं घेण्यासाठी झेपावत किंवा तो मुलांना दोन एकसारख्या आकाराची काचेची भांडी दाखवे. दोघांत तो तितकंच पाणी भरे. नंतर कुठल्या भांड्यात पाणी जास्त आहे ते विचारे. सगळे जण दोघांत तेवढंच पाणी असल्याचं सांगत. नंतर त्यातल्या एका भांड्यातलं पाणी तो एका अत्यंत कमी व्यास असलेल्या पण उंच काचेच्या नळीवजा भांड्यात ओते. आता ते नळीवजा उंच भांडं आणि दुसरं काचेचं भांडं यापैकी कशात जास्त पाणी आहे ते विचारे आणि हे प्रश्‍न तो वेगवेगळ्या वयातल्या अनेक मुलांना वारंवार विचारत राही. सात वर्षांच्या आत वय असणारी मुलं त्या उंच, निमुळत्या नळीत जास्त पाणी असल्याचं सांगत, तर त्यापेक्षा मोठी मुलं दोघांत सारखंच पाणी असल्याचं सांगत.

असे असंख्य प्रयोग पिअँजेनं शेकडो, हजारो मुलांवर अनेक दशकं केले आणि त्यांच्या निरीक्षणांना तत्त्वज्ञान, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र यांची जोड घालून स्वतःची अशी त्यानं एक थिअरी तयार केली. आपल्या आयुष्यात जसजसं वय वाढेल, तसतसे आपल्या मनात आणि त्याच्या रचनेत आणि क्षमतेत टप्प्याटप्प्यात अनेक बदल होत जातात असा एक महत्त्वाचा निष्कर्ष त्यानं या सगळ्यांवरून काढला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे जन्मापासून साधारणपणे 15 वर्षे वय होईपर्यंत ही घडण्याची प्रक्रिया चालू असते.

स्वित्झर्लंडमधल्या न्यूशटेल इथे पिअँजे 9 ऑगस्ट 1896 रोजी जन्मला. फ्रॉईडसारखा तो "आऊटसायडर' कधीच नव्हता. त्यामुळे फ्रॉईडला ज्यू वातावरणातून जसा स्वतःचा मार्ग काढावा लागला तसा पिअँजेला काढावा लागला नाही. पाव्हलॉव्हला जशा आर्थिक संकटांचा सामना करावा लागला तसाही पिअँजेला करावा लागला नाही. विल्यम जेम्ससारखा पिअँजेचा ब्रेकडाऊनही झाला नाही. पण एवढं असूनही त्याला चांगलं आनंदी बालपण लाभलंच नाही. कदाचित म्हणूनच त्याला लहान मुलांमध्ये एवढा रस निर्माण झाला असावा. त्याचे वडील आर्थर पिअँजे इतिहासाचे प्राध्यापक होते. त्याची आई रिबेका जॅक्‍सन ही एक प्रचंड बुद्धिमान आणि उत्साही बाई होती, पण ती न्यूरॉटिक होती. त्याचे वडील नास्तिक होते तर आई प्रचंड धार्मिक होती. त्यांच्या स्वभावात इतके फरक होते, की त्यांचे नेहमी वाद होत. यामुळे पिअँजेचं लहानपण अस्थिर आणि वादळीच गेलं. त्यामुळे परीकथा, वेगवेगळे खेळ हे त्याच्या लहानपणी नव्हतेच. तोही मग त्याच्या वडिलांसारखा अभ्यासू आणि गंभीरच बनला. वयाच्या सातव्या वर्षापासून त्याला पक्षी, प्राणी, जीवाश्‍म, शंख, शिंपले, मासे यांच्यातच रस निर्माण झाला.

वयाच्या 10 व्या वर्षापासून पिअँजेनं त्या प्रदेशातल्या सजीवांवर चक्क एक पुस्तकही लिहिलं, पण वडिलांनी त्याचं फारसं कौतुक केलंच नाही. दहाव्या वर्षी त्यानं एक विशिष्ट तऱ्हेची चिमणी बघून त्यावर एक संशोधनप्रबंध लिहिला आणि "नॅचलर हिस्ट्री जर्नल'कडे पाठवून दिला. इतक्‍या लहान मुलानं ते लिहिलं आहे याची कल्पना नसल्यामुळे त्या जर्नलनं त्याचा तो लेख छापला. तिथल्या डायरेक्‍टरनं पिअँजेला मदतनीस म्हणूनही घेतलं. तिथल्या संग्रहालयातल्या शिंपल्यांवर लेबलं चिकटवण्याचं पिअँजे काम करायला लागला. दर आठवड्याला दोनदा असं चार वर्षे त्यानं हे काम केलं. 16 वर्षांचा होईपर्यंत तो शिंपल्यावर शोधनिबंधही लिहायला लागला होता.

हायस्कूलमधलं शिक्षण संपवून पिअँजे न्यूशटेल विद्यापीठात आला, पण सततच्या अभ्यासानं आणि लिखाणानं तो आजारी पडला. शेवटी हवापालटासाठी डोंगराळ भागात काही काळ राहिल्यानं त्याची तब्येत सुधारली आणि पुन्हा तो कामाला लागला. पिअँजे स्वतःला नॅचरल सायंटिस्टच समजे. त्याने याच विषयात डॉक्‍टरेटही मिळवली. यानंतर त्याला तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र यांच्यात रस निर्माण झाला. त्यानं काही काळ झ्युरिकमधल्या मानसशास्त्रावरच्या योगशाळेत काम केलं. त्यानं झ्युरिकमध्येच युंगची खूप लेक्‍चर्सही ऐकली. नंतर पॅरिसमधल्या सोर्बोन इथे त्यानं लॉजिक आणि ऍबनॉर्मल सायकॉलॉजीचा अभ्यास केला आणि त्यानंतर बिनेटचा सहकारी थिओडोर सायमन याच्या हाताखाली पॅरिसमधल्या 5 ते 8 वर्षांच्या मुलांच्या चाचण्या घेण्याचं काम दोन वर्षं केलं. कुठल्या वयापासून मुलं प्रश्‍नांची बरोबर उत्तरं द्यायला सुरवात करतात यापेक्षाही ठराविक वयाची मुलं तशाच चुका का करतात, या प्रश्‍नाचं उत्तर पिअँजे शोधत होता. या वेळी त्यानं शेकडो मुलांना जे हजारो प्रश्‍न विचारले तेव्हा तो या विषयात गुंततच गेला आणि हेच आपलं पुढचं कार्यक्षेत्र आहे, हे त्याच्या लक्षात आलं.

यानंतर जिनिव्हामधल्या अनेक संशोधनसंस्था आणि विद्यापीठं यांच्यात त्यानं काम केलं. त्यातल्याच रोसो इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या एका व्हॅलेंटाइन शॅटने नावाच्या विद्यार्थिनीबरोबर त्यानं लग्न केलं. त्यांना तीन मुलंही झाली. या दांपत्यासाठी आपली स्वतःची मुलं त्यांच्या संशोधनासाठी आयतीच "प्रयुक्त (सब्जेक्‍ट)' झाली. या काळात आणि यानंतर त्यानं अनेक मुलांवर अविरत प्रयोग केले. या सगळ्यातनं त्याला मुलांची भावनिक, बौद्धिक आणि वैचारिक वाढ वेगवेगळ्या वयात कशी होते, हे लक्षात यायला लागलं. यातूनच त्यानं मग त्याची थिअरी मांडली. पिअँजेनं 60 पेक्षा जास्त पुस्तकं आणि 100 हून अधिक लेख लिहिले मृत्यूच्या अखेरपर्यंत 16 सप्टेंबर 1980 पर्यंत त्याचं लिखाण आणि प्रयोग चालूच होते. बालमानसशास्त्रात पिअँजेनं आपल्या कामाचा कायमस्वरूपी ठसा उमटवला, हे मात्र नक्की!

मास हिस्टेरिया

August 21, 2011

जे
वेड मजला लागले तुजलाही ते लागेल का?' या बाबूजींनी गायिलेल्या गीताप्रमाणेच जर एखाद्या गोष्टीचं वेड हळूहळू आजूबाजूच्या हजारोंना लागलं तर कसा गोंधळ उडतो, याची अनेक उदाहरणं इतिहासात घडली आहेत आणि अजूनही ती घडताहेत. कुठल्याही दंगलीत, युद्धात आणि आनंदाच्या किंवा दुःखाच्या अनेक प्रसंगी एखादी गोष्ट एकानं केल्यावर अनेक लोक वेड्यासारखं करायला लागतात, यालाच "मास हिस्टेरिया' म्हणतात.

1480 ते 1700 या काळामध्ये युरोपमध्ये एक "विचहंट' नावाचा प्रकार गाजला. त्या काळात आपल्यावर कोणीतरी चेटूक करतंय असं अनेकांना वाटे. या चेटूक करणाऱ्या बायकांनाच "चेटकीण' किंवा "विच' असं म्हणत. त्यांच्यामुळेच आपल्यावर संकटं ओढवतात, असं समजून कित्येक चेटकिणींना लोक ठार मारत असत. त्यांना पकडून एका जागी आणत आणि त्यानंतर एक जण रागारागानं त्यांच्यावर दगड मारायला सुरवात करे. त्याचं बघून दुसरा, दुसऱ्याचं बघून तिसरा असं करत शेकडो/हजारो लोक आरडाओरडा करत यात मग सामील होत. हा एक तऱ्हेचा मास हिस्टेरियाच होता. 1480 ते 1700 दरम्यान सुुमारे 40,000 ते 1 लाख चेटक्‍यांना प्राण गमवावे लागले. या प्रकाराला मग "विचहंट' म्हणायला लागले.

मध्ययुगात नन्स होणाऱ्या मुलींना कडक शिस्त, उपास, अनेक धार्मिक बंधनं अशा वातावरणात सतत राहावं लागत असल्यानं बऱ्याचदा त्यांचं मानसिक संतुलन बिघडत असे आणि मग त्या खूप चित्रविचित्र गोष्टी करत. फ्रान्समध्ये एक नन एकदा मांजरासारखी "म्याऊ' आवाज करत ओरडायला लागली आणि थोड्याच वेळात सगळ्याच नन्स मांजरासारखं तास न्‌ तास ओरडायला लागल्या. शेवटी त्या परिसरातल्या इतर रहिवाशांनी तक्रार केली. तेव्हा मग चक्क सैनिकांना तिथे पाचारण करण्यात आलं होतं! एकदा जर्मनीमधली एक नन इतर नन्सना जेव्हा चावायला लागली तेव्हा हजारो नन्स ते बघून इतरांना चावायला लागल्या. हळूहळू हा "बाइटिंग मॅनिया' झपाट्यानं हॉलंड आणि इटलीमध्येही पसरत गेला. शेवटी ही चावाचावी थांबवता थांबवता युरोपमधल्या अनेक राज्यकर्त्यांची आणि धर्मगुरूंची दमछाक झाली!

मास हिस्टेरियाचा गमतीदार प्रकार म्हणजे "डान्स मॅनिया'. इतिहासात याची बरीच उदाहरणं आहेत. 1278 मध्ये 200 लोक जर्मनीत एका पुलावरून बेधुंदपणे आणि जोरकसपणे इतके नाचत होत,क्‍किी शेवटी तो पूल कोसळून पडला! यात बरेच लोक मरण पावले. 1373-74 च्या दरम्यान या डान्स मॅनियाच्या अनेक घटना इंग्लंडमधे नोंदवल्या गेल्या. त्यानंतर जर्मनी, नेदरलॅंड्‌स, पुढे इटली, मादागास्कर आणि फ्रान्स इथे या प्रकारानं थैमानच घातलं. 1518 मध्ये जुलै महिन्यात फ्रान्समधल्या स्ट्रासबर्ग ऍलसेस इथे एका बाईनं नाचायला सुरवात केली. चार दिवसांनी तिच्यासोबत नाचणाऱ्यांची संख्या 33 झाली, तर महिन्याभरात 400 झाली! त्यातल्या बऱ्याच जणांना हार्ट अटॅक्‍स येऊन ते मेले! डान्स मॅनिया सतराव्या शतकाच्या मध्याला अचानक थांबला.

पैसा मिळवण्याच्या हव्यासानं माणसांनी केलेल्या सट्टेबाजीच्याही अनेक घटना मास हिस्टेरिया म्हणूनही गाजल्या. 1636-37 च्या काळात "ट्युलिपोमॅनिया'नं नेदरलॅंडमधे अक्षरश: धुमाकूळ घातला. याच काळात नेदरलॅंड्‌समध्ये व्यापाराच्या जोरावर श्रीमंत झालेल्या मंडळींना ट्युलिपची फुलं बाळगणं म्हणजे प्रतिष्ठेचं लक्षण वाटू लागलं. मागणीच्या मानानं ट्युलिपच्या फुलांचा पुरवठा कमी असल्यानंही त्यांच्या किमती भरमसाट वाढायला लागल्या. यातूनच ट्युलिप्स जास्त भावानं विकण्याची सट्टेबाजी सुरू झाली. या वेळी एका कंदाची किंमत 5200 फ्लॉरिन्स इतकी झाली होती. एका कंदाची किंमत एखाद्याच्या आयुष्यभराच्या कमाईपेक्षाही जास्त किंवा 30 लाख इतकी झाली होती. हे भाव वाढत वाढत गगनाला भिडले.
पण हा वेडेपणा कुठेतरी थांबणारच होता. 1637 च्या फेब्रुवारी महिन्यात तीन तारखेला हार्लेमच्या बाजारात एक दिवस अचानकपणे या कंदांसाठी ग्राहक कमी झाले. आता भाव घटतच राहणार, त्यापेक्षा आत्ताच ते कंद विकलेले बरे, असं समजून सगळ्यांनी ते विकण्यासाठी ही गर्दी केली! मागणीच्या मानानं पुरवठा वाढल्यानं ट्युलिपच्या किमती आणखीनच धडाधड कोसळायला लागल्या. कालांतरानं मग जे कंद पूर्वी 5000 फ्लॉरिन्सला विकले जात होते ते शेवटी जेमतेम 100 फ्लॉरिन्सला विकले जायला लागले! त्याचा परिणाम असंख्य व्यापाऱ्यांचं आणि ग्राहकांचंही अतोनात नुकसान झालं. शेकडो मंडळी कंगाल होऊन भिकेला लागली. ट्युलिपचा हा बबल असा फुटल्यानं नेदरलॅंड्‌समध्ये नंतर बराच काळ मंदीचं वातावरण निर्माण झालं. ट्युलिप मॅनियाप्रमाणेच साऊथ सी बबल आणि मिसिसिपी बबल हेही इतिहासात गाजले. अगदी अलीकडेसुद्धा डॉटकॉम बबल आणि हाऊसिंग बबल हासुद्धा याच वेडेपणाचा एक प्रकार होता. 1920 आणि 30 च्या दशकामध्ये इंग्लंड आणि अमेरिकेमधे ग्रेट डिप्रेशनमुळे मास हिस्टेरियाचे अनेक प्रकार घडले. यातले दोन खूपच गाजले.

