Saturday, October 15, 2011

स्मृती आणि विस्मरण

September 18, 2011

स्मृती आणि विस्मरणाबाबत बरंच संशोधन झालंय. स्मृतीचा विचार मानसशास्त्रीय आणि शरीरशास्त्रीय अशा दोन्ही पद्धतींनी झालाय. जेव्हा कुठलीही नवीन माहिती मेंदूकडे येते तेव्हा ती स्मृतीच्या वेगवेगळ् या तुकड्यांना विशिष्ट तऱ्हेने जोडली जाते. संगणकाच्या डाटाबेसपेक्षा अनेक पटीनं हे गुंतागुंतीचं असतं. या परिस्थितीचा वेध या वेळी...


कदा सत्तरीच्या घरातल्या एका जोडप्यानं एक पार्टी आयोजित केलेली असते. पार्टी झकास चाललेली असते. दर 10 मिनिटांनी त्या जोडप्यातला पुरुष आपल्या बायकोला "डार्लिंग, हनी, माय डिअर' अशा छान छान नावांनी पुकारायचा. दोनएक तास ते ऐकल्यावर त्याचा मित्र त्याच्याजवळ जाऊन म्हणाला, ""तुमच्या लग्नाला इतकी वर्षं झाली, पण अजून तू तिला अशा काही हाका मारतो आहेस, की जणू कालच तुमचं लग्न झालंय! किती प्रेम आहे तुमच्यात!'' त्यावर तो म्हातारा त्या मित्राच्या कानात म्हणतो, ""अरे, दहा वर्षांपूर्वीच मी तिचं खरं नाव विसरलोय!''

स्मरणशक्तीचे किंवा विसराळूपणाविषयीचे अनेक किस्से आपण ऐकत असतो. हर्मन एबिंगहॉस या जर्मन मानसशास्त्रज्ञानं विसाव्या शतकाच्या सुरवातीला स्मृतीवर प्रथमच संशोधन केलं. स्मृतीच्या प्रक्रियेत तीन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे माहिती मिळवणं (ऍक्विझिशन), ती साठवणं (स्टोअरेज) आणि ती पुन्हा बाहेर आणणं (रीट्रिव्हल). या तीन गोष्टींपैकी एका गोष्टीत जरी गडबड झाली तरीही आपल्या स्मृ तीत गोंधळ उडू शकतो, असं त्यानं म्हटलं. उदाहरणार्थ आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे त्या वेळी आठवत नाही, पण काही वेळानं ती आपल्याला आपोआपच आठवते किंवा त्या गोष्टीचं पहिलं अक्षर आठवलं तर मग ती आठवते. याचा अर्थ ती आपल्या स्मृतीतून नष्टच झालेली असते असा नाही.

स्मृतीचा विचार मानसशास्त्रीय आणि शरीरशास्त्रीय अशा दोन्ही पद्धतींनी झालाय. मानसशास्त्रीय पद्धतीप्रमाणे आपली स्मृती एखाद्या पेटीप्रमाणे असते असं काहींनी मांडलंय. एखाद्या टोपलीत जशा आपण वस्तू जमा करत जातो, तशा गोष्टींच्या, घटनांच्या आठवणी आणि कल्पना आपण डोक्‍यात/ मनात साठवत जातो. शरीरशास्त्राच्या दृष्टीनं विचार करता जेव्हा आपल्यासमोर काही माहिती, दृश्‍यं किंवा विचार येतात तेव्हा आपल्या मेंदूतले विशिष्ट न्यूरॉन्स क्रियाशील होतात. या सगळ्या न्यूरॉन्सना जोडणारा एक मेमरी ट्रेस किंवा स्मृतीतला ठसा तयार होतो. तीच गोष्ट पुन्हा पुन्हा समोर आली, वाचली किंवा आठवली तर हे ठसे गडद किंवा पक्के होत जातात आणि मग त्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात.

