Saturday, October 15, 2011

बघ्यांची वागणूक

August 14, 2011

1964 मध्ये मार्च महिन्यात न्यूयॉर्कच्या क्वीन्सबरोमधल्या क्‍यू गार्डन्स इथे एक खून झाला. न्यूयॉर्क टाइम्सच्या मुखपृष्ठावर त्याची बातमी झळकली. तसं पाहिलं तर या बातमीत सनसनाटी असं काहीच नव्हतं, पण तरीही या बातमीनं खळबळ माजवली होती. किटी जेनोव्हीज ही एक बारमध्ये मॅनेजर म्हणून काम करणारी बाई पहाटे तीन वाजता बार बंद करून आपल्या घरी निघाली असताना विन्स्टन मॉसले या माणसानं रस्त्यात तिला भोसकून मारलं होतं. त्यानं पूर्वीही दोन बायकांचा खून केला होता, पण किटीचा खून तासभर चालल्यामुळे एवढा गाजला होता. किटीला एकदा भोसकून रक्तबंबाळ अवस्थेत तसंच विव्हळत ठेवून मॉसले तिथून निघून गेला. पण काही काळात पुन्हा परतला आणि त्यानं तिला पुन्हा भोसकून तिथून काढता पाय घेतला. असं त्याने अनेक वेळा केलं. या सगळ्या काळात किटी मोठमोठ्यानं मदतीसाठी धावा करत होती. त्या बागेजवळच्या घरात राहणाऱ्या 38 लोकांनी तिचा आक्रोश ऐकून लगेच आपल्या खिडक्‍या उघडून ते दृश्‍य बघायला सुरवात केली खरी, पण हे सगळं नाट्य चालू असताना एकही माणूस तिच्या मदतीला धावला नाही. शेवटी तिचा मृत्यू झाल्यावरच एकानं पोलिसांना फोन केला. न्यूयॉर्क टाइम्सच्या मुखपृष्ठावर झळकलेली ही बातमी सनसनाटी ठरली होती ती फक्त निर्घृण खुनामुळेच नव्हे, तर त्याहीपेक्षा त्या बघ्यांच्या वागणुकीमुळे!

आधुनिक युगात माणसं कशी भावनाशून्य झाली आहेत, याविषयी यानंतर अनेक लेख आले आणि अनेक मानसशास्त्रज्ञांनीही मग या घटनेचं त्यांच्या परीनं विश्‍लेषण केलं. न्यूयॉर्कमध्ये वाढलेल्या एकूणच गुन्हेगारीचा हा परिणाम आहे आणि या भानगडीत आपण पडलो तर आपल्यावरच गदा येईल, या भीतीनं कुणी काही केलं नाही, असं डॉ. जॉर्ज सर्बन यानं मांडलं.

पण न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या न्यूयॉर्क विद्यापीठातल्या जॉन डार्ले आणि बिब लाटाने या दोन मानसशास्त्रज्ञांना मात्र हे मत खूपच पोकळ वाटलं. ते दोघं याविषयी रात्रभर चर्चा करत होते. त्या खुनाचा विषय काही कोणाच्याही डोक्‍यातून जात नव्हता. 38 लोकांनी तो खून होताना बघूनही काहीच कसं केलं नाही, याविषयी सगळ्या वर्तमानपत्रांत रकानेच्या रकाने भरून येत होते. सगळ्या टीव्ही चॅनेल्सवर अनेक तज्ज्ञ याविषयी आश्‍चर्य दाखवत होते. पण त्या रात्री याविषयी बोलतानाच डार्ले आणि लाटाने यांना एक ब्रेनवेव्ह आली आणि त्यातूनच एक इनसाइट मिळाली. 38 लोकांनी हे दृश्‍य बघितल्यामुळेच उलट कोणी काही केलं नसावं; दोघंतिघंच बघे असते तर त्यांनी काहीतरी करण्याची शक्‍यता बरीच जास्त होती, असं त्यांना अचानक वाटलं. त्यांची चर्चा संपली तेव्हा पहाट झाली होती. त्यांनी त्याचं हायपोथेसिस तपासून बघण्यासाठी "बघ्यांची वागणूक' यावर प्रयोग आणि संशोधन सुरू करण्याचं ठरवलं.
1968 मध्ये डार्ले आणि लाटाने यांनी यासंबंधी विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांवर त्यांचे प्रयोग केले. डार्ले-लाटाने यांनी त्या विद्यार्थ्यांमध्ये आपलीही काही मुलं पेरली होती. ते सगळे एकत्र बोलत असताना या पेरलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकानं फीट आल्याचं नाटक केलं. या फीटविषयी एकालाच समजलं तर त्याची प्रतिक्रिया काय होते, काहींना समजलं तर त्यांची प्रतिक्रिया काय होते आणि अनेकांना समजलं तर त्यांची प्रतिक्रिया काय होते आणि त्यातले किती मदतीला धावून येतात, याची डार्ले-लाटाने यांनी निरीक्षणं केली, आणि असं अनेक वेळा करून त्यांनी मोजमापं करून आकडेवारीसहित निष्कर्षही काढले. जेव्हा (काल्पनिक) फीट यायच्या वेळी शेजारी दुसरा एकच विद्यार्थी हजर होता तेव्हा तो मदतीला पुढे येण्याची शक्‍यता 85 टक्के होती. (म्हणजे 100 प्रयोगांत 85 वेळा तो विद्यार्थी (दर वेळेला वेगवेगळा) मदतीसाठी पुढे आला.) पण फीट येण्याच्या वेळी तिथे जेव्हा जास्त विद्यार्थी हजर होते तेव्हा फक्त 31 टक्के विद्यार्थी मदतीसाठी पुढे आले. म्हणजे जसजशी बघ्यांची संख्या वाढत होती, तसतशी कुणीतरी मदतीसाठी पुढे येण्याची शक्‍यता मात्र कमीत कमी होत चालली होती.