याच काळात इंग्लंडमध्ये रेडिओवरून एक उपहासात्मक नाटक (सटायर) प्रक्षेपित करण्यात आलं. यामध्ये एक बेरोजगारांचा घोळका बेफाम आणि बेछूट वागायला लागला आहे, अशी बातमी दिली जातीय असं रंगवलं होतं. श्रोत्यांना ही नाटकातली नव्हे, तर खरोखरचीच बातमी सांगताहेत असं वाटावं इतकं ते नाट्य हुबेहूब रंगलं होतं. त्या काळात तरुणांमध्ये बेरोजगारी खरोखरच वाढली होती आणि असंतोषही पसरला होता. यामुळे खरोखरच लोकांमध्ये प्रचंड घबराट उडाली. हजारो/लाखो लोक रस्त्यावर आले, हजारो फोन खणखणायला लागले आणि एकाच दिवसात असंख्य पत्रं याविषयी लिहिली गेली. याच काळात अमेरिकेतही रेडिओवर एका नाटकात मंगळावरून एक भलंमोठं सैन्य पृथ्वीवर चालून आलंय आणि सध्या त्यानं न्यू जर्सीमध्ये तळ ठोकलाय, असं चित्र उभं केलं होतं. त्या काळात परग्रहावरील जीवांविषयी बरीच उलटसुलट चर्चा चालू होतीच आणि हे नाटकसुद्धा जसं काही प्रत्यक्षात घडलंच आहे, असं वाटावं इतक्‍या प्रभावशाली पद्धतीनं मांडलं होतं. हे ऐकून अन्नपदार्थ, पांघरण्यासाठी घोंगडी घेऊन आपल्या मुलांना दिसेल त्या गोष्टी गाडीत कोंबून लाखो अमेरिकन रडत, एकमेकांचं सांत्वन करत मिळेल त्या दिशेनं देवाचा धावा करत सुसाट बाहेर पडले होते. जेव्हा हे सगळं खोटं आहे हे लक्षात आलं त्या वेळी सगळ्या देशाला हायसं वाटलं, पण अनेकांना सीबीएस रेडिओचा राग येऊन त्याच्यावर अनेक खटले भरले गेले.

1962 मध्ये टांझानियामधल्या एका शाळेत एका विद्यार्थ्याच्या हसण्याची बाकीच्या विद्यार्थ्यांना लागण झाली आणि नंतर हे प्रकरण वाढत वाढत जाऊन हळूहळू सगळी शाळा आणि नंतर सगळं गावच आणि त्याच्या आसपासची अनेक गावं आणि जिल्हे, आणि खरं म्हणजे सगळा देशच कित्येक दिवस आणि आठवडे हसत सुटला. शेवटी परिस्थिती काबूत आणण्यासाठी चक्क सैन्याला बोलवावं लागलं होतं! यातल्या कित्येक मंडळींना अति हसण्यानं पोटदुखीसारखे आजार उद्‌भवल्यानं शेवटी हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यावे लागले होते.

1963 मध्ये दक्षिण कोरियामध्ये तर कहरच झाला. तिथल्या काही ग्रामीण भागामधले बहुतांशी पुरुष पादायला लागले. हे पादण्याचं प्रमाण इतकं वाढत गेलं, की दक्षिण कोरियापुढे चक्क याचं पादसंकट उभं राहिलं! कोबीच्या आणि किमची नावाच्या एका मसाल्याच्या अतिरिक्‍त सेवनामुळे ही पादण्याची लाट पसरली होती असं म्हणतात.

1974 मध्ये संपूर्ण लेनिनग्राडमध्ये एका अफवेनं खळबळ माजली होती. तिथल्या एका प्रसिद्ध बागेतल्या कारंज्यामधून व्होडकाचे फवारे उडताहेत, अशी बातमी हां हां म्हणता सगळीकडे पसरली, आणि मग ही चकट फू व्होडका पिण्यासाठी लोकांनी इतकी मोठी रांग केली, की ती रांग 115 कि.मी. झाली होती! या कारंज्यातून निघणाऱ्या पाण्यात व्होडकाच काय, पण कुठल्याच मद्याचा लवलेशही नसल्याचं जाहीर करूनही लाखो रशियन पुरुष, महिला, मुलं त्या व्होडकाच्या आशेनं बागेकडे धाव घेत होती. आणि एवढंच नव्हे, तर ती प्यायलेले लोक दारूच्या नशेत असल्यासारखंच झोकांड्या देत फिरतही होते. ही परिस्थिती इतकी नियंत्रणाबाहेर गेली, की शेवटी रशियन पोलिसांना तिथे येऊन बराच काळ हवेत गोळीबार करून लोकांना पांगवावं लागलं आणि जेव्हा ती कारंजी स्फोटकं वापरून उद्‌ध्वस्त केली तेव्हा कुठे सारं कसं शांत शांत झालं!

1976 मध्ये फ्रान्समध्ये एक कागद देशभर फिरत होता. त्या कागदावर साइट्रिक ऍसिड ज्यात आहे अशा पदार्थांनी कॅन्सर होतो अशा पदार्थांची यादी टाइप केलेली होती. हे ऍसिड तर जवळपास सगळ्या फळांमध्ये सापडत होतं. त्यामुळे फळंच कोणी खाईना. इंग्लंड, जर्मनी, आफिका इथे अनेक फळांचे ढिगारे नुसते पडून राहायला लागले. संपूर्ण युरोपभर 1970 आणि 80 च्या दशकात फळांच्या विरुद्धच्या या मास हिस्टेरियाच्या चळवळीनं खूपच धुमाकूळ घातला होता.

21 डिसेंबर 1995 या दिवशी आपल्या भारतात- दिल्लीत, "गणपती दूध पितो' या अफवेनं असंच सगळ्यांना वेडं केलं होतं. ही बातमी वाऱ्यासारखी देशभर आणि परदेशातही पसरली. अगोदरच रोजच हिस्टेरिया झाल्यासारखं वागणाऱ्या टीव्ही चॅनेल्सना तर ऊतच आला होता! या घटनेवर अनेक राजकारणी, मंत्री, अभिनेते आणि कित्येक प्रसिद्ध मंडळींनीही विश्‍वास दाखवला होता, इतकंच नाही, तर आपल्याकडल्या गणपतीनंही दूध प्यायल्याचा दावा कित्येकांनी केला होता. शेवटी "दगडी मूर्तीतल्या दगडाच्या सच्छिद्र गुणधर्मामुळे दूध शोषलं जातं, गणपती काही ते पीत नाही,' असं संशोधकांनी जाहीर केल्यावर या प्रकरणावर पडदा पडला आणि गणपतीबाप्पानं हुश्‍श केलं आणि तो मोदक खायला मोकळा झाला!
आजही अनेक धार्मिक स्थळी प्रचंड चेंगराचेंगरी आणि हल्लकल्लोळ माजल्यामुळे शेकडो, हजारो लोक मृत्यूमुखी पडतात. तोही एक मास हिस्टेरियाचाच प्रकार असतो. हिस्टेरियाचा धुवॉं पसरून कोणतं रूप धारण करू शकतो हे अमिताभच्या "दोस्ताना' या चित्रपटातल्या गाण्यावरूनही आपल्या लक्षात येईल, दिल्लगीने दी हवा, थोडासा उठा धुवॉं, और आग जल गयी...

बघ्यांची वागणूक

August 14, 2011

1964 मध्ये मार्च महिन्यात न्यूयॉर्कच्या क्वीन्सबरोमधल्या क्‍यू गार्डन्स इथे एक खून झाला. न्यूयॉर्क टाइम्सच्या मुखपृष्ठावर त्याची बातमी झळकली. तसं पाहिलं तर या बातमीत सनसनाटी असं काहीच नव्हतं, पण तरीही या बातमीनं खळबळ माजवली होती. किटी जेनोव्हीज ही एक बारमध्ये मॅनेजर म्हणून काम करणारी बाई पहाटे तीन वाजता बार बंद करून आपल्या घरी निघाली असताना विन्स्टन मॉसले या माणसानं रस्त्यात तिला भोसकून मारलं होतं. त्यानं पूर्वीही दोन बायकांचा खून केला होता, पण किटीचा खून तासभर चालल्यामुळे एवढा गाजला होता. किटीला एकदा भोसकून रक्तबंबाळ अवस्थेत तसंच विव्हळत ठेवून मॉसले तिथून निघून गेला. पण काही काळात पुन्हा परतला आणि त्यानं तिला पुन्हा भोसकून तिथून काढता पाय घेतला. असं त्याने अनेक वेळा केलं. या सगळ्या काळात किटी मोठमोठ्यानं मदतीसाठी धावा करत होती. त्या बागेजवळच्या घरात राहणाऱ्या 38 लोकांनी तिचा आक्रोश ऐकून लगेच आपल्या खिडक्‍या उघडून ते दृश्‍य बघायला सुरवात केली खरी, पण हे सगळं नाट्य चालू असताना एकही माणूस तिच्या मदतीला धावला नाही. शेवटी तिचा मृत्यू झाल्यावरच एकानं पोलिसांना फोन केला. न्यूयॉर्क टाइम्सच्या मुखपृष्ठावर झळकलेली ही बातमी सनसनाटी ठरली होती ती फक्त निर्घृण खुनामुळेच नव्हे, तर त्याहीपेक्षा त्या बघ्यांच्या वागणुकीमुळे!

आधुनिक युगात माणसं कशी भावनाशून्य झाली आहेत, याविषयी यानंतर अनेक लेख आले आणि अनेक मानसशास्त्रज्ञांनीही मग या घटनेचं त्यांच्या परीनं विश्‍लेषण केलं. न्यूयॉर्कमध्ये वाढलेल्या एकूणच गुन्हेगारीचा हा परिणाम आहे आणि या भानगडीत आपण पडलो तर आपल्यावरच गदा येईल, या भीतीनं कुणी काही केलं नाही, असं डॉ. जॉर्ज सर्बन यानं मांडलं.

पण न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या न्यूयॉर्क विद्यापीठातल्या जॉन डार्ले आणि बिब लाटाने या दोन मानसशास्त्रज्ञांना मात्र हे मत खूपच पोकळ वाटलं. ते दोघं याविषयी रात्रभर चर्चा करत होते. त्या खुनाचा विषय काही कोणाच्याही डोक्‍यातून जात नव्हता. 38 लोकांनी तो खून होताना बघूनही काहीच कसं केलं नाही, याविषयी सगळ्या वर्तमानपत्रांत रकानेच्या रकाने भरून येत होते. सगळ्या टीव्ही चॅनेल्सवर अनेक तज्ज्ञ याविषयी आश्‍चर्य दाखवत होते. पण त्या रात्री याविषयी बोलतानाच डार्ले आणि लाटाने यांना एक ब्रेनवेव्ह आली आणि त्यातूनच एक इनसाइट मिळाली. 38 लोकांनी हे दृश्‍य बघितल्यामुळेच उलट कोणी काही केलं नसावं; दोघंतिघंच बघे असते तर त्यांनी काहीतरी करण्याची शक्‍यता बरीच जास्त होती, असं त्यांना अचानक वाटलं. त्यांची चर्चा संपली तेव्हा पहाट झाली होती. त्यांनी त्याचं हायपोथेसिस तपासून बघण्यासाठी "बघ्यांची वागणूक' यावर प्रयोग आणि संशोधन सुरू करण्याचं ठरवलं.
1968 मध्ये डार्ले आणि लाटाने यांनी यासंबंधी विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांवर त्यांचे प्रयोग केले. डार्ले-लाटाने यांनी त्या विद्यार्थ्यांमध्ये आपलीही काही मुलं पेरली होती. ते सगळे एकत्र बोलत असताना या पेरलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकानं फीट आल्याचं नाटक केलं. या फीटविषयी एकालाच समजलं तर त्याची प्रतिक्रिया काय होते, काहींना समजलं तर त्यांची प्रतिक्रिया काय होते आणि अनेकांना समजलं तर त्यांची प्रतिक्रिया काय होते आणि त्यातले किती मदतीला धावून येतात, याची डार्ले-लाटाने यांनी निरीक्षणं केली, आणि असं अनेक वेळा करून त्यांनी मोजमापं करून आकडेवारीसहित निष्कर्षही काढले. जेव्हा (काल्पनिक) फीट यायच्या वेळी शेजारी दुसरा एकच विद्यार्थी हजर होता तेव्हा तो मदतीला पुढे येण्याची शक्‍यता 85 टक्के होती. (म्हणजे 100 प्रयोगांत 85 वेळा तो विद्यार्थी (दर वेळेला वेगवेगळा) मदतीसाठी पुढे आला.) पण फीट येण्याच्या वेळी तिथे जेव्हा जास्त विद्यार्थी हजर होते तेव्हा फक्त 31 टक्के विद्यार्थी मदतीसाठी पुढे आले. म्हणजे जसजशी बघ्यांची संख्या वाढत होती, तसतशी कुणीतरी मदतीसाठी पुढे येण्याची शक्‍यता मात्र कमीत कमी होत चालली होती.

दुसऱ्या एका प्रयोगात एका लिफ्टमधून जाताना मुद्दामहून एक नाणं खाली पाडणं आणि लिफ्टमधून चाललेला दुसरा कोणी ते उचलून द्यायला मदत करतो का हे बघणं, असं चालू झालं. जेव्हा त्या लिफ्टमध्ये दुसरा एकच माणूस असायचा तेव्हा 40 टक्के वेळा तो दुसरा माणूस ते उचलून द्यायला मदत करायचा; पण जेव्हा त्या लिफ्टमध्ये जास्त माणसं असायची तेव्हा हेच प्रमाण 20 टक्‍क्‍यांवर घसरायचं. डार्ले-लाटाने यांनी असे वेगवेगळे 40 च्या वर प्रयोग केले आणि यातला प्रत्येक प्रयोग अनेकदा करून निष्कर्ष काढले. हे सगळे बघे एकत्र आहेत का, ते एकमेकांना बघू शकताहेत का, अशा अनेक गोष्टींचाही बघ्यांच्या वागणुकीवर काय परिणाम होतो, याचाही मग अभ्यास झाला.