1960, 1970 आणि 1980 च्या दशकात कॉग्निटिव्ह सायकॉलॉजिस्टांनी स्मृतीविषयी अनेक प्रयोग केले आणि यानंतर त्यांनी आपल्या स्मृतीच्या क्षणिक स्मृती, (संवेदनिक नोंद किंवा सेन्सरी रजिस्टर्स किंवा बफर्स), लघुकालिक स्मृती (शॉर्ट टर्म मेमरी) आणि दीर्घकालिक स्मृती (लॉंग टर्म मेमरी) अशा तीन पातळ्या असतात असं मांडलं. संवेदनिक स्मृती किंवा सेन्सरी रजिस्टर्स किंवा बफर्स यांचं अ िस्तत्व तपासून बघण्यासाठी जॉर्ज स्परलिंग यानं प्रयोग केले. आपण जेव्हा एखादं दृश्‍य बघतो तेव्हा त्या दृश्‍याची प्रतिमा आपल्या बफरमध्ये पाव ते अर्धा सेकंद राहते हे त्याला आढळलं; पण ऐकलेला आवाज मात्र या बफरमध्ये जास्त वेळ म्हणजे 2 ते 4 सेकंदांएवढा टिकतो, असं डार्विन आणि त्याचे सहकारी यांनी दाखवून दिलं. 1992 मध्ये डी लो लो यानं केलेल्या प्रयोगावरून दृश्‍य स्मृती ही ज्ञानें द्रियात साठवली जात नसून, मध्यवर्ती मज्जासंस्थेत (सेंट्रल नर्व्हस सिस्टीम - सीएनएस) साठवली जात असावी, असं दिसून आलंय. ती एवढी लहान असल्यामुळे आपण जेव्हा काही बघत, ऐकत असतो तेव्हा फक्त खूप महत्त्वाचं, गरजेचंच टिपतो. यामुळेच आदिमानव जंगलातल्या आपल्या वास्तव्यात टिकून राहू शकला. अनावश्‍यक गोष्टीही जर आपण लक्षात ठेवू शकत असतो, तर निर्णय घेताना आपला गोंधळ होऊन काय करायचं, याचा निर्णय होईपर्यंत वन्य प्राण्यानं आपल्याला खाऊन टाकलं असतं, असं उत्क्रांतिवादी मानसशास्त्रज्ञ म्हणतात. अल्पकालिक स्मृती ही सर्वसाधारणपणे 1 ते 2 मिनिटंच टिकते. यासाठी पीटरसन दांपत्यानं एक प्रयोग केला. त्या प्रयोगात फक्त 18 सेकंदांनंतर 90 टक्के अल्पकालिक स्मृती नष्ट होऊन फक्त 10 टक्के उरली होती, हे त्यांच्या लक्षात आलं. कॉग्निटिव्ह क्रांती होण्यापूर्वी 1955 मध्ये जॉर्ज मिलरनं "स्मृती'वर भाषण दिलं. त्यात आपण सात गोष्टी सहजरीत्या चटकन लक्षात ठेवू शकतो, अशी ही थिअरी होती. ती वुंडनं प्रथम मांडली होती. उदाहरणार्थ 7 अंक असलेला एखादा 4354672 असा आकडा असेल तर तो चटकन लक्षात राहू शकतो. एकदा बघून आपण तो दुसरीकडे पुन्हा न बघता लिहू शकतो; पण त्यापेक्षा खूप जास्त अंक असतील तर तो आकडा लक्षात ठेवणं अवघड जातं, अशी ही थिअरी होती. या अल्पकालिक स्मृतीचेही दोन भाग असतात. एक म्हणजे व्हर्बल. यात आकडे, अक्षरं, शब्द वगैरे गोष्टी मोडतात. दुसरा भाग म्हणजे कॉन्से प्चुअल. यात वेगवेगळ्या संकल्पना येतात. रामरक्षेसारख्या उजळणी केलेल्या कित्येक गोष्टी अल्पकालिक स्मृतीतून दीर्घकालिक स्मृतीमध्ये जात असतात. वेगवेगळे आकडे, अक्षरं, वाक्‍यं, संकल्पना, सिद्धान्त, चेहरे, वास, स्पर्श आणि अशा अनेक गोष्टी आपल्या मेंदूत या वेगवेगळ्या स्मृतींमध्ये साठवतो. जॉन ग्रिफिथ या गणितज्ञाच्या मते आयुष्यभर आपण कुठल्या ना कुठल्या वेळी स्मृतीत साठवून ठेवलेल्या गोष्टींची संख्या 10 चा 11 वा घात (1011) किंवा 10,000 कोटी आहे! संपूर्ण एन्सायक्‍लोपीडिया ब्रिटानिकामधल्या माहितीच्या ती 500 पट आहे!

