Saturday, October 15, 2011

नैराश्‍य (डिप्रेशन)

July 31, 2011

नैराश्‍याच्या वाटेवर हरएक चेहरा जुना आहे, खोल गर्तेतला प्रवास सारा फिरून पुन्हा पुन्हा आहे.
नैराश्‍य हा एखाद्या संसर्गजन्य रोगालाही लाजवेल इतक्‍या झपाट्यानं पसरत चाललेला एक मनोविकार आहे. नैराश्‍याला शारीरिक, मानसिक आणि सामाजिक अशी कारणं असतात. शारीरिक कारणांमध्ये आनुवंशिकता आणि त्याचबरोबर मेंदूतल्या अनेक वेगवेगळ्या न्यूरोट्रान्समीटर्सच्या आणि हार्मोन्सच्या असंतुलनामुळे आणि मेंदूतल्या विशिष्ट भागांमधल्या बिघाडामुळे नैराश्‍य निर्माण होतं, अशी एक थिअरी आहे; पण नक्की कशामुळे काय होतं याविषयी बरंच संशोधन आणि वादविवाद चालूच आहेत. नैराश्‍य येण्यास मानसिक कारणंही तितकीच जबाबदार असतात. आई-वडिलांचा मृत्यू किंवा घटस्फोट, आपल्याच अपत्याचा मृत्यू, कुटुंबातला कलह, वृद्धत्व, पालकांचा प्रचंड धाक, अतिशिस्त किंवा प्रेमभंग अशा अनेक कारणांमुळेही माणसांमध्ये नैराश्‍य निर्माण होतं. नैराश्‍यामुळे हृदयविकार, मधुमेह, हार्मोनल डिसऑर्डर्स, पार्किन्सन्स (कंपवात), अल्झायमर्स होऊ शकतो. तसंच याउलट हृदयविकार, कॅन्सर अशांसारख्या शारीरिक व्याधींमुळे किंवा दीर्घ काळ ब्लडप्रेशरवरच्या, झोपेच्या किंवा संततिनियमनासाठीच्या काही ठराविक गोळ्या घेतल्यामुळेही नैराश्‍याला निमंत्रण मिळतं, अशी एक थिअरी आहे.

सामाजिक कारणांमध्ये एकटेपणा वाटणं हे एक महत्त्वाचं कारण आहे. समाज आपल्या पाठीशी आहे, आपण एकटे नाही, या जाणिवेमुळे व्यक्तिगत आणि त्यामुळे एकूण समाजात नैराश्‍याचं प्रमाण कमी राहतं. याविषयी सेलिगमन या मानसशास्त्रज्ञानं छान सांगितलंय. शीफेलिने, न्यू गिनी या प्रांतातल्या कलुली या जमातीत एखाद्या माणसाचं नुकसान झालं तर त्याची जबाबदारी ही आजूबाजूच्या सगळ्यांची समजतात. म्हणजे एखाद्याचं डुक्कर मेलं तर ते ज्यानं मारलं अशा संशयिताच्या घरासमोर जाऊन सर्व जण मिळून घोळक्‍यानं आरडाओरडा करतात आणि त्याला नुकसानभरपाई द्यायला भाग पाडतात. यामुळे नुकसान झालेल्या माणसाला एकटं आणि असहाय वाटत नाही.

पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती त्या वेळी एकूणच सामाजिक सुरक्षितता बरीच होती. अडीअडचणींना लगेच सगळे धावून येत. पण गेल्या शतकात शहरांची वाढ झाली, विभक्त कुटुंबपद्धती आली. त्यातून स्वातंत्र्य मिळालं, पण सुरक्षितता घटली. प्रत्येकाचा व्यक्तिवाद वाढला. त्याला असहाय आणि एकटं वाटायला लागलं आणि त्यातून नैराश्‍यही वाढायला लागलं.