या प्रयोगानंतर डार्ले आणि लाटाने यांना क्‍यू गार्डन्समधल्या 38 बघ्यांच्या निष्क्रियतेचं मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून स्पष्टीकरण मिळत होतं. यालाच मग ते "बायस्टॅंडर इफेक्‍ट' असं म्हणायला लागले. त्यांच्या मते, अशा वागणुकीमध्ये किंवा "बायस्टॅंडर इफेक्‍ट'मधल्या वागणुकीसाठी तीन कारणं होती. एक म्हणजे इतर सगळे हजर असताना आपणच काहीतरी कृती करायला जाणं योग्य आहे की नाही, हा प्रश्‍न प्रत्येकाच्या मनात येतो आणि त्यामुळे कोणीच मदतीला पुढे येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, ज्याअर्थी इतर कोणीच मदतीला पुढे येत नाहीयेत, त्याअर्थी तीच सगळी माणसं बरोबर असली पाहिजेत आणि आपणही तसंच वागलं पाहिजे, असं प्रत्येकाला वाटतं आणि मग सगळेच मागे राहतात. तिसरी गोष्ट म्हणजे, अनेक जणांनी ती गोष्ट बघितल्यामुळे काहीतरी करण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे, आपली एकट्याचीच नाही, हे कळल्यामुळे नैतिक ओझं बरंच कमी होतं आणि मग प्रत्येक जण गप्प बसतो. लाटाने आणि त्यांचे सहकारी यांनी यानंतर सहा लोकांना एकत्र करून टाळ्या वाजवायला सांगितल्या. यानंतर त्यानं फक्त एकाच माणसाला टाळ्या वाजवायला सांगितल्या. त्या वेळी त्यांना एक आश्‍चर्यकारक गोष्ट आढळली. जेव्हा 12 हात टाळ्या वाजवत होते तेव्हाचा टाळ्यांचा आवाज हा दोन हातांच्या टाळ्यांच्या आवाजापेक्षाही हळू येत होता. इतर लोक तीच गोष्ट करत असताना आपण कशाला ती करायला जा, आणि आपण ती नाही केली तर कोणाला कळणार आहे, हीच त्यात भावना असते, असं लाटानेच्या लक्षात आलं. रस्सीखेचीच्या शर्यतीत हेच दिसून येतं. याला "सोशल बक पासिंग' असं म्हणतात.

डार्ले-लाटाने यांच्या प्रयोगामुळे "बायस्टॅंडर इफेक्‍ट'मध्ये अनेक संशोधकांना रस वाटायला लागला. पुढच्या 10-12 वर्षांत तीस प्रयोगशाळांत मिळून यावर 56 वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. प्रत्येक प्रयोगात अनेक बघे निवडले होते आणि खात्री करून घेण्यासाठी प्रत्येक प्रयोग हा अशा बघ्यांच्या अनेक गटांवर झाला. यात एकूण मिळून 6000 लोकांना वेगवेगळ्या मुद्दामहून तयार केलेल्या इमर्जन्सीच्या परिस्थितीतून जावं लागलं. या 56 प्रयोगांपैकी 48 प्रयोगांत "बायस्टॅंडर इफेक्‍ट' स्पष्टपणे दिसून आला.

1978 मध्ये बेमोन आणि इतर काही संशोधकांनी आणखी एक गोष्ट दाखवून दिली. जेव्हा या "बायस्टॅंडर इफेक्‍ट'विषयी त्या बघ्यांना जाणीव करून दिली तेव्हा त्यांची निष्क्रियता कमी झाली होती. यासाठी संशोधकांनी दोन गट केले. एक गटाला "बायस्टॅंडर इफेक्‍ट' म्हणजे काय, याविषयी माहिती दिली. दुसऱ्या गटाला ही माहिती दिली नाही. यानंतर दोन आठवड्यांनंतर या दोन्ही गटांना वेगवेगळ्या वेळी एका पार्कमध्ये नेलं. दोन्ही वेळी जवळच्या एका बाकावरून एका माणसानं एकदम बेशुद्ध होऊन पडल्याचं नाटक केलं. पण हे नाटक आहे हे कोणालाच माहीत नव्हतं. ज्या गटाला "बायस्टॅंडर इफेक्‍ट'विषयी कल्पना होती त्यांच्यापैकी 50 टक्के मदतीसाठी पुढे आले, तर दुसऱ्या गटातले फक्त 25 टक्केच पुढे आले. अँड्य्रू मॉर्माईल या 17 वर्षांच्या मुलावरही मॅनहटनमध्ये ट्रेननं प्रवास करत असताना चक्क दिवसाढवळ्या चालत्या रेल्वेच्या डब्यात एकानं हल्ला करून पोटात सुरा खुपसला. या वेळी त्या डब्यात असलेल्या 11 लोकांपैकी मदतीला कोणीच पुढे धावलं नाही. शेवटी अँड्य्रू रक्तबंबाळ होऊन जागच्या जागीच मरण पावला. या घटनेवर "द इन्सिडेंट' नावाचा एक चित्रपटही निघाला होता. भारतात रस्त्यावर कोणी चक्कर येऊन पडला असेल किंवा कुठला अपघात झाला असेल तर कोणीच मदतीला येत नाही, हे आपण अनेकदा बघतोच. तेव्हाही तो "बायस्टॅंडर इफेक्‍ट'च असतो.

बघ्यांची संख्या जास्त असली म्हणजे मदत करायला कुणीच केव्हाच पुढे येत नाही, असं मात्र नाही. जर अशी मदत करणं हे शौर्याचं लक्षण असून, आपण मदत करायला पुढे आलंच पाहिजे, अशी जर सगळ्यांची समजूत झाली असेल तर मात्र बघ्यांची संख्या जास्त असूनही लोक चटकन पुढे येऊ शकतात. कारण तसं करण्यात सन्मान आणि कौतुक असतं. इतरांकडून त्यामुळे मान्यता मिळते. थोडक्‍यात, समाजात आत्मकेंद्री मूल्यांऐवजी सामाजिक हिताची मूल्यं रुजली असतील तर लोक इतरांची मनं जिंकण्यासाठी किंवा त्यांच्यावर छाप पाडण्यासाठी का होईना, पण एकमेकांना मदतीसाठी पुढे धजावतील. "आता ते पुढे येत नाहीत, कारण "आपण बरं आणि आपलं बरं' अशा समाजात रुजलेल्या आत्मकेंद्री मूल्यांमुळेच' असं काही मानसशास्त्रज्ञांना वाटायला लागलं. दुसऱ्यांना मदत करणं हे चांगलं आहे, अशी विचारसरणी असलेल्या एका गटात जेव्हा जास्त लोक हजर होते तेव्हा मदत करायला पुढे येणाऱ्यांची संख्या 74 टक्के होती; पण जेव्हा या बघ्यांची संख्या कमी होती तेव्हा फक्त 39 टक्के लोकच मदतीला पुढे आले. कारण आपलं कौतुक फारसं होणार नाही, असं कदाचित त्यांना वाटलं असावं. थोडक्‍यात, समाजातल्या मूल्यव्यवस्थेमुळे (व्हॅल्यू सिस्टीम) माणसांच्या वागणुकीत फरक पडतो, यात शंकाच नाही!

सोशल सायकॉलॉजी

August 07, 2011

खाद्याच्या भावना, प्रेरणा आणि वागणूक अशा सगळ्या गोष्टी इतरांमुळे कशा बदलतात, त्यांचा त्याच्यावर काय परिणाम होतो, याचा अभ्यास म्हणजेच "सोशल सायकॉलॉजी'.

गॉर्डन ऍलपोर्ट याच्या मते, प्लेटो हा सोशल सायकॉलॉजीचा जनक म्हटला पा हिजे. त्यानंतर ऍरिस्टॉटल, हॉब्ज, बेंथम, ऑगस्ट कॉम्ट, हर्बर्ट, स्पेन्सर वगैरे अनेकांनी याविषयी विचार केला होता. 1987 मध्ये सोशल सायकॉलॉजीवर प हिला प्रयोग नॉर्मन र्टिप्लेट यानं केला. सायकल चालवताना एखाद्याबरोबर इतरही कोणी सायकल चालवत असेल तर तो नेहमीपेक्षा जास्त भरभर सायकल चालवतो, याचं त्यानं निरीक्षण केलं होतं. यावर त्यानं वेगवेगळ्या तऱ्हेनं प्रयोगही केले, पण आधुनिक सोशल सायकॉलॉजी ही गेल्या शतकापासूनच सुरू झाली. कार्ट लेव्हिन या बर्लिन विद्यापीठातल्या जेस्टाल्टिस्टनं याचा पाया घातला. यानं तर 1950 आणि 1960 च्या दशकात जवळपास सगळ्याच अमेरिकन विद्य ापीठात सोशल सायकॉलॉजी हा विषय शिकवला जायला लागला.

सॉलोमन ऍश (1907-1996) या जगप्रसिद्ध जेस्टाल्ट मानसशास्त्रज्ञानं इतर लोकांच्या थोड्याशा दडपणामुळेही माणूस आपली मतं कशी बदलतो हे सिद्ध करण्यासाठी 1950 मध्ये एक प्रयोग केला. या प्रयोगात ऍशनं आठ लोकांचा एक गट केला. त्यातले सात जण हे मानसशास्त्रज्ञांनी निवडलेली त्यांची खास माणसं होती! ती विचारलेल्या प्रश्‍नांना हळूहळू चुकीची उत्तरं देणार होती आणि त् याचा आठव्या माणसावर (प्रयुक्तावर) काय परिणाम होतो, हे त्या मानसशास्त्रज्ञांना बघायचं होतं. पण या सर्व योजनेविषयी प्रयुक्ताला काहीच माहीत नव्हतं. ऍशच् या या प्रयोगातून खूपच गंमतशीर निष्कर्ष निघत होते. आजूबाजूच्या लोकांची उत्त् ारं जसजशी बदलत गेली तसतसं प्रयुक्ताचं उत्तरही बदलत गेलं. आपलं उत्तर इतरांशी न जुळल्यामुळे आपली चेष्टा होईल, या भीतीपोटी त्याची उत्तरं बदलत होती. ऍशचे प्रयोग मानसशास्त्रात प्रचंड गाजले. यानंतर त्यासारखेच अनेक प्र योग अनेक वर्षं होत राहिले.
1971 मध्ये स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या फिलीप डिम्बार्डो याच्या नेतृत्वाखाली "स्टॅ नफर्ड मॉक प्रिझन एक्‍स्परिमेंट' हा प्रयोगही प्रचंड गाजला. त्या काळी पाश्‍चिमात्य देशांत तुरुंगांमध्ये कैद्यांनी केलेल्या दंग्यांचं प्रमाण खूपच वाढलं होतं. तुरुंगातले कैदी, त्यांच्यावर हुकुमत गाजवणारे गार्डस्‌ आणि तुरुंगातले नियम या तिघांपैकीच कुठेतरी चूक होत असली पाहिजे, असं तज्ज्ञांना वाटत होतं.

यापैकी खरं कारण शोधण्यासाठी झिम्बार्डोनं एक प्रयोग केला. त्यासाठी त्यानं स्टॅ नफर्ड विद्यापीठातच चक्क एक भयानक प्रतितुरुंग (मॉक प्रिझन) बनवला. या तुरु ंगात कैदी आणि गार्डस्‌ म्हणून काम करण्यासाठी त्यानं वृत्तपत्रात चक्क जा हिरातही दिली. या मॉक प्रिझनमध्ये काम करणाऱ्यांना रोज 15 डॉलर याप्रमाणे रोजगारही मिळणार होता. जवळपास 75 अर्जदारांपैकी झिम्बार्डोनं 24 लोकांची निवड केली. भरती करताना ते भावनिकदृष्ट्या स्थिर, कायदा पाळणारे, शांत स् वभावाचे आहेत, याविषयीची खात्री करून घेतली होती. निवडलेल्या लोकांचे 12-12 जणांचे दोन गट त्यानं केले. एका गटातले लोक कैदी, तर दुसऱ्या गटातले लोक गार्डस्‌ झाले. या प्रयोगांच्या दरम्यान त्यांना खूप तणावपूर्ण आणि कठीण परिस्थितीतून जायचं असल्याचं त्यानं सगळ्यांना बजावलं होतं. कोण कुठल्या गटात जाईल हे चक्क नाणेफेक करून ठरवलं होतं. स्वतः झिम्बार्डो जेल सुपरिंटेंडंट झाला.

प्रयोगाची सुरवात होईपर्यंत कैद्यांना आपापल्या घरीच थांबायचं होतं. त्यानंतर गाडर् स्‌ झालेल्या पोलिसांनी अचानकपणे त्यांच्या घरावर धाड टाकून कैद्यांना पकडलं, त्यांच्यावर दरोडे आणि चोरीचे आरोप ठेवले आणि त्यांना तुरुंगात आणलं. आता खरा प्रयोग सुरू झाला. खऱ्या कैद्यांप्रमाणे याही कैद्यांचे हातांचे ठसे घेऊन, त्यांना दरडावून, धमकावून त्यांच्यावरच्या आरोपांचं वाचन झालं, आणि मग त्यांना जेलमध्ये कैद केलं. तुरुंगात आणताना कैद्यांचे पूर्ण कपडे काढून तपासणी करणं, त्यांना बेड्या घालणं, त्यांच्याकडल्या सगळ्या चीजवस्तू काढून घेणं, हे सगळं अगदी रीतसर झालं. गार्डस्‌ झालेल्या लोकांना खऱ्या गार्डस्‌सारखेच खाकी पोशाख, लाकडी बंदुका, शिट्ट्या, दंडुके वगैरे साहित्य देण्यात आलं. कैद्यांना कोणतीही शारीरिक शिक्षा करू नये, अशी अट झिम्बार्डोनं सगळ्या गार्डस्‌ना घातली. गार्डस्‌नी तुरुंग कसा सांभाळायचा याविषयीच्या दहा नियमांची यादी चटकन बनवली. कैद्यांनी ठराविक वेळीच खायचं आणि जेवताना कोणाशीही बोलायचं नव्हतं. कैद्यांना त्यांच्या नावाऐवजी नंबरांप्रमाणे पुकारलं जावं असे ते नियम होते. कोणीही नियम तोडल्यास त्याला शिक्षा मात्र होणार होती. प्रयोगाच्या दरम्यान झिम्बार्डोनं गार्डस्‌ लोकांना कैद्यांच्या मनामध्ये भीती, नैराश्‍य, कमालीचा कंटाळा या भावना निर्माण झाल्या पाहिजेत; त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं पा हिजे आणि त्यांना दुबळेपणाच्या भावनेनं ग्रासलं पाहिजे, असा आपला हेतू स्पष्ट केला होता. कैद्यांना कुठल्याही तऱ्हेचा एकांत मिळू नये याचीही खबरदारी घेतली होती. बाकी तुरुंग कसा सांभाळायचा, हे झिम्बार्डोनं त्यांच्यावरच सोपवलं. पुढचे 15 दिवस हा प्रयोग सुरू राहणार होता.