1960 आणि 1970 च्या दशकात दीर्घकालिक स्मृतीविषयी बरंच संशोधन करण्यात आलं. जेव्हा कुठलीही नवीन माहिती येते, तेव्हा ती आपल्या सध्या अस्तित्वात असलेल्या स्मृतींच्या वेगवेगळ्या तुकड्यांना विशिष्ट तऱ्हेनं जोडली जाते. हे कॉम्प्युटरच्या डेटा बेससारखंच असतं. खरं तर त्यापेक्षाही अनेक पटीनं गुंतागुंतीचं असतं. आई जेव्हा आपल्या मुलाला एक मांजर दाखवते आणि "ते मांजर आहे' असं त्याला सांगते आणि जेव्हा मांजर "म्यॉव' असा आवाज करतं, तेव्हा तो मुलगा त्या मांजराचं चित्र, त्याचा रंग, उंची, त्याची चाल आणि "म्यॉव' असा आवाज असे त्या मांजराचे गुणधर्म आणि "मांजर' ही अक्षरं आणि "मांजर' हा शब्द उच्चारल्यानंतरचे ध्वनी हे सगळं स्मृतीत साठवून ठेवतो. या सगळ्या गोष्टी मेंदूत एकाच ठिकाणी साठवून ठेवल्या असतील असं आपल्याला वाटेल; पण तसं होत नाही. ही माहिती मेंदूत खूपच विखरून ठेवलेली असते. पण जेव्हा "मांजर' हा शब्द जरी कुणी उच्चारला किंवा कुणी "म्यॉव' असा आवाज ऐकला किंवा कुणी मांजर जरी बघितलं तरी त्याची उंची, चाल आ णि इतर अनेक गोष्टी आपल्या चटकन डोळ्यांसमोर येतात. याचं कारण त्या सगळ्या गोष्टी मेंदूत जिथे वेगवेगळ्या ठिकाणी साठवलेल्या असतात त्या सगळ्या ठिकाणांहून त्या एकत्र केल्या जातात आणि मग आपल्यासमोर सादर केल्या जातात.
जर त्या मुलानं अनेक महिन्यांनंतर/ वर्षांनंतर पूर्वी पाहिलेल्या मांजरापेक्षा वेगळ्या रंगाचं, आकाराचं आणि मुख्य म्हणजे वेगळ्या स्थितीत (पोझिशन) बसलेलं मांजर बघितलं तरी तो मुलगा क्षणार्धात ते मांजर आहे हे ओळखतो. हे नक्की कसं होतं, याचं कोडं अजून पूर्णपणे सुटलेलंच नाहीये. पूर्वी बघितलेल्या गोष्टी आपण जशाच्या तशा आठवू शकणं याला "दृश्‍य स्मृती' (व्हिज्युअल मेमरी) असं म् हणतात. आपण एखादी गोष्ट लक्षात ठेवतो किंवा शिकतो म्हणजे नेमकं काय होतं? आणि जर या शिकण्याचा मेंदूच्या रचनेशी आणि त्यांच्या रसायनाशी संबंध असेल तर ती कायमच टिकायला पाहिजे. मग आपण काही गोष्टी विसरतो त्या कशा? एखाद्या म्हाताऱ्या माणसाला त्याच्या लहानपणी खेळलेला क्रिकेटचा एक सामना आणि त्यात त्यानं कशी सेंच्युरी मारली होती हे काल घडल्याप्रमाणे अचूकपणे आठवत असतं; पण नुकताच पेपर वाचल्यानंतर चष्मा कुठे ठेवलाय आठवत नाही.