दुसऱ्या एका प्रयोगात एका लिफ्टमधून जाताना मुद्दामहून एक नाणं खाली पाडणं आणि लिफ्टमधून चाललेला दुसरा कोणी ते उचलून द्यायला मदत करतो का हे बघणं, असं चालू झालं. जेव्हा त्या लिफ्टमध्ये दुसरा एकच माणूस असायचा तेव्हा 40 टक्के वेळा तो दुसरा माणूस ते उचलून द्यायला मदत करायचा; पण जेव्हा त्या लिफ्टमध्ये जास्त माणसं असायची तेव्हा हेच प्रमाण 20 टक्‍क्‍यांवर घसरायचं. डार्ले-लाटाने यांनी असे वेगवेगळे 40 च्या वर प्रयोग केले आणि यातला प्रत्येक प्रयोग अनेकदा करून निष्कर्ष काढले. हे सगळे बघे एकत्र आहेत का, ते एकमेकांना बघू शकताहेत का, अशा अनेक गोष्टींचाही बघ्यांच्या वागणुकीवर काय परिणाम होतो, याचाही मग अभ्यास झाला.

या प्रयोगानंतर डार्ले आणि लाटाने यांना क्‍यू गार्डन्समधल्या 38 बघ्यांच्या निष्क्रियतेचं मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून स्पष्टीकरण मिळत होतं. यालाच मग ते "बायस्टॅंडर इफेक्‍ट' असं म्हणायला लागले. त्यांच्या मते, अशा वागणुकीमध्ये किंवा "बायस्टॅंडर इफेक्‍ट'मधल्या वागणुकीसाठी तीन कारणं होती. एक म्हणजे इतर सगळे हजर असताना आपणच काहीतरी कृती करायला जाणं योग्य आहे की नाही, हा प्रश्‍न प्रत्येकाच्या मनात येतो आणि त्यामुळे कोणीच मदतीला पुढे येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, ज्याअर्थी इतर कोणीच मदतीला पुढे येत नाहीयेत, त्याअर्थी तीच सगळी माणसं बरोबर असली पाहिजेत आणि आपणही तसंच वागलं पाहिजे, असं प्रत्येकाला वाटतं आणि मग सगळेच मागे राहतात. तिसरी गोष्ट म्हणजे, अनेक जणांनी ती गोष्ट बघितल्यामुळे काहीतरी करण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे, आपली एकट्याचीच नाही, हे कळल्यामुळे नैतिक ओझं बरंच कमी होतं आणि मग प्रत्येक जण गप्प बसतो. लाटाने आणि त्यांचे सहकारी यांनी यानंतर सहा लोकांना एकत्र करून टाळ्या वाजवायला सांगितल्या. यानंतर त्यानं फक्त एकाच माणसाला टाळ्या वाजवायला सांगितल्या. त्या वेळी त्यांना एक आश्‍चर्यकारक गोष्ट आढळली. जेव्हा 12 हात टाळ्या वाजवत होते तेव्हाचा टाळ्यांचा आवाज हा दोन हातांच्या टाळ्यांच्या आवाजापेक्षाही हळू येत होता. इतर लोक तीच गोष्ट करत असताना आपण कशाला ती करायला जा, आणि आपण ती नाही केली तर कोणाला कळणार आहे, हीच त्यात भावना असते, असं लाटानेच्या लक्षात आलं. रस्सीखेचीच्या शर्यतीत हेच दिसून येतं. याला "सोशल बक पासिंग' असं म्हणतात.