प्रयोगाच्या पहिल्याच रात्री अनेक वेळा गार्डस्‌नी जोरात कर्णकर्कश्‍श शिटी वाजवून कैद्यांना सतत जागं केलं. इथे खरी सत्ता कोणाच्या हातात आहे आणि इथे कोणाचा नियम चालतो हे त्यांना दाखवून द्यायचं होतं. काही तासांतच कैद्यांना न्यूनगंड येऊन आपणच स्वतः खरंच कुठेतरी कमी आणि वाईट असल्यासारखं वाटायला लागलं. याउलट कैदी कसे बेशिस्त आणि खतरनाक आहेत, असं गार्ड स्‌ना वाटायला लागलं. कैद्यांनाही गार्डस्‌ हे जुलमी, सॅडिस्ट वाटायला लागले. त्यांच्यातले संबंध भराभर बिघडत गेले.

प्रयोगाच्या दुसऱ्याच दिवशी कैद्यांनी तुरुंगातल्या व्यवस्थेच्या विरोधात दंगल केली. सकाळीच त्यांनी आपले गणवेश फाडून टाकले आणि आपले बिछाने आपल्या खोलीच्या दाराकडे ढकलून खोली बंद करून टाकली. त्याबरोबर तिथले गार्डस्‌ खूपच चिडले आणि आणखी तीन राखीव गार्डस्‌ची कुमक मागवली. या दंगलीवर नियंत्रण आणण्यासाठी गार्डस्‌नी फायर एस्टिंग्विशर्सचा वापर केला. शेवटी खोलीत शिरून गार्डस्‌नी त्या कैद्यांना नग्न केलं; त्यांचे बिछाने काढून घेतले आणि त्यांच्यावर खूपच जरब दाखवली. आता कैदी गार फरशीवरच झोपायला लागले. गार्डस्‌नी यानंतर त्यांचे नियम आणखीनच कडक केले. यामुळे एका कैद्याचं मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडल्यामुळे त्याला तुरुंगातून बाहेर जा ण्याची परवानगी द्यावी लागली! झिम्बार्डोला आणि इतरही अनेक मानसशास्त्रज्ञांना या सगळ्या प्रकाराचं खूपच आश्‍चर्य वाटलं.

सुरवातीला कैदी मंडळी गार्डस्‌कडे गंभीरपणे बघत नसत. आपलं व्यक्तिमत्त्व आणि अभिमान दाखवण्यासाठी त्यांच्या सूचना न पाळणं, त्यांची टर उडवणं, त्या ंना प्रत्युत्तर देणं, असले प्रकार होत असत. पण गार्डस्‌ मंडळींची कठोर आणि शिस्तबद्ध वागणूक बघून कैदी खूपच नरमले होते आणि गार्डस्‌ सांगतील तसं निमूटपणे कवायत करणं, प्रचंड श्रमांची कामं करणं, असं सगळं ते करायला लागले.

कैद्यांची रोजची हजेरी, कवायत या नेहमीच्या गोष्टीही जितक्‍या त्रासदायक करता येतील त्या पद्धतीनं केल्या जात असत. कैद्यांना टॉयलेट्‌स हॅंडग्लोव्ह्‌ज न घालता साफ करायला सांगितले गेले. आता मात्र कैदी खूपच खच्ची होत चालले होते. गार्डस्‌मधलाही सॅडिझम वाढत चालला होता, याचं खुद्द गार्डस्‌नाही आश्‍ चर्य वाटत होतं. आपण पूर्वी किती शांत होतो! आताच असे का वागायला लागलो आहोत, हे त्यांचं त्यांनाच उमगत नव्हतं. झिम्बार्डो आणि कंपनीलाही कै दी आणि गार्डस्‌ यांच्यात इतके झटपट बदल होतील असं वाटलंच नव्हतं. एकदा झिम्बार्डोनं अचानकपणे जाहीर केलं, की सहभागी गार्डस्‌ मंडळींना कसलं ही मानधन मिळणार नाही. पण गमतीचा भाग असा, की तरीसुद्धा त्यातल्या एकानं ही या प्रयोगातून बाहेर पडण्याचं नाव घेतलं नाही.
तिथलं वातावरण सहन न झाल्यामुळे एका कैद्यानं उपोषण सुरू केलं. इतर कैदीही उपोषण करतील असं झिम्बार्डोला वाटलं होतं; पण झालं उलटंच. इतर सगळे कै दी त्या कैद्याला चक्क शिव्या देत होते. त्यांच्यातली एकी आता पूर्णपणे संपली होती. ते कैदी स्वतःला गुन्हेगार आणि शिक्षेला पात्र असंच समजायला लागले होते आणि गार्डस्‌नाही ते कैदी किती वाईट आहेत आणि त्यांना घडा शिकवायलाच पाहिजे, असं वाटायला लागलं होतं.

प्रयोगाच्या सहाव्या दिवशी झिम्बार्डोची प्रेयसी ख्रिस्तिना मॅस्टॅक आणि काही पत्र कार कैद्यांचे आणि गार्डस्‌ मंडळींचे इंटरव्ह्यू घ्यायला आले. त्या वेळी हातकड्या घातलेले कैदी खाली माना घालून गार्डस्‌च्या शिव्या खात खात स्वच्छतागृहां कडे चालले होते. तिथला सगळा प्रकार बघून ती अवाकच झाली आणि तिच्या डोळ्यांत चक्क पाणी आलं. "तू या कैद्यांबरोबर जे करत आहेस ते बरोबर नाहीये,' असं तिनं झिम्बार्डोला सांगितलं. या वेळी मात्र झिम्बार्डोचं हृदयपरिवर्तन झालं आणि शेवटी त्यानं आपला हा प्रयोग आवरता घेतला. 15 दिवसांसाठी म् हणून सुरू केलेल्या या प्रयोगाची सांगता शेवटी 6 दिवसांतच झाली. 20 ऑग स्ट 1971 रोजी हा खेळ अखेर संपुष्टात आला.

या प्रयोगावरून अनेक गोष्टी लक्षात आल्या. कैदी आणि गार्डस्‌ यांच्या वागणुकीतले बदल हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे नव्हे, तर बाह्य परिस्थितीमुळे निर्माण झालेले होते. तुरुंगातलं वातावरण आणि तिथली कार्यपद्धतीच याला कारणीभूत होती, हे झिम्बार्डोच्या लक्षात आलं. झिम्बार्डोला आपला प्रयोग यश स्वी झालाय असं वाटत होतं; पण समाजाच्या दृष्टीनं असे प्रयोग हितकारक नस ल्याची आणि ते अवैज्ञानिक असल्याची त्याच्यावर जोरदार टीका झाली. कॅलिफो र्नियातल्या सगळ्याच तुरुंगांत झिम्बार्डोला प्रवेश नाकारण्यात आला. 1970 च्या दशकात अशा प्रयोगांवर खूप बंधनं आणण्यात आली. पण सोशल सायकॉलॉजि स्ट्‌स मंडळींनी याविरुद्ध बोंबाबोंब करायला सुरवात केली. "असे प्रयोग केल्या शिवाय आपल्याला समाजाविषयी, मनाविषयी आणि मानसशास्त्राविषयी निष्कर्ष कसे काढता येणार?' असा त्यांचा सवाल होता. हा वाद खूपच रंगला. शेवटी 1981 मध्ये अशा प्रयोगांवरची बंधनं पुन्हा शिथिल करण्यात आली; पण अजून त्यावर वाद, चर्चा चालूच आहे.

नैराश्‍य (डिप्रेशन)

July 31, 2011

नैराश्‍याच्या वाटेवर हरएक चेहरा जुना आहे, खोल गर्तेतला प्रवास सारा फिरून पुन्हा पुन्हा आहे.
नैराश्‍य हा एखाद्या संसर्गजन्य रोगालाही लाजवेल इतक्‍या झपाट्यानं पसरत चाललेला एक मनोविकार आहे. नैराश्‍याला शारीरिक, मानसिक आणि सामाजिक अशी कारणं असतात. शारीरिक कारणांमध्ये आनुवंशिकता आणि त्याचबरोबर मेंदूतल्या अनेक वेगवेगळ्या न्यूरोट्रान्समीटर्सच्या आणि हार्मोन्सच्या असंतुलनामुळे आणि मेंदूतल्या विशिष्ट भागांमधल्या बिघाडामुळे नैराश्‍य निर्माण होतं, अशी एक थिअरी आहे; पण नक्की कशामुळे काय होतं याविषयी बरंच संशोधन आणि वादविवाद चालूच आहेत. नैराश्‍य येण्यास मानसिक कारणंही तितकीच जबाबदार असतात. आई-वडिलांचा मृत्यू किंवा घटस्फोट, आपल्याच अपत्याचा मृत्यू, कुटुंबातला कलह, वृद्धत्व, पालकांचा प्रचंड धाक, अतिशिस्त किंवा प्रेमभंग अशा अनेक कारणांमुळेही माणसांमध्ये नैराश्‍य निर्माण होतं. नैराश्‍यामुळे हृदयविकार, मधुमेह, हार्मोनल डिसऑर्डर्स, पार्किन्सन्स (कंपवात), अल्झायमर्स होऊ शकतो. तसंच याउलट हृदयविकार, कॅन्सर अशांसारख्या शारीरिक व्याधींमुळे किंवा दीर्घ काळ ब्लडप्रेशरवरच्या, झोपेच्या किंवा संततिनियमनासाठीच्या काही ठराविक गोळ्या घेतल्यामुळेही नैराश्‍याला निमंत्रण मिळतं, अशी एक थिअरी आहे.

सामाजिक कारणांमध्ये एकटेपणा वाटणं हे एक महत्त्वाचं कारण आहे. समाज आपल्या पाठीशी आहे, आपण एकटे नाही, या जाणिवेमुळे व्यक्तिगत आणि त्यामुळे एकूण समाजात नैराश्‍याचं प्रमाण कमी राहतं. याविषयी सेलिगमन या मानसशास्त्रज्ञानं छान सांगितलंय. शीफेलिने, न्यू गिनी या प्रांतातल्या कलुली या जमातीत एखाद्या माणसाचं नुकसान झालं तर त्याची जबाबदारी ही आजूबाजूच्या सगळ्यांची समजतात. म्हणजे एखाद्याचं डुक्कर मेलं तर ते ज्यानं मारलं अशा संशयिताच्या घरासमोर जाऊन सर्व जण मिळून घोळक्‍यानं आरडाओरडा करतात आणि त्याला नुकसानभरपाई द्यायला भाग पाडतात. यामुळे नुकसान झालेल्या माणसाला एकटं आणि असहाय वाटत नाही.

पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती त्या वेळी एकूणच सामाजिक सुरक्षितता बरीच होती. अडीअडचणींना लगेच सगळे धावून येत. पण गेल्या शतकात शहरांची वाढ झाली, विभक्त कुटुंबपद्धती आली. त्यातून स्वातंत्र्य मिळालं, पण सुरक्षितता घटली. प्रत्येकाचा व्यक्तिवाद वाढला. त्याला असहाय आणि एकटं वाटायला लागलं आणि त्यातून नैराश्‍यही वाढायला लागलं.

नैराश्‍य हे आपल्याला साहित्यात अनेकदा दिसतं. कीट्‌ससारख्या कवींच्या कविता नैराश्‍यानं, दु:खानं इतक्‍या ओतप्रोत भरलेल्या असत, की कीट्‌स आजच्या काळात नैराश्‍याचा रुग्ण मानला गेला असता. जर्मन लेखक गटेनं लिहिलेलं "द सॉरोज ऑफ यंग वर्थर' हे पुस्तक 2000 लोकांनी वाचलं आणि ते वाचून नैराश्‍याने त्यांनी सरळ आत्महत्या केल्या. डोस्टोव्हस्कीच्या "क्राईम अँड पनिशमेंट'मध्ये, चेकॉव्हच्या "सीगल'मध्ये शेवटी आत्महत्या आहे. "टु बी ऑर नॉट टु बी' या प्रसिद्ध मनोगतात हॅम्लेट त्याच्या वडिलांच्या मृत्यूमुळे नैराश्‍य येऊन आयुष्य संपवावं असं म्हणतो. ग्रॅहॅम ग्रीनच्या "द पॉवर अँड द ग्लोरी', "द क्वाएट अमेरिकन'सारख्या कादंबऱ्यांतली पात्रं नैराश्‍याच्या गर्तेत गेलेली दिसतात.

सामान्य लोकांपेक्षा कलाकार, कवी अशा लोकांना बायपोलार डिसऑर्डर जास्त प्रमाणात होते. म्हणूनच ते आनंद किंवा दु:ख आणि नैराश्‍य यांच्या टोकाला जाऊ शकतात. जगप्रसिद्ध चित्रकार व्हिसेंट व्हॅन गॉग, व्हर्जिनिया वूल्फ, अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी नैराश्‍याच्या तीव्र गर्तेत असताना आत्महत्या केली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्त्सिन, इंग्लंडची लेडी डायना, हॉलिवूड अभिनेता हॅरिसन फोर्ड, हॅरी पॉटरची लेखिका जे. के. रोलिंग, मर्लिन मन्‍रो, अब्राहम लिंकन, विन्स्टन चर्चिल, रुझवेल्ट, निक्‍सन यांच्यासारखे खंदे राजकारणी आणि आलड्रिनसारखा अंतराळवीर, लिओ टॉलस्टॉय, एडगर ऍलन पो, चार्ल्स डिकन्स असे लेखक आणि मायकेल अँजेलोसारखे कलावंत नैराश्‍यामुळे त्रस्त होते.