ऍगाथा ख्रिस्ती या प्रचंड प्रसिद्ध ब्रिटिश रहस्यकथा लेखिकेची गोष्ट गंमतशीर आहे. 3 डिसेंबर 1926 रोजी तिच्या बर्कशायरमधल्या घरातून ती अचानक गायबच झाली. वर्तमानपत्रात तिच्याविषयी उलटसुलट बातम्या येत असल्यामुळे सगळीकडे गूढ वातावरण वाढतच चाललं होतं. शेवटी अनेक पोलिस तिचा शोध घेण्यासाठी पाठविण्यात आले. ऍगाथाच्या नवऱ्याचं- अर्चीचं एका मुलीबरोबर प्रे मप्रकरण चालू असल्यानं त्यानंच ऍगाथाचा खून केला असल्याचा बऱ्याच लोकांना संशय येत होता. त्यानंतर 14 डिसेंबरला हॅरोगेटमधल्या एका हॉटेलमध्ये राहत असलेली एक बाई म्हणजे आपली बायको ऍगाथाच आहे, हे अर्चीनं ओळखलं. पत्रकारांनी ऍगाथावर प्रश्‍नांचा भडिमार केला; पण ती तिच्या पुढच्या संपूर्ण आयुष्यातही गायब होण्याविषयी चकार शब्द बोलली नाही. तिला ऍम्नेशियाचा झटका (विस्मरणाचा ऍटॅक) आल्यामुळे ती अशी वागली, असं स्पष्टीकरण अर्चीनंच पत्रकारांना दिलं. ऍगाथा ख्रिस्ती आगामी पुस्तकाचा खप वाढावा म्हणून स्टंट्‌स करतेय, असं सगळ्या वर्तमानपत्रांनी छापलं. प्रसिद्धीपासून दूर पळणाऱ्या ऍगाथा ख्रिस्तीला तिच्या या स्मृतिभ्रंशाचे लोकांनी असे वेडेवाकडे अर्थ लावावेत याचं अतीव दुःख झालं. त्यातून ती कधीच सावरली नाही.

गोडार्डच्या मते, आपल्या मेंदूत स्मृतीमुळे तयार झालेले मेमरी ट्रेसेस किंवा न्यूरॉन्सची सर्किट्‌स जर क्षीण होत गेली तर आपण गोष्टी विसरायला लागतो. जसजसा काळ लोटतो तसतसं आपण जास्त जा स्त विसरतो. पण एबिंगहॉसच्या मते, आपण पूर्णपणे कधीच विसरत नाही. त्यानं केलेल्या प्रयोगात एक गंमतशीर गोष्ट दिसून आली. कुठलीही गोष्ट शिकल्यानंतर उजळणी झाली नाही तर 15 मिनिटांत त् याची आठवण किंवा स्मृती ही 100 टक्‍क्‍यांवरून धाडकन 35 टक्‍क्‍यांवर येते. म्हणजे 15 मिनिटांत आपण 65 टक्के विसरतो. पण नंतर काळाबरोबर हा विसरण्याचा दर कमी कमी होत जातो. 31 दिवसांनंतरही स्मृतीचं प्रमाण फक्त 10 टक्‍क्‍यांवर घसरतं.

मेंदूच्या टेम्पारेल लोब, फ्रॉंटल लोब आणि हिप्पोकॅंपस यांना दुखापत झाल्यावर स्मृतीविषयक अनेक विकार होऊ शकतात, असं मेंदूतज्ज्ञांना दिसून आलंय. मानसशास्त्रीय किंवा शारीरिक कारणांमुळे स्मृ तिनाश किंवा स्मृतिभ्रंश (ऍम्नेशिया), अपघातामुळे रेट्रोग्रेड ऍम्नेशिया, ताणतणावांमुळे ऍम्नेशिया, तर दीर्घकाळच्या मद्यपानामुळे किंवा व्यवस्थित सात्त्विक खाणं खाल्लं नाही तरीही स्मृतिनाश होऊ शकतो. शॉर्ट टर्म मेमरी लॉस, डिमेन्शिया, हटिंग्टन्स डीसी, अल्झायमर्स यांचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे.

No comments:

Post a Comment