नैराश्‍य हे आपल्याला साहित्यात अनेकदा दिसतं. कीट्‌ससारख्या कवींच्या कविता नैराश्‍यानं, दु:खानं इतक्‍या ओतप्रोत भरलेल्या असत, की कीट्‌स आजच्या काळात नैराश्‍याचा रुग्ण मानला गेला असता. जर्मन लेखक गटेनं लिहिलेलं "द सॉरोज ऑफ यंग वर्थर' हे पुस्तक 2000 लोकांनी वाचलं आणि ते वाचून नैराश्‍याने त्यांनी सरळ आत्महत्या केल्या. डोस्टोव्हस्कीच्या "क्राईम अँड पनिशमेंट'मध्ये, चेकॉव्हच्या "सीगल'मध्ये शेवटी आत्महत्या आहे. "टु बी ऑर नॉट टु बी' या प्रसिद्ध मनोगतात हॅम्लेट त्याच्या वडिलांच्या मृत्यूमुळे नैराश्‍य येऊन आयुष्य संपवावं असं म्हणतो. ग्रॅहॅम ग्रीनच्या "द पॉवर अँड द ग्लोरी', "द क्वाएट अमेरिकन'सारख्या कादंबऱ्यांतली पात्रं नैराश्‍याच्या गर्तेत गेलेली दिसतात.

सामान्य लोकांपेक्षा कलाकार, कवी अशा लोकांना बायपोलार डिसऑर्डर जास्त प्रमाणात होते. म्हणूनच ते आनंद किंवा दु:ख आणि नैराश्‍य यांच्या टोकाला जाऊ शकतात. जगप्रसिद्ध चित्रकार व्हिसेंट व्हॅन गॉग, व्हर्जिनिया वूल्फ, अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी नैराश्‍याच्या तीव्र गर्तेत असताना आत्महत्या केली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्त्सिन, इंग्लंडची लेडी डायना, हॉलिवूड अभिनेता हॅरिसन फोर्ड, हॅरी पॉटरची लेखिका जे. के. रोलिंग, मर्लिन मन्‍रो, अब्राहम लिंकन, विन्स्टन चर्चिल, रुझवेल्ट, निक्‍सन यांच्यासारखे खंदे राजकारणी आणि आलड्रिनसारखा अंतराळवीर, लिओ टॉलस्टॉय, एडगर ऍलन पो, चार्ल्स डिकन्स असे लेखक आणि मायकेल अँजेलोसारखे कलावंत नैराश्‍यामुळे त्रस्त होते.

नैराश्‍याचे दोन मुख्य प्रकार म्हणजे डिप्रेसिव्ह (युनिपोलर) डिसऑर्डर आणि बायपोलार डिसऑर्डर. डिप्रेसिव्ह डिसऑर्डरचे त्याच्या तीव्रतेवरून माइल्ड, मॉडरेट आणि मेजर असे तीन प्रकार मानले जातात. डिप्रेशनचा जास्तीत जास्त आढळणारा प्रकार म्हणजे मेजर डिप्रेशन. मेजर डिप्रेशनमध्ये सलग डिप्रेशनमध्ये राहण्याचा काळ जास्त असतो. अशाच एका केसमध्ये आर्किटेक्‍ट म्हणून अतिशय यशस्वी असलेल्या एका माणसात एकदम लक्षणीय बदल दिसायला लागले. जेवण झाल्यावर कोणाशीच न बोलता तो बेडरूममध्ये जायचा. मग हळूहळू कामावर जाणं बंद झालं. जेवणखाण बंद झालं. मुठी आवळून तो सारखा रडत बसायचा. "तुम्ही माझ्यासारख्या राक्षसाला कसं सहन करता?' असं तो स्वत:च्या मुलांना म्हणायचा. हे बराच काळ चाललं आणि हळूहळू तो नैराश्‍याच्या मगरमिठीत खोलवर रुततच गेला.

बायपोलार डिसऑर्डरचे दोन मुख्य प्रकार म्हणजे मॅनिया आणि डिप्रेशन. अतिशय आनंदानं, तीव्रतेनं उत्तेजित होणं याला मॅनिया म्हणतात, तर दु:ख आणि वैफल्याच्या तीव्रतेला डिप्रेशन म्हणतात. बायपोलार डिसऑर्डरमध्ये या दोन मनोवस्थांमध्ये ही माणसं सतत दोलायमान असतात. बायपोलार डिसऑर्डरचेही अनेक प्रकार आणि उपप्रकार आहेत. बायपोलार डिसऑर्डरच्या रुग्णांना दैनंदिन जीवनातले तणाव सहन होत नाहीत. मित्र बनवण्यात अशी माणसं अयशस्वी ठरतात.