नैराश्‍याचे दोन मुख्य प्रकार म्हणजे डिप्रेसिव्ह (युनिपोलर) डिसऑर्डर आणि बायपोलार डिसऑर्डर. डिप्रेसिव्ह डिसऑर्डरचे त्याच्या तीव्रतेवरून माइल्ड, मॉडरेट आणि मेजर असे तीन प्रकार मानले जातात. डिप्रेशनचा जास्तीत जास्त आढळणारा प्रकार म्हणजे मेजर डिप्रेशन. मेजर डिप्रेशनमध्ये सलग डिप्रेशनमध्ये राहण्याचा काळ जास्त असतो. अशाच एका केसमध्ये आर्किटेक्‍ट म्हणून अतिशय यशस्वी असलेल्या एका माणसात एकदम लक्षणीय बदल दिसायला लागले. जेवण झाल्यावर कोणाशीच न बोलता तो बेडरूममध्ये जायचा. मग हळूहळू कामावर जाणं बंद झालं. जेवणखाण बंद झालं. मुठी आवळून तो सारखा रडत बसायचा. "तुम्ही माझ्यासारख्या राक्षसाला कसं सहन करता?' असं तो स्वत:च्या मुलांना म्हणायचा. हे बराच काळ चाललं आणि हळूहळू तो नैराश्‍याच्या मगरमिठीत खोलवर रुततच गेला.

बायपोलार डिसऑर्डरचे दोन मुख्य प्रकार म्हणजे मॅनिया आणि डिप्रेशन. अतिशय आनंदानं, तीव्रतेनं उत्तेजित होणं याला मॅनिया म्हणतात, तर दु:ख आणि वैफल्याच्या तीव्रतेला डिप्रेशन म्हणतात. बायपोलार डिसऑर्डरमध्ये या दोन मनोवस्थांमध्ये ही माणसं सतत दोलायमान असतात. बायपोलार डिसऑर्डरचेही अनेक प्रकार आणि उपप्रकार आहेत. बायपोलार डिसऑर्डरच्या रुग्णांना दैनंदिन जीवनातले तणाव सहन होत नाहीत. मित्र बनवण्यात अशी माणसं अयशस्वी ठरतात.

बायपोलारचं उदाहरण म्हणजे कार विकणारा मनोज या सेल्समनची गोष्ट. त्याच्या एका मैत्रिणीला तो खूपच लहरी आहे असं वाटायचं. ती मैत्रीण मानसोपचार तज्ज्ञाकडे नर्स म्हणून काम करत होती. मनोजबरोबर केलेल्या गप्पांमधून तो शाळेत असताना वयाच्या 14 व्या वर्षी त्याला सतत मॅनिया आणि डिप्रेशनचे ऍटॅक यायचे, असं तिच्या लक्षात आलं. नैराश्‍याच्या सायकलमध्ये असताना तो 10-14 तास झोपून राहायचा, आपलं जगणं निरुत्साही, निरुद्देश असल्यासारखं त्याला वाटत असे. या मूडमध्ये 4-7 दिवस जायचे आणि परत तो एकदम ताजातवाना व्हायचा. मग तो अतिउत्साहात पहाटे तीनला उठून कामाला लागायचा. मग मॅनियाची सायकल मात्र चालू व्हायची. या त्याच्या "मूडी' स्वभावामुळे शाळेत तो कधीच हुशार मुलगा म्हणून चमकला नाही. त्याच्या कामाबाबतही नेमकं हेच घडत होतं. त्याला वाटणाऱ्या चांगल्या दिवसांत ग्राहकांशी उत्तम संवाद साधून तो गाड्यांची चांगली विक्री करायचा, तर वाईट दिवसांत कटकट करून ग्राहकांना पळवून लावायचा. पण औषधं आणि मानसोपचारांमुळे तो काही दिवसांत बरा झाला. या रुग्णांना जर समाजातून मानसिक, भावनिक मदत मिळाली तर ते लवकर सुधारतात. त्यांच्यावर उपचार म्हणून कॉग्निटिव्ह उपचार पद्धत वापरतात. त्यांच्या कुटुंबांनाही सायकोएज्युकेशन दिलं जातं आणि अशा रुग्णांबरोबर कसं वागायचं हे शिकवलं जातं.

नैराश्‍याची लाज वाटल्यामुळे बरेचसे रुग्ण उपचार घेतच नाहीत. नैराश्‍याचे अनेक प्रकार असल्यामुळे त्याच्या लक्षणांवरून विकाराचं अचूक निदान होत नाही. ते झालं तर नैराश्‍यावर जास्त परिणामकारक औषधं वापरता येतील. नैराश्‍यावर वेगवेगळी अँटिडिप्रेसंट्‌स वापरली जातात. अँटिडिप्रेसंटच्या गोळ्यांनी न्यूरोट्रान्समीटर्समध्ये बदल होतात. त्यामुळे नैराश्‍य कमी व्हायला आणि झोप नीट लागायला मदत होते. ही औषधं दिल्यावर रुग्णाला काही काळ चांगलं वाटतं, पण विकार बळावण्याची शक्‍यता असते. अँटिडिप्रेसंट्‌स, ईसीटी (इलक्‍ट्रिक शॉक्‍स), टीएमएसची मॅग्नेटिक थेरपी अशा शारीरिक बदल करणाऱ्या उपचारांसोबत मानसोपचार देण्याची गरज नैराश्‍यात असतेच. त्यातही सीबीटी (कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी) ही खूप महत्त्वाची मानली जाते.

अल्टरनेटिव्ह उपचारांमध्ये आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक उपचारही नैराश्‍यावर केले जातात. कॉम्प्लिमेंटरी थेरपीजमध्ये व्यायाम, मेडिटेशन आणि योग्य आहार हे उपाय केले जातात. याशिवाय रिलॅक्‍सेशन थेरपीज, एन्व्हायर्न्मेंटल थेरपीज (उदा. अरोमा थेरपी, संगीत थेरपी), सायकोथेरपी (टॉक थेरपी), इंटरपर्सनल थेरपी (आयपीटी), स्पिरिच्युअल किंवा फेथ बेस्ड ऍक्‍टिव्हिटीज, प्राण्यांसोबत आणि इतर व्यक्तींसोबत संवाद यांचाही नैराश्‍यावर खूप चांगला परिणाम होतो, असा अनेकांचा दावा आहे. औषधं आणि मानसोपचार घेणाऱ्या लोकांपैकी साधारण 40 टक्के लोक पूर्णपणे बरे होतात. उरलेल्यांपैकी अनेकांमध्ये बरीच सुधारणा दिसून येते. पण काही केसेसमध्ये मात्र नैराश्‍य आयुष्यभर घेरून टाकतं, तर त्यातले काही आत्महत्या करतात.

नैराश्‍यावर सगळ्या उपचार पद्धती काही प्रमाणात परिणामकारक ठरत असल्या तरी अँटिडिप्रेसंट्‌सबाबत बरेच प्रश्‍न आहेत. औषधं घेतली तर किती काळ घ्यायची? डोस किती असावा? औषधं आणि मानसोपचार यांचं कोणतं प्रमाण रुग्णाला लवकर बरं करेल? औषधं बंद झाली तरी मानसोपचार घेत राहावेत का? ज्यांना अँटिडिप्रेसंट चालत नाहीत त्यांनी कोणते उपचार घ्यावेत? नॉर्मल डिप्रेशनच्या लोकांना तर कोणते उपचार घ्यावेत, याबद्दलचं चित्र काहीसं धूसर आहे.

आज जगाला चंगळवादानं घेरलंय. या नव्या चंगळवादी, बाजारू समाजव्यवस्थेचा मानसिकतेवर काय परिणाम होतो? एका अभ्यासानुसार, अमेरिकेत दुसऱ्या महायुद्धापासून ते शतकाच्या अखेरीपर्यंत नैराश्‍याचं प्रमाण दहापट वाढलं! 1990 च्या दशकात दहा मोठ्या विकारांपैकी पाच मनोविकार होते. त्यात नैराश्‍याचा पहिला क्रमांक लागत होता. नैराश्‍य हा 2020 मध्ये अत्यंत मोठा मनोविकार असेल असं "वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन'नं म्हटलंय.
मानवी सुखांच्या संकल्पनांचं एरिक फ्रॉम यानं सुंदर विश्‍लेषण केलंय. माणसाच्या आयुष्यातल्या सुखाच्या कल्पना आजकाल बदलत चालल्या आहेत. वेगवेगळ्या क्रयवस्तू गोळा करणं आणि त्यांचा जास्तीत जास्त साठा करणं यातच तो सुख आणि आयुष्याची परिपूर्णता मानायला लागला आहे. त्यामुळे त्याला कितीही त्या गोष्टी मिळाल्या तरी त्याची हाव काही कमी होत नाही. त्याची सतत कुणाशी तरी स्पर्धा तर कधी तुलना चालू असते. यामुळे प्रचंड मानसिक असुरक्षितता, एकाकीपणा आणि नैराश्‍य यांना त्याला सामोरं जावं लागतंय.

समाजाच्या चालीरीती स्वीकारलेल्या माणसाला आपण नॉर्मल ठरवतो, पण खरं तर याउलट माणसाच्या मानसिक गरजा एखादा समाज भागवतोय की नाही, त्यावरून तो समाज निरोगी आणि चांगला आहे (दी सेन सोसायटी) की नाही ते ठरवणं योग्य ठरेल, असं एरिक फ्रॉम म्हणतो. थोडक्‍यात, एकूणच समाजात मनोविकारांचं, नैराश्‍याचं प्रमाण प्रचंडपणे वाढतंय, मात्र रुग्णांवर उपचार करण्याबरोबरच या समाजालाच कीड लागली आहे का, याचा विचार सर्वप्रथम झाला पाहिजे, असं एरिक फ्रॉम याचं म्हणणं आज किती खरं आहे!

ऑटिझम

July 24, 2011

'ऑटिझम' हा मनोविकारातला एक महाराक्षस आहे. "ऑटिझम' म्हणजे "आत् ममग्न' किंवा स्वतःमध्येच गुंतून असणं. ऑटिझम या "ऑटोस' या ग्रीक शब् दापासून निर्माण झालेल्या शब्दाचा अर्थ "स्वतः' असा होतो (जसं ऑटोमोबील, ऑटोमॅटिक वगैरे). नॉर्मल आणि ऑटिस्टिक मुलं यांच्यातली सीमारेषा सुरवातीस धूसर असते. त्यामुळे मूल सामान्यपणे, सहजपणे वाढत नाहीये, हे लवकर लक्षात येणं पालकांना कठीण जातं. ऑटिस्टिक मुलं बाह्यदर्शनी नॉर्मल दिसतात; पण त्यांचे हावभाव, हात उडवणं, विचित्र हसणं वगैरे सुरू झालं, की हे प्रकरण वेगळं आहे, असा अंदाज इतरांना येऊ लागतो. कित्येक लोक मग त् याला स्क्रू ढिला झालेला अगर मतिमंद समजायला लागतात. "मुलाला वाढवता येत नाही,' असा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शेरा पालकांना देतात. अभिजितची केस याबाबत खूपच बोलकी आहे.

अभिजित हा साधारण अडीच वर्षांचा असताना हळूहळू त्याचं बोलणं, खेळणं आणि भोवतालच्या सगळ्या गोष्टींमधलं लक्ष कमी व्हायला लागलं. कधी छतावर गरगर फिरणाऱ्या पंख्याकडे निरर्थकपणे एकटक पाहत बसणं, तर कधी अकारण हसत सुटणं आणि कधी हात झटकल्यासारखे उडवत-उडवत एका खोलीतून दुस ऱ्या खोलीत पळणं, तिथून परत पहिल्या खोलीत येणं आणि पुन्हा लगेच दुसऱ्या खोलीत पळणं (हायपरऍक्‍टिव्हिटी) सुरू झालं. हळूहळू अभिजितचं डोळ्याला डोळा भिडवणंही नाहीसंच झालं. "अभिजित, तुझं नाव काय?' असं त्याला विचारल्यावर तोही उलट "अभिजित तुझं नाव काय?' असं म्हणे (इकोलॅलिया). तो गंमत करतोय असं म्हणावं, तर त्याच्या डोळ्यांत लहान मुलाचा मिस्कीलपणा अगर खोडसाळपणाही दिसत नसे. त्याला कोणी मित्र नव्हते. हवी असलेली गोष्ट तोंडानं मागण्याऐवजी तो हाताने खेचून त्या वस्तूपर्यंत नेऊन तिच्याकडे बोट दाखवू लागला. तो कशावरच फार काळ लक्ष केंद्रित करू शकत नसे. (ऍटेन्शन डेफिसीट).

ऑस्ट्रियात जन्म झालेल्या "लिओ कॅनर' आणि "हॅन्स ऍस्पर्जर' या दोन सं शोधकांनी स्वतंत्रपणे अनेक मुलांचं निरीक्षण करून ऑटिझमचा अभ्यास केला. जॉन हॉपकिन्स विद्यापीठात असताना लिओ कॅनरनं 11 मुलांचं निरीक्षण केलं होतं. त्या मुलांना समाजात वावरण्यात आणि लोकांशी बोलण्यात येणारी अडचण, कोणत्याही प्रकारच्या बदलाचा अस्वीकार, इकोलॅलिया, भाषा खुंटणं, डोळ्याला डोळा न भिडवणं, हायपरऍक्‍टिव्हिटी, अटेन्शन डेफिसीट अशा अनेक समस्या होत्या, हे कॅनरच्या निदर्शनास आलं होतं. स्वतःमध्येच मग्न असलेल्या या मुला ंना या दोघा संशोधकांनी स्वतंत्रपणे "ऑटिझम' हे नाव दिलं. त्या वेळी एकूणच ऑटिस्टिक व्यक्तींचं प्रमाण दर 10,000 मागे 4 एवढं समजलं जायचं. पण आता हे प्रमाण दर 150 मुलांमागे 1 एवढं जास्त आहे. काहींच्या मते तर ते दर 100 मागे 1 एवढं आहे. साधारणपणे ऑटिस्टिक मुलांचं प्रमाण ऑटिस्टिक मुलींपेक्षा चौपट असतं.

ऑटिस्टिक मुलांना खेळही समजत नाहीत. याचं कारण चोर-शिपाईसारखे अनेक खेळ आपल्या प्रत्यक्ष आयुष्याशी आणि आजूबाजूच्या समाजाशी निगडित असतात. उदाहरणार्थ चोर चोरी करतो किंवा पोलिस त्याला पकडतात, हे समजण् याकरिता मालकी हक्क, चोरी, कायदे, पोलिस अशा काही गोष्टी आहेत, याचंच म ुळात पहिल्यांदा भान असावं लागतं. तेच जर समजलं नाही, तर चोर-शिपाई खेळणार तरी कसं? त्यामुळे विमानासारखं कुठलंही खेळणं ऑटिस्टिक मुलांच्या हातात पडलं तर ते उडवल्यासारखा हात करण्याऐवजी ऑटिस्टिक मुलं नुसतंच त्याकडे बघत बसतात किंवा निरर्थकपणे ते गरगर फिरवत बसतात. या मुलांना िमत्र असायचं कारण राहतच नाही. ही मुलं एककल्ली असतात. बहिरं असल् यासारखी वागतात. कित्येकदा बोलूच शकत नाहीत. मूल स्वाभाविकपणे आई-व डिलांना बिलगतं, तशी ही मुलं बिलगत नाहीत. खरंतर बाहेरच्या जगाची त्यांना कल्पनाच नसते. त्यांना तोचतो पणा आवडतो. त्यामुळे दैनंदिन कार्यक्रम थोडा जरी बदलला तरी त्यांना राग येतो. काही मुलं त्यातून बरीच हिंसकही होतात. "अ ॅस्पर्जर सिंड्रोम' हा एक ऑटिझमचाच माइल्ड प्रकार आहे. या विकाराचं नाव हॅन्स ऍस्पर्जर याच्या नावावरून पडलं. ऍस्पर्जरला प्रसिद्धी मात्र खूपच कमी मिळाली. त्यानं 400 मुलांचा सखोल अभ्यास करून त्याची थिअरी मांडली होती. हायपरऍक्‍टिव्हिटी, अटेन्शन डेफिसीट डिसऑर्डर असे ऑटिझमसारखे अनेक विकार विचारात घेऊन आज ऑटिझमऐवजी "ऑटिझम स्पेक्‍ट्रम' हा शब्द वापरतात. आश्‍चर्य म्हणजे यातली काही मुलं काही ठराविक तऱ्हेची कोडी चटकन सोडवू शकतात, तर काहींना शेकडो गाणी पाठ असू शकतात. पण या का ैशल्याचा मुलाच्या सर्वांगीण विकासाशी आणि वाढीशी संबंध नसतो. म्हणून अशांना "इडियट सॅव्हंट' म्हणतात.

1960 मध्ये कॅनरच्याच काळात ब्रुनो बेटलहाईम या मानसशास्त्रज्ञानं भावनाशून्य आणि थंड आईमुळे मुलाला ऑटिझम होतो, असा विचार मांडला. अशा आईला तो "रेफ्रिजरेटर' मदर म्हणतात. बेटलहाईमच्या या थिअरीमुळे कित्येक जणींना अपराधीपणामुळे प्रचंड नैराश्‍य आलं. काहींनी आत्महत्याही केल्या! बेटलहाईमच्या थिअरीपासून स्त्रियांना जर कुणी वाचवलं असेल तर 1964 मध्ये "बर्नार्ड रिमलॅं ड' या मानसशास्त्रज्ञानं. ऑटिस्टिक मुलांच्या शरीरात किंवा मेंदूतही बिघाड असू शकतो याकडे बेटलहाईम दुर्लक्ष करतोय, असं रिमलॅंडनं मांडलं. शेवटी बेटलहाईम चूक आहे आणि ऑटिझम हा मेंदूत बिघाड झाल्यामुळेच होतो, हे गेल्या काही वर्षांतल्या संशोधनावरून सिद्ध झालं.

ऑटिझम सर्वसामान्यांपर्यंत पोचला तो 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या "रेनमॅन' या चार ऑस्कर मिळवणाऱ्या चित्रपटामुळे. यात चार्ली बॅबिट हा एक अत्यंत स् वार्थी, उद्धट असा अमेरिकन तरुण असतो. आपल्या मैत्रिणीसोबत सहलीला गेलेला असताना त्याला त्याच्या वडिलांच्या आकस्मिक मृत्यूची बातमी कळते. आपल्या वडिलांनी 30 लाख डॉलरची इस्टेट एका ऑटिस्टिक मुलांसाठी असलेल्या संस्थेच्या नावानं केली असल्याचं कळल्यावर तो भडकतो. त्या अज्ञात संस्थेचा शोध घेत असतानाच त्याला आपल्याला एक रेमंड नावाचा ऑ टिस्टिक भाऊ असून, तो त्याच संस्थेत असल्याचं कळतं. पहिल्यांदा हे ऐकून तो भावावरच चिडतो. ऑटिझम म्हणजे काय याचा चार्लीला पत्ताच नसतो. पण प्रत्यक्ष रेमंडला भेटल्यानंतर त्याचा निरागसपणा बघून चार्लीचा राग निवळतो. रे मंडच्या आकडेमोडीतल्या प्रावीण्याच्या जोरावर चार्ली जुगारात बरेच पैसेही मि ळवतो. सगळ्यात शेवटी चार्ली आपल्या भावाला आहे तसा स्वीकारतो; पण शेवटी त्याला पुन्हा त्या संस्थेत सोडून परतावं लागतं, अशी ही या चित्रपटाची हृदयस्पर्शी कथा.

ऑटिझमच्या लक्षणात प्रामुख्यानं अनेक ऑटिस्टिक मुलांना कोणाचीच नक्कल आणि अनुकरण करता येत नाही, हे लक्षण असतं. म्हणजेच त्यांच्या "मिरर न्यूरॉन सिस्टिम'मध्ये दोष असला पाहिजे, असं मत व्ही. एस. रामचंद्रन यांनी मांडलंय. आपण दुसऱ्यांचं मन ज्या आपल्या मेंदूतल्या पेशींच्या जाळ्यामुळे वाचू शकतो, त्या पेशींना मिरर न्यूरॉन्स म्हणतात. दुसऱ्याची सुख-दुःखं, भावना कळणं, त्याच् याशी समरस होणं (एम्पथी), दुसऱ्याचा हेतू कळणं, दुसऱ्याची नक्कल करणं, भाषा शिकणं याला मिरर न्यूरॉन्स मदत करतात. याच मिरर न्यूरॉन्सचा ऑटिस्टिक मुलांमध्ये अभाव असतो. म्हणूनच त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत किंवा वागणुकीत खूपच विचित्रपणा येतो.

ऑटिझम पूर्णपणे बरा होण्यासाठी आज एकही औषध नाही; पण आक्रमकता, हायपरऍक्‍टिव्हिटी यांच्यासारखी ऑटिझमची लक्षणं नियंत्रित करता येतील यावर मात्र आज औषधं आहेत. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानं ती घेतली तर त्यामुळे ऑटिस् िटक मुलं ही जास्त शांत आणि सोशिएबल होऊ शकतात. पण औषधांबरोबरच ऑटिझमवर अनेक थेरपीज जर वापरल्या तर त्याचा फायदा जास्त होतो. बिहे विअर मॉडिफिकेशन, 1960 च्या सुमारास फ्रान्समध्ये डॉ. बेरार्ड यांनी काढलेली "ऑडिटरी इंटिग्रेशन ट्रेनिंग'ची थेरपी, "डिस्क्रीट ट्रायल ट्रेनिंग'ची थेरपी, "व्हिटॅमिन' थेरपी, "ऑक्‍युपेशनल' थेरपी, "फिजिकल' थेरपी आणि डॉ. ज्यॉं एयर्स यानं सांगितलेली सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी अशा वेगवेगळ्या थेरपीज आहेत. याशिवाय अँटियीस्ट थेरपी, म्युझिक-थेरपी, डोमन-डेलकॅटो थेरपी, ऑ स्टेओपथी/ कॅनिओसॅक्रल थेरपी, स्क्वीझ मशिन थेरपी आणि होल्डिंग थेरपी याही वेगवेगळ्या पद्धती आहेत. कॉफमन मंडळींनी ऑप्शन इन्स्टिट्यूटमध्ये शिकवला जाणारा "सनराईज प्रोग्रॅम' निर्माण केला आहे. 1960 मध्ये इव्हार लोवास या कॅलिफोर्निया विद्यापीठातल्या मानसशास्त्रज्ञानं विकसित केलेली "अप् लाईड बिहेविअर ऍनालिसिस (एबीए)' ही पद्धत बऱ्याच पालकांना आणि डॉक्‍ टरांना मान्य झालेली आहे. "आपल्याला हवा तसा प्रतिसाद मिळवण्यासाठी आपलं वागणं शिस्तबद्ध पद्धतीनं बदलणं' या कल्पनेवर "एबीए' आधारित आहे.

हान्स अँडरसन, आर्थर कॉनन डॉईल, मोझार्ट, बीथोव्हेन, व्हॅन गॉग, न्यूटन, आईनस्टाईन, ऍडॉल्फ हिटलर, मायकेलएंजेलो, रामानुजन, निकोला टेसला, लुडविग विटगेनस्टाईन या सगळ्यांमध्ये ऍस्पर्जर सिंड्रोमची लक्षणं होती, असं काही लोकांचं म्हणणं आहे.

मुलाला ऑटिझम झाला आहे हे समजल्यावर पालक खूपच खचून जातात; पण ऑटिस्टिक मुलांच्या पालकांनी स्वतःवर रागावणं, नशिबाला दोष देणं, प्रसंगी मुलांची पिटाई करणं यापेक्षा एकत्र येऊन एकमेकांना मदत करण्याची, निदान धीर देण्याची आज खूपच गरज आहे. इंग्लंडमध्ये 1962 मध्ये पहिली "ऑटिस्टिक सोसायटी' स्थापन झाली. अमेरिकेत स्थापन झालेल्या "ऑटिझम सोसायटी ऑफ अमेरिका' या संस्थेत ऑटिस्टिका मुलांचे पालक आणि तज्ज्ञ हे विविध उपचारपद्धती आणि त्यांची परिणामकारकता यांचा आढावा घेतात. मुंबईतल्या काही पालकांनी एकत्र येऊन "फोरम फॉर ऑटिझम' स्थापन केला आहे. आज दर 150 मागे 1 या हिशेबाने मुंबईतच साधारण 1,00,000 आणि इतर प्रत्येक शहरात हजारो ऑटिस्टिक मुलं आहेत. त्यांच्यासाठी आज महाराष्ट्रात हजारो शाळांची आणि निवासी संस्थांची गरज आहे; पण प्रत्यक्षात बोटावर मोजण्याइत क्‍या शाळा आहेत, तर निवासी संस्था जवळपास नाहीतच. यामुळे मोठी झालेली ऑटिस्टिक माणसं 10-12 वर्षांत रस्त्यावर चक्क वेड्यासारखी फिरताना आढळतील. हे एक भयानक चित्र आहे.

या सगळ्यात एक आशेचा किरण म्हणजे पुढच्या काही दशकात "स्टेम सेल थेरपी'मुळे ऑटिझमवर बऱ्याच प्रमाणात मात मिळवता येईल, असं मात्र आज संशोधकांना वाटतंय!

स्किझोफ्रेनिया भ्रम आणि भास

July 17, 2011

नाही हाकारा, पण उठले रान
घरटे सापडेना वाट
बेभान पाखरू, समजेना कोणा
का कल्लोळ कल्लोळ

अभिनेता अतुल कुलकर्णीची ही कविता "देवराई' या चित्रपटातली. स्किझोफ्रेनियाबद्दल भाष्य करणारा मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातला हा मराठीतला एक पहिलाच प्रयोग होता. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या "देवराई' या सिनेमाचा नायक हा स्किझोफ्रेनिक असतो. स्किझोफ्रेनियामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वात होत जाणारे बदल या चित्रपटात अत्यंत बारकाईनं टिपले आहेत. या चित्रपटाचे सल्लागार प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी होते.

मनोविकारांमध्ये स्किझोफ्रेनिया हा एक भयानक विकार आहे. कुठल्याही देशातल्या, वंशातल्या, जातीतल्या किंवा धर्मातल्या माणसांना तो होऊ शकतो. स्किझोफ्रेनिया झालाय, हे कसं ओळखावं? त्याची पाच मुख्य लक्षणं म्हणजे सतत भ्रम होणं (डिल्युजन्स), सतत आभास होणं (हॅल्युसिनेशन्स), विस्कळित, असंबद्ध बोलणं, लिहिणं किंवा असंबद्ध वागणं आणि नकारात्मक विचार. हा विकार झाल्यावर रुग्णाचं वास्तवाचं भान सुटून त्याचं विचार करणं आणि कृतीच बदलून जातात. या पाचापैकी कुठलीही दोन लक्षणं किंवा कुठलंही एक लक्षण खूप तीव्रपणे सतत सहा महिने दिसून आलं तर त्याला "स्किझोफ्रेनिया' म्हणतात. या विकारातली प्रत्येक केस ही इतरांपेक्षा वेगळी असते. रुग्णाचं विचित्र आणि अव्यवस्थित वागणं हे कुणाच्याही लक्षात येऊ शकतं. प्रचंड उकाड्यामुळे खूप घाम येत असतानाही कोट, स्कार्फ, हातमोजे, कानटोपी घालणं, घरीसुद्धा नेकटाय घालून बसणं, स्वतःची राहणी आणि आरोग्य यांच्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करणं, असले प्रकार हे रुग्ण वरचेवर करतात. ज्या घरात स्किझोफ्रेनिया झालेला असतो त्या घरातलं वातावरणच पूर्णपणे बिघडून गेलेलं असतं.

स्किझोफ्रेनिया हा सर्वसामान्यांना ओळखीचा वाटायला लागला तो नोबेल पुरस्कारविजेता जॉन नॅश या प्रचंड बुद्धिमत्ता असलेल्या शास्त्रज्ञावर 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या "ब्यूटिफुल माइंड' या सिनेमामुळे. या चित्रपटानं ऑस्करची चार पारितोषिकं पटकावली. भासांच्या दुनियेत जगणाऱ्या नायकाच्या आयुष्यात अनेक वादळं निर्माण होतात. या चित्रपटात जॉन नॅशच्या स्किझोफ्रेनिया विकारातले अनेक बारकावे रसेल क्रो या अभिनेत्यानं अचूकपणे साकारले होते. स्किझोफ्रेनियाच्या विळख्यातून नॅश कसा बाहेर येतो आणि 1994 मध्ये त्याला "गेम थिअरी'मधल्या योगदानाबद्दल अर्थशास्त्रातलं नोबेल पारितोषिक कसं मिळतं, याची सुंदर गोष्ट या चित्रपटात चितारली आहे.

स्किझोफ्रेनियाचं अचूक वर्णन जर कोणी केलं असेल तर ते एमिल क्रॅपेलिन (1856 - 1926) यानं. क्रॅपेलिननं 1896 मध्ये या विकाराला "डेमेन्शिया प्रॅकॅक्‍स' असं नाव दिलं होतं. यूजेन ब्लुलर (1857 - 1939) या स्विस मानसोपचारतज्ज्ञानं "स्किझोफ्रेनिया' हा शब्द प्रथम वापरला. स्किझोफ्रेनियाचं प्रमाण एपिलेप्सीएवढंच आहे. हा विकार बहुतांशी तरुणपणीच होतो. स्किझोफ्रेनिया होण्याचं सरासरी वय पुरुषांत 25, तर स्त्रियांमध्ये 29 मानलं जातं. पुरुषांमध्ये या विकाराचं प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त असतं. एस्ट्रोजन हेच सेक्‍स-हार्मोन्स स्त्रियांना स्किझोफ्रेनियापासून थोडंफार वाचवत असेल, असं संशोधकांना वाटतंय.

स्किझोफ्रेनियामध्ये भ्रम (डिल्युजन्स) होण्याच्या अनेक तऱ्हा असतात. आपले विचार कुणीतरी दुसरी व्यक्ती किंवा बाहेरची कुठली तरी शक्ती नियंत्रित करताहेत, आपले विचार कुणीतरी बाहेर प्रसारित करतंय, कुठल्या तरी टीव्ही किंवा रेडिओवरच्या प्रोग्रॅममधली वाक्‍यं आपल्यालाच उद्देशून म्हटली जाताहेत; आपले अवयवच कुणीतरी काढून घेऊन जातोय किंवा आपणच शिवाजी महाराज किंवा नेपोलियन आहोत, असे भ्रमाचे गंमतशीर वाटणारे पण खूपच क्‍लेशदायक प्रकार असतात. आभास किंवा हॅल्युसिनेशन्स हेही तितकेच विचित्र आणि भीतिदायक असतात. हे परिणाम आवाजाचे, स्पर्शाचे, दृश्‍याचे, चवीचे आणि वासाचे असे कुठलेही असू शकतात. निरोगी माणसांच्या स्वभावात राग, लोभ, प्रेम हे पैलू दिसतात; पण स्किझोफ्रेनिया या विकारात भावनाशून्य असणं, कुठल्याही ध्येयाशिवाय विचित्र तऱ्हेनं वागणं, अशी नकारात्मक लक्षणं बऱ्याचदा दिसतात.

आइन्स्टाइनचा मुलगा एडुवर्ड आइन्स्टाइन, जेम्स जॉईस या प्रसिद्ध लेखकाची नर्तिका मुलगी ल्युसिया जॉईस, जगप्रसिद्ध गणिततज्ज्ञ आणि नासाचे वैज्ञानिक डॉ. वसिष्ठ नारायण सिंग, इंग्लंडमधला गिटारवादक रॉक स्टार पीटर ग्रीन आणि प्रसिद्ध ड्रमर जिम गॉर्डन यांनाही स्किझोफ्रेनियानं ग्रासलं होतं असं म्हणतात.

स्किझोफ्रेनिया पॅरेनॉइड, डिसऑर्गनाइज्ड, कॅटेटॉनिक, अनडिफरन्शिएटेड आणि रेसिड्युअल असे पाच प्रकार मानतात. पॅरेनॉईड प्रकारात रुग्णाला आपल्याविषयी सतत कोणीतरी बोलतोय किंवा कुणीतरी आपला पाठलाग करतोय, आपल्यावर वॉच ठेवतोय, आपल्याला विष देणार आहे किंवा आपण जगातले सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ, तत्त्वज्ञ किंवा शास्त्रज्ञ अशा तऱ्हेची कोणी मोठी व्यक्ती आहोत असं वाटल्यामुळे कोणीतरी आपल्या मागावर आहे, या प्रकारचे अनेक तऱ्हेचे भास होतात. सततच्या असुरक्षिततेमुळे रुग्णामध्ये संशयी वृत्ती वाढते. कानात कोणीतरी पुटपुटतंय असे भास त्याला होऊ लागतात. एकूणच अशा रुग्णांमध्ये विचार, भावना, इच्छाशक्ती या सगळ्यांवर परिणाम होत असल्यामुळे अशा व्यक्ती समाजापासून तुटतात. जर योग्य औषधं वेळेवर घेतली तर अशा रुग्णांमध्ये इतर प्रकारच्या स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांपेक्षा जास्त प्रमाणात सुधारणा दिसून येते.

डिसऑर्गनाइज्ड स्किझोफ्रेनियाचा प्रकार तरुणपणापासूनच चालू होतो आणि तो हळूहळू वाढत जातो. विचित्र भाषा, विचित्र बोलणं, लिहिणं आणि वागणं यामुळे रुग्ण एकाकी पडत जातो. तो आपल्या दिवास्वप्नातच, फॅंटसीतच मग्न असतो. विनाकारण हसणं, रडणं, कळायला अवघड उच्चार, सारखं तेच ते बोलणं, विचित्र हावभाव आणि चेहरे, विचित्र आभास आणि भ्रम या सगळ्या गोष्टी हळूहळू वाढायला लागतात.

कॅटेटॉनिक हा स्किझोफ्रेनियाचा एक खूपच विचित्र प्रकार आहे. त्यात एकदम पुतळ्यासारखं स्थिर होणं आणि हालचाल पूर्ण थांबवणं किंवा अचानक प्रचंड हालचाल किंवा पळापळ करणं, त्याच त्या विचित्र हालचाली करणं, प्रश्‍न विचारल्यावर उत्तरादाखल तोच प्रश्‍न विचारणं (इकोलॅलिया), अशा गोष्टी तो करायला लागतो. कॅटाटॉनिक स्किझोफ्रेनियामध्ये रुग्णांना वारंवार झटके येतात. नियमित औषधोपचारानं ते आटोक्‍यात राहू शकतात. अनडिफरन्शिएटेड प्रकारात भ्रम, आभास, विस्कळित आचार-विचार ही सगळी लक्षणं दिसतात; पण स्पष्टपणे आणि ठळकपणे दिसत नाहीत. रेसिड्युअल प्रकारात भ्रम किंवा आभास यांची लक्षणं फारशी दिसतच नाहीत.

स्किझोफ्रेनियासारखेच इतर काही विकार आहेत. "स्किझोऍफेक्‍टिव्ह डिसऑर्डर' हा त्यातलाच एक प्रकार. यात स्किझोफ्रेनिया आणि तीव्र मूड डिसऑर्डर यांचं मिश्रण आपल्याला सापडतं. स्किझोफ्रेनिफॉर्म डिसऑर्डर विकारात स्किझोफ्रेनियाची लक्षणं दिसतात, पण ती सहा महिने एवढा काळ न दिसता त्यापेक्षा कमी काळ म्हणजे एक-दोन महिने अशी दिसतात. हा विकार जास्त लवकर बरा होऊ शकतो. सहा महिने सलग अशी लक्षणं दिसली तरच डॉक्‍टर त्याला स्किझोफ्रेनिया म्हणतात. डिल्युजनल डिसऑर्डर, ब्रीफ सायकॉटिक डिसऑर्डर हेही या विकाराचे भाईबंदच आहेत. एखाद्याला स्किझोफ्रेनिया असेल तर त्याच्यासारख्याच जुळ्यालाही (आयडेंटिकल ट्‌विन्स) स्किझोफ्रेनिया होईल, याची शक्‍यता 48 टक्के, तर इतर जुळ्यांना तो होण्याची शक्‍यता 17 टक्के असते. स्किझोफ्रेनियात आनुवंशिक किंवा "नेचर'चा घटक मोठा मानला जातो.

स्किझोफ्रेनिया झालेल्या रुग्णांचा सीएटी, पीईटी किंवा एमआरआय यांच्या साह्यानं मेंदूचा अभ्यास सुरू झाला. त्या वेळी अशा रुग्णांच्या मेंदूतली पोकळी (व्हेंट्रिकल्स) नेहमीपेक्षा मोठी असल्याचं संशोधकांना आढळलं. स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांच्या मेंदूचा व्हॉल्युमही साधारणपणे तीन टक्‍क्‍यांनी कमी असतो. म्हणजेच अशा रुग्णांमध्ये मेंदूचे टिश्‍यूज इतरांच्या मानानं कमी असतात.

स्किझोफ्रेनियावर उपचार काय आहेत? 1950 च्या अगोदर अशा रुग्णांना भवितव्यच नसायचं. अमेरिकेत त्यांना प्रचंड गर्दी असलेल्या अकार्यक्षम सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये घालावं लागे. भारतासारख्या देशात तर अशी हॉस्पिटल्सही नसल्यामुळे कुटुंबाची प्रचंडच ओढाताण आणि कुचंबणा व्हायची. काहींना शॉकथेरपी द्यायचे. अजून स्किझोफ्रेनियामुळे नक्की मेंदूतला कुठला भाग, किती प्रमाणात आणि कशा तऱ्हेनं बिघडतो हे खात्रीपूर्वक कळलेलं नाहीये. आपल्या मेंदूमधल्या रसायनांमुळे आपल्या मनोवस्था बदलतात. 1947 मध्ये एलएसडी हे एक रसायन निघालं. व्यसनाधीन लोक त्याचा वापर पुढे करायला लागले; पण हा पदार्थ घेऊन त्याचा मेंदूवर आणि त्यामुळे मनाच्या अवस्थेवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास केला तेव्हापासून मेंदूच्या रासायनिक अभ्यासाला आणखीनच चालना मिळाली. या रसायनांनाच न्यूरोट्रान्समीटर्स असं म्हणतात.

स्किझोफ्रेनियाच्या संशोधनात "डोपमाईन' हा महत्त्वाचा न्यूरोट्रान्समीटर ठरला आहे. "ऍफीटमाईन्स' औषधांमुळे डोपमाईनचं प्रमाण वाजवीपेक्षा जास्त असल्यासारखा आपला मेंदू वागायला लागतो आणि स्किझोफ्रेनियाच्या लक्षणांसारखीच लक्षणं तो दाखवायला लागतो. त्यामुळे मेंदूत डोपमाईन जास्त होण्यामुळे स्किझोफ्रेनिया होतो की काय, यावर संशोधन सुरू झालं. 1952 मध्ये स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांसाठी क्‍लोरप्रोमाझाईन किंवा थोरझाईन हे औषध द्यायला डॉक्‍टरांनी सुरवात केली. या औषधाचा बराच उपयोगही दिसायला लागला. या औषधामुळे मेंदूतले डोपमाईन रिसेप्टर्स ब्लॉक होतात, हेही पुढं लक्षात आलं.

1950 च्या आणि 1980 च्या दशकात "अँटिसायकोटिक्‍स' या गटातली औषधं निघाली आणि या औषधांनी रुग्णाला शांत करणं, त्याची आक्रमकता कमी करणं, अशासारख्या गोष्टी शक्‍य झाल्या. त्यामुळे त्यांच्या मानसिक स्थितीतही सुधारणा झाल्या. पण स्किझोफ्रेनियावर फक्त औषधं घेऊनही चालत नाही. शिवाय या औषधांचे झोप येणं, वजन वाढणं, रक्तातल्या पांढऱ्या रक्तपेशी कमी होणं, असे साइड-इफेक्‍टही होऊ शकतात. या सगळ्यांमुळे ही औषधं डॉक्‍टरांच्या सल्ल्यानंच घ्यावी लागतात आणि त्याचबरोबर मानसोपचारही करण्याची गरज असते. "कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी' (सीबीटी) या तंत्राचा उपयोग स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांसाठी सुरू झालाय.

संशोधनावरून शहरी आयुष्यातल्या ताणतणावांमुळे, गतीमुळे आणि इतर कारणांमुळेही स्किझोफ्रेनियाचं प्रमाण वाढलेलं आढळलंय. स्किझोफ्रेनिया होऊ नये याकरिता गरोदरपणात किंवा बाळंतपणात आईच्या प्रकृतीची खूप काळजी घेणं, हा एक प्रतिबंधक उपाय आहे. कारण काही वेळा याच प्रक्रियेत बिघाड झाल्यामुळे किंवा प्रसूतीच्या वेळी मुलाला ऑक्‍सिजन कमी मिळाल्यामुळे आणि इतरही वेगवेगळ्या संबंधित कारणांमुळे स्किझोफ्रेनियाची शक्‍यता वाढते. अशी काळजी घेतल्यास निदान काही केसेस तरी स्किझोफ्रेनिया होण्यापासून वाचू शकतील; पण तरीही स्किझोफ्रेनिया पूर्णपणे टाळता येईल, असं अजूनही चित्र नाही.

फोबियाज कारणं आणि उपाय

July 10, 2011

फ्रॉईडनं फोबियाजवरती 1890 च्या दशकाच्या मध्यावर बरेच लेख लिहिले होते. यामध्ये त्यानं नादिष्टपणा आणि भयगंड यांच्यामधला फरकही स्पष्ट केला होता. मृत्यू, आजारपण, साप, रात्र अशा गोष्टींच्या भयगंडांना तो "कॉमन फोबियाज' असं म्हणायचा. विशिष्ट गोष्टींच्या भयगंडांना तो "स्पेसिफिक फोबियाज' म्हणे. फोबियाज हे लैंगिक ताणतणावामुळे किंवा नपुंसकत्व असेल तर उद्‌भवतात, असं तो म्हणे. स्त्रियांमध्ये फोबियाज जास्त प्रमाणात आढळून येतात, असंही त्याचं मत होतं.

फ्रॉईडनं 1909 मध्ये "ए फोबिया इन हे फाइव्ह इयर ओल्ड बॉय' हे पुस्तक प्रकाशित केलं. यामध्ये त्यानं हॅन्स नावाच्या मुलाचं 140 पानांत विश्‍लेषण केलं होतं. हॅन्सला घोड्याची इतकी प्रचंड भीती वाटत असे, की तो घराबाहेरच पडत नसे. आपल्या वडिलांविषयी वाटणारा सुप्त द्वेष घोड्यांच्या रूपात त्याच्या समोर ठाकत असे, असं फ्रॉईडनं त्याचं विश्‍लेषण केलं होतं. पण हा युक्तिवाद बिहेवियरिस्ट मानसशास्त्रज्ञांना मान्य नव्हता. चार वर्षांचा असताना हॅन्सनं घोड्यांचा एक अपघात बघितला होता, आणि म्हणूनच त्याला हा फोबिया झाला होता, असं वोल्प आणि रॅचमन यांनी म्हटलंय. कुठलीशी गोष्ट (उदा.- प्राणी) बघताना त्याच वेळी एखादी धक्कादायक (ट्रॉमॅटिक) घटना घडली तर त्या गोष्टीची भीती वाटायला लागते आणि ती वाढत जाऊन त्याचा फोबिया बनतो. आणि हे जसं निसर्गतःच किंवा अचानक घडू शकतं तसंच आपल्याला स्टिमुलस-रिस्पॉन्सची बिहेवियरल पद्धती वापरून एखाद्या गोष्टीचा भयगंड एखाद्या माणसात निर्माणही करता येतो, असं बिहेवियरिस्ट म्हणायला लागले.

यासंबंधी 1990 च्या दशकात मिनेका, कूक आणि त्यांचे सहकारी यांनी माकडांवर प्रयोग केले. प्रयोगशाळेत वाढवलेल्या काही माकडांना प्रथम सापांची भीतीच वाटत नसे. मग त्यांना काही जंगली माकडं दाखवण्यात आली. ती जंगली माकडं मात्र साप दाखवल्यावर खूप घाबरायची. हे बघून ही प्रयोगशाळेत वाढलेली माकडंही सापांना घाबरायला लागली. ही भीती पुढचे तीन महिने टिकली. याचा अर्थ मास मीडियाही असे फोबियाज निर्माण करू शकतो, असं संशोधकांना वाटायला लागलं.

पण एवढं असूनही प्रत्यक्ष अनुभवातून किंवा दुसऱ्यांबद्दलचं दृश्‍य बघून जो फोबिया निर्माण होतो तो पुन्हा व्यक्तीप्रमाणे बदलतो. त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व, जडणघडण आणि पूर्वीचे अनुभव, यामुळेही या फोबियामध्ये फरक पडू शकतो. उदाहरणार्थ- जर खूप शांत आणि खेळकर कुत्र्यांबरोबर एखाद्याला खूप चांगले अनुभव पूर्वी आले असतील तर नंतर जरी एखादा सतत भुंकणारा कुत्रा बघितला तरी कुत्र्यांविषयीचा फोबिया निर्माण होत नाही. मिनेका आणि कूक यांनी जे सापाला घाबरत नाहीत अशा माकडांचे व्हिडिओ प्रथम प्रयोगशाळेतल्या माकडांना बराच काळ दाखवले आणि मग त्यांना एक भीतिदायक साप दाखवला. या वेळी तो भीतिदायक साप बघून त्या माकडांमध्ये भीती निर्माण झाली नव्हती.

एखाद्याला एखाद्या गोष्टीचा फोबिया कसा आणि किती निर्माण होतो, हे जेनेटिक आणि टेंपरामेंटल घटकांवरही अवलंबून असतं. 2003 मध्ये कगान आणि त्याचे सहकारी यांनी याविषयी अनेक मुलांवर प्रयोग केले. लहानपणापासून लाजरीबुजरी असणारी आणि हसरी, धीट असणारी अशी दोन्ही तऱ्हेची बरीच मुलं त्यांनी निवडली आणि त्यांच्यात वेगवेगळ्या गोष्टींमुळे किती भीती निर्माण होते, ते बघितलं. 1999 मध्ये केंडलर, कार्कोव्हस्की आणि प्रेस्कॉट यांनी जुळ्यांवर केलेल्या प्रयोगांवरून आनुवंशिकतेचा आणि फोबियाचा संबंध दिसून आला. पण याच वेळी जर या जुळ्यांपैकी नंतरच्या आयुष्यात एखाद्याच्या वाट्याला काही भीतिदायक अनुभव आले असतील तर त्याला फोबियाज असण्याची शक्‍यता बरीचशी वाढत होती. थोडक्‍यात, यात "नेचर (आनुवंशिकता, जीन्स)' आणि "नर्चर (आयुष्यातले अनुभव, आजूबाजूचं वातावरण)' या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरत होत्या.

हे फोबियाज किंवा ही भीती घालवण्यासाठी अशा रुग्णांना त भीतिदायक वस्तू (उदा. - कुत्रा) किंवा घटनेपाशी हळूहळू नेण्यात येतं. हे करत असताना त्याच्याबरोबर कोणीतरी मित्र किंवा थेरपिस्ट असावा लागतो. हे असं बराच काळ टप्प्याटप्प्यानं त्या वस्तूच्या किंवा घटनेच्या जवळ जाणं चालू राहतं. "अरेच्या! ती वस्तू जवळ असूनही भीतिदायक काहीच घडत नाहीये' हे त्या रुग्णाच्या मनावर ठसवलं जातं. असं करत शेवटी मग त्या रुग्णाची खात्री पटून त्याची भीती कमी कमी होत जाते, अशी ही थिअरी आहे. प्राण्यांच्या, बंद जागांच्या, रक्ताच्या अशा वेगवेगळ्या फोबियाजसाठी ही थिअरी उपयोगी पडते. यालाच "एक्‍स्पोजर थेरपी' असं म्हणतात. यातल्या "एक्‍स्पोजर'सारख्या कित्येक बिहेवियरल थेरपीजमध्ये पूर्वी फक्त भीती घालवण्यावर भर असे. पॅनिक ऍटॅक्‍सवर फारसा भर नसायचा. 1980 च्या दशकात "इंटरोसेटिव्ह एक्‍स्पोजर' ही पद्धत यासाठी निघाली. यामध्ये त्या रुग्णाला व्यायाम करायला सांगतात. या व्यायामामुळे पॅनिक ऍटॅक्‍सवर मात करता यावी, हा यामागचा उद्देश असतो.

अलीकडे काही थेरपिस्ट कॉंप्युटरच्या साह्यानं व्हर्चुअल रिऍलिटी (व्हीआर)चा वापर करतात. व्हीआरमध्ये कॉंप्युटरच्या पडद्यावर आपल्याला तीन भीतीतली अनेक दृश्‍यं, वस्तू किंवा घटना यांचे व्हिडिओज दाखवतात. क्रमाक्रमानं भीतिदायक वस्तूंविषयी किंवा घटनांविषयी असे व्हिडिओज दाखवून मग प्रत्यक्षात रुग्णाला त्याकडे पुन्हा हळूहळू न्यायचं, हेही थेरपिस्ट करतात. काही जण "कॉग्नेटिव्ह पद्धत' वापरतात. अशा प्रकारची भीती वाटण्यात कसा अर्थ नाही, हे ते विवेकवादानं रुग्णांना दाखवून देतात आणि त्यांच्या भीतीवर हळूहळू मात करायला हे कॉग्निटिव्ह थेरपिस्ट मदत करतात. मात्र यापेक्षा "बिहेवियरल एक्‍स्पोजर पद्धत'च जास्त उपयोगी असल्याचं आढळलंय. भयगंड कमी करण्यासाठी औषधांचाही वापर होऊ शकतो. त्यांचाही थोडाफार उपयोग काही जणांना दिसून आलाय. प्राण्यांबद्दलच्या भीतीवर मात्र औषधं उपयोगी ठरू शकतात, असा कित्येकांचा अनुभव आहे.

"सोशल फोबिया'ला "सोशल अँक्‍झायटी डिसऑर्डर' असंही म्हणतात. मोठ्या सभेत भाषण करण्यापासून ते सार्वजनिक मुताऱ्यांमध्ये मूत्रविसर्जन करण्यापर्यंत अनेक सामाजिक, सार्वजनिक गोष्टींची भीती या फोबियाजच्या रुग्णांना वाटू शकते. त्यामुळे असा विकार झालेले लोक असे प्रसंग किंवा ठिकाणं एक तर टाळतात किंवा त्यांना सामोरं जावंच लागलं तर त्यांना प्रचंड असह्य, तणावपूर्ण परिस्थितीतून जावं लागतं. पब्लिक स्पीकिंगची भीती हा यातला सर्वांत जास्त आढळणारा प्रकार आहे.

काही लोकांना पब्लिक स्पीकिंगसारख्या ठराविक गोष्टींचीच भीती न वाटता कुठल्याही सामूहिक, सार्वत्रिक, सार्वजनिक गोष्टींची भीती वाटते. डीएसएम-4-टीआरमध्ये यालाच "जनरलाइज्ड सोशल फोबिया' असं म्हटलंय. याला डॉक्‍टर "अव्हॉयडंट पर्सनॅलिटी डिसऑर्डर' असं म्हणतात.
एका सर्वेक्षणाप्रमाणे 12 टक्के लोकांना कुठल्या ना कुठल्या तऱ्हेचा सोशल फोबिया असतो. त्यातही बायकांमध्ये तो 60 टक्के, तर पुरुषांमध्ये कमी म्हणजे 40 टक्के आढळतो. हा फोबिया लहानपणापासून सुरू होण्याऐवजी बहुतांश वेळा पौगंडावस्थेत चालू होतो. हा फोबिया असणाऱ्यांपैकी 50 टक्के लोकांना नैराश्‍याचेही झटके येतात असं आढळलंय, तर 33 टक्के हे आपली चिंताग्रस्तता कमी करण्यासाठी दारू घेतात किंवा व्यसनीही असतात, असं दिसून आलंय. उदाहरणार्थ- एखाद्या समारंभाला जाण्यापूर्वीच हे लोक दारू पिऊन जातात.

स्पेसिफिक (विशिष्ट) फोबियाजप्रमाणेच सोशल फोबियाजसुद्धा प्रत्यक्ष धक्कादायक अनुभवांमुळे किंवा तसे अनुभव दुसऱ्याला आल्याचं बघून निर्माण होतात असं आढळलंय. ज्यांना असे सोशल फोबियाज झाले होते त्यांच्यापैकी 56-58 टक्के लोकांच्या पूर्वायुष्यात काहीतरी धक्कादायक घटना घडल्याचं आढळलं होतं. दुसऱ्या एका अभ्यासात ज्यांना मोठेपणी अशी सर्वांसमोर जाण्याची भीती वाटत होती अशांपैकी 92 टक्के लोकांना लहानपणी खूप चिडवलं किंवा अपमानित केलं गेलं होतं, किंवा काहींनी इतरांची अशीच चेष्टा झालेली बघितली होती.

सोशल फोबियाज आनुवंशिक कारणानंही निर्माण होऊ शकतात, पण त्यांचा प्रभाव खूप जास्त नसतो. आपण विचित्र वागत असल्यामुळे आजूबाजूचे लोक आपल्याला नाकारतील, आपली चेष्टा करतील, या विचारांनी त्याची भीती आणखीनच वाढते. सोशल फोबियावर "बिहेवियरल थेरपी' आणि "कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी (सीबीटी)' हे दोन्ही उपयोगी पडू शकतात. थेरपीज सोडून औषधंही यावर उपयोगी पडतात. ती बऱ्याचदा अँटिडिप्रेसंट्‌स असतात.
एड झाईन या मुलानं त्याच्या आईला आपल्या डोळ्यांसमोर मरताना बघितलं. त्याचा त्याच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला. कुठलाही आवाज ऐकला तरी त्याला भीती वाटायची. त्यामुळे त्यानं स्वतःला तळघरात कोंडून घेतलं होतं. त्या खोलीतून बाहेर पडायचं म्हणजे तो दोन पावलं पुढे चालायचा, पण पुन्हा मागे यायचा. असं तास न्‌ तास चालायचं. त्यामुळे त्याला खोलीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला चक्क 10 तास लागायचे! अर्थातच त्याची काळजी घेताना घरच्यांची तारांबळ उडायची. हार्वर्डच्या मायकेल हेनिके या डॉक्‍टरनं एडला यातून कसं बाहेर काढलं याविषयी "लाइफ इन रिवाइंड' या पुस्तकात लिहिलंय.

ऍगोराफोबियानं त्रस्त असलेली मंडळी सार्वजनिक जागांना घाबरतात. त्यात मग रस्ते, दुकानं, मॉल्स, चित्रपटगृहं, ट्रेन्स, बसेस, उपाहारगृहं अशा अनेक गोष्टी येतात. त्याचबरोबर जिथून पळून जाणं अवघड आहे अशी बोगदे, लिफ्ट्‌स, पोहण्याचे तलाव अशीही ठिकाणं येतात. ऍगोराफोबिया हा पॅनिक ऍटॅकशिवायही असू शकत असला तरी बहुतांश वेळा यात पॅनिक ऍटॅकही सुरू होतो. मग चक्कर येणं, घाम येणं, छातीत धडधडणं असे अनेक प्रकार सुरू होतात. ऍगोराफोबिया असलेल्या निम्म्याहून अधिक लोकांना नैराश्‍य, स्पेसिफिक फोबिया, सोशल फोबिया, चिंताग्रस्तता अशा तऱ्हेचे इतरही मनोविकार असतात. ऍगोराफोबियाच्या रुग्णाला ट्रॅंक्विलायझर्स, अँटिडिप्रेसंट्‌स दिली जातात. अँटिडिप्रेसंट्‌ससोबत बिहेवियरल आणि कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीमुळे ऍगोराफोबियाच्या रुग्णांमध्ये सुधारणा दिसून येते.

इतक्‍या प्रकारच्या फोबियाजविषयी वाचल्यावर आपल्याला आश्‍चर्य तर वाटेल, पण ज्यांना ते होतात त्यांची परिस्थिती खूपच दयनीय असते. उदाहरणार्थ- ज्यांना वर बघायचीही भीती वाटते किंवा ज्यांना बसण्याची भीती वाटते किंवा झोपायची भीती वाटते, अशा रुग्णाचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं रोजचं जगणं किती कठीण होत असलं पाहिजे, याची आपण फक्त कल्पनाच केलेली बरी!