डार्ले-लाटाने यांच्या प्रयोगामुळे "बायस्टॅंडर इफेक्‍ट'मध्ये अनेक संशोधकांना रस वाटायला लागला. पुढच्या 10-12 वर्षांत तीस प्रयोगशाळांत मिळून यावर 56 वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. प्रत्येक प्रयोगात अनेक बघे निवडले होते आणि खात्री करून घेण्यासाठी प्रत्येक प्रयोग हा अशा बघ्यांच्या अनेक गटांवर झाला. यात एकूण मिळून 6000 लोकांना वेगवेगळ्या मुद्दामहून तयार केलेल्या इमर्जन्सीच्या परिस्थितीतून जावं लागलं. या 56 प्रयोगांपैकी 48 प्रयोगांत "बायस्टॅंडर इफेक्‍ट' स्पष्टपणे दिसून आला.

1978 मध्ये बेमोन आणि इतर काही संशोधकांनी आणखी एक गोष्ट दाखवून दिली. जेव्हा या "बायस्टॅंडर इफेक्‍ट'विषयी त्या बघ्यांना जाणीव करून दिली तेव्हा त्यांची निष्क्रियता कमी झाली होती. यासाठी संशोधकांनी दोन गट केले. एक गटाला "बायस्टॅंडर इफेक्‍ट' म्हणजे काय, याविषयी माहिती दिली. दुसऱ्या गटाला ही माहिती दिली नाही. यानंतर दोन आठवड्यांनंतर या दोन्ही गटांना वेगवेगळ्या वेळी एका पार्कमध्ये नेलं. दोन्ही वेळी जवळच्या एका बाकावरून एका माणसानं एकदम बेशुद्ध होऊन पडल्याचं नाटक केलं. पण हे नाटक आहे हे कोणालाच माहीत नव्हतं. ज्या गटाला "बायस्टॅंडर इफेक्‍ट'विषयी कल्पना होती त्यांच्यापैकी 50 टक्के मदतीसाठी पुढे आले, तर दुसऱ्या गटातले फक्त 25 टक्केच पुढे आले. अँड्य्रू मॉर्माईल या 17 वर्षांच्या मुलावरही मॅनहटनमध्ये ट्रेननं प्रवास करत असताना चक्क दिवसाढवळ्या चालत्या रेल्वेच्या डब्यात एकानं हल्ला करून पोटात सुरा खुपसला. या वेळी त्या डब्यात असलेल्या 11 लोकांपैकी मदतीला कोणीच पुढे धावलं नाही. शेवटी अँड्य्रू रक्तबंबाळ होऊन जागच्या जागीच मरण पावला. या घटनेवर "द इन्सिडेंट' नावाचा एक चित्रपटही निघाला होता. भारतात रस्त्यावर कोणी चक्कर येऊन पडला असेल किंवा कुठला अपघात झाला असेल तर कोणीच मदतीला येत नाही, हे आपण अनेकदा बघतोच. तेव्हाही तो "बायस्टॅंडर इफेक्‍ट'च असतो.

बघ्यांची संख्या जास्त असली म्हणजे मदत करायला कुणीच केव्हाच पुढे येत नाही, असं मात्र नाही. जर अशी मदत करणं हे शौर्याचं लक्षण असून, आपण मदत करायला पुढे आलंच पाहिजे, अशी जर सगळ्यांची समजूत झाली असेल तर मात्र बघ्यांची संख्या जास्त असूनही लोक चटकन पुढे येऊ शकतात. कारण तसं करण्यात सन्मान आणि कौतुक असतं. इतरांकडून त्यामुळे मान्यता मिळते. थोडक्‍यात, समाजात आत्मकेंद्री मूल्यांऐवजी सामाजिक हिताची मूल्यं रुजली असतील तर लोक इतरांची मनं जिंकण्यासाठी किंवा त्यांच्यावर छाप पाडण्यासाठी का होईना, पण एकमेकांना मदतीसाठी पुढे धजावतील. "आता ते पुढे येत नाहीत, कारण "आपण बरं आणि आपलं बरं' अशा समाजात रुजलेल्या आत्मकेंद्री मूल्यांमुळेच' असं काही मानसशास्त्रज्ञांना वाटायला लागलं. दुसऱ्यांना मदत करणं हे चांगलं आहे, अशी विचारसरणी असलेल्या एका गटात जेव्हा जास्त लोक हजर होते तेव्हा मदत करायला पुढे येणाऱ्यांची संख्या 74 टक्के होती; पण जेव्हा या बघ्यांची संख्या कमी होती तेव्हा फक्त 39 टक्के लोकच मदतीला पुढे आले. कारण आपलं कौतुक फारसं होणार नाही, असं कदाचित त्यांना वाटलं असावं. थोडक्‍यात, समाजातल्या मूल्यव्यवस्थेमुळे (व्हॅल्यू सिस्टीम) माणसांच्या वागणुकीत फरक पडतो, यात शंकाच नाही!

No comments:

Post a Comment