बायपोलारचं उदाहरण म्हणजे कार विकणारा मनोज या सेल्समनची गोष्ट. त्याच्या एका मैत्रिणीला तो खूपच लहरी आहे असं वाटायचं. ती मैत्रीण मानसोपचार तज्ज्ञाकडे नर्स म्हणून काम करत होती. मनोजबरोबर केलेल्या गप्पांमधून तो शाळेत असताना वयाच्या 14 व्या वर्षी त्याला सतत मॅनिया आणि डिप्रेशनचे ऍटॅक यायचे, असं तिच्या लक्षात आलं. नैराश्‍याच्या सायकलमध्ये असताना तो 10-14 तास झोपून राहायचा, आपलं जगणं निरुत्साही, निरुद्देश असल्यासारखं त्याला वाटत असे. या मूडमध्ये 4-7 दिवस जायचे आणि परत तो एकदम ताजातवाना व्हायचा. मग तो अतिउत्साहात पहाटे तीनला उठून कामाला लागायचा. मग मॅनियाची सायकल मात्र चालू व्हायची. या त्याच्या "मूडी' स्वभावामुळे शाळेत तो कधीच हुशार मुलगा म्हणून चमकला नाही. त्याच्या कामाबाबतही नेमकं हेच घडत होतं. त्याला वाटणाऱ्या चांगल्या दिवसांत ग्राहकांशी उत्तम संवाद साधून तो गाड्यांची चांगली विक्री करायचा, तर वाईट दिवसांत कटकट करून ग्राहकांना पळवून लावायचा. पण औषधं आणि मानसोपचारांमुळे तो काही दिवसांत बरा झाला. या रुग्णांना जर समाजातून मानसिक, भावनिक मदत मिळाली तर ते लवकर सुधारतात. त्यांच्यावर उपचार म्हणून कॉग्निटिव्ह उपचार पद्धत वापरतात. त्यांच्या कुटुंबांनाही सायकोएज्युकेशन दिलं जातं आणि अशा रुग्णांबरोबर कसं वागायचं हे शिकवलं जातं.

नैराश्‍याची लाज वाटल्यामुळे बरेचसे रुग्ण उपचार घेतच नाहीत. नैराश्‍याचे अनेक प्रकार असल्यामुळे त्याच्या लक्षणांवरून विकाराचं अचूक निदान होत नाही. ते झालं तर नैराश्‍यावर जास्त परिणामकारक औषधं वापरता येतील. नैराश्‍यावर वेगवेगळी अँटिडिप्रेसंट्‌स वापरली जातात. अँटिडिप्रेसंटच्या गोळ्यांनी न्यूरोट्रान्समीटर्समध्ये बदल होतात. त्यामुळे नैराश्‍य कमी व्हायला आणि झोप नीट लागायला मदत होते. ही औषधं दिल्यावर रुग्णाला काही काळ चांगलं वाटतं, पण विकार बळावण्याची शक्‍यता असते. अँटिडिप्रेसंट्‌स, ईसीटी (इलक्‍ट्रिक शॉक्‍स), टीएमएसची मॅग्नेटिक थेरपी अशा शारीरिक बदल करणाऱ्या उपचारांसोबत मानसोपचार देण्याची गरज नैराश्‍यात असतेच. त्यातही सीबीटी (कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी) ही खूप महत्त्वाची मानली जाते.

अल्टरनेटिव्ह उपचारांमध्ये आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक उपचारही नैराश्‍यावर केले जातात. कॉम्प्लिमेंटरी थेरपीजमध्ये व्यायाम, मेडिटेशन आणि योग्य आहार हे उपाय केले जातात. याशिवाय रिलॅक्‍सेशन थेरपीज, एन्व्हायर्न्मेंटल थेरपीज (उदा. अरोमा थेरपी, संगीत थेरपी), सायकोथेरपी (टॉक थेरपी), इंटरपर्सनल थेरपी (आयपीटी), स्पिरिच्युअल किंवा फेथ बेस्ड ऍक्‍टिव्हिटीज, प्राण्यांसोबत आणि इतर व्यक्तींसोबत संवाद यांचाही नैराश्‍यावर खूप चांगला परिणाम होतो, असा अनेकांचा दावा आहे. औषधं आणि मानसोपचार घेणाऱ्या लोकांपैकी साधारण 40 टक्के लोक पूर्णपणे बरे होतात. उरलेल्यांपैकी अनेकांमध्ये बरीच सुधारणा दिसून येते. पण काही केसेसमध्ये मात्र नैराश्‍य आयुष्यभर घेरून टाकतं, तर त्यातले काही आत्महत्या करतात.

नैराश्‍यावर सगळ्या उपचार पद्धती काही प्रमाणात परिणामकारक ठरत असल्या तरी अँटिडिप्रेसंट्‌सबाबत बरेच प्रश्‍न आहेत. औषधं घेतली तर किती काळ घ्यायची? डोस किती असावा? औषधं आणि मानसोपचार यांचं कोणतं प्रमाण रुग्णाला लवकर बरं करेल? औषधं बंद झाली तरी मानसोपचार घेत राहावेत का? ज्यांना अँटिडिप्रेसंट चालत नाहीत त्यांनी कोणते उपचार घ्यावेत? नॉर्मल डिप्रेशनच्या लोकांना तर कोणते उपचार घ्यावेत, याबद्दलचं चित्र काहीसं धूसर आहे.

आज जगाला चंगळवादानं घेरलंय. या नव्या चंगळवादी, बाजारू समाजव्यवस्थेचा मानसिकतेवर काय परिणाम होतो? एका अभ्यासानुसार, अमेरिकेत दुसऱ्या महायुद्धापासून ते शतकाच्या अखेरीपर्यंत नैराश्‍याचं प्रमाण दहापट वाढलं! 1990 च्या दशकात दहा मोठ्या विकारांपैकी पाच मनोविकार होते. त्यात नैराश्‍याचा पहिला क्रमांक लागत होता. नैराश्‍य हा 2020 मध्ये अत्यंत मोठा मनोविकार असेल असं "वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन'नं म्हटलंय.
मानवी सुखांच्या संकल्पनांचं एरिक फ्रॉम यानं सुंदर विश्‍लेषण केलंय. माणसाच्या आयुष्यातल्या सुखाच्या कल्पना आजकाल बदलत चालल्या आहेत. वेगवेगळ्या क्रयवस्तू गोळा करणं आणि त्यांचा जास्तीत जास्त साठा करणं यातच तो सुख आणि आयुष्याची परिपूर्णता मानायला लागला आहे. त्यामुळे त्याला कितीही त्या गोष्टी मिळाल्या तरी त्याची हाव काही कमी होत नाही. त्याची सतत कुणाशी तरी स्पर्धा तर कधी तुलना चालू असते. यामुळे प्रचंड मानसिक असुरक्षितता, एकाकीपणा आणि नैराश्‍य यांना त्याला सामोरं जावं लागतंय.

समाजाच्या चालीरीती स्वीकारलेल्या माणसाला आपण नॉर्मल ठरवतो, पण खरं तर याउलट माणसाच्या मानसिक गरजा एखादा समाज भागवतोय की नाही, त्यावरून तो समाज निरोगी आणि चांगला आहे (दी सेन सोसायटी) की नाही ते ठरवणं योग्य ठरेल, असं एरिक फ्रॉम म्हणतो. थोडक्‍यात, एकूणच समाजात मनोविकारांचं, नैराश्‍याचं प्रमाण प्रचंडपणे वाढतंय, मात्र रुग्णांवर उपचार करण्याबरोबरच या समाजालाच कीड लागली आहे का, याचा विचार सर्वप्रथम झाला पाहिजे, असं एरिक फ्रॉम याचं म्हणणं आज किती खरं आहे!

No comments:

Post a